हुकुमशाही _ सविस्तर

Submitted by भास्कराचार्य on 16 November, 2018 - 12:10

लागणारा वेळ:
एखादे दशक.

लागणारे जिन्नस:

१. १ नावापुरती चिमूटभर लोकशाही.

२. १ सरकारच्या हातात सर्व नाड्या असलेली अमाप ताकद असलेली 'कल्याणकारी' अर्थव्यवस्था. डबघाईला आलेली असल्यास उत्तम. पण तशी नसली, तरी चालू शकते. ती योग्य तशी 'वाटून' घेता येते. मात्र ह्या परिस्थितीत पदार्थ शिजायला थोडा जास्त वेळ लागण्याची तयारी ठेवावी.

३. सामदामदंडभेदाने सरकारच्या कह्यात असलेली समाजमाध्यमे. ह्यात वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीवरील बातम्या, झालंच तर चित्रपट, पुस्तके, इ. अशी सर्व जंत्री तयार ठेवावी. सरकारची हांजीहांजी करणारे लेखक, बातम्या देणारे, अभिनेते, खेळाडू असा सगळा मसाला ह्यात हवा. ही सढळ हाताने पेरावी. त्यामुळे मोजमाप देण्यात अर्थ नाही. ह्या सगळ्यांना देशात उच्चपदावर हळूहळू बसवावे. जेणेकरून पुढे येणारा 'शिक्षण' नावाचा पदार्थ चांगला शिजतो.

४. सरकारच्या जवळचे १०-२० उद्योगपती तरी हवेच. उपरोल्लेखित सगळी समाजमाध्यमे ताब्यात घेता येणे जर वेळखाऊ असेल, तर ह्या उद्योगपतींना ते काम वाटून द्यावे. त्याचबरोबर आदिवासी, जंगले, शुद्ध हवा, आरोग्याची जबाबदारी वगैरे नको असलेले फालतू घटक काढून फेकून द्यायला ह्या उद्योगपतींचा फार उपयोग होतो. त्याचबरोबर त्यांची विमाने वगैरे आपल्या दिमतीला राहतात. पैसा आपल्याकडे असेल, ह्याची काळजी घेता येते. मज्जानु जिंदगी!

५. १ पोलिस यंत्रणा लागतेच. राजकीय विरोधक, कोर्ट जजेस, पत्रकार इ. घटक जास्त आवाज करायला लागले, की तो आवाज दाबायला ह्यांचा फार उपयोग होतो. दंगलींमध्ये काय करावे वगैरे सूचना ह्याच्यात योग्य त्या प्रमाणात एकजीव करून घ्याव्यात. बदल्या वगैरे हत्यारे ह्या पदार्थाला शिजवायला उपयोगी पडतात.

६. ह्याचबरोबर १ सेनाही तयार ठेवावी. ह्यांचाही उपयोग पोलिसांसारखा करता येऊ शकतो. त्याचबरोबर 'न्याशन्यालिझम' वगैरे उन्मादाचे बुडबुडे पुढे येणार्‍या 'जनता' नामक पदार्थामध्ये कायम येत रहायला ह्यांचा फार उपयोग होतो. शेजारचा बंडू येऊन आपला पदार्थ खराब करून जाईल, अशी भीती थोड्याथोड्या वेळाने येत राहील, अशी काळजी ह्यांच्या सहाय्याने घेता येते, आणि मग पदार्थ जास्त चांगला शिजतो. सेनेचे प्रस्थ फार वाढले, तर वेगळ्याच प्रकारची हुकुमशाही येऊन पदार्थाची मजा अनोख्या पद्धतीने घेता येईल, ते वेगळंच.

७. १ बोंबललेली शिक्षणव्यवस्था घ्यावी. त्यात शिकवण्यात रस नसलेले शिक्षक, आणि फक्त पैशात रस असलेले पालक असे घटक असावेत. ह्या दोघांच्या सहाय्याने आपण मुलांच्या डोक्यात काय वाट्टेल ते मसालेदार शिक्षण भरू शकतो. त्याचबरोबर 'उद्योगपती' ह्या घटकाला ह्या व्यवस्थेत सामील करून खूश ठेवता येते. जनता ह्या पदार्थाचे हुकुमशाहीमध्ये नीट परिवर्तन करता येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा सर्वव्यापी बहुढंगी बटाट्यासारखा घटक आहे.

