रंगांशी जडले नाते

Submitted by mi_anu on 20 November, 2018 - 22:58

(असाच एक जुना पूर्वप्रकाशित लेख.)

मला माहिती आहे, हे 'भव्यदिव्य' शीर्षक वाचून तुम्ही 'अरे वा, अनु चित्रं पण काढते वाटतं?' म्हणून उत्सुकतेने हा लेख वाचायला घेणार. (म्हणूनच हे शीर्षक दिलं! हॅ हॅ हॅ!) पण माझं नातं जडलं आहे ते चित्रांच्या रंगांशी नाही, तर कपड्यांच्या रंगांशी.

सातवीत असताना आमच्या शाळेचा गणवेष बदलला.म्हणजे, पूर्ण नाही बदलला, वरच्या गडद निळ्या बाहीरहित झग्याच्या आत घालण्याच्या शर्टाचा रंग पांढरा होता, तो पुढच्या आठवड्यापासून आकाशी झाला. माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं, 'अगं आपली पांढऱ्या कपड्यांना घालायची नीळ असते ना, ती जास्त घालून शर्ट त्यात बुडवून ठेवायचा. आपोआप आकाशी होतो.' दुसऱ्या दिवशी न्हाणीघरात माझा प्रयोग सुरु झाला. ते चौकोनी पाकिट मिळतं ना नीळीचं, ते ओतलं आणि भिजवला शर्ट.

पिकासोच्या थोबाडीत मारेल, असं जबरी ऍबस्ट्रॅक्ट निळं रंगकाम झालं होतं शर्टावर. निळाशार, आकाशी, फिका आकाशी, अगदी फिका आकाशी अशा सर्व छटा त्या बिचाऱ्या सदऱ्यावर एकवटल्या. शिवाय निळीची बोटं भिंतीला लागून भिंतीवर अगम्य लिप्या उमटल्या त्या वेगळ्याच. मातेने नुकतंच बालमानसशात्राचं एक पुस्तक वाचलेलं असल्याने तिने प्रचंड सहिष्णुतेने तो निळा पसारा परत पांढरा केला. नाहीतरी 'कार्टी जरा जास्तच प्रयोगशील आहे. अगदी तिच्या बाबांवर गेली आहे' हे आईचं मनातलं मत होतं. कुंडीतल्या झाडाला पाण्याऐवजी बर्फ टाकणे, बाहुलीचे केस कापून ते वाढावे म्हणून तिच्या डोक्याला महाभृंगराज तेल लावणे, गरम वाफाळता चहा स्ट्रॉने पिणे,नवी वही केल्यावर 'जुनी वही आता चांगली दिसत नाही' म्हणून जुन्या वहीतलं सर्व लिखाण परत नवीन वहीत उतरवणे इ.इ. माझ्या पराक्रमांचा अनुभव तिला होताच.

पुढे अकरावीत गेल्यावर गणवेषाच्या पांढऱ्या शर्टावर प्रयोगशाळेत काहीतरी सांडलं. पांढऱ्या शर्टावर एक पिवळट डाग पडला. तो जाईनाच कशानेही. म्हणून काही दिवस त्याला पांढऱ्या खडूने रंगवून पाहिला. तितक्यात आमच्या इमारतीत 'फॅब्रिक पेंटींग' च्या नवीन लाटेत घरात आलेले रंग मिळाले. योग्य तो पांढरा रंग शोधून त्या डागावर लावला आणि 'दाग? ढुंढते रह जाओगे!' झालं. पण दुसऱ्या दिवशी इस्त्री करताना त्या डागाने आत्मार्पण करुन स्वत:बरोबर खालच्या कापडाला सुद्धा नेलं. चक्क गोल डागाच्या ऐवजी गोल छिद्र.

पुढे महाविद्यालयात गेल्यावर गणवेष नाही म्हणून मी खूष. वसतिगृहात असताना एकदा केसांना मेंदी लावली. मैत्रिणीशी गप्पा मारत असताना जाणवलं की मागे वाळत घातलेला श्रीलंकन मुलीचा पांढराशुभ्र टीशर्ट पण मेंदीची खूण अंगावर बाळगून आहे. वेळीच कळल्यामुळे तो धुतला आणि रंग गेला.

