धर्म - एक अनवट सिनेमा

Submitted by टोच्या on 20 December, 2018 - 08:24

धर्म. प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा (अन् वादाचाही) विषय. प्रत्येक धर्माची इमारत विशिष्ट मूलतत्त्वांच्या पायावर उभी असते. आज ही मूलतत्वे सर्रास पायदळी तुडवली जाताना दिसतात. धर्माची सोयीने व्याख्या केली जाते. आपापल्या मनाप्रमाणे त्यातील मूलतत्वांचे, नियमांचे अर्थ लावले जातात. मात्र, एखादा असाही असतो, की ज्याची धर्मावर जीवापाड श्रद्धा असते. नव्हे, धर्मपालन हेच जीवन असते. आणि जीवन तर अकल्पित असते. एखादी अशी घटना अचानक घडून जाते की त्यावेळी धर्म म्हणजे नेमके काय, मानवी नीतीमूल्ये महत्त्वाची की धर्माने घालून दिलेली कठोर बंधने महत्त्वाची, असे प्रश्न पडतात. भावना तलवार यांनी दिग्दर्शित केलेला ‘धर्म’ हा सिनेमा आपल्यासमोर असेच प्रश्न उपस्थित करून डोकं भंजाळून सोडतो.
ही कथा घडते हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान, तीर्थक्षेत्र काशी (वाराणशी) येथे. पंडित चतुर्वेदी (पंकज कपूर) काशीतील एक अतिशय प्रतिभावान, धर्माभिमानी आणि प्रकांड पंडित असलेले व्यक्तिमत्त्व. धर्मपालन हेच त्यांचे जीवन. पौरोहित्य करून उपजीविका करणारे. त्यांच्याकडे दूरदूरहून पौरोहित्याचे धडे घेण्यासाठी विद्यार्थी येतात. साही शास्त्रे, अठरा पुराणे मुखोद्गत. अभ्यास इतका गाढा की, परदेशातील लोकांनाही धर्म जाणून घ्यायचा असेल तर त्यांच्याकडेच जावे लागते. अतिशय नम्र, मितभाषी असलेले चतुर्वेदी यांचा गावात आदरयुक्त दरारा असतो. काशीतील बहुतांश ब्राह्मण मुले त्यांच्याकडून संस्कार घेऊन मोठी झालेली असतात.
दररोज भल्या पहाटे गंगेत स्नान करून, विधीवत पूजा करून, सूर्याला अर्घ्य देणे व शिष्यांकडूनही हे सर्व अतिशय काटेकोरपणे करून घेणे येथून पंडित चतुर्वेदींचा दिवस सुरू होतो. संपूर्ण दिनक्रम अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे ठरलेला. पहाटेचे स्नान आटोपून घरी गेल्यानंतर स्वत:च्या हाताने देवाचा नैवेद्य बनविणे, घरात असलेल्या विशाल महादेवाच्या पिंडीची अगदी विधीवत, मंत्रोच्चारासह तासभर पूजा करणे, मध्यान्ह भोजन विशिष्ट वेळेतच आणि विशिष्ट प्रमाणातच घेणे, शिष्यांना शास्त्रांची शिकवण देणे, सायंकाळी पुन्हा संध्या आटोपून परमेश्वराच्या नामस्मरणात झोपी जाणे हा दिनक्रम.
एकदा पंडितजी शिष्यांसह पहाटेची पूजा करून, सूर्याला अर्घ्य देऊन गंगाघाटावरून पायऱ्यांनी वर चढू लागतात, तोच अनावधानाने एका झाडूवाल्याचा त्यांना स्पर्श होतो. पंडितजींच्या दृष्टीने झाडूवाला अस्पृश्य. त्याचा स्पर्श अपवित्र. पण, ते रागावत नाहीत. ते कर्मठ आहेत, पण कोणाचा द्वेष करीत नाहीत. पुन्हा शुद्ध होण्यासाठी ते नदीच्या पात्रात उतरतात आणि स्नान करतात. म्हणतात ना, एखाद्या माणसाचं अगदी सरळ वागणंही अनेकांना खटकतं. त्याच्यावर अनेकजण टपलेले असतात. गंगाघाटावरील काही पुरोहित असेही असतात, जे पंडिजींच्या समाजातील मान-सन्मानावर, त्यांच्या प्रकांड पांडित्यावर जळत असतात. असाच एक असतो पंडित दयाशंकर (दयाशंकर पांडे ) हा तरुण पुरोहित. खरंतर दयाशंकरनेही पौरोहित्याचे धडे पंडितजींकडूनच घेततलेले असतात. मात्र, त्याचा स्वभाव जरा बेरकी असतो. येणाऱ्या भाविकांना खोटे-नाटे सांगून पूजा करायला लावणे, पैसे उकळणे आदी त्याच्या सवयी. पंडितजींना हे माहिती असतं, पण ते इतरांच्या कामात दखल देत नाहीत. पंडितजींना अस्पृश्याचा स्पर्श झाल्यानंतर ते शांतपणे पुन्हा गंगेत अंघोळीला जातात खरे, पण दयाशंकर हीच संधी साधतो आणि पंडितजींना अपवित्र केले म्हणून त्या झाडूवाल्याला लाथाबुक्क्यांनी तुडवतो. पंडितजी हे बघतात, पण त्याला अजिबात न अडवता शांतपणे घराकडे जायला निघतात. घाटावरील एक साधू हे सर्व बघत असतो. पंडितजी कोण, त्यांचे काशीतील स्थान, दरारा हे त्या साधूला माहिती असते. मात्र, गरीब झाडूवाल्याला विनाकारण मार खावा लागला म्हणून साधूला वाईट वाटतं. साधू पंडितजींना अडवतो, ‘तुम्ही त्या झाडूवाल्याचा मार थांबवू शकला असतात, पण थांबवला नाही.’ कबीराच्या दोह्यांचा दाखला देऊन संपूर्ण मानव, सर्व देव, धर्म कसे एकच आहेत, हे साधू समजावून सांगतो. साधूही पंडितजींइतकाच अभ्यासू असतो. पंडितजी हे ऐकून साधूला म्हणतात, ‘देवाच्या कृपेने शास्त्रांचा मीही अभ्यास केलाय, पण आता शास्त्रार्थ सांगण्याची वेळ नाही’ आणि घरी निघून जातात. खरंतर हा प्रसंग किरकोळ. पण तो सिनेमाचा पाया आहे.
सिनेमात दुसरा ट्रॅक आहे सूर्यप्रकाशच्या (पंकज त्रिपाठी) कुटुंबाचा. सूर्यप्रकाशचे वडील वाराणशीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. तेही महादेवाचे भक्त. कुठलेही कार्य पंडित चतुर्वेदींच्या सल्ल्याने, त्यांच्या आदेशाप्रमाणेच करणार. सूर्यप्रकाश हाही पंडित चतुर्वेदींचा शिष्य. पण, त्याचे विचार कट्टर धार्मिक असतात. सूर्यप्रकाशची बहीण मणी (इशिता भट्ट) शिकलेली तरुणी. तिचेही पंडितजींच्या घरी येणे-जाणे असते. पंडितजींकडे धर्माची माहिती घेण्यासाठी आलेला अमेरिकन पत्रकार पॉल एकदा मणीचे फोटो काढतो. नेमका त्याच वेळी सूर्यप्रकाश तेथे असतो. बहिणीने परधर्मीय व्यक्तीशी मैत्री केली, हे त्याच्या सहनशक्तीच्या पलिकडचे असते. तो गंगेच्या घाटावरच पॉलला लाथाबुक्क्यांनी तुडवतो. त्याला ठार करायच्या उद्देशाने चाकू काढतो, तेवढ्यात पंडित चतुर्वेदी तेथे येतात. पंडितजींपुढे सूर्यप्रकाश थबकतो. चाकू तेथेच टाकून निघून जातो. हे सर्व पाहून दयाशंकर सूर्यप्रकाशला पॉलविरोधात आणखी भडकावतो. इतर धर्मिय येथे येऊन आपला धर्म भ्रष्ट करीत असून, तो वाचविण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे, हे त्याला पटवतो. दोघेही एका कट्टर धार्मिक संघटनेत सामील होतात.
कट टू. इकडे पंडित चतुर्वेदींचा दिनक्रम नेहमीप्रमाणे सुरू असतो. एके दिवशी पंडितजी पूजाविधी आटोपून घरी येतात. दारातूनच त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. पंडितजींना साधारण दहा-बारा वर्षांची एकच मुलगी असते. घरात येऊन पाहतात, तो पत्नी आणि मुलगी एका गोंडस बाळाला नादी लावण्याचा प्रयत्न करीत असतात. विचारल्यानंतर त्या सांगतात की, एक महिला तासाभरात येते असे सांगून बाळाला सोडून गेलीय. पण, अद्याप परतली नाही. बराच वेळ उलटूनही महिला येत नाही, हे पाहून पंडितजींना खात्री पटते की ती महिला बाळाला टाकून गेली आहे. रात्रभर बाळाच्या रडण्याने पंडितजींना झोप येत नाही. वास्तविक, निरागस बाळ दिसलं की कोणीही पटकन उचलून घेईल. पण, बाळाला पाहूनही पंडितजींच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नसतात. कोण जाणो, ते कुठल्या जाती-धर्माचे आहे, त्याला स्पर्श करून आपला धर्म भ्रष्ट झाला तर! ही भीती सतत त्यांच्या मनात असते. बाळ इतकं गोंडस असतं की, त्यांची पत्नी पार्वती आणि मुलीला त्याचा लगेच लळा लागतो. त्या पंडितजींकडे आग्रह धरतात, बाळाला आपणच ठेवून घेऊया. हे बाळ देणारी महिला ब्राह्मणच होती, असेही त्यांची मुलगी चाचरत सांगते. तरीही पंडितजींच्या चेहऱ्यावरचे भाव निरंक असतात. ते दुसऱ्या दिवशी पोलिस इन्स्पेक्टरला बोलावून त्या बाळाच्या आईचा शोध घेण्याची विनंती करतात. तोपर्यंत ते बाळ आपल्याच घरी ठेवावे, अशी गळ मायलेकी पंडितजींना घालतात. त्याला पंडितजी जरा नाराजीनेच मान्यता देतात.