८. १ नावापुरती न्यायव्यवस्था घ्यावी. हा पदार्थ अतिशय थिजलेला दिसतो. पण आहे महत्त्वाचा. त्याला आपल्याला हव्या असलेल्या तापमानाला आणणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांच्या नावाने 'जनता' हा पदार्थ उकळत्या पाण्यातही शांतपणे शिजतो. ह्यातले न्यायालये, वकील, इ. सर्व जे अडचणीचे ठरू शकतात, ते घटक घ्यावे, व त्यांत आपली विचारसरणी पेरावी. ह्यासाठी पोलिस, उद्योगपती, पैसा, ह्या घटकांची मदत भरपूर होते. एकदा बहुसंख्यांमध्ये ही विचारसरणी सामदामदंडभेदाने पेरली गेली, की काही थोडेफार खड्यासारखे सलणारे असतात, त्यांना सहज बाजूला फेकता येते.

९. सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अर्थातच जनता. ही एकसंध नसते. अल्पसंख्यांक वगैरे खडे ह्यात मुद्दाम ठेवावेत. उरलेल्यांचा कल बर्‍यापैकी छुपा का होईना पण धार्मिक असावा. ह्या पदार्थात बर्‍याच भेगा पडलेल्या असाव्यात. गरीब-श्रीमंत, जाती-पाती, परदेशस्थ-स्वदेशस्थ अश्या भेगा मुद्दाम वाढतील असे करावे. ह्या पदार्थामध्ये घडणार्‍या प्रक्रिया आपल्या काबूत असल्याच पाहिजेत, अन्यथा पदार्थ बिघडू शकतो, किंवा पूर्णतः नासू शकतो. ह्या जनतेमध्ये देशासाठी फक्त उन्माद वाढत असावा. ह्यासाठी स्वच्छता, भ्रष्टाचार निर्मूलन वगैरे फालतू गोष्टींचे मोहन ह्या पदार्थात घालावे. मात्र खरेच असे काहीही करायला जाऊ नये, हे लक्षात घ्या. कारण जनता खरंच आनंदी राहिली, तर तुम्हाला जोरदार समर्थन देण्यासाठी त्यांच्याकडे कारण काय असणार?

ह्याखेरीज काही घटक काही देशांमध्ये घातले जातात, तर काहींमध्ये नाही. प्रत्येक रूपाची लज्जत काही वेगळीच असते. त्यामुळे शक्य झाल्यास सर्व प्रकार करून बघावेत. इथे त्यातले काहीच घटक दिले आहेत.

१०. विनोदी वाटणारे, भरपूर उपद्रवमूल्य असलेले धार्मिक गट भरपूर प्रमाणात घ्यावेत. ह्यांना थोडीशी उष्णता लागली, की ते आपसूक तडतड करायला लागतात. आपल्याला हवी असणारी रसायनं पुढे येणार्‍या 'जनता' ह्या पदार्थाच्या अंतरंगात पोहचवण्यासाठी ह्यांचा फार छान उपयोग होतो. त्याचबरोबर नको असलेल्या लोकांचा काटा ह्यांच्या साहाय्याने विनासायास काढता येतो.

११. नवीनच आलेले इंटरनेटसारखे माध्यम घ्यावे. ह्याची ताकद अफाट असल्याने घटक सदासर्वकाळ नियंत्रणात असावा. ह्यासाठी न्यायव्यवस्था, पोलिस, उद्योगपती इ. घटकांची मदत होते. ह्यावर वरच्या गटांना मुक्त प्रवेश द्यावा. ह्याचबरोबर उद्योगपती ह्या घटकाकडून पैसा घेऊन तो आपल्या हस्तकांना ह्या माध्यमावर वावरण्यासाठी द्यावा. त्याचबरोबर परदेशस्थ नागरिक ह्या घटकाला आपल्या बाजूने वळवून घ्यायला हा घटक फार उपयोगी ठरतो. पुढे ते आपल्या बाजूने झाल्यावर फुकटात आपली मदत करतात, ते वेगळेच. जनतेमध्ये ह्या माध्यमाने अफाट वेगाने बदल घडतो. त्यामुळे पाकृ आपल्यावरच उलटून आपले तोंड काळे होणार नाही, ह्याची काळजी घ्यावी.

