आ..आ... च्छी ! अर्थात अ‍ॅलर्जिक सर्दी

Submitted by कुमार१ on 31 December, 2018 - 00:23

सध्या आपल्याकडे थंडी पडली आहे. पहाटे व रात्री एकदम थंड तर दुपारी बऱ्यापैकी गरम असे विषम हवामान अनेक ठिकाणी आहे. आता पुढचे ३ महिने हवेतील अ‍ॅलर्जिक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढत जाईल. मग या लेखाच्या शीर्षकात लिहिल्याप्रमाणे बऱ्याच जणांना फटाफट शिंका येत राहतील. त्यापुढे जाऊन सर्दी अथवा नाक बंद होणे, डोळे चुरचुरणे आणि एकूणच बेजार होणे अशा अवस्था येऊ शकतील. एकंदर समाजात या त्रासाचे प्रमाण लक्षणीय आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतच आहे. या आजाराची कारणमीमांसा, लक्षणे, तपासण्या आणि उपचार या सर्वांचा आढावा या लेखात घेत आहे.

या आजाराचे शास्त्रीय नाव Allergic Rhinitis असे आहे. Rhino = नाक व itis = दाह. ‘सर्दी’ होण्याचे हे समाजात सर्वाधिक आढळणारे कारण आहे. हवेतील सूक्ष्मकण नाकात जातात आणि मग त्यांचे वावडे (allergy) असलेल्या व्यक्तीस नाकाच्या आतील पातळ आवरणाचा(mucosa) दाह होतो. परिणामी त्या व्यक्तीत खालीलपैकी काही लक्षणे दिसतात:
१. शिंका येणे
२. नाक चोंदणे व खाजणे
३. नाकातून सर्दी वाहणे
४. डोळे चुरचुरणे
५. घसा खवखवणे
६. कान अथवा कपाळ दुखणे

कारणमीमांसा
साधारणपणे असा त्रास होण्यास हवेतील काही पदार्थकण कारणीभूत ठरतात. त्यामध्ये धूळ, परागकण, बुरशीचे बीजकण (mold spores) आणि पाळीव प्राण्यांच्या संपर्कातून आलेले कण (mites) यांचा समावेश होतो. परागकण हे विविध झाडे, गवत आणि तण यांच्यातून येतात. भौगोलिक स्थानानुसार यांचे प्रमाण काही ऋतूंत वाढते. भारतात डिसेम्बर ते मार्च या काळात झाडांची पानगळ खूप होते. त्यातून सूक्ष्मकण हवेत पसरतात. अगदी घरातही गालिचे, सोफ्याची आवरणे, उशांचे अभ्रे आणि पडदे अशा अनेक वस्तूंतून धुलीकण हवेत पसरतात. याव्यतिरिक्त काही व्यावसायिकांना त्यांच्या रोजच्या कामामुळे असा त्रास सहन करावा लागतो. यात सुतारकाम, रासायनिक प्रयोगशाळा व कारखाने, शेती आणि जनावरांचे दवाखाने असे व्यवसाय येतात.
जर अशी व्यक्ती धूर, प्रदूषण किंवा तीव्र वासांच्या संपर्कात आली तर तिची लक्षणे अजून वाढतात. मुळात एखाद्याच्या शरीरात अ‍ॅलर्जिक प्रवृत्ती निर्माण व्हायला त्याची जनुकीय अनुकुलता असावी लागते. आता अशा कणांच्या (allergens) श्वसनातून नाकात पुढे काय होते ते पाहू.

अ‍ॅलर्जिची शरीरप्रक्रिया:
आपल्या प्रतिकारशक्तीचा एक भाग म्हणजे आपल्या रक्त आणि इतर स्त्रावांत असलेली प्रतिकार-प्रथिने अर्थात इम्म्युनोग्लोब्युलिन्स (Ig). त्यांचे ५ प्रकार असतात आणि त्यातला अ‍ॅलर्जिच्या संदर्भातला प्रकार आहे IgE. प्रथम अ‍ॅलर्जिक कण नाकात शिरतो. त्यावर प्रतिकार म्हणून विशिष्ट IgE तयार होते. नाकाच्या आतील आवरणात विशिष्ट पांढऱ्या पेशी असतात. हे IgE त्या पेशींवर चिकटते. आता या पेशी उत्तेजित होतात आणि काही रसायने बाहेर सोडतात. त्यातली दोन प्रमुख रसायने आहेत Histamine व Leukotrienes.
ही रसायने आवरणातील म्युकस-ग्रंथींना उत्तेजित करतात आणि मग तिथे भरपूर द्रव तयार होतो. ह्यालाच आपण ‘सर्दी’ म्हणतो. मग तेथील चेतातंतू उत्तेजित होतात आणि त्यामुळे शिंका येणे व नाक खाजणे ही लक्षणे दिसतात.
ही प्रक्रिया नाकापुरती मर्यादित नसते. ती पुढे जाऊन सायनसेस, कानातील नलिका, घसा आणि डोळे इथपर्यंत पसरते. या भागांतील पेशींत (रक्तातील) पांढऱ्या पेशी उत्तेजित होऊन लढू लागतात. परिणामी दाह होतो. नाकातील द्रवाचे प्रमाण खूप वाढल्यास त्याची धार (postnasal drip) तयार होते आणि ती आपसूक खालील श्वसनमार्गात उतरते.

