पुरणाचा घाट

Submitted by mrsbarve on 12 January, 2019 - 00:26

माझ्या माहेरी पुरणपोळ्या करणे याला पुरणाचा घाट घालणे असाच वाक्प्रचार होता!कारण घरात लाहान मोठी मिळून पंधरा माणसे!ज्या दिवशी पुरण पोळीचा घाट घातला जाई तेंव्हा आज्जी लीडर असे,तिच्या हाताखाली आई,दोन्ही काकवा नाचत असत! तेंव्हा पुरण यंत्र नव्हते !मला अजुनी आई,आज्जी,आणि दोन्ही काकवा आळीपाळीने पुरण पाट्यावर वाटताना ,अगदी तश्या आठवताहेत.एरवी आज्जी कधी तरीच स्वयपाकात मदत करत असे,ती भरपूर करारी स्वभावाची होती,त्यामुळे सुनांना बर्यापैकी धारेवर धरलेले असे! पण ज्या दिवशी पुरण्पोळिचा घाट असे त्या दिवशी तिचा उत्साह काय असे!तिच्या हातून भरपूर तेल घालून ती लांब लांब लांबणारी परातीतील कणिक मला तशीच्या तशी दिसते आहे अजुनी डोळ्या समोर!आणि तो वाटलेला पुरणाचा गोळा !आणि मग त्यातले थोडे पुरण आम्हा मुलांना खायला मिळायचे तेंव्हा झालेला कोण आनंद!बघता बघता आज्जी त्या कणकेच्या लहान लहान गोळ्यांमध्ये पुरणाचे गोळे भरी आणि एव्ह्ढाल्या ,तव्याएव्हढ्या मोठ्ठ्या मोठ्ठ्या पुरणाच्या पोळ्या करी,त्या मौसुत पोळ्यांच्या स्पर्शाने,चवीने,जीभ आणि मन अगदी प्रसन्न होऊन जाई,त्या सोनेरी पिवळ्या रंगावरती तुपाच्या सोडलेल्या धारा,मग वदनी कवळ घेता म्हणत संपवलेला वरण भात मग तुटून पडलेले आम्ही त्या पुरणपोळ्यांवर ! हेही चित्रही तसेच आहे डोळ्यासमोर!
त्या पोळ्यामागच्या कष्टांची आम्हाला जाणीव असण्याचं आमचं वय नव्हत हे खरेच पण आम्हाला असं खाताना पाहून आज्जीचा समाधानी झालेला चेहरा मला अगदी आठवतोय!
मध्ये काही वर्षे गेली , …पुरण पोळी एकाच घरात पण तीन वेगवेगळ्या स्वयपाक घरात बनत होती...पण त्यांना आज्जीच्या हातची सर होती?…
लग्न होऊन इकडे या देशात आले ,फोनवर आणि कमला बाइंच्या 'रुचिरा' वरून एक भांड्याच्या पुरणाचा "घाट" घातला! झकास पराठे तयार झाले! ते माझ्या बिचार्या नवर्याने 'गोड' मानून खाल्ले !पण पुन्हा कधीही मला पुरण पोळ्या कर असा हट्ट धरला नाही! बहुदा त्याने हायच खाल्ली!
मग वर्षानंतर प्रथमच सासरी गेले! तेथे तर पुरण पोळ्या म्हणजे प्रकल्पच होता.!एकावेळी शंभर दिडशे पुरणपोळ्या !सासूबाई आणि जावा आणि मी पण त्यांच्या हाताखाली पुरणपोळ्या बनवायला लागले !त्या माझ्या नवख्या पुरण पोळ्यांची चेष्टामस्करी होत हळू हळू सुधारित आवृत्ती तयार हॊउ लगलि. !त्या कष्टा मागचे संदर्भ कळत गेले. …आणि माझ्या सासुबाइनि चक्क मीठ मोहर्यांनी त्या सर्व पुरण पोळ्यांची दृष्ट काढली! हा प्रकार म्हणजे मला cultural shock च होता.
आता ते मला जरा विचित्र वाटले खरे ,पण मग विचार केला कि खरच एव्हढे कष्ट करून ,इतक्या पुरणपोळ्या करायच्या आणि त्याही सुंदर …तर त्यांची दृष्ट काढायला हवीच!काही चुकीचे नाही! त्यात भावना आहेत,अंधश्रद्धा नाहीत!
घरी पोळी बनवण्याचा व्याप गेल्या चार पाच वर्षात घातलाच नाहीय! दोन वर्षांपूर्वी तर चक्क भारतातून पोळ्या आणल्या दोन किलोच्या आणि खाऊन घेतल्या. आता होळी जवळ आली ना? पुरणपोळ्यांची खूप आठवण येतेय. सुट्टीच्या दिवशी काय माहित कदाचित घालेनहि पुरणपोळ्यांचा घाट!