पण दुसऱ्या वसतिगृहात गेल्यावर रंगाशी माझं नातं जास्तच घट्ट होत गेलं. एकदा निरोप आला की हिमानी नावाच्या 'लय डेंजर रॅगिंग मास्टर' मुलीने मला खोलीत बोलावलंय. गेले. तिने मला दोरीपाशी नेलं.
'अनु, ये क्या है?'
'आपका टीशर्ट, दीदी.' (आम्ही नवागत असल्याने ज्येष्ठ मुलींना 'दिदी' आणि ज्येष्ठ मुलांना 'भैया/सर'(ज्याला जे चालेल ते) म्हणावे लागे.)
'उसपर क्या है?'
'रंग.'
'किसका है?'
'मेरे ड्रेसका.'
'गुड. अभी के अभी धोकर निकालो, अगर नही निकला तो मुझे बिलकुल ऐसा नया टीशर्ट लाकर दो.'

बादली आणि साबण घेऊन आमची स्वारी न्हाणीघरात. 'व्हाय मी?' हे असे घोर दैवदुर्विलास माझ्याच वाट्याला का यावे? नारींगी रंगाचा तो कपडा मुद्दाम वेगळा भिजवून वेगळा धुतला, तर वाऱ्याने उडून त्याचा रंग शेजारच्या दोरीवरच्या पांढऱ्याभडक(म्हणजे, पांढऱ्याशुभ्र हो! जर इतर रंगाना 'भडक' ही पदवी द्यायची तर पांढऱ्या रंगातील जास्त्तीत जास्त शुभ्र छटेला 'पांढराभडक' म्हणायला हरकत काय आहे?) टीशर्टालाच लागावा?? आणि तोही हिमानीचा टीशर्ट?

स्टोव्हचे रॉकेल, साबण, १०० रु. किलोवाला 'लय भारी' साबणचुरा सगळं लावून पाहिलं. पण नारींगी रंग काही त्या टीशर्टाला सोडेचना. 'नवीन घेऊन देऊ' म्हणून मी खिसापाकीट चाचपायला जाणार तितक्यात शेजारी ठेवलेली 'मेडीक्लोर' ची बाटली दिसली. पाणी शुद्ध करण्यासाठी नुकत्याच माझ्या खोलीसाथिदारीणीने नवी नवी बाटली आणली होती. मेडीक्लोरचे तीन थेंब पाणी शुद्ध करायला पुरत असतील, पण त्या शर्टावर पसरलेले डाग काढायला मला अख्खी बाटली लागली! 'नव्या शर्टाचं एका बाटलीवर निभावलं' म्हणून बाटली पुन्हा विकत आणली. यावेळी रंगांशी असलेलं माझं घट्ट नातं बघून मी स्वत: साठी एक जादा बाटली आणून ठेवली होती.

एका सहलीला माझ्या परममैत्रिणीने हौसेने घालायला तिचा पांढराशुभ्र आणि वर विटकरी लोगो असलेला टीशर्ट दिला. तिला मी तो धुवून परत देणार होते. 'यावेळी रंग लावायचा नाही, नाही, नाही, नाही' असं घोकत मी तो काळजीपूर्वक धुतला. आसपास काही पांढरं वस्त्र वाळत न घातलेली एक एकांतातली दोरी निवडली. शर्ट पिळून निथळायला नळावर ठेवला होता तो घ्यायला गेले आणि .. हाय दैवा! नळावर एका रंगाऱ्याने हातपाय धुतले होते तेव्हा नळाला लागलेला निळा रंग आता अतिव प्रेमाने पांढऱ्या टीशर्टाला चिकटला होता! यावेळी 'मेडीक्लोर है ना..' असं म्हणून मी निवांतपणे तो परत धुवायला घेतला. पण मेडीक्लोरचा रंग काढायचा गुण शर्टावरील विटकरी लोगोला चांगलाच नडला. मैत्रीण 'जाऊ दे गं, त्यात काय??' म्हणून सोडून देण्याइतकी चांगली मैत्रीण होती आणि आजही आहे, पण त्या विटलेल्या विटकरी लोगोने माझ्या हृदयावर केलेली जखम आजतागायत तशीच आहे. (हे असं काहीतरी उदात्त भावनाप्रधान वाक्य अधूनमधून टाकायचं असतं म्हणे बालपणीच्या आठवणीत.)