१२. बरेच धार्मिक नेते घ्यावेत. १-२ उच्चमध्यमवर्गीयांसाठी पुरतात. इतरांसाठी स्थानकालपरत्वे बरेच लागतात. ह्या सगळ्यांनी विज्ञान, गॉड पार्टिकल, उत्क्रांती, स्त्रीने मंदिरात जाणे अश्या उदाहरणादाखल घेतलेल्या परंतु ह्यापुरतेच मर्यादित नसलेल्या गोष्टींवर अधिकाराने बोलले पाहिजे. ह्यात अधिकार महत्त्वाचा. काय म्हणतायत ते त्यांचं त्यांनाच समजत नाही, तर जन्तेला काय समजणार?

१३. एक खोटा मुखवटा हवा. आपण वास्तविक भले एखाद्याचा खून करू, पण परदेशात जाऊन त्याच्या नावाचा उदोउदो आपल्याला करता येईल, अशी क्षमता अश्या मुखवट्याने अंगी येते. ती क्षमता असल्याखेरीज ही पाककृती करायचा प्रयत्न करू नये. असे मुखवटे असले, की जनता ह्या पदार्थाला छान घोळात घेता येते. हे लक्षात ठेवावे. अश्या मुखवट्याबरोबरच स्वत:च्या प्रतिमेवर अतिशय प्रेम करण्याची क्षमता अंगी असणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतःच स्वतःवर प्रेम करत नसाल, तर जनता हा पदार्थ योग्य शिजून तुमच्यावर प्रेम करेलच कशाला?

ह्याखेरीज अजून बरेच घटक घालता येतात. परंतु वेळेच्या आणि जागेच्या अभावी आपण ह्यांवरच लक्ष केंद्रित करू.

क्रमवार पाककृती:

वास्तविक ही पाककृती एकसमयावच्छेदेकरून घडत असते. त्यामुळे क्रमवार वगैरे काही नाही. त्याचबरोबर घटकांमध्येच बरंच लिहिलं असल्यानं सर्वसाधारण काय करायचं, ह्याची कल्पना चाणाक्ष वाचकांना आलीच असेल. पण एक कल्पना म्हणून पुढील पायर्‍या देता येतील.

१ . दशकाच्या सुरवातीपासून आपल्या नामाचा गजर लोकांमध्ये हळूहळू होत राहील, ह्याची दक्षता घ्यावी. आपण कोणी धर्मवीर असल्यागत काही कांड केलेले असल्यास त्याचा वापर करावा. बहुधा बर्‍यापैकी धार्मिक असलेल्या जनतेला आपल्या कच्छपी लागायची इच्छा असते. ती त्यांना उद्योगपती घटक वापरून विकासाच्या नावाखाली पुरी करून द्यावी. धार्मिक नाही असे भासवणार्‍या जनतेला योग्य रीतीने शिजायला असे आच्छादन लागते. धर्माची ठेकेदारी घेतलेल्या संघटना समाजकारणाच्या नावाचे जे आच्छादन घेतात, तसेच हे आच्छादन असते.

२. विरोधक वगैरे घटक असतात, त्यांना शिजवायला यथेच्छ वैयक्तिक शेरेबाजी करावी. शिवीगाळीवर उतरलात, तरी पूर्वी चालत होते. सध्याच्या काळात जरा जपून. आपले राजकीय विरोधक म्हणजे देशाचे शत्रू आहेत, ही कल्पना जनतेच्या गळी उतरवता आली पाहिजे. आपण म्हणजेच देश, हे सिद्ध करण्यासाठी हे गरजेचे आहे. हे करण्यासाठी इंटरनेट व इतर माध्यमांचा वापर जोरदार करावा. आपण एकच ह्या धरतीवर राज्य करायला देवाकडून आलो आहोत, हे देवभोळ्या जनतेला पटवून द्यावे.

