नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

Submitted by अभय आर्वीकर on 23 June, 2015 - 23:03

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले
समज ना उमज पण खुर्चीत धसते?

जुन्या काळचे डाकू तरी लै बेस व्हते
शेतावरच्या श्रमिकांना कधी लुटत नोयते
शोषकांच्या छाताडावर पुरणपोळी लाटे
तीर्थप्रसाद करुनशान भुकेल्यांना वाटे
शेतीच्या गच्चीवर आता सरकारच बसते?

उठसूठ होयनोय पाखुरा करते
'मुक्या'च्या चुलीपाशी झाडलोट करते
गावातला 'मुका' इथं फास घेऊन मरते
पोशिंद्याच्या मढ्यावर बांडगूळ चरते
'अभय'तेच्या मस्तीवर ऐदी फुसफुसते?

                         - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं आहे..
सध्याच्या राजकीय परिस्थितीला चपखल लागू पडते.

<<जुन्या काळचे डाकू >>
तेंव्हा ब्रिटिश राज होते. आता स्वतंत्र झाल्यावर आपला देश आपणच चालवायचा म्हंटल्यावर त्या डाकूंना रा़जकारणात पडावेच लागले.