अशा एका परीक्षेनंतरच्या सुट्टीत आमच्या घरी बाटीक व बांधणीची लाट आली होती. रंग उत्साहाने आणले होते.यावेळी मात्र रंगाशी जडलेलं नातं मी घट्ट केलं. फॅशन रस्त्यावरुन चाळीस रुपयात आणलेल्या शर्टाचा बळी देऊन त्याचा रंग आकाशीचा गडद हिरवा केला. 'हेय! समथिंग डिफरंट अबाउट धिस शेड!' या मैत्रीणमंडळीच्या चाणाक्ष नजरेला 'फॅशन स्ट्रीटचा आहे' हे नरो वा कुंजरो वा उत्तर देऊन टाळलं.माझा कपड्याचा चॉइस 'जरा घाटी टाइप्स'(आता सुधारला आहे हो मी!) असतो असे त्यांचे वादातीत मत असल्याने विषय आणि पुढे गेला नाही.

'कुछ कुछ होता है' चित्रपटानंतर पांढऱ्याशुभ्र सलवार कुडत्यावर लाल बांधणीची ओढणी ही नवीन फॅशनलाट आली. यावेळी मी सावध होते. नळ तपासला, कपडे वेगळे धुतले, काळजीपूर्वक वेगळ्या दोरीवर वाळत घातले. पण नियती इथेही खदखदून हसत होती!! (उदात्त वाक्य-२). आमच्या वरच्या बिऱ्हाडातल्या यंडुगुंडू बाईच्या लहान मुलीच्या वाळत घातलेल्या परकर पोलक्याचा रंग टपकून बरोबर पांढऱ्या कुर्त्यावर पडला. आता मी सावध होऊन पांढरेशुभ्र कपडे विकत घेणे आणि पांढरेशुभ्र कपडे वापरणाऱ्यांची संगत शक्यतो टाळली.

लग्न झाल्यावर कपडे भिजत घातलेले असताना आपला गडद पोशाख बाजूला वेगळा ठेवला. पण काही परोपकारी कुटुंबघटकांनी 'विसरली असेल घाईत' म्हणून तो परत टबात टाकला. 'रंगाख्यान' मागील पानावरुन पुढे चालू!! समस्त पुरुषमंडळींच्या पांढऱ्याशुभ्र बनियानला निळा रंग! पुन:श्च मेडीक्लोर..

हल्ली मी गडद/फिकट रंगाचे कपडे धुवायला टाकताना स्वत:ला खालील प्रश्न विचारुन मगच धुते:
१. बादलीत इतर कोणाचा पांढरा कपडा आहे का?
२. बादलीत इतर कोणाचा गडद कपडा आहे का?
३. नळाला काही लागलं आहे का?
४. कामवालीच्या ओल्या साडीचा रंग जाऊन कपड्याला लागण्याची शक्यता आहे का?
५. वरच्या मजल्यावरील मंडळींनी आज काय वाळत टाकले आहे?
७. 'कपड्याचा रंग जाणार नाही' अशी १००% खात्री असलेल्या कपड्यावरच्या विणकामाचा रंग जाईल का?
८. मेडीक्लोर जवळच्या दुकानात उपलब्ध आहे का?

पण तरीही एखादी दुचाकीवरुन पांढरेशुभ्र कपडे घालून चाललेली सुंदर ललना पाहिली की मन परत कळवळतं..परत एकदा दुकानातला पांढराशुभ्र पोशाख हौसेने घेतला जातो.. आणि रंगांशी जडलेलं माझं नातं परत कधीतरी घट्ट होतं!

