आपण आणि पाऊस

Submitted by राजेश्री on 14 July, 2018 - 02:44

आपण आणि पाऊस....

IMG_20180714_103707.jpg

शनिवारची आळसावलेली सकाळ,बाहेर कधी मुसळधार तर कधी रिमझिमता पाऊस.घरात कामांचा नुसता रतीब.मन आणि शरीराने मात्र अजूनही आळस नाहीच झटकला.कुठे जायचे नाही होईल त्या कलाने काम करीत राहूया म्हणून गोगलगाईसारखी माझी संथ हालचाल,आणि इतक्यात मोतीच्या भुंकण्याचा आवाज बाहेर बघते तर शे-दीडशे गायी आणि चार गुराखे आमच्या घराशेजारच्या माळरानावर गायींना चरायला घेऊन आलेले.खुरटी झाडी आणि जमिनीलगतच गवत पण गुराख्याने गायींची समजूत काढल्यासारख्या त्या गाई जमिनीला हुंगत चरण्यायोग्य काही मिळतं का बघत होत्या.पावसाची रिमझिम चालूच होती आणि मी त्या चालीत घरात काही कामाला हात लागतो का हे बघण्याच्या विचारात.पाऊस वाढला ते गुराखी कुठे बसलेत बघायला बाहेर डोकावलं तर गायी आणि ते गुराखे पावसात सचैल नहात होते जणू.ते गुराखी त्या गायींना सांगू पहात होते कदाचित इथे कुठे आडोसा नाहीच आहे .बघा आम्हीही भिजत आहोत.आपल्याला भिजावच लागेल.मला कृष्ण आठवला..गोवर्धन पर्वत उचलून आडोसा निर्माण केलेला.मन म्हणाले गायी ठीक आहे गुराखी पण भिजतयात.आपण कस पटकन पावसातून बाहेर जाऊन आलो की डोकं पूस...केसातील पाणी काढ म्हणून आईचे, ताईचे उपदेश सुरू होतात हे आठवलं.
मी ते बघून आत गेले माझा कामाला काही हाताच लागला नाही पुन्हा बाहेर आले,गुराख्याना ओ दादा ...ओ दादा...अशी शक्य तेवढी मोठी हाळी मारू लागले.पाचव्या सहाव्या हाळीत त्यांच्या कानी माझी हाक गेली.मी खुणेने इकडे या म्हणून बोलावलं.एक माणूस आला .मी म्हंटल किती जण आहात चहा पिऊया का?तर म्हणाला,मावशी(इथे मला मात्र त्याचा राग आला होता..गिळला मी तो..) आम्हाला चहा प्यायची सवय नाहीये.आम्ही चहा पित नाही.मग म्हंटल बर दूध तरी प्या गरम.म्हंटला ते पण नाहीच पीत.. त्याच्या अंगावर फाटका रेनकोट आत मळका ,जीर्ण शर्ट ,अचानक काही सुचलं आणि बिटूचे कपड्याचे कपाट उघडले.त्याचे सारे शर्ट इस्त्री करून ठेवलेले.सात आठ शर्ट पांढरेच. मी निळा एक आणि चेक्स चा काळा एक असे चांगलेच ड्रेस घेऊन कॅरी बॅग मधून त्याला दिले.(मनात म्हंटल..देवा याला पाच हजार चा दंड नको व्हायला...)घेताना तो घ्यायला तयार नव्हताच मी म्हंटल असावेत सुखे दोन ड्रेस म्हणून दिलेत ठेवा मग त्याने ती पिशवी ठेऊन घेतली.आता बिट्या घरी आल्यावर मला काय म्हणेल माहीत नाहीच.पण म्हंटल ते नंतर बघता येईल.यामध्ये आमचे मोती महाराज..कोण हा आगंतुक म्हणून त्यावर प्रचंड आवाजात भुंकत होते.पाऊस थांबला आणि तो गुराखी पुन्हा गायीजवळ गेला.
हे सगळं सांगण्याचा हेतू काय तर काहीच नाही हेतू...आपल्यासाठी बाहेर रिमझिमणारा हा पाऊस कधी कवितेची कवणे सुचवितो...पाऊस डोळ्यात साठवत वाफाळता चहा किंवा कॉफीचा कप आपल्याला सुखावतो...पावसात कधी आपण ट्रेकिंगला जातो...पावसात आपण मस्त ताणून देतो...बाहेर पाऊस पडू लागला की आपल्या खिडकीच्या काचांमधून निथळणारे पाणी बघत आपण उबदार अश्या दुलईत पहुडलेले असतो...कधी आवडती गाणी ऐकतो...पाण्याचे रंग जसे तसे प्रत्येक परिस्थितीचे रंग...मी ,स्वतः यातून पावसातून दूर कुठेतरी नजर टाकली ना की पावसाच्या हिरवळीच्या पुढे ग्रीन नाही तर ग्रे रंगी जीवन दिसू लागत.आपलं आपलं नशीब म्हणून आपण आपल्या अवतीभोवती दृष्टीस पडणाऱ्या,आणि हलाखीचे जीवन जगणाऱ्या माणसांना पाहिले की हळहळतो.पण त्यातूनही त्यांचे त्या क्षणांचे जीवन सुसह्य करण्यासाठी नक्कीच काही करू शकतो.आपल्या आणि पावसाच्या आनंदात घटकाभर तरी कुणाला सामील करून घेता आले तर आजूबाजूची हिरवळ आपल्याला सुखावत राहील...निदान एवढं तरी करू शकतोच आपण...हो ना?

©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१४/०७/२०१८

IMG_20180714_103652.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथल्या हिवाळ्यात सुद्धा भारतातल्या पावसाची मस्त आठवण करून दिली तुम्ही. पावसाळ्यात लेख वाचला असता तर अजून मस्त वाटले असते.
निदान एवढं तरी करू शकतोच आपण...हो ना?>> नक्कीच