तो, काही काही घेवुन येतो...

Submitted by शिवाजी उमाजी on 5 December, 2018 - 21:22

तो, काही काही घेवुन येतो...

काल पासुन मस्त माहौल बनवलाय पावसाने, त्याचं अगोदर अंधार करून येणं, म्हणजे कुणी म्हणायला नको कि "अचानक आला न् आम्हाला भिजवलं" तसं तर त्याचं आगमन साधं नसतचं मुळी, वाजत गाजत स्वारी येते, कधी कधी सोबत विजांचा लखलखाट असतो, वराती मधे दिव्यांच्या रोषणाई करतात तसा, तेव्हा त्या लखलखाटाची भिती वाटते खरी, पण आवडतं त्याचं असं वाजत गाजत होणारं आगमन.

एक, दोन, तीन थेंब अंगावर करता करता हळूच जाणवायला लागतं, अरे आपण तर भिजलो आहोत, आजुबाजूला अनेकांची तीच अवस्था, कोण आडोश्याला उभं, कुणी चेहरा आभाळाकडे करून एखादा थेंब सरळ तोंडात पडतो का याचा प्रयत्न करतो, चातका सारखा, (बर्‍याच जणांना लहाणपणी असं केलेलं नक्की स्मरत असेल), तर कोण पळतोय! तरीही भिजतोय, वेगळचं विलक्षण मनोहर दृष्य असतं ते. हळुहळू त्याचा वेग एका लयीत वाढू लागतो, इथं रस्त्यावर सारा राड जमा होऊ लागतो, चिडचिड, चिखल होतो, पुन्हा त्याचा वेग दुपटीने वाढतो, तसा रस्त्यावरचा गाळ कचरा उताराकडे शक्य तेवढा वाहू लागतो, रस्त्याशेजारच्या गटारांमधे जागा शिल्लक असेल तर वाहून पुढे जात राहतो, पण काही वेळाने वाहण्याचा प्रवास मंद मंद होत जातो, ती क्रिया मंद होते, थांबते, वरून सतत पडणारं उर्वरीत पाणी रस्त्यावर जमा होउ लागत, तर यात त्याचा काय दोष? कचरा काय त्यानं केलाय, गटारं काय त्यानं साफ करायची? मग आम्ही काय करायचं?

आला आला म्हणता तो येतो, चुकुन फुटक्या गळक्या कौला-पत्र्यातून थेट घरातच प्रवेश करतो, एकच पळापळ होते, आनंद मिश्रीत चडफड होते, जागोजागी पातेलं, घमेलं जे मिळेल ते भांड ठेवलं जातं, किती मनोहारी दृष्य ते! एखाद्या अँन्टीकच्या प्रदर्शनात मांडलेल्या वस्तू भासतात आपलीच भांडी, मग त्या प्रत्येक भाड्याचा इतिहास आठवु लागतो, "अरे, हि तर आपल्या लग्नात कमु मावशीने दिलेली परात, आणि हा हंडा, आईनं दिला होता" म्हणता म्हणता घर धनीन हळूच पदर डोळ्याला लावते. तसंच काहिसं ईमारतीत होतं, उघड्या बाल्कनीत कधी तरी लागतील, कामी येतील म्हणुन ठेवलेले कुठल्या कुठल्या वस्तुंचे खोके पार चिंब होउन लगदा झालेला त्यांचा, पुन्हा चिडचिड, तरी मी सांगत होतो... "फेकुन द्या, नही तर भंगारात द्या, पण नाही ऐकल माझं", म्हणत मुलगा बाबांना सुनावतो, काही काळ वादविवाद होउन बाल्कनी स्वच्छ होते, आणि प्रथमच बाल्कनीत आल्या सारखे तीघं चौघं तीथं चहा घेत जमा होतात, तिथुन दिसणारं, तसं नेहमीचचं समोरच्या रस्त्यावरलं दृष्य पावसाने पुर्णतः रिर्फ्रेश करून नव्यानं दिलेलं असतं. जे मनाला पण निवांत करून जातं.