आई कडे भारतात मस्त असतं ,पोळीवाल्या बाई झकास पैकी पुरणपोळ्या करून देतात ,काश मेरे पास भी पोळीवाली बाई असती! पण मला तर ते स्वप्न रंजन दूर ठेवून स्वत: कशा चांगल्या आणि कमी व्यापाच्या पुरणपोळ्या करता येतील हे पाहायचय! तर मंडळीनो कोणाकडे काही टिप्स ,काही सल्ल्ले असतील तर नक्की लिहा.. थोडक्यात २१ अपेक्षित सारखे!:)

हुश्श एव्हढे बोलून मी आपला निरोप घेते ,धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच आहे.देशावर, बायका अगदी सहजतेने पुपो करतात. पुरण पाट्यावर वाटण्यापासून!
माहेरी कधीच पुपो केली नव्हती.माझ्या घरी पहिल्यांदा केली तेव्हा हाफफ्राय ऑम्लेटपासून जाड काठ असलेल्या पोळ्या झाल्या होत्या.अजूनही सहजतेने येत नाहीत.माझ्या साबांनी मला गावी गेले असता विचारले की तू कशी करतेस पु.पो?तेव्हा तडफदारपणे सांगणार होते की मी विकत आणते म्हणून.पण साबांना सा.धक्का नको आणि एका मैत्रिणीची शिकवण म्हणून म्हटले की नेहमी करतो तशाच.वाईट वाटले खोटे बोलताना.पण मग त्यांनी सांगितले की मैद्यात नुसतेच थंड तेल घालण्यापेक्षा तापवून घाल म्हणून.पोळ्या खुसखुशीत होतात.

,पोळीवाल्या बाई झकास पैकी पुरणपोळ्या करून देतात >>>>> सगळ्याच पोळीवाल्या पु.पो करून देत नाहीत.