३. विरोधकांच्या चुकलेल्या धोरणांचा वापर आपले विकासाचे आच्छादन गडद करण्यात करून घ्यावा. आपले आच्छादन अपारदर्शक राहिले पाहिजे, जेणेकरून आतमध्ये काय शिजते आहे ते बाहेर दिसणार नाही. आपली सर्व धोरणे अपारदर्शक असतील, ह्याची काळजी घ्यावी. विरोधकांची चांगली धोरणे इतिहास पुसून टाकून स्वतःची असल्यासारखी चालवावीत. त्याचबरोबर आपल्या बहुमताचा वापर करून जनतेला स्वातंत्र्य, एकांत वगैरे फालतू गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी कायदे करावेत. शेवटी 'आपणोच्छिष्टं जगत्सर्वं' म्हटल्यावर आपण जनतेच्या प्रत्येक गोष्टीत असणार, हे आलेच. मग अश्या संकल्पनांची गरजच कुठे उरली?

४. सत्तेवर आल्यावर ज्ञान, विज्ञान, शिक्षण इ. क्षेत्रांत फक्त आपलाच उदोउदो कसा होईल, ते बघावे. जनतेला शेवटी शिकून आपलीच प्रार्थना करायची असल्याने इतर गोष्टी शिकायची गरजच काय? आपण व आपल्याशी संबंधित गोष्टी पवित्र आणि उज्ज्वल आणि महान इ. इ. कश्या दाखवता येतील, ह्याचा फक्त विचार करावा. ह्या कामी परदेशस्थ जनतेची भरपूर मदत होते. आपलेच शिक्षण कसे उज्ज्वल, आणि आपलीच भाषा कशी शिकायला हवी, इ. इ. गोष्टी ते परदेशात बसून छान सांगू शकतात. त्यांना अश्या गोष्टींनी गतकालविव्हल व्हायला होत असल्याने ते अश्या गोष्टी आपसूक करतात आणि आपला डंका पिटतात. त्याचबरोबर धार्मिक नेते ह्या कामी महत्त्वाचे ठरतात. ह्या नेत्यांमुळे देशाची विज्ञानासारख्या क्षेत्रात वाटचाल वेगाने होते. अश्या नेत्यांना कोणी अंधश्रद्धानिर्मूलन वगैरे म्हणून विरोध करू गेल्यास उन्मादी धार्मिक गटांना चिथवून द्यावे.

५. ह्याचबरोबर जनतेला विविधप्रकारे कोलांटउड्या मारायला लावून सतत कशाततरी गुंतवून ठेवावे. सदैव त्यांच्यामागे कुठलेतरी शुक्लकाष्ठ लागेल हे बघावे. आपल्या वक्तव्यांमधल्या कोलांटउड्यांची जनतेला आपसूक सवय होते. त्याचबरोबर जनतेला 'देशासाठी त्याग' वगैरे रांगांमध्ये उभे केले, की ते आपसूक आपल्या सर्व आज्ञा पाळतात. ह्याकामी सेना ह्या घटकाची नावापुरती मदत होते. मात्र जाज्ज्वल्य देशाभिमान वगैरे धग जनतेला नीट देत राहिली पाहिजे. जनतेत भय, अस्थिरता, परस्पर अविश्वास अशी रसायने घुसली, की हा पदार्थ फक्कड होतो.