डोळ्यात प्राण पाणी आणुन, हात जोडून मिरगाची वाट पाहणार्‍या शेतकर्‍याची गोष्टच वेगळी. भुईवर पडलेला पहिला थेंब जणु अमृतच आहे असचं त्याला वाटतं, त्याची किंम्मत तोच जाणे, एक दोन करता करता, अगणित अमृत थेंबानी धरणीची कुस ओलावते, अन् सुटतो जगातला सर्वात महागडा, कुठेही साठवता न येणारा असा इसेंन्स, अमृत दरवळ, मृदगंध, सुगंध... छाती भरून घेतली तरी भुक भागत नाही त्याने. घरात लागणारं तेल, मीठ, मिरची आधीच कशीबशी आणलेली असते, मग शेतकर्‍याची लगबग सुरू होते, किती किती कामं उरकायची असतात त्याला? पेरलेल्या प्रत्येक दाण्यातुन हिरवा कोंब यावा या साठी सारे प्रार्थना करीत असतात, मागल्या काहि वर्षातल्या नुकसानीची भरपाई यंदा होवु दे, घेतलेली कर्जे सुध्दा मिटू दे, सालभर पुरेल ईतकं मिळू दे रे, पिकू दे परमेश्वरा...

कष्ट करून थकलेल्या व पिकाची वाट पाहणार्‍या आणि नोकरी व्यवसायातुन वेळ, रजा काढणार्‍या चारमान्याना सह सर्वांना वेध लागतात ते आषाढीच्या पंढरपुर वारीचे, कधी जावुन विठोबाचं दर्शन घेतो असं मनोमन वाटणारे लाखो वारकरी उन पावसाची, कशाची पर्वा न करता वैकुंठ भुमीला, चंद्रभागेच्या तीरी जमा होतात, केलेल्या सार्‍या कष्टाचं सार्थक झाल्याची भावना मनात घेवुन, विठ्ठलाचे दर्शन घेतात, भरून पावल्याचं समाधान घेवुन पुढील वर्षी पुन्हा येण्या साठीचं मोठ बळ घेवुन जातात.

त्याच्या अस्तित्वाच्या या चार महिन्यात प्रत्येक जण त्याच्या सोबत आपलं काही ना काही नातं जोडून असतो. नवी सासुरवाशीन माहेरातल्या वेगवेगळ्या सणांची, परंपरांची वाट पहात असते. सण, व्रतवैकल्यांचा वेगळाच मुलामा या वेळी वातावरणात चढलेला असतो, अगदि वट पौर्णिमा, नारळी पौर्णिमे पासुन सुरू होणारा हंगाम गणेश चतुर्थी पर्यंत पार कळसाला पोहचलेला असतो. धार्मिक व पारंपारीक संदर्भांसह वेगळं आर्थिक समिकरण पण यात गुंतलेलं असतं, सारं वातावरण कसं मस्त भारून गेलेलं असतं.

याला कवी, लेखकांना प्रेरणा देणारा ॠतु म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये, ईतक्या अनेक प्रकारचं साहित्य या काळात निर्माण होतं. हळव्या मनाला आणखी हळवा, प्रेमळ करणारा मोसम हा... प्रत्येकाला हवा हवासा, प्रत्येका साठी काही तरी पँकेज देणारा हा पाऊस तसा सर्वांचा लाडका. कधी कधी रौद्र रूप घेवुन दहा बारा वर्षा पुर्वीचा महापुर, माळीन, ॠषीकेश, बद्रीनाथ वगैरे ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांची आठवण करून देतो. करून देतो आठवण आपण केलेल्या चुकांची, अपार जंगल तोडीची, प्लास्टीकचा अनावश्यक वापर केल्याची, प्रवाहाचे नैसर्गिक मार्ग बुजवण्याचे, बदलण्याचे प्रताप म्हणुन ढासळणार्‍या दरडीनां दोष देवुन काय फायदा? खरे दोषी तर आपण आहोत याची जाणिव करून देणारा पाऊस आता आम्हाला त्रासदायक वाटतो. तरीही दरवर्षी तो काही ना काही घेवुन येतो...

©शिवाजी सांगळे, +91 9545976589 email:sangle.su@gmail.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही अजूनही पावसात भिजत आहात,पण पावसाळा तर केव्हाच संपला,आता हिवाळ्यात थंडी वाजते का नाही ते सांगा?

पावसाबद्दलचं हे सुद्धा आवडलं.
खरं आहे... स्वार्था मानवाने ठायीठायी निसर्गावर अतिक्रमण केले आहे.
फार छान लिहिता तुम्ही... निसर्गवर्णनाला सत्यतेची जोड खासच.