-अनुराधा कुलकर्णी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहलयं! Happy

असे रंगीबेरंगी शेडचे पांढरे शर्ट शाळेत वापरलेत! Happy

नेहमी प्रमाणे धमाल. भारी जमलय. Lol Lol

नवी वही केल्यावर 'जुनी वही आता चांगली दिसत नाही' म्हणून जुन्या वहीतलं सर्व लिखाण परत नवीन वहीत उतरवणे Lol
बऱ्याच उद्योगी दिसता आपण.

मस्त लिहीलंय Happy Happy
आमच्या वरच्या बिऱ्हाडातल्या यंडुगुंडू बाईच्या लहान मुलीच्या वाळत घातलेल्या परकर पोलक्याचा रंग टपकून बरोबर पांढऱ्या कुर्त्यावर पडला>>>> हे खुपच दुर्दैवी आहे Lol

तुमच्या राशीला पांढरा रंग चालत नसणार बहुतेक Proud - एक अर्धवट राशीतज्ञ

रच्याकने पांढ र्याशुभ्र कपड्यान्चे बरेच constraints असता अजुन,
बेसिक उदा:
१. धुळ हा सर्वात मोठा शत्रु, त्यापसुन सावधान
२. पाऊस, चिखल वगिरे पासुन सावधान

भारी!
मला नेहमी हा प्रश्न पडतो की मूळ कपड्यापासून सहज फारकत घेणारा रंग ज्या कपड्याला लागतो त्या कपड्याला एवढ्या निष्ठेने का चिकटून बसतो?
माझ्या एका सुंदर गुलाबी ड्रेसला लागलेल्या दुसर्या ड्रेसच्या ब्राऊन रंगाची कटु आठवण जागी झाली. शिवाय एका लाल टॉपचा रंग जीन्सला लागल्याची आणि नंतर ती जीन्स डाय करून घेतल्याची आणि डाय केल्यावर परत कधीही न घातल्याचीही Sad ( काहीतरीच रंग निर्माण झाला होता)

"परोपकारी कुटुंबघटकांनी " >> अगदी अगदी! लाल बांधणीचा ड्रेस भिजवला आणि समस्त बनियन आणि परकर गुलाबी शेडचे झाले Lol

बनियान गुलाबीच होतात.
निळे झाले असते तर निदान नीळ घातली वगैरे मनाला समजावता येते.पण नाही.लालच रंगाची सलवार किंवा कुर्ता धुण्यात जाऊन गुलाबीच झाला पाहिजे हा मर्फी चा नियम आहे.

रंगाबद्दल अगदी अगदी झालं...माझाच एकटीचा असा प्रॉब्लेम आहे की काय असं वाटत असताना मी एकटी नाही हे पाहिल्याने जीव थंडावला

बबौ! Biggrin
नवीन वॉम घेतल्यावरचा किस्सा. जवळ जवळ सगळा लॉट फिक्या आणि पांढर्‍या कपड्यांचा. नवीन वॉम ९५ डिग्रीवर पाणी तापवून कसं कपडे धुतं ते पाहायचा नसता मोह होताच. आणि काय नाय त्या कपड्यांच्या गठ्ठ्यांत एक जीन्स चं पिल्लू होतं बाळाचं. हरे राम. ते निळसर कपडे अज्जून वाकुल्या दाखवतात ४/५ महिन्यांनतरही. गरम पाण्यानं बहुतेक पांढरे कपडे डायच झाले असावेत.

मस्त लिहीलंय!
मला नेहमी हा प्रश्न पडतो की मूळ कपड्यापासून सहज फारकत घेणारा रंग ज्या कपड्याला लागतो त्या कपड्याला एवढ्या निष्ठेने का चिकटून बसतो?>> Lol Lol
माझाच एकटीचा असा प्रॉब्लेम आहे की काय >> छे हो ! आपण सगळे एकाच होडीत Wink

लग्न झाल्यावर कपडे भिजत घातलेले असताना आपला गडद पोशाख बाजूला वेगळा ठेवला. पण काही परोपकारी कुटुंबघटकांनी 'विसरली असेल घाईत' म्हणून तो परत टबात टाकला>>> हा तर सेम टू सेम माझा किस्सा .. "फक्त रंग माझा वेगळा" Wink गुलाबी Happy