दीर्घकालीन परिणाम :

अ‍ॅलर्जिक सर्दी वारंवार झाल्यास त्यातून नाकाच्या आजूबाजूच्या इंद्रियांच्या समस्या निर्माण होतात. या रुग्णांना पुढे कानाचा अतर्गत दाह होतो आणि Eustachian नलिकेचा बिघाड होतो. तसेच विविध सायनसेसचेही दाह (sinusitis) होतात.
बऱ्याचदा या रुग्णांना दमा आणि त्वचेचा अ‍ॅलर्जिक दाह बरोबरीने असल्याचे दिसते. जेव्हा विशिष्ट मोसमात अ‍ॅलर्जिक सर्दी होते तेव्हा हे आजार अजून बळावतात. एकंदरीत असे रुग्ण त्रस्त व चिडचिडे होतात.

रुग्णतपासणी:

वर वर्णन केलेले या आजाराचे स्वरूप बघता रुग्णाने योग्य त्या तज्ञाकडून नाक, घसा, कान व डोळे यांची प्रामुख्याने तपासणी करून घ्यावी. अशा तपासणीत साधारणपणे खालील गोष्टी आढळतात:

१. नाक: पातळ आवरणाचा भाग सुजलेला आणि निळसर-करडा दिसतो. कधी तो लाल देखील असतो.
२. घसा: सूज आणि रेषा ओढल्यासारखे दृश्य दिसते. टॉन्सिल्स आकाराने मोठे व सुजलेले असू शकतात.
३. कान ; दाहाची लक्षणे.
४. डोळे: लालबुंद, काहीशी सूज आलेली आणि अश्रूंचे प्रमाण वाढते.
गरजेनुसार अशा रुग्णाची छाती व त्वचेची तपासणी करतात.

प्रयोगशाळा आणि अन्य तपासण्या
अ‍ॅलर्जिचे निदान करण्यासाठी यांची मदत होते. सामान्यतः खालील दोन चाचण्या केल्या जातात:
१. रक्तातील eosinophil या पांढऱ्या पेशींचे प्रमाण मोजणे : अ‍ॅलर्जिक रुग्णात यांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते.
२. रक्तातील IgE या प्रथिनाचे प्रमाणही वाढलेले असते.

या दोन्ही चाचण्या अ‍ॅलर्जिच्या निदानासाठी पूर्णपणे खात्रीच्या (specific) नाहीत. पण त्या करण्यास सोप्या आहेत व सामान्य प्रयोगशाळांत होतात. रुग्णाचा इतिहास, तपासणी आणि या चाचण्यांचे निष्कर्ष असे सर्व एकत्रित अभ्यासल्यास रोगनिदान होते. बहुतेक रुग्णांच्या बाबतीत हे पुरेसे असते.
काही विशिष्ट मोजक्या रुग्णांसाठी याहून वरच्या पातळीवरील चाचण्या करण्याची गरज भासते. त्या अशा आहेत:

१. त्वचेवरील अ‍ॅलर्जिक तपासणी: ही करण्यासाठी विशेष प्रशिक्षित तज्ञ लागतो. रुग्णाचा इतिहास आणि राहायच्या ठिकाणानुसार ठराविक अ‍ॅलर्जिक पदार्थांची निवड केली जाते. मग असे पदार्थ इंजेक्शनद्वारा सूक्ष्म प्रमाणात त्वचेत टोचले जातात. त्यानंतर काही वेळाने टोचल्याच्या जागेवर काय प्रतिक्रिया (reaction) दिसते ते पाहतात. जेव्हा ही प्रतिक्रिया तीव्र स्वरूपाची असते, तेव्हा त्या पदार्थाची रुग्णास अ‍ॅलर्जि आहे असे निदान होते.

२. असे पदार्थ रुग्णास टोचल्यानंतर त्याच्या रक्तातील IgEचे प्रमाण मोजणे. परंतु या चाचणीचे निष्कर्ष पहिल्या चाचणीइतके विश्वासार्ह नसतात.
एक लक्षात घेतले पाहिजे. या विशिष्ट चाचण्या करूनही रुग्णास नक्की कशाची अ‍ॅलर्जी आहे याचा शोध दरवेळी लागेलच असे नाही. बऱ्याचदा ‘अमुक इतक्या पदार्थांची अ‍ॅलर्जी नाही’ असा नकारात्मक निष्कर्षच हाती पडतो ! म्हणूनच उठसूठ या चाचण्या करीत नाहीत.