६. आपल्या वरील सर्व घटकांकरवी शेकडो वर्षांपूर्वी झालेल्या गोष्टींबद्दल रान माजवावे. अपमानाचा बदला, भरपाई, फोडून-तोडून टाकू, आगी लावू, अशी भावना जनतेच्या बहुसंख्यांक गटामध्ये जागृत करावी. आपण म्हणजे जणू परत आलेले करण-अर्जुन आहोत, अशी जनतेची समजूत झाली, की पदार्थ छान शिजतो. त्याचबरोबर शेकडो वर्षांपूर्वी झालेल्या लढायांबद्दल दंगली माजवाव्या व त्यावर आपला पदार्थ नीट शेकून घ्यावा. एकंदरीतच येनकेनप्रकारेण मढ्यांच्या टाळूवरचे लोणी ह्या पदार्थात असले, की तो छान शिजतो.

७. ह्याचबरोबर आपल्याच पित्त्यांना सर्व पदे द्यावी, हा महत्त्वाचा मुद्दा. संस्थांचे खच्चीकरण करायला हे उपयोगाचे आहे. संस्थांना आणि त्यांच्या प्रमुखांना ते मऊ होईपर्यंत शब्दांनी व कृतींनी हाणावे. आपल्याला कोणीही 'चेक्स व बॅलन्सेस' लावू धजणार नाही, असे भयाचे वातावरण निर्माण करावे. त्याचबरोबर धार्मिक नेत्यांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळेल, हे बघावे. धार्मिक नेत्यांच्या व्यवसायांना सरकारतर्फे पाठिंबा द्यावा. उद्योगपती आणि धार्मिक नेता जर एकच घटक असेल, तर त्याची उपयुक्तता खूपच मोठी असते. अश्यांचे सामर्थ्य वाढवावे. परंतु आपले लोक कधीही आपल्या उरावर बसणार नाहीत, ह्याची काळजी घ्यावी. आपले पाय चाटल्याशिवाय कोणाला मानही हलवता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करावी.

८. देशामध्ये आर्थिक अधोगती होत असली, तरी प्रगती होते आहे, हे समाजमाध्यमांच्या साहाय्याने पटवून द्यावे. लोकांच्या दारापर्यंत रणगाडे येऊन ठाकेपर्यंत त्यांना जसे फक्त रेडिओवरून वाटते, की आपण जिंकत आहोत, त्याप्रकारे हे करावे. शेतकरी, कामगार वगैरे तुच्छ घटकांना विचारू नये. त्यांना तोंडही दाखवू नये. अगदीच जास्त झाल्यास त्यांच्यावर पोलिसांना सोडावे. शेवटी प्रगती आणि समाधान हे लोकांच्या मनात असते. ते तुम्ही त्यांना देतच आहात. आणि तितकेच आवश्यक आहे.

९. आपली प्रतिमा मोठी करायची असल्यावर आपल्या पूर्वसुरींच्या प्रतिमा पाडून टाकाव्या, हे साधे तत्त्व फार महत्त्वाचे आहे. जिवंत नसलेल्या व्यक्तींचे यथेच्छ चारित्र्यहनन करावे. त्यांच्या कामगिरीवर शिंतोडे उडवावेत. त्यांचे मित्र मात्र जणू आपलेच मित्र होते अश्या थाटात त्या मित्रांना आपल्या प्रेमाचा रंग द्यावा. त्यांच्याकडून स्वतःलाच कॅरॅक्टर सर्टिफिकेट्स देऊ करावीत. ह्याकामी इंटरनेट, फोटोशॉप अश्या घटकांची मदत होते, हे सांगणे नलगे.

१०. आपल्या पदार्थात अनपेक्षित प्रकारे मदत करणारा घटक म्हणजे 'बॅलन्सड' लोक. आपण मध्यावर आहोत अशा समजुतीत असणारे हे लोक आपला पदार्थ शिजायला जी मंद उब लागते, ती आपल्याला देतात. आपण व आपले विरोधक सारख्याच टोकांना उभे आहोत, अशी ह्यांची समजूत आपल्या पथ्यावर पडते. वास्तविक ह्यातले बरेचसे आपल्याच बाजूचे असतात. आपल्या विज्ञान इ. विषयक धोरणांना हे आरामात पाठिंबा देतात. कला, इतिहास इ. क्षेत्रावर आपण आणलेले नियंत्रण ह्यांना अनिवार