छान लिहिलं आहे. पुरणपोळी चा घाटच असतो. कारण पुरणपोळी बरोबर कटाची आमटी, साधा वरण भात, बटाट्याची भाजी आणि भजी कुरडई पापड ही कराव लागत. मला पण जमत नव्हते एकटीला करायला. आता लग्नाला चार वर्ष झाली जमते आता. सासूबाई माझ्याकडे आल्या असताना त्यांना नाष्ट्याला पुरणपोळी करून दिली (पुरण शिल्लक होता मागच्या आठवड्यातील), त्यांनी छान म्हटलं म्हणजे समजून गेले यायला लागली पुरणपोळी करायला. पुरण शक्यतो जास्त घालावा कारण करणारी खायला नाही मिळत वेळेवर so जास्त करून fridge मध्ये ठेवावा एखादा निवांत bf/lunch/dinner time पाहून दोन गरमगरम पोळ्या करून तूप लावून शांत पणे खाव्यात. अहाहा काय मस्त. मी पण करते आता मला खुप दिवस झाले आठवण येतेय तिची.
एकटीने करायचे म्हटले तर सलग 3 तास लागतात सगळा घाट उरकायला त्यात नवऱ्याला पुरण यंत्र्यातून पुरण वाटून द्यायला सांगावं.
डाळ दोन तास भिजवा, सकाळी उठल्या वर प्रथम अंघोळ करून डाळ भिजवणे मग इतर कामे. कणिक मळून घ्या. वरण भात बटाटा चा कुकर लावा. आमटी ची तयारी, वाटण करून ठेवा. चहा पिऊन घ्या. गूळ चिरून ठेवा प्रमाण जेवढी डाळ तेवढे. वेलची पावडर करून घ्या. अजून आठवा काय तयारी करायची ते. तोवर नवरा मुलं उठताहेत, त्यांना काय हवा नको ते बघा. होताहेत दोन तास.
आता डाळ (थोडे तूप हळद किंचित मीठ, डाळीच्या सहापट पाणी) पातेल्यात शिजायला ठेवून द्या. कुकर झालेला असेल बटाटे काढून घ्या. बटाटा भाजी, वरण करून ठेवा. मधून मधुन डाळ बघत राहा. नवऱ्याचा मागे लागा पटपट आवर म्हणून.
डाळ शिजली कि निथळून घ्या हे पाणी म्हणजे कट निघाला आमटीला. आता डाळ त्याच पातेल्यात ठेवून परता, पाणी सुकू द्या आणि डाळ हाटून घ्या मग चिरलेला गूळ टाका आणि मिश्रण एकजीव होऊ द्या. हे सगळं medium flame वर करा. मिश्रणात उलथनं उभा राहिलं कि पुरण झाला असा समजा. Gas off करा. नवऱ्याला आवाज द्या. तो येई पर्यंत पाच minutes होताहेत. पुरण थोडा थंड झाले असेल. त्याला वाटायला सांगा. तोवर तुम्ही कुरडया पापड भजी तळून आमटी फोडणीला टाका. कुरडया मग पापड मग भजी हा sequence ठेवा. नंतर तेच उरलेल तेल घेऊन आमटी करा तेल लागेल तेवढा घ्या. आता कणिक पुन्हा तेल पाणी लावून तिंबुन घ्या. तोवर होत आहेच पुरण वाटून. आता करा पोळ्या... आता उरलेला नंतर टायपते.

पुरणपोळीच्या खूप आठवणी आहेत. मला शक्यतोवर आवडत नाही, पण आजी करताना बघून नक्कीच खातो.
एकदा मी सहज आईला विचारलं, की हा काही एवढा भारी पदार्थ नाहीये, एवढी मेहनत करून बनवायला. तर तिने दिलेलं उत्तर मोठं मार्मिक होतं.
"पूर्वी सगळ्यांना राजेशाही गोडधोडाचे चोचले परवडत नसत. दुधाची मिठाई करायची, तर दूध हवं... रात्री अपरात्री कुणी गोडाचा हट्ट केला, तर काय करायचं? शिवाय सणासुदीला भरपूर पुरेल, आणि चवही गोड येईल, गरीब श्रीमंत सगळयांना आवडेल, असा पदार्थ पुरणपोळी!
घरचच पीठ, घरचाच गूळ, आणि घरातलीच डाळ. यासाठी विशेष वेगळा जिन्नस आणावा लागत नाही, मग सण साजरा करायला सोपा गेलं तर नवल काय?"
आजी मस्त पुरणयंत्रात पुरण काढून घायची, आणि छोट्या छोट्या मैद्याच्या गोळ्यात भरायची. मग पोळपाटावर तो गोळा हळूहळू मोठा होत जायचा. तो त्यावर मावेनासा झाला, की दोन्ही हातांच्या कोपऱ्यांनी त्याचा पेंडुलम करणं चालू होतं! एवढं मोठं खापर, पण त्यापेक्षा एवढ्याशा गोळ्याची पुरणपोळी मोठी येते.
मग खरपूस भाजून, त्याची घडी घालून पांढऱ्या उपरण्यात आणि बांबूच्या डालकीत पोळ्या जातात.
आता इतकी छान प्रोसेस बघितल्यावर, खावी तर लागणार!