उपचार :
यांचे ३ गटांत विवेचन करतो:
१. अ‍ॅलर्जिक कणांचा संपर्क टाळणे
२. नेहमीचे औषधोपचार
३. इम्युनोथेरपी

अ‍ॅलर्जिक कणांचा संपर्क टाळणे:

तसे पाहता हा उपाय सर्वोत्तम ठरेल. अर्थात हा सांगायला सोपा पण आचरायला महाकठीण आहे ! तेव्हा जेवढे शक्य आहे तेवढे टाळावे असे म्हणतो. भारतात डिसेंबर ते मार्चदरम्यान पहाटे व सकाळच्या वेळेत अशा कणांचे प्रमाण जास्त असते. त्या वेळात घराबाहेर पडणे टाळावे. तसेच धूर, धूळ व तीव्र वासांपासून जमेल तितके संरक्षण करावे. बाहेर पडताना गरजेनुसार तोंडावरील ‘मास्क’चा वापर करावा.
घरात साठणाऱ्या धुळीसाठी योग्य ते स्वच्छतेचे उपाय केले पाहिजेत. उशीचे अभ्रे, पडदे, अंथरूण आणि गालिचे यांची योग्य निगा राखणे महत्वाचे.
परागकणांची अ‍ॅलर्जी असणाऱ्या रुग्णांना मात्र वरील काळजी घेऊनही ठराविक मोसमात त्रास होतोच. तो कमी करण्यासाठी औषधोपचार गरजेचे असतात.

औषधोपचार

साधारण जेव्हा ‘सर्दी’चा त्रास सुरु होतो तेव्हा रुग्ण प्रथम घरगुती उपचारांचा अवलंब करतो. मात्र ही सर्दी जर अ‍ॅलर्जिक असेल तर त्यांचा फारसा उपयोग होत नाही. हळूहळू हा त्रास वाढू लागतो आणि रुग्णास बेजार करतो. अशा वेळेस वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. अ‍ॅलर्जिक सर्दीसाठी अनेक उपचारपद्धतींची औषधे उपलब्ध आहेत. या लेखाची व्याप्ती आधुनिक वैद्यकातील औषधांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे त्यांची जुजबी माहिती देत आहे. (ज्या वाचकांना अन्य उपचारपद्धतींची माहिती वा अनुभव असतील त्यांनी ते प्रतिसादात जरूर लिहावेत. त्याचा आपल्या सर्वांनाच फायदा होईल). खालील सर्व औषधे ही वैद्यकीय सल्ल्याविना कोणीही घेऊ नयेत ही सूचना.

औषधांचे प्रमुख गट:

१. Antihistamines : ही गोळ्यांच्या रुपात वापरतात. अ‍ॅलर्जीमुळे शरीरात जे Histamine तयार होते त्याचा ती विरोध करतात.
ही औषधे सुमारे ५० वर्षांपासून वापरात आहेत. त्यातील पहिल्या पिढीच्या गोळ्यांमुळे रुग्णास गुंगी येत असे. आता दुसऱ्या पिढीची औषधे ही त्या बाबतीत सुधारित आहेत. तरीही काहींना त्यामुळे तोंडाचा कोरडेपणा आणि त्वचेवर पुरळ येऊन खाजणे असे दुष्परिणाम जाणवतात. यावर मात करण्यासाठी आता या औषधांचे नाकात मारायचे फवारे निघाले आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण शरीरातील दुष्परिणाम फारसे होत नाहीत. मुळात अ‍ॅलर्जीविरोधी औषधे म्हणून ही विकसित झाली; पण त्यांच्या वापरानेसुद्धा काहींना (वेगळी) अ‍ॅलर्जी होऊ शकते हा विरोधाभास आहे ! ‘सर्दी’च्या अन्य काही प्रकारांसाठी ती स्वतःहून उठसूठ घेऊ नयेत.

२. Decongestants : ही औषधे चोंदलेले नाक मोकळे करतात. ती वरील गटाच्या बरोबर देतात. अलीकडे या दोन्ही गटाच्या औषधांचे मिश्रण उपलब्ध आहे.

३. नाकातील Steroidsचे फवारे: जेव्हा हा आजार दीर्घकालीन होतो तेव्हा वरील औषधांपेक्षा हे फवारे उपयुक्त ठरतात. ही औषधे आता विकसित होत तिसऱ्या पिढीत पोचली आहेत. पहिल्या पिढीतील औषधांचे नाकातून रक्तात शोषण होई व त्यामुळे शरीरभरातील दुष्परिणाम होत. आता तो भाग बराच सुधारला आहे. या औषधांमुळे रुग्णाच्या शिंका, नाक खाजणे, नाक चोंदणे आणि वाहणे ही सर्व लक्षणे कमी होतात. त्यामुळे ती वरील दोन गटांपेक्षा अधिक फायद्याची आहेत. अर्थात त्यांच्यामुळे डोळ्यांची खाज मात्र कमी होत नाही. या फवाऱ्यामुळे नाकात चुरचुरणे किंवा रक्त येणे असे तात्पुरते दुष्परिणाम होऊ शकतात.

४. Steroids च्या पोटातून घ्यायच्या गोळ्या: जेव्हा रुग्णास हा त्रास असह्य होतो व निव्वळ वरील औषधे व फवाऱ्यानी आटोक्यात येत नाही तेव्हाच याचा विचार अगदी थोड्या कालावधीकरता केला जातो; ही उठसूठ घ्यायची नसतात.