दोन-तीन दिवस उलटूनही बाळाच्या आईचा काही तपास लागत नाही. एके दिवशी पंडितजींची पूजा सुरू असते, त्याच वेळी इकडे पत्नी पार्वती स्वयंपाक करीत असते. तिचे हात पिठाने भरलेले असतात. बाळ झोळीत असते. बाळाची रडारड सुरू असते. रडून रडून त्याचा घसा सुकायची वेळ येती. त्याचा टाहो सहन न होऊन पंडितजी पूजा आटोपून घरात येतात. पत्नी सांगते, ‘माझे हात भरलेले आहेत, जरा त्याच्यापुढे खुळखुळा हलवा.’ खरंतर त्यांना बाळाकडे पाहायचीही इच्छा नसते. नाखुशीनेच ते खुळखुळा घेतात आणि जरा दुरूनच वाजवतात, जराशी झोळी हलवतात. बाळ शांत होते. पंडितजींच्या निरंक चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते घरी येतात, तेव्हा बाळाचा टाहो सुरू असतो. ते पत्नी, मुलीला आवाज देतात. पण घरात कोणीच नसतं. आता काय करायचं? बाळाला स्पर्श करावा तर धर्म भ्रष्ट होण्याची शक्यता. न करावा तर जीवाच्या आकांताने सुरू असलेला टाहो, काळीज चीरत जातोय. द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या कणखर पंडितजींवर कनवाळू मन जरा वरचढ ठरते. ते त्याच्यापुढे खुळखुळा हलवतात, पण ते शांत होत नाही. शेवटी अगदीच नाइलाजाने ते त्याला दबकत दबकत स्पर्श करतात. इतर कोणीच नसतं, त्यामुळे मग त्याला ते उचलून घेतात आणि खेळवायचा प्रयत्न करतात. बाळ हाती आल्यावर जणू त्यांच्यातला पिता जागृत होतो. बराच वेळ खेळवल्यानंतर बाळ शांत होते. काही वेळानंतर पंडितजींची पत्नी आणि मुलगी बाहेरून येतात. समोरचे चित्र पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. जी व्यक्ती बाळाकडे पाहतही नव्हती, त्या व्यक्तीच्या पोटावर बाळ अगदी शांतपणे झोपलेले आहे. त्यांना अत्यानंद होतो.
बरेच दिवस उलटूनही बाळाची आई पोलिसांनाही सापडत नाही. त्यामुळे मायलेकी पंडितजींकडे हे बाळ आपणच ठेवून घेऊ या का, अशी चाचरत चाचरत विचारणा करतात. पण, पंडितजी म्हणतात, ‘उद्या मंदिराच्या अनाथाश्रमाच्या लोकांना बोलावून त्याला तिकडे पाठवून देऊ.’ त्यांचे मन द्रवले असले तरी अद्याप पूर्णपणे मतपरिवर्तन झालेले नसते.
त्याच रात्री पत्नी पंडितजींची सेवा करता करता विषय काढते. खरंतर पंडितजींइतकीच तीही महादेवाची भक्त असते, धर्मशास्त्र जाणणारी असते. पत्नी सांगते, ‘तुम्हीच तर म्हणता की या जगातले एकही कार्य देवाच्या इच्छेशिवाय घडत नाही. मग, कोण जाणो, हे बाळ आपल्याकडे येण्यात त्या विश्वनियंत्याची काही योजना असेल! ही योजना आपण का धूडकावून लावावी?’ तिच्या या युक्तिवादाने पंडितजी निरूत्तर होतात. त्यांच्यातील कठोर, कर्मठ माणूस हार मानतो आणि प्रेमळ पिता जागा होतो. झोळीत शांतपणे पहुडलेल्या बालकाकडे पाहून धीरगंभीर आवाजात ते त्याचं नामकरण करतात….‘कार्तिकेय…!’
यानंतर पंडितजींचं जीवन बदलून जातं. प्रत्येक पूजेवेळी कार्तिकेय पंडितजींच्या बरोबर असतोच असतो. त्याचा खट्याळपणा, बाललीलांनी ते हरखून जातात. चार-पाच वर्षे कशी निघून जातात कळत नाही. या कोवळ्या वयातच कार्तिकेय पंडितजींबरोबर सर्व मंत्र मुखोद्गत करतो. शिष्यांना शिकवतानाही पंडितजींबरोबर तो असतो. बाप-लेकाचं हे नातं बहरत जातं. त्यांच्यात अगदी अतूट, घट्ट बंध तयार होतात. कार्तिकेयशिवाय पंडितजींना एक क्षणही करमत नाही. सतत तो त्यांच्या अवतीभोवती खेळत असतो. जणू त्यांच्या शरीराचा अवयवच असावा. पण, जीवनात सगळं मनासारखंच घडतं का? पुढं काय वाढून ठेवलंय, हे कुणाला कळलंय?
इकडे सूर्यप्रकाशची बहीण मणी अमेरिकन पत्रकार पॉलबरोबर पळून जाऊन लग्न करते. तिच्या या कृतीनंतर चिडलेला सूर्यप्रकाश कट्टरतावादी संघटनांमध्ये सामील होतो. बहिणीने धर्म भ्रष्ट केला म्हणून पंडित चतुर्वेदींना बोलावून गोमूत्र शिंपडून, मंत्रोच्चारात संपूर्ण घर शुद्ध करून घेतलं जातं.
