कृतज्ञता

Submitted by दीपा जोशी on 16 September, 2017 - 06:51

कृतज्ञता

आज काल सकाळी उठल्यापासून मला कृतज्ञ वाटत राहतं.
इंडियन जर्नल ऑफ एंडोक्राइन अँड मेटॅबॉलिझम च्या २०१३ सप्टेंबर च्या अंकात भारतातल्या हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणाबद्दल एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यातल्या एका उल्लेखानुसार, २००८ मध्ये एक संशोधन प्रसिद्ध झालं होत. त्यामध्ये असं म्हटलं होतं की, पुढच्या १५ वर्षात जगातल्या हृदय-विकाराच्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण एकट्या भारतात असतील. त्यातल्या बऱ्याच जणांना अगदी लहान वयातच हृदयविकार होण्याच्या शक्यताही या संशोधकांनी वर्तवल्या होत्या.त्यामध्ये वातावरणातील प्रदूषणासारखी कारणं आणि नवीन बदलत्या तणावयुक्त जीवनशैलीचा अंगीकार हे कारण महत्वाचं दिलं होत. मागच्या आठवड्यात युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या वैद्यकीय केंद्राने एक संशोधन प्रसिद्ध केले. दक्षिण आशियातल्या (त्यात भारत येतो!) ज्या घरात अनुवंशिकतेने हृदयविकार आला आहे त्यांना हृदयविकाराचा धोका इतरांपेक्षा तिप्पट जास्त असतो असं त्यात म्हटलं आहे. दक्षिण आशियायी वांशिक गटात
हृदय विकाराचे प्रमाण आनुवंशिक कारणाने जास्त असते, असं हे संशोधन म्हणते.
याचा अर्थ, भारतीयांना सदोष जीवन शैली बरोबरच आनुवंशिक कारणांमुळे- म्हणजे, सदोष जनुकांमुळेही हृदयविकाराचा सामना करावा लागतो.
अनेक वर्षे माझीही जीवनशैली धावपळीची आणि तणावपूर्ण नक्की होती. मग मलाही सगळा गाशा गुंडाळून या जगातून लवकरच ‘एक्झिट’ घ्यायला लागण्याची शक्यता होतीच तर ! किंवा त्याच्या जवळपास जाणारी परिस्थिती येईल अशी अवस्था सुद्धा येऊ शकली असती. पण अजूनही माझं सगळं धडधाकट आहे, ते आनुवंशिक कारणाने तर नव्हे ? खरंच असं असेल तर, मला निरोगी जनुक देणाऱ्या माझ्या आई- वडिलांप्रती, आणि हा निरोगी जनुकांचा प्रवाह माझ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या माझ्या सगळ्या पूर्वजांप्रती मला खूप कृतज्ञता वाटू लागली.
सकाळी उठल्यावर हा विचार मनात आला, तसं सगळ्या जगाबद्दलच मला कृतज्ञता वाटू लागली. सकाळी ताजेपणाचा ‘फील’ देणारा, बरोब्बर चव असलेला चहा; रात्री पाऊस पडून गेल्यास सकाळी स्वच्छ झालेली आणि हवाहवासा वाटणारा गारवा देणारी हवा, निळेभोर शांत आकाश, प्रसन्नपणे गिरक्या घेणारे पक्षी, सळसळणारी हिरवीगार झाडं, शाळेला जाणारी चैतन्यमय लहान मुले, माझी काळजी असणारे माझे आप्त … सगळं जीवनच कसं मनात साठवून ठेवावं इतकं सुंदर वाटू लागलं. अवती- भवती जे जे आहे त्या सगळ्यातलं सोंदर्य, माझा जीवनप्रवास सहज सुलभ करण्यातला त्याचा वाटा अगदी स्पष्ट जाणवू लागला, आणि या सगळ्यांच्या बद्दलच्या कृतज्ञतेने मन अगदी भरून गेलं .
आणि हो! हे सगळं माझ्या बुद्धीला जाणवू देण्याची कृपा करणाऱ्या त्या ‘सकलार्थ-मति-प्रकाशु’ जीवन-विभु परमात्म्याचे तर किती आभार मानू ! खरंच…. सगळ्या सगळ्या प्रति कृतज्ञता बाळगून विपश्यनाची ती प्रसिद्ध प्रार्थना आहे ना- ‘तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होये रे….’
ती अगदी मनापासून गुणगुणविशी वाटत राहतेय!

Group content visibility: 
Use group defaults

तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होये रे >> किती सुंदर विचार आहेत. खरेच सगळ्यांनी असा विचार रोज केला पहिजे.

याचा अर्थ मरणाची भीति घातल्याशिवाय देवाचे उपकार लक्षात येत नाहीत असा करायचा का?

नन्द्या ४३,तसे नव्हे,तर निरोगीपणाची जनुकं आपल्याला मिळाली आहेत याबाबत आणि ते लक्षात येण्यासारखी बुद्धी मिळाल्याबाबत कृतज्ञता व्यक्त झाली आहे.

मला निरोगी जनुक देणाऱ्या माझ्या आई- वडिलांप्रती, आणि हा निरोगी जनुकांचा प्रवाह माझ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या माझ्या सगळ्या पूर्वजांप्रती मला खूप कृतज्ञता वाटू लागली.>>>>>>> तुमच्यी भावना पोहोचल्या.पण त्या शब्दांवर अडखळायला झाले.

लिखाणात फ्रेशनेस जाणवला.