५. Antileukotrienes : वर पाहिल्याप्रमाणे अ‍ॅलर्जी प्रक्रियेत तयार होणारी अन्य एक रसायने आहेत leukotrienes. ही औषधे त्यांच्या विरोधी कार्य करतात. Antihistaminesना पर्याय म्हणून ती वापरता येतात.
औषधोपचाराबरोबर गरम पाण्याची वाफ घेणे इत्यादी पूरक उपचार उपयुक्त ठरतात.
(वरील सर्व औषधांची माहिती सामान्यज्ञान होण्याइतपतच दिली आहे. त्यांपैकी कुठलेही औषध वैद्यकीय सल्ल्याविना घेऊ नये).

इम्युनोथेरपी

हे उपचार काहीसे लसीकरणासारखे आहेत. ज्या रुग्णांना अ‍ॅलर्जीचा असह्य त्रास होतो त्यांच्या बाबतीत याचा विचार केला जातो. पण त्यासाठी रुग्णास नक्की कुठली अ‍ॅलर्जी आहे हे त्वचा-अ‍ॅलर्जी चाचणीने सिद्ध झालेले असले पाहिजे. समजा एखाद्याला गवतातून उडणाऱ्या सूक्ष्मकणांची अ‍ॅलर्जी आहे. तर या व्यक्तीसाठी त्या कणांपासून तयार केलेले अर्क (allergen extract) उपलब्ध असतात. त्या अर्काच्या गोळ्या जिभेखाली ठेवून घेतात. संबंधित अ‍ॅलर्जीचा मौसम सुरु होण्याच्या ४ महिने अगोदर हे उपचार सुरु करतात. हे उपचार दीर्घकाळ घ्यावे लागतात. त्याने फरक पडल्यास पुढे काही वर्षे चालू ठेवतात.

समारोप

अ‍ॅलर्जिक सर्दी हा समाजात बऱ्यापैकी आढळणारा आजार आहे. साधारण ३०% लोकांना तो असतो. मुलांतील त्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. हा आजार वरवर दिसायला साधा वाटला तरी प्रत्यक्षात तसा नसतो. या त्रासाने पिडीत रुग्ण त्या मोसमात अक्षरशः पिडलेला असतो. त्या त्रासाने त्याच्या कामावर व दैनंदिन जीवनावर आणि कौटुंबिक स्वास्थ्यावरही बऱ्यापैकी परिणाम होतो. काहींना तर दर ३ सेकंदांना एक अशा वेगाने शिंका येतात. अशा रुग्णांना त्या संपूर्ण मोसमात नैराश्य येते. हा आजार नाकापुरता मर्यादित न राहता अन्य इंद्रियांवर परिणाम करू शकतो. काही जणांना याच्या बरोबरीने दम्याचाही त्रास असू शकतो. म्हणून त्याकडे वेळीच लक्ष देणे आणि योग्य ते उपचार करून घेणे आवश्यक ठरते.
****************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तशी मला बारा महिने सर्दी थोड्या फार प्रमाणात का होईना असतेच पण गेले दोन दिवस थंडी वाढल्यामुळे सर्दीही वाढली आहे, आणि तुम्ही दिलेली सगळीच लक्षणे दिसत आहेत, अजून तरी कोणतेही औषध सुरु केलेले नाही पण वाफारा घेतो आहे. थोडा फरक पडतो पण बहुतेक थंडी कमी झाल्यावर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतल्यावरच आराम मिळेल..

हा आजार वरवर दिसायला साधा वाटला तरी प्रत्यक्षात तसा नसतो. या त्रासाने पिडीत रुग्ण त्या मोसमात अक्षरशः पिडलेला असतो. त्या त्रासाने त्याच्या कामावर व दैनंदिन जीवनावर आणि कौटुंबिक स्वास्थ्यावरही बऱ्यापैकी परिणाम होतो.

अगदी अगदी. माझा याबाबतीतला अनुभव असा आहे की परागकणांचा मोसम गेल्यानंतरही माझी अ‍ॅलर्जीची लक्षणं (नाक बंद, नाक गळणे, प्रचंड प्रमाणात postnasal drip वगैरे) कमीच झाली नाहीत. मग त्याचा संपूर्ण प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला (कारण ही सगळी लक्षणं + त्यामुळे सतत झोपेचा अभाव + ह्या सगळ्यामुळे आलेला भयंकर ताण). हे सगळं इतकं विकोपाला गेलं की मला तो देश सोडावा लागला. अजूनही ते दिवस (६ महिने) आठवले की अंगावर काटा येतो, विशेषतः हे नुकतंच घडलं असल्यामुळे. त्यातून बाहेर पडायला जवळपास एक वर्ष लागलं, पण अजून नाक इतकं सेन्सिटिव्ह आहे की कधी अ‍ॅलर्जीचा अटॅक येईल सांगता येत नाही.

छान माहीती. धागा साठवून ठेवतो.