छान लिहिले आहे. प्रतिसाद पण भारी

पुरण शक्यतो जास्त घालावा कारण करणारी खायला नाही मिळत वेळेवर so जास्त करून fridge मध्ये ठेवावा एखादा निवांत bf/lunch/dinner time पाहून दोन गरमगरम पोळ्या करून तूप लावून शांत पणे खाव्यात. >>+१

लहानपणी बाबांची मावशी चिपळूनहून घरी येत असे, ती आली की आवर्जून पुरणपोळी चा घाट घातला जायचा,
आजी-मावस आजी आणि मदतीला आई,

आता बायकोला पुरणपोळ्या करायचा प्रचंड उत्साह असतो.
मात्र वर्षातून एकदा-दोनदा च या प्रकाराला हात लागत असल्याने सगळ्या पोळ्या खात्रीने चांगल्याच होतील याची हमी कोणी देऊ शकत नाही, वर स्पीड कमी म्हणून मोठ्या प्रमाणावर केले जाणे टाळले जाते.
खात्रीने चांगल्या, हव्या तेव्हा, हव्या तितक्या पोळ्या USK मध्ये उपलब्ध असल्याने घरी पोळ्या करण्याचे कष्ट कोणी करू नये अश्या मताचा मी आहे.

अर्थात माझे हे मत असल्याने त्याला घरी किंमत नाही,
त्यामुळे होळीच्या आसपास घरी पोळ्या बनतात Happy

घरच्या पोळीची चव विकतच्या पोळीला नाही. फक्त चांगला लालसर तपकिरी गूळ मिळायला हवा. मंडईपाशी काही दुकानांत उच्च प्रतीचा गूळ मिळतो तो वापरुन चांगल्या पोळ्या बनतात.

घरच्या पोळीची चव विकतच्या पोळीला नाही>>> +१११

इकडे मुंबई ठाण्यात जी पुपो विकतात ती तुरीच्या डाळीची करतात. अन पुरण सुद्धा कंजूशी ने भरलेले असते सो विकतची पुपो नाही आवडत.

बाकी घरच्या पुपो बद्दल सवडीने लिहीन☺️

गुजराती दुकानात घेतलीत ( टीपोकल मुंबई ची ड्राय फ्रुट स्टोअर्स टाईपची दुकाने) तर तुरीची मिळते,

आमच्या पुण्यात सगळीकडे चण्याच्या डाळीचीच मिळते, वर ज्यांना हरभऱ्याची डाळ सोसत नाही त्यांच्यासाठी मुगाच्या डाळीची पण मिळते.

@शीतल कृष्णा मस्त लिहिले आहेस,एकदम २१ अपेक्षित!धन्यवाद गं !
@अज्ञातवासी ,पुरणपोळी आवडत नाही?बाप रे ,कसं काय म्हणे?!
@सिम्बा <<<<<<<<<,आता बायकोला पुरणपोळ्या करायचा प्रचंड उत्साह असतो.>>>>>>>>>लकी आहात Happy
@बिपीन ,exactly !घरची पुरणपोळी ती घरची!
@VB ,घरच्या पुरणपोळी बद्दल नक्की लिहा,वाचायला आवडेल.
@sonalisl ,धन्यवाद

पुराणांमध्ये वेलची पावडर बरोबर बडीशेपेची पूड घातली असता पुरण पोळी खमंग होते.. दोन वाट्या डाळीला एक छोटा चमचा बडीशेप पावडर पुरेशी होईल..

मी पुरण पोळी स्वत: च शिकले,मला कोणी शिकवले नाही.पण मला भाकरी,पुरण-पोळी,कुरवड्य,पापड,सांडगी येतात हे पहिल्या भेटीत कुणाला ही खरे वाटत नाही, हे मी खूपदा अनुभवले!
तू करतेस?
तुला येत?
हेच आश्र्चर्य कारक उद्गार माझ्यासमोर स्वत: ला माझी मैत्रीण म्हणणारे काढतात.