एके दिवशी….
साधारण चार-पाच वर्षांचा कार्तिकेय झोपाळ्यावर बसलेला असतो… पंडितजी त्याला मोठ्या प्रेमाने झोका देत असतात… त्याच्याशी खेळत असतात. त्यांची मुलगी, पत्नीही आसपासच घरातील किरकोळ कामांत मग्न असतात… तेवढ्यात दार वाजतं. पंडितजींची पत्नी पार्वती दार उघडते तो समोर दयाशंकर… त्याच्या नजरेत वेगळीच उपरोधिक चमक असते. तो दारातूनच सांगतो, ‘तुम्ही जे बाळ सांभाळलंय, त्याची आई आलीय त्याला न्यायला.’ इकडे सगळ्यांना धक्का बसतो. इतका जीव लावलेलं बाळ, अचानक इतक्या वर्षांनी त्याची आई कुठून आली? जीवापाड सांभाळलेलं ते लेकरू, असं कसं एका क्षणात त्याची आई नेऊ शकते? पंडितजींची पत्नी निकराने म्हणते, ‘नाही, मी त्याला सांभाळलंय, मीच त्याची आई आहे.’ तोपर्यंत आई कोण, हेही त्यांना माहिती नसतं. ‘ती आई कोण आहे’, हे विचारताच दयाशंकर म्हणतो, ‘तुम्ही स्वत:च पाहा’ असे म्हणत त्या महिलांना मध्ये बोलावतो. कार्तिकेयची आई दारात पाय टाकते आणि वीज कडाडावी तसा मोठा झटका सगळ्यांना बसतो. काळा बुरखा घातलेल्या दोन महिला दारात येतात आणि सगळेच गर्भगळीत होतात. वातावरण सुन्न होतं. काय बोलावं, काही कळत नाही. अगदी काटेकोर धर्मपालन करणाऱ्या घरात तब्बल चार-पाच वर्षे इतर धर्माचं मूल वाढलेलं असतं. वैश्याचा धक्का लागल्यानंतर अंघोळ करून पवित्र होणाऱ्या पंडितजींसाठी हा नियतीचा मोठा आघातच असतो. तितकाच धक्का बाळाला आतापर्यंत आईची ममता दिलेल्या पार्वतीलाही बसतो. पण, त्यातून क्षणात सावरत, हे परधर्मीय मूल आपल्यामुळेच या घरात राहिलंय आणि त्यामुळे पंडितजींचा धर्म भ्रष्ट झाला, या पश्चात्तापातून पार्वती कार्तिकेयला झोपाळ्यावरून खेचते आणि फराफरा ओढत त्याच्या आईकडे घेऊन जाते. तिच्या ताब्यात देते. झोपाळा हलत राहतो… वाजत राहतो… त्यांच्या मनातील आंदोलनांप्रमाणे. आई मला दुसऱ्यांच्या हवाली का करतेय, हे त्या चिमुकल्याला कळत नाही आणि ते जीवाच्या आकांतानं किंचाळत राहतं, ‘माँ, मुझे नही जाना है, आपको छोडके नही जाना है… माँ मुझे आपसे अलग मत करो…’, ते शब्द पार्वतीच्या काळजाला गरम सळया टोचल्यासारख्या वेदना देतात. एकीकडे ममता, दुसरीकडे धर्मपालन आणि तिसरीकडे पतीचा धर्म आपल्या चुकीमुळे भ्रष्ट झाला या पश्चात्तापात होरपळलेली महिला, अशा धारदार कात्रीत सापडलेली पार्वती केवळ सुप्रिया पाठक यांच्यासारखी कसलेली अभिनेत्रीच उभी करू शकते.
पंडितजी सुन्न होऊन उभे असतात. हा काय अनर्थ घडला? पार्वती गयावया करते, क्षमा मागते. पंडितजी स्तब्ध असतात. शून्यात नजर लावून… शब्दच नसतात! कार्तिकेयसाठी आणलेल्या सर्व खेळण्या, खुळखुळ्यासह घराच्या बाहेर फेकल्या जातात. शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारात घर शुद्ध केलं जातं… पण मनाचं काय? पंडितजी पूजेला बसले की त्याची लाडिक ‘बाबूजी…’ अशी आरोळी कानात गुंजते, ध्यान भरकटतं. मन अस्वस्थ होतं. शिष्यांना शिकवायला गेलं की तेथे त्याने पूजा सुरू असेपर्यंत केलेल्या बाललीला, त्याच्या तोंडी खडीसाखर, पेढा, प्रसाद भरवणं, हेच सगळं डोळ्यांसमोर दिसत असतं. एक दिवस ते अतिशय विषण्ण होतात. देवापुढे बसतात. झालेल्या पापांची माफी मागतात. मन पूर्णपणे शुद्ध करू शकलो नाही, अशी कबुली देतात. त्यांचे हाल न पाहवणारी पार्वती त्यांना म्हणते, ‘आमची चूक झाली. आम्हाला शिक्षा द्या, पण तुम्ही स्वत:ला त्रास करवून घेऊ नका.’ पण, या सर्व प्रकाराची जबाबदारी आपलीच आहे असे समजून पंडित चतुर्वेदी स्वत:ला ताडन करीत असतात. एके दिवशी ते पूजेला बसतात आणि डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागतात. कंठ रुद्ध होतो. ‘त्याला’ विसरू शकत नाही. त्यामुळे प्रायश्चित्त म्हणून अनिश्चित काळासाठी आपण मौन धारण करीत आहोत, अशी प्रतिज्ञा करतात. पत्नी पार्वती आणि मुलीला धक्का बसतो. कारण, पंडितजी वचनाचे पक्के असतात. कुठल्याही परिस्थितीत ते प्रतिज्ञा मागे घेणारच नाहीत, हे त्यांना माहीत असतं. दिवस बदलतात. पूजाविधी नेहमीसारखी सुरू असली तरी गावात पंडितजींविषयी चर्चा सुरू होते. इतके दिवस मुसलमान मुलाला घरात वाढवलं, याबाबत अनेकांची नाराजी असते. इकडे पंडित दयाशंकर, सूर्यप्रकाश यांना पंडितजींवर टीका करण्याची आयतीच संधी मिळते, ते दोघं ती सोडत नाही.
अनेक दिवस जातात. पण, कार्तिकेयच्या आठवणी काही केल्या जात नाहीत. घरात दुखवट्याचं वातावरण असतं. मायलेकी कार्तिकेय दुरावला म्हणून आणि पंडितजींना आपल्यामुळे मनस्ताप होतो म्हणून अशा दुहेरी दु:खात असतात, तर पंडितजींच्या मनातून लहानगा कार्तिकेय हटायला तयार नसतो. एके दिवशी ते पुन्हा महादेवाच्या पिंडीसमोर बसतात. रडवेल्या आवाजात महादेवाला सांगतात, ‘देवा, मन काही स्थिर होत नाही. आजपासून मी हे मौन व्रत भंग करीत आहे…’ बाजूला उभी असलेली पार्वती हे ऐकते आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य उमलते. पण क्षणभरच. पुढच्याच क्षणी पुन्हा पंडितजींचा आवाज येतो, ‘आजपासून मी चंद्रायण व्रत सुरू करीत आहे.’ हे ऐकल्याबरोबर पार्वतीच्या जीवाचं पाणी होतं. तिला धक्का बसतो. आता आणखी किती प्रायश्चित्त, असा प्रश्न तिला पडतो.
तेवढ्यात जोरजोरात दार वाजते. पार्वती दार उघडते तो समोर दयाशंकर, सूर्यप्रकाश आणि शेकडो कार्यकर्ते हातात मशाल घेऊन पंडितजींना धर्म भ्रष्ट केल्याचा जाब विचारायला आलेले असतात. मोठ्या आवेशात दयाशंकर विचारतो, ‘कुठे आहे, पंडितजी? त्यांनी धर्म बुडवलाय… त्यांना जाब विचारायचाय’ पार्वती खिन्न मनाने सांगते, ‘तुम्ही प्रत्यक्षच विचारा. आजपासून त्यांनी चंद्रायण व्रत सुरू केलंय.’ ‘चंद्रायण व्रत’ हे शब्द ऐकल्यावर दयाशंकर चपापतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलतात… चिंता दाटते. सूर्यप्रकाश विचारतो, ‘हे चंद्रायण व्रत काय आहे?’ दयाशंकर सांगतो, ‘चंद्रायण म्हणजे चंद्र जसजसा कलेकलेने वाढत-घटत जातो, त्याप्रमाणे आहार घेणे. म्हणजे एका दिवशी एकच घास, दुसऱ्या दिवशी दोन घास असे करीत पंधरा दिवस पंधरा घास वाढवत न्यायचे आणि पुन्हा आमावस्येपर्यंत तसेच घटवत न्यायचे. दिवसभरात पाणीही प्यायचं नाही. स्वत:ची सगळी कामं स्वत: करायची.’ पंडितजींचे इतके कठोर प्रायश्चित्त सुरू असल्याचे पाहून सगळ्यांचा आवेश उतरतो आणि ते आल्या पावली परत फिरतात.
पंडितजींचे चंद्रायण व्रत सुरू होते. एक घास, दोन घास असा दिनक्रम सुरू होतो. पार्वतीला चिंता लागून असते. त्यातच कट्टरतावादी संघटना वाराणशीत दंगली सुरू करतात. अमेरिकन पत्रकार पॉलला सूर्यप्रकाश दंगलीत मारून टाकतो. विधवा झालेली बहीण त्याच्याकडे येते तेव्हा तो तिला घरात घ्यायला नकार देतो. शेवटी पंडितजींच्या आदेशावरून वडिल तिला रहायला स्वतंत्र घर पाहून देतात आणि तिच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारतात. दंगलींची तीव्रता वाढते. संपूर्ण वाराणशी जळत असते. हिंदू-मुस्लीम एकमेकांना कापत, जाळत सुटतात. काशीचे घाट ओस पडतात. पुरोहितांच्या पथाऱ्या, छत्र्या मोडून पडतात. पूजा-अर्चा बंद होतात. तीच अवस्था इकडे मुस्लीम गल्ल्यांमध्येही असते.