मला वर्षाचे बारा महिने सर्दी असते. माझ्या खिशात नेहमी दोन रुमाल असतात. त्यातील डाव्या खिशातील रुमाल सर्दीचा असतो.
कधीतर अचानक ईतकी सुरू होते की मोबाईल कॉम्प्युटर स्क्रीन कडे बघवतही नाही. डोळ्यातूनही पाणी येते. ऑफिसमधून पळून घरी येतो. हे असे साधारण महिन्यातून एकदा होते.

या आजाराचा फायदा एकच - घरी कुठलेही साफसफाईचे काम करावे लागत नाही Happy

वरील सर्वांचे आभार.
आपल्या सर्वांचे अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक आहेत.

हे सगळं इतकं विकोपाला गेलं की मला तो देश सोडावा लागला.>>>>> +१
या आजाराचा फायदा एकच - घरी कुठलेही साफसफाईचे काम करावे लागत नाही >>>> Bw

@ साद
खाण्यातील काही पदार्थांमुळे अशी सर्दी होते का ? >>>

होय, तशी होऊ शकते. पण त्यात एक फरक दिसतो. त्या व्यक्तीस सर्दी व्यतिरिक्त त्वचेचा, पचनसंस्थेचा अथवा फुफ्फुसाचाही त्रास होतो. अशी allergy ओळखायला सोपी जाते.
मानव, धन्स.

अगदीच जिव्हाळ्याचा विषय आहे हा धागा म्हणजे Happy
भारतात असताना रोज सकाळी शिंका, नाक चोंदणे हे प्रकार व्हायचे. ८-१० वर्षांपूर्वी तेव्हा इतका अ‍ॅलर्जीचा विचार नव्हता आला. असं वाटायचं रात्रभर फॅन चालू असतो वगैरे वगैरे त्यामुळे होत असेल.

इकडे न्यू जर्सीमधे आल्यावरही हा त्रास होतच आहे. बाराही महिने सर्दी, घसादुखी, कणकण असतेच. कंटाळून आता आयुर्वेदीक ट्रीटमेंट चालू केली आहे. बघू काय फरक पडतोय. माझी इम्युनिटी पण कमी आहे असे आयु. डॉ. ने सांगितलेय.

अंजली, तुमचा अनुभव दखलपात्र आहे.
या आजाराबाबाबत राहण्याचे स्थानबदल (निदान मोसमात) केल्याने काही फरक पडतो का, असा प्रश्न बरेच रुग्ण विचारतात. या संदर्भात दोन्ही प्रकारचे अनुभव येतात:

१. समजा एखाद्याचे राहायचे ठिकाण असे आहे: बऱ्यापैकी थंड हवा, सकाळ-दुपार तापमानात खूप फरक, डोंगरमाथा आणि खूप धूळ. हा रुग्ण पिडलेला आहे.
आता मोसमात तो स्थलांतर करतो ते ठिकाण असे: कोरडे व उष्ण आणि समुद्राला जवळ. इथे कमाल- किमान तापमानातील फरक बराच कमी असतो. त्याला इथे बरे वाटते.

२. पण समजा त्याने अशा ठिकाणी कायमचे स्थलांतर केले तर तो आजारापासून मुक्त होईल का? याचे उत्तर सोपे नाही. बरेचदा त्याला काही काळ छान वाटते पण कालांतराने तिथेही काहीसा त्रास सुरु होतो. याचे कारण त्याच्या अलर्जीसाठी त्याचे जनुक जबाबदार असतात.

३. तर काहींना स्थानबदलाने फरक पडत नाही.

चांगला लेख नेहमी प्रमाणेच. माझ्या नवर्‍याला हा त्रास होत असे. पण त्याला घातक असे तो सिगरेट स्मोकिन्ग पण बरोबरीने करत असे व त्रास प्लस खोकला वाढत असे त्याला स्मोकर्स कफ असे ग्लोरिफाय करतात. हे अतिश य घातक काँबिनेशन आहे. त्यात तो कधीच वैद्यकीय सल्ला ह्या बाबींवर घ्यायला आला नाही. फार्मा मध्ये कामे केल्याचा अनुभव आहे असे सांगून प्रत्यक्ष दुकानातूनच सिट्रिझीन नामक गोळ्या आणून खात असे. म्हणजे मला कधी मधी सर्दी झाली ( बॅक्ट्रेरियामुळे/ जीवाणूं मुळे) तर माझे उपाय. व्हिक्स लावुन, गरम सुप पिउन झोपणे, हे एखाद दोन वेळा, प्लस ताप असल्यास क्रोसीन व पुढे खोकला आल्यास अडुळसा सिरप दुध हळद वगैरे दोन दिवस ताप असेल तर लगेच जनरल फिजिशिअन ला दाखवणे. हे त्याने कधीही केले नाही. आपण अ‍ॅडल्ट ला एका मर्यादे पलिकडे फोर्स करू शकत नाही. सेल्फ मेडिकेशन तर एकदम वाइट. पन लंग्ज इतका नाजुक अवय व आहे. त्याची काळजी घ्ययला पाहिजे हे मी फुकटचा सल्ला वा टत असते. कोणी स्मोकर्स वरून वाचत असतील तर त्यांच्या साठी मुद्दाम लिहीले आहे. काळजी घ्या.