@VB ,घरच्या पुरणपोळी बद्दल नक्की लिहा,वाचायला आवडेल.>>> mrsbarve, अजून कोणीतरी सांगितले होते लिहायला सो मी नवीन धागा काढलाय.
खाली लिंक देतीये☺️

https://www.maayboli.com/node/68656

मी अगदी पहिल्यांदा एक वाटीच पुरण केलेलं. एक वाटी चणा डाळ वरण -भाताबरोबर कूकरमध्ये लावून नंतर पातेल्यात गूळ टाकून मस्त पुरण झालं होतं. आता जास्त प्रमाणात करते पण चणा डाळ कूकरलाच शिजवते.

मला पण पुरण पोळी आव्डत नाही. त्यापेक्षा चितळे कडे पूर्वी मिळत ते साखर लावलेले लांबट सुके गुलाब जाम भारी वाटतात. पाकातले गुलाब जाम पहिल्यांदा पाहिले तेव्हा हे काय आणि नवीन असे वाटले होते. कटाची आमटी व भात मात्र जबरी काँबिनेशन. ते ही आईच्या हातचीच आमटी.

एकदा करायला घेतल्या तेव्हा पुरण अंमळ पातळ राहिले होते ते कोरडे घट्ट करायची युक्ती आहे?

पाकातले गुलाब जाम पहिल्यांदा पाहिले तेव्हा हे काय आणि नवीन असे वाटले होते. >>>>>>>>
अहोss आश्चर्यम्!!!!!

मला पण पुरण पोळी आव्डत नाही. >>>>>>
अतिआश्चर्यम्!!!!!!!

@अमा, डाळीमध्ये गूळ घालण्यापूर्वी ती पाणतुटी करा म्हणजे परतवा मग गूळ घाला. आणि जोपर्यंत उलथनं उभा राहत नाही त्या मिश्रणामध्ये तोपर्यंत हलवत राहा. हे tested n proved आहे, असा केल्यास नाही होणार पुरण पातळ.
@ट्युलिप, कुकर ला शिजवलेले पुरण आणि पातेल्यात शिजवलेले चव वेगळी असते.
@अज्ञातवासी, तुम्ही सांगतली आहे ती कृती पुराणाचे मांडे म्हणून प्रसिद्ध आहे. खापरावर भाजतात.
@VB, लेख छान आहे, परंतु पुरणपोळी गव्हाची कणिकच वापरतात बरेच ठिकाणी आम्ही नाही मैदा रवा वापरात. गावी सासरी रत्नागिरी ला मैदा वापतात गोड करायला गहू नसतो तिकडे, पण नाही खाल्ली गावी पण रवा मैदा ची पोळी. गावच्या चुलत सासूबाई तांदळाचेच गोडाचे पदार्थ करतात सणासुदीला, पोळी नाहीच. माझ्या सासूबाई मात्र पुण्यातच राहतात गेली 60years, so सगळा पुणेरीच शक्यतो. माझी आई पुणेरी ब्राह्मणी पद्धतीचा स्वयंपाक करते. कटाची आमटी पण गोड वाली चिंच गूळ घातलेली. लग्न झाल्यावर सासूबाई चे पाहून मी वाटणाची आमटी करायला शिकले.

@mrsbarve, thank you तुला आवडले. अजून सविस्तर लिहणार होते परंतु लिहियचा कंटाळा. तुला काही विचारायचे तर विचार ajun.
@सिम्बा, आमचे शेजारी मारवाडी आहेत त्यांच्याकडे तुरीच्या डाळीची पुरणपोळी खाल्ली आहे.

मस्त लेख.

आई फार सुंदर पु पो करायची, आता वयामुळे होत नाही. मी तिच्या हाताखाली मदत म्हणून करायचे. सासरी कधी सासुबाई वगैरे असल्या तर हाताखाली पण सासरी पु पो पेक्षा आंब्याच्या पोळ्या जास्त करतात. माहेरी सासरी होळीला पुरणपोळी. एरवी कधी क्वचित श्रावण महीन्यात करतात.

इथे पुरणपोळ्या सर्रास विकत मिळतात पोळी भाजी केंद्रात, चांगल्या असतात त्यामुळे घरी नाहीच घाट घालत.

Pages