छे हो ! आपण सगळे एकाच होडीत >>> ++११११
छान लिहीलय.
मी नेहमी कॉटनचे कुडते वापरते. त्यांचा पाण्यात भिजवले की हमखास रंग जातोच जातो. रोज बाकीच्यांसाठी मशीन लवले जात असतांना माझे मात्र हाताने धूत बसावे लागतात. त्यामुळे जाम चिडचिड होते. क्वचित एखादा कुडता रंग न जाणारा निघाला की मला फार आनंद होतो.

वेस्टसाईड चे कुत्रे रंग न जाणारे असतात.
पण त्यांनी उतसा कलेक्शन मध्ये 80% टक्के कुर्ते रोल अप स्लिव्ह फॅशन मध्ये बनवायला लागल्यापासून मी वेस्ट साईड ला सोडचिठ्ठी दिली.माझ्यावर रोल अप स्लीव्ह अजिबात सूट होत नाहीत.

मस्त लिहिलंय ! Lol

मेडीक्लोर आणतो आता, नुकतीच एक नविन बनियन पिवळसर झालीय.

आला आणा
मेडिक्लोर डाग काढते पण धागे कमकुवत होतात

वेस्टसाईड चे कुत्रे >> Lol
पण बरोबर आहे तुझे. वेस्टसाईडच्या कपड्यांचा कलर जात नाही. म्हणून मी लेगिन्स तरी तिथून घेते. कुडते मात्र तिथले फारसे आवडत नाही. एखादा आवडला तर नेमक्या माझ्या साईझचा मिसिंग असतो. किंवा किंमत कायच्या काय असते.

भारी लिहिलय... Lol
परोपकारी कुटुम्बघटक.. Rofl हे प्रत्येक कुटुम्बात असतातच.

मेडीक्लोर आणतेच आता.
वॉ म. मुळे आतापर्यन्त सगळ्या बान्धणी वै ड्रेसेसचा रन्ग स्लिप्स, लेकाचे बनियन्स ना लागलाय. म्हणुन वैतागुन आता दर रविवारी अख्खा ढिग उपसावा लागतो.

हे 'भव्यदिव्य' शीर्षक वाचून तुम्ही 'अरे वा, अनु चित्रं पण काढते वाटतं?' म्हणून उत्सुकतेने हा लेख वाचायला घेणार.>>>>>.>>> म्चित्र असेल म्हणूनच सकाळपासून लेख वाचायचा टाळला.भन्नाट लिहिलंय.मजा आली.

मला नेहमी हा प्रश्न पडतो की मूळ कपड्यापासून सहज फारकत घेणारा रंग ज्या कपड्याला लागतो त्या कपड्याला एवढ्या निष्ठेने का चिकटून बसतो?>>>>> Lol

भारी लिहीलय
मेडिक्लोर टाइप काहितरी वापरण्याचा प्रयोग मी पण केलाय

छान लिहिलंय.
पांढर्या कपड्यांसाठी आला वापरा. रंगीत कपड्यांवर डाग असेल तर वॅनीश.
मी पांढरे कपडे वेगळे भिजवते.
रंगीत वेगळे, त्यातही रंग जाणारे वेगळे.

आमच्या कडे वेगळे भिजवण्या इतके नसतात हो पांढरे कपडे
एका प्राण्याकडे असतात पण त्याचा आमच्या श्वेतवस्त्रकलंकदमनक्षमतेवर घोरघोर अविश्वास असल्याने स्वतःचा धोबीघाट वेगळा मांडतो शनिवारी.

बरंय की मग.
माझ्या कडे नवर्‍याचे सॅन्डो बनियन्स, ढीगाने असलेले पांढरे शर्टस, एक दोन टीशर्ट्स, हात्रुमाल इ.
लेडिज बायकांचे आतले कपडे, कुर्ते, लेगिंग्ज. ओढण्या असला बराच पांढरा माल असतोय. Happy