माहितीपूर्ण लेख आहे. वरवर पाहतासर्दी खोकला साधा आजार वाटला तरी बेजार करणारा आजार आहे, आणि आजकाल हवामान इतक्या वेगाने आणि अनपेक्षित बदलत आहे की प्रत्येक घरी एकतरी सर्दी चा पेशंट असतोच, पर्यायाने सगळ्या घरालाच त्याचा संसर्ग होतो.

अमा, डॉक्टर असे काही सांगतील की त्यामुळे स्मोकिंग बंद करावे लागेल, खूप कमी करावे लागेल, या भीतीने स्मोकर्स डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात. मी स्मोकर होतो तेव्हा डॉक्टरकडे गेलो असताना त्यांनी खोकला आहे का / कधी पासून आहे विचारले तर मी काही विशेष नाही, दोन दिवसापासूनच आहे अशीच उडवाउडवीची उत्तरे द्यायचो. बाकी सगळं तपासा औषधं द्या ते खोकल्याचं तेवढं राहू द्या.

स्मोकिंगचे दुष्परिणाम डॉक्टरांपेक्षा दीर्घकालीन स्मोकरलाच जास्त ठाऊक असतात, पण त्याबद्दल तो चकार शब्द बोलणार नाही, तो विषय निघाला की स्मोकर वाळूत डोकं खुपसणार. तर नविन सुरू करणाऱ्याला हे दुष्परिणाम माहीत असले तरी त्याला हे ही माहीत असतं की काही काळ एक दोन सिगरेट ओढल्याने असं काही होत नाही. तो म्हणतो मी त्या आयुष्यभर सिगरेट ओढणाऱ्यांसारखा मूर्ख थोडीच आहे! अगदी शरीराची, फुफ्फुसांची वाट लागे पर्यंत ओढतातच कसे हे लोक? मी काही काळ एन्जॉय करेन आणि जेव्हा केव्हा वाटलं की याचा माझ्यावर दुष्परिणाम होत आहे तेव्हा मी सोडून देईन. अर्थात तो दिवस येतो तेव्हा तो ही एक कन्फर्मड स्मोकर बनलेला असतो, आणि तोही विषय निघाला की वाळूत डोके खुपसतो.

स्मोकिंग सोडले तर जीवन बेचव होइल, स्मोकिंगच्या तल्लफशी सामना करत करत आयुष्य कंठावे लागेल अशी भीती सर्व स्मोकर्सना वाटते. जी अर्थात १००% चुकीची आहे. स्मोकिंगचे व्यसन हे ९०% पेक्षाशी जास्त मानसिक आणि फारच थोडे निकोटीन ड्रग डिपेंडन्ट आहे. स्मोकिंग बद्दलचे मेंटल ब्लॉक्स आणि ब्रेनवॉशिंग एक एक करत दूर केले की एका क्षणात व्यसन सुटू शकते, तेही एकदाही सिरियस तल्लफ न येता.

डॉक्टर, माहितीबद्दल धन्यवाद.
अलर्जीसाठी त्याचे जनुक जबाबदार असतात. >>>> पटले एकदम. त्यामुळे "मलाच का हा त्रास होतो", या प्रश्नाचे उत्तर मिळते.
मानव, चांगला प्रतिसाद.

My daughter's pedi told me, now there are prebiotics available which taken during pregnancy can avoid allergies in baby. Kharech la?
I have wonderful experience with pranayam.
Last year i was doing it regularly. No issues during monsoon, nothing during nov/dec timeframe too.
This year i stopped (more than 7-8 months), now i m back to square one. Sad

नानबा,
Probiotics हे आपल्याला उपयुक्त असे मैत्रीपूर्ण जीवाणू असतात. अलीकडे त्यावर बरच संशोधन झाले आहे.
जर ते गर्भावस्थेत स्त्रीस दिले आणि पुढे तिने बालकास स्तनपान दिले तर ते त्याच्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे बालकास २ वर्षांपर्यंत काही अलर्जिक आजारांपासून संरक्षण मिळते असा काही अभ्यासकांचा दावा आहे. पण असा अभ्यास अद्याप अपुरा असल्याचे अन्य काहींचे म्हणणे आहे.

एकंदरीत Probiotics बद्दल आता उलटसुलट मते व्यक्त होत आहेत. सुरवातीस उत्साहाच्या भरात त्यांना इतके गौरवले गेले की कुठल्याही आजारावर ते रामबाण इलाज आहेत ! पण नंतरच्या संशोधनातून मात्र ठोस निष्कर्ष मिळाले नाहीत. त्यामुळे सध्या हा ‘कुंपणावर’चा विषय आहे.

माझ्या मुलाला त्रास आहे . वर्षातले 10 महिने सर्दी असते. त्याला खाद्यपदार्थांपेक्षा थनडीची ऍलर्जी आहे पण शाळा क्लासमुळे सकाळी साडेसहाला बाहेर पडावे लागते. त्याला इलाज नाही. डॉ नि montilukast ही अलर्जीची गोळी हे 10 महिने घ्यायला सांगितलंय. आम्ही तो 6-7 वर्षांचा असल्यापासून गेली 7 -8 वर्ष घेतोय. गोळीमुळे त्रास कमी असतो. पण पूर्ण रिलीफ नसतो .