बाहेर दंगली सुरू असताना पंडिजींच्या दारावर जोरजोरात थापा पडतात. पार्वती दार उघडायला जाते तोच छोटा कार्तिकेय ‘माँ’ अशी आरोळी मारून धावत पुढे येतो. त्याला छातीला कवटाळावं असा आवेग आला असतानाच पार्वतीला कर्तव्याची जाणीव होते आणि ताडकन दार बंद करून घेते. मुलगी म्हणते आई, ‘त्याला घरात तरी घे.’ पण, पार्वती मुलीला एका खोलीत बंद करून टाकते. पंडितजींचा पिंडीसमोर बसून मंत्रोच्चार सुरू असतो. दार बंद केल्याबरोबर मुलाची आई म्हणते, ‘बाहेर फार दंगली सुरू आहेत. त्याला मारून टाकतील. एका दिवसासाठी तरी त्याला तुमच्याकडे घ्या.’ पण, पार्वती काही ऐकत नाही. दोघे मायलेक पुन्हा खिडकीतून गयावया करतात. ती महिला शेवटी म्हणते, ‘बाळा बाबूजीला आवाज दे.’ कार्तिकेय म्हणतो, ‘नाही, बाबूजी पूजा करताहेत. त्यांना पूजेत व्यत्यय आणणे योग्य नाही’… हे शब्द कानावर पडतात आणि पंडितजींच्या हृदयाला जणू भोकं पडतात. हृदयातील वेदना डोळ्यांतून अश्रू होऊन बाहेर पडतात. तोंडाने मंत्रोच्चार, कानावर चिमुकल्याची गयावया… नजरेसमोर महादेवाची पिंड आणि दोन्ही डोळ्यांना लागलेल्या धारा… अशा अवस्थेत ती पूजा सुरू असते. खूप गयावया करूनही पार्वती त्यांना घरात घेत नाही, आणि पंडितजीही काही म्हणण्यापलिकडे गेलेले असतात.
ते मायलेक गेल्यानंतर काही काळाने मोठ्या निग्रहाने पंडित चतुर्वेदी उठतात. डोळ्यांत नेहमीचा करारी बाणा, पूर्वीसारखेच कपडे करून तयार होतात आणि कुठल्यातरी निग्रहाने घराबाहेर पडतात. त्यांच्या मनात असंख्य आंदोलनं सुरू असतात. वाराणशीच्या गल्लीबोळातून जात असताना त्यांना रस्त्यात रक्ताचे पाट वाहत असताना दिसतात. लोक मरून पडलेले असतात. बायका किंचाळत असतात, मुले रडत असतात. त्यांची पावलं मुस्लीम मोहल्ल्याकडे वळतात. या रस्त्यावरही तीच स्थिती असते. जाताना प्रचंड रक्त वाहिलेला एक मृतदेह त्यांना दिसतो. स्वत:चा पंचा काढून ते त्यावर टाकतात. पुढे निघतात. रस्ता पूर्ण रक्ताने भरलेला असतो. पाय टाकावा कुठे, हे समजत नाही. शेवटी ते त्या महिलेच्या घरी पोहचतात, आणि सभोवतालचं चित्र पाहून त्यांच्या काळजात चर्रर्र होतं. कार्तिकेय ठिक तर असेल? त्याला कुणी मारलं तर नसेल? असे असंख्य प्रश्न उभे राहतात. त्यांचा आवाज घोगरा होतो, डोळ्यांत पाणी असते. त्याच स्थितीत ते त्याच्या नावाचा पुकारा करतात, ‘कार्तिकेय…कार्तिकेय…’ दोन तीन आवाज देऊनही कोणी येत नाही. थोड्या वेळाने माडीवरून कार्तिकेयची आई पंडितजींना बघते…तिला प्रचंड आनंद होतो. ती कार्तिकेयला सांगते, ‘बघ तुझे बाबूजी तुला घ्यायला आले आहेत.’ चिमुकला कार्तिकेय पळत पळत येऊन पंडितजींना बिलगतो. पंडितजीही त्याला मायेने जवळ घेऊन कुरवाळतात. दोघांच्या डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहत असतात. तितक्यात एक माणूस पळत येतो आणि पंडिजींना म्हणतो, ‘मला वाचवा.’ त्याच्या मागोमाग सूर्यप्रकाश आणि अनेक कार्यकर्ते तलवारी घेऊन धावत असतात. पंडितजींना पाहून सगळे थबकतात. त्यातील एकजण म्हणतो, ‘पंडितजी, त्याला आमच्या हवाली करा. हे लोक आमचा धर्म भ्रष्ट करीत आहेत.’ पंडितजी तो असहाय माणूस आणि या कार्यकर्त्यांच्या मध्ये खंबीरपणे उभे असतात. कार्यकर्त्यांकडे एक निग्रही करारी कटाक्ष टाकल्याबरोबर त्यांच्या नजरा झुकतात. त्यातील एकजण त्या व्यक्तीला मारायला तलवार घेऊन पुढे सरसावतो, तोच पंडितजी त्याचा हात धरतात. त्याची इतकीही हिंमत नसते की पंडितजींचा प्रतिकार मोडून काढावा. तो तलवार टाकतो आणि मागे सरकतो.