कोणत्याही शाररिक कारणाशिवाय मला गेले तीन आठवडे श्वास लागत आहे खूप. छातीचा फोटो नॉर्मल आहे , हार्ट साउंड्स लंग साउंड्स नॉर्मल आहेत असे डॉक्टर म्हणतात. नात्यात कधिच कुणाला दम्याचा त्रास नाही मलाही नाही. फक्त बेकार श्वास लागतो अर्धा एकतास ,खोकल्याशिवाय. डॉक्टर म्हणतात भीतीने असे होत आहे पण मला असा कोणताच मानसिक आजार नाही. यावर काय उपाय करता येईल?

यावर काय उपाय करता येईल?>> तुम्ही स्ट्रेस टेस्ट केली आहे का हार्ट साठी? इसीजी केला आहेका ? साउंड्स नॉर्मल ह्याला अर्थ नाही. मधुमेह असलयस हार्ट चा त्रास वेदना जाणवत नाहीत. काही मानसिक दडपण आले आहे का? जीवनात काही चेंजेस आले आहेत का? मुले कॉलेज साठी घरून निघून जाणे, नोकरीतुन रिटायर होणे इत्यादि. हार्ट साठी कोंप्रि हेन्सिव टेस्ट्स करून घ्या. अ‍ॅड्मिट व्हा एक दिवस पाहिजेतर. आरोग्यपूर्ण जीवना सा ठी हार्दिक शुभेच्छा.

च्रप्स,
बरोबर, ते anti histamine गटातील औषध आहे.

केशव, तुमच्या प्रश्नाचे उत्तर जाला वरून नाही देता येणार.

अमा ,धन्यवाद. डॉ. ुमार१ मी कोणत्या टेस्ट केल्या पाहीजे ते मला सांगू शकाल का?
माझे वय ३० आहे.
चेस्ट एक्स रे नॉर्मल येणे याचा अर्थ काय आहे.? चालताना दम वगैरे लागत नाही.

या विषयावर लेख लिहील्याबद्दल धन्यवाद.

मला हा त्रास लहानपणापासुन आहे / होता. पण तेव्हा ही अ‍ॅलर्जी वगैरे काही माहित नव्हते.
शाळेत असल्यापासुन प्रत्येक ऋतु बदलला की मला सर्दी व्हायची. प्रचंड सायनस चा त्रास व्हायचा. आणि सर्दी घशातुन उतरल्यामुळे घसा सतत खवखवायचा. कायम सर्दीची औषधं घेतली. मग नोकरी करायला लागले त्याच दरम्यान अंबिका योग कुटीर मधे योगवर्ग केले. आणि नेती शिकुन घेतली. ते रेग्युलरली केली. त्याच दरम्यान जपानला गेले आणि . नेती सुरु ठेवली. शिवाय आधी माझे वजन अतिशय कमी होते त्यामुळे अशक्तपणा असावा / इम्युनिटी कमी असावी. ( जपानला गेल्यावर वजन योग्य झाले आणि इम्युनिती वाढली असावी) नाकात साजुक तुप टाकायचा उपायची काही वेळा केला आणि हळुहळू सायनस चा त्रास आपसुक कमी झाला. मग काही वर्षानी वेगळाच त्रास सुरु झाला. जो रुढार्थाने अ‍ॅलर्जी म्ह्टला जातो. डोळे चुर्चुरणे, पाणि येणे, सर्दी शिंका, सर्दी घशात आल्यामुळे होणारा त्रास. तिथल्या डॉक ने अ‍ॅलर्जी आउषधे दिली मग दर वर्षी त्रास वाढत गेला.. आणि मग डॉक ने माइल्ड अस्थमा सांगुन त्याचा पंपही काही दिवस वापरयला सांगितला. भारतात चेक केलयावर पण तेच सांगितले. अ‍ॅलर्जी टेस्ट केल्या.. कसल्या कसल्या अ‍ॅलर्जी आहेत असे सांगितले. भारतात कायमचे परत आल्यावर इथल्या दुसर्या डॉक ने पण तेच सांगितले. मग आपल्याला माइल्ड अस्थमा आहे हे मला मान्य करावे लागले. आणि वर्षातले अध्याहुन अधिक दिवस कसली ना कसली औषधे घेत घालवले... अँटी अ‍ॅलर्जीक गोळ्या, श्वासाचा त्रास झाल्यावरच्या गोळ्या , पंप सगळे सुरु असुनही मी एकदम हेल्दी असणारे दिवस कमीच भरायचे.. सतत दम लागलेला असायचा. विजिंग दिसायचे , श्वासाचा आवाज यायचा... भरपुर चालायचा स्टॅमिना ही कमी झाला असे वाटायला लागले..

मग एक दिवस एका आयुर्वेदीक डॉक कडे गेले. तिने दिवसातुन दोन वेळा काढा करुन पिणे , इतर चाटणे असे दिले. त्याने श्वास घ्यायचा त्रास तात्पुरता कमी झाला असे वाटायचे. पण काढा ३/४ दिवस नाही घेतला की सुरु.. शिवाया रोजच्या रोज काढे बनवणे पिणे हे एक वैताग काम झाले होते. त्याहुन जास्त म्हणजे त्यांच्या औषधचे स्टॅन्डर्डाय्झेशन नव्हते. एखाद्या आठवड्यात त्यांच्या काढ्याच्या पुडीत एखाद्या मुळीचे प्रमाण कमी जास्त व्हातचे मग परिणाम पण दिसायचे. पुन्हा ही औषधं अति महाग ही वाटत होती.

नंतर ते बंद करुन पुन्हा मॉडर्न औषधे सुरु केली आणि अँटी अ‍ॅलर्जीक गोळ्या, श्वासाचा त्रास झाल्यावरच्या गोळ्या , पंप.. हे काही महीने केले. स्टॅरॉइड पंप वापरुन वजन वाढते का असे पण वाटले ( डॉक ने नाही सांगितले खरतर.. ) या ही वेळेस सतत दम लागलेला असायचा...श्वासाचा आवाज यायचा.. औषधे वापरुन कमी व्हायचा. (levocet, Montelucast etc गोळ्या होत्या बहुतेक )

पुन्हा एका मैत्रिणीने दुसर्या आयुर्वेदीक डॉक चा पत्ता दिला - डॉ प्रसन्न केळकर - ठाणे. हे डॉक इम्युनिटी वाढवण्यावर भर देतात असे सांगितले. त्यामुळे जाउन पाहिले. चेक केल्यावर सर्वात पहिली गोष्टं त्यांनी सांगितली ती म्हणजे ' तुला माइल्ड अस्थमा आहे हे डोक्यातुन काढुन टाक. असे काही नाहीये '
त्यानंतर त्यांनीही चाटण दिले. आणी एक काढा ( रेडीमेड , कंपनीत पॅकबंद केलेला - नाव लिहीत नाहीये कारण इथे नुसते ते वाचुन कोणी घेऊ नये.. ) दिला. शिवाय श्वास घ्यायला त्रास झाला तर काय करायचे ( डीप ब्रिदिंग ) आणि वाफ घ्यायची, त्या पाण्यात टाकायला एक तेल दिले. ( वाफ घायला नाही जमलं तर त्याचा एक थेंब गळ्याशी लावायचा.. ) आणि अ‍ॅलर्जीचा नाकात त्रास होऊ नये म्हणुन नाकात घालायचे एक तेल ही दिले. रोज सुर्यनमस्कार घालायला सांगितले.

हे सगळे उपाय सुरुवातीचा एक / दोन महीना मी अगदी इमाने इतबारे केले आणि आश्चर्य झालं. श्वास जड व्हायचे बंद झाले. हे दोन तिन महिने पावसाळ्याचे असुनही मला त्रास झाला नाही. कफ, घशातले इरिटेशन कमी झालं. आता मी या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज करत नाही..( बरं वाटल्यावर औषधं घ्यायला विसरायला होतं ) आता ६/७ महीने झाले असतील. पण पंप किंवा अँटी अ‍ॅलर्जिक गोळ्या घ्याव्या लागल्या नाहीत. मी प्रवासही करुन आले. (तेव्हा फक्त फ्लाइट मधे एकदा अँटी अ‍ॅलर्जिक गोळी घेतली कारण डोळे चुरचुरणे शिंका अति प्रमाणात सुरु झालं)
म्हणजे अस्थमा आहे आणि पंप कायम बरोबर ठेवावा वगैरे पासुन सुटका झाली..

डॉक च्या म्हणण्यानुसार काढा आणि सुर्यनमस्कार यामुळे इम्युनिटी वाढली / वाढतेय. आणि नाकात घालायच्या तेलामुले अ‍ॅलर्जी चा त्रास कमी झालाय. वाफार्याचं तेल श्वास मार्ग मोकळा व्हावा म्हणुनच आहे आणि आता ते रोज करावे लागत नाही / गरजे नुसार वाफ घेता येते.

इतके सगळे लिहायचे कारण की दोन दशकापेक्षा प्रत्येक ऋतुबदलाचा त्रास सहन केल्यावर आता जरा चांगलं वाटतय.! इतर . कोणाला फायदा झाल तर बरंच आहे.

सावली, दीर्घ अनुभव कथना बद्दल आभार. त्याचा इतरांना उपयोग होईल. तुमच्या उत्तम आरोग्यास शुभेच्छा. आपले शरीर गुंतागुंतीचे आहे खरे. रोगनिदान हे कौशल्याचे काम आहे.

केशव ,
तुम्ही ज्या डॉ ना तब्बेत दाखवली आहे त्यांच्याच सल्ल्याने जावे हे उत्तम. रुग्णास अजिबात न बघता इथून कोणतेही मत देणे अयोग्य आहे.
शुभेच्छा.

Pages