पंडितजींना गंगाघाटावर भेटलेल्या साधूचे बोल आठवतात. सर्वधर्म कसे एकच आहेत, हे त्या साधूने पंडितजींच्या लक्षात आणून दिलेलं असतं. त्याचा अर्थ त्यांना आता समजतो. धीरगंभीर आवाजात पंडितजी बोलू लागतात.. ‘तुम्ही सगळे माझे विद्यार्थी? सर्वांना धर्म शिकवला, पण धर्म म्हणजे काय? हिंसा? नाही… धर्म हिंसा सांगत नाही आणि हिंसा असलेला धर्म असू शकत नाही. धर्म म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या धर्माचा आदर करणं. माणसाशी माणसारखं वागणं…’ पंडितजींच्या मुखातून तत्वज्ञान बाहेर पडत असतं आणि सगळे खजिल होऊन ते ऐकत असतात. त्यांच्या हातातल्या तलवारी गळून पडतात. दाटून आलेले ढग एकदम पडून गेल्यासारखी पंडितजींचं मन मोकळं होतं. चेहऱ्यावर पुन्हा चमक येते, डोळ्यांत करारी भाव आणि रुबाबदार चाल. पंडितजी चिमुकल्या कार्तिकेयचं बोट पकडतात… घराकडे चालू लागतात…. आणि श्रेयनामावली सुरू होते.
पंकज कपूर हा अभिनेता मला नेहमीच आवडला आहे. त्यांनी अतिशय मोजक्या भूमिका केल्या, पण त्यात अक्षरश: प्राण ओतले आहेत. या सिनेमातील त्यांनी साकारलेली पंडित चतुर्वेदी ही भूमिका दुसरा कोणी इतकी प्रभावीपणे करूच शकला नसता, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. सुरुवातीला कर्मठ, कठोर पण मनाने मृदू असणारा, गावात प्रतिष्ठा असलेला आणि धर्म भ्रष्ट झाल्यानंतर खचलेला, अगतिक तरीही तत्वांशी बांधिल पुरोहित त्यांनी ज्या पद्धतीने साकारलाय, त्याला तोड नाही. चेहरा अगदी निराकार ठेवूनही केवळ डोळ्यांवरून किती परिपक्व अभिनय करता येऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण. कार्तिकेयला वाचविण्यासाठी त्याची आई दारातून, खिडकीतून गयावया करते तेव्हा पंडितजींची पूजा सुरू असते. आतून कोमलता, चेहऱ्यावर निगरगट्टपणा, मंत्र म्हणताना आवाजातील कंप, पंकज कपूर यांच्या या सिनेमातील अभिनयाचा तो कळस ठरावा. पार्वती साकारलेल्या सुप्रिया पाठक खऱ्या आयुष्यातही त्यांची पत्नीच. सुप्रिया पाठक यांनी पडद्यावर त्यांना तोडीस तोड साथ दिली आहे. पतीप्रेम, धार्मिकता आणि पुत्रवियोग अशा कोंडीत सापडलेली सुहृदयी पत्नी त्यांनी कमाल उभी केली आहे. पंकज त्रिपाठीने माथी भडकलेल्या कट्टरतावादी तरुणाची भूमिका चोख बजावली आहे. दयाशंकर पांडेही नेहमीप्रमाणे उत्तम काम करतो. ह्रषिता भट्टची भूमिका अगदी लहान आहे. तिला विशेष वाव नाही. मुळात सगळेच थिएटरशी संबंधित कलाकार असल्याने अभिनयात कुठेच कमी पडत नाहीत. कौतुक करावं लागेल ते दिग्दर्शिका भावना तलवार यांचं. त्यांनी संपूर्ण सिनेमा असा काही उभा केलाय, जणू आपण काशीतच आहोत, असा भास व्हावा. छायांकनही जमून आलंय. सिनेमात गाणी नाहीत, पण संपूर्ण सिनेमाभर धार्मिक वातावरण उभं करणारं संगीत, धीरगंभीर आवाजात सतत सुरू असलेले मंत्रोच्चार प्रत्येक प्रसंगाचं महत्त्व अधोरेखित करतात. मूळच्या पत्रकार, फॅशन, अॅड एजन्सी आणि सिनेमा अशा मार्गाने आलेल्या भावना तलवार यांचा हा पहिलाच सिनेमा. पण, त्यांनी तो अगदी ताकदीने उभा केला आहे. हा सिनेमा २००७च्या कान्स चित्रपट महोत्सवातील ‘क्लोजिंग प्रीमियर’ म्हणून दाखविण्यात आला होता. या सिनेमाची ८० व्या अॅकॅडमी अॅवॉर्डसाठी निवड करण्यात आली होती, पण निवड समितीने तो अचानक रद्द करून वशिलेबाजीतून ‘एकलव्य : द रॉयल गार्ड’ या सिनेमाची निवड केल्याचा आरोप तलवार यांनी केला होता. निवड समितीविरोधात वशिलेबाजीने सिनेमाची निवड केल्याचा दावाही दाखल केला होता. मात्र, सिनेमा पाठविण्याची वेळ निघून गेल्याने त्यांनी तो दावा परत घेतला. अजीर्ण होणाऱ्या मसालेदार सिनेमांच्या युगात हा सिनेमा मस्ट वॉच आहे.
(टीप- मी समीक्षक नाही. सिनेमा आवडला म्हणून त्याबाबत मला जे वाटलं ते लिहिलं. तांत्रिक बाबींबद्दल फारसे ज्ञान नसल्याने तसेच सिनेमातील चुका शोधण्याचा उद्देश नसल्याने ते टाळले आहे.)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी.

टोच्या भाऊ , शीर्षकविस्तार करा की. कंजुषीमुळे मायबोलीकर पण कंजुषी करतील फिरकायला.
दाग - द फायर च्या धर्तीवर धर्म - एक अनवट सिनेमा असं काहीसं.

<असा चित्रपट येऊन गेला हेच माहीत नाही. याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.>
साधनाजी, मलाही असा सिनेमा आहे, हे माहिती नव्हते. गेल्या आठवड्यात स्टार सिलेक्ट चॅनलवर तो लागला. सुरुवात इंटरेस्टींग वाटली म्हणून पूर्ण पाहिला. आवडला.
मेरीच गिनो, सायो प्रतिसादाबद्दल धन्यवाद. शीर्षकाबद्दल विचार करतो.

भारी आहे सिनेमा, तुम्ही लिहिलं पण छान आहे. नेटफ्लिक्स किंवा प्राईम वर आहे का? आता शोधून पाहायलाच हवा.

छान लिहीले आहे. याचा पोस्टर कधीतरी पाहिला होता पण काहीच माहिती नव्हती कथेबद्दल. नेटफ्लिक्स वर का कोठेतरी होता बहुधा. चेक करतो. आता पाहण्याची उत्सुकता आहे.

ही सगळी कथा अगदी ओळखिची वाटते आहे... बहुतेक बघितलाय हा पिक्चर. तुम्ही छान लिहिलंय. फक्त सगळंच क्लायमॅक्स सकट लिहून टाकलंत तर कसं चालेल?

छान लिहिलंय गोष्ट लिहिल्यासारखं. वेगळाच विषय.

धर्माच्या नावाखाली ऑनर किलिंग आणि दंगली करणं अक्षम्य आहे.
दुसरीकडे त्या बाईने नवजात मूल सोडून देऊन मग पाच वर्षांनी येऊन घेवून जाणे, पुन्हा दंगलीत त्या पंडित कुटूंबाबानेच मुलाला सांभाळावं अशी अपेक्षा करणं हेही सगळं फार क्रूर वाटलं.

चित्रपट पाहिला नाही पण साधारण कथा माहित होती.

छान लिहिले आहे.

> वैश्याचा धक्का लागल्यानंतर अंघोळ करून पवित्र होणाऱ्या पंडितजींसाठी > वैश्य कि अस्पृश्य?

सुंदर ओळख,
FB वर लिंक शेअर करत आहे.

<छान लिहीले आहे. याचा पोस्टर कधीतरी पाहिला होता पण काहीच माहिती नव्हती कथेबद्दल. नेटफ्लिक्स वर का कोठेतरी होता बहुधा. चेक करतो. आता पाहण्याची उत्सुकता आहे.>धन्यवाद फारेण्ड
धन्यवाद गुगु

<ही सगळी कथा अगदी ओळखिची वाटते आहे... बहुतेक बघितलाय हा पिक्चर. तुम्ही छान लिहिलंय. फक्त सगळंच क्लायमॅक्स सकट लिहून टाकलंत तर कसं चालेल?>
अमितव, सिनेमा दहा बारा वर्षांपूर्वीचा आहे. त्यात काय स्पॉयलर्स देणार? आणि तसाही क्लायमॅक्स प्रेडिक्टेबल आहे.

<दुसरीकडे त्या बाईने नवजात मूल सोडून देऊन मग पाच वर्षांनी येऊन घेवून जाणे, पुन्हा दंगलीत त्या पंडित कुटूंबाबानेच मुलाला सांभाळावं अशी अपेक्षा करणं हेही सगळं फार क्रूर वाटलं.>
सनव, त्या महिलेवर तशी वेळ येते. नंतर येते तेव्हा ती दंगलीतून वाचण्यासाठी हिंदू पेहराव केलेली दाखवली.
< वैश्य कि अस्पृश्य?>
अॅमी, चातुर्वर्ण्याप्रमाणे झाडूवाला वैश्य आणि पंडितजींच्या मान्यतेप्रमाणे वैश्य अस्पृश्य असतो.

सिम्बा, सायो, हर्पेन प्रतिसादाबद्दल धन्यवाद

छान चित्रपट परिचय. बघावा लागेल.
पंकज कपूर आणि पंकज त्रिपाठी दोघेही ताकदीचे कलाकार आहेत.

असा चित्रपट येऊन गेला हेच माहीत नाही. याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. >>> +१

नक्की बघेन हा चित्रपट

छान परिचय. बघेन का नाही माहीत नाही, पण कथा खिळवून ठेवणारी.
एकलव्य हा चित्रपट अर्धा तास बघून माझं चार दिवस डोकं दुखत होतं.

काम अगर ये हिंदू का है, मंदिर किसने लुटा है !
मुस्लिम का है काम अगर ये, खुदा का घर कयों टुटा है !!
जिस मजहब मे जायज है ये, वो मजहब तो झूठा है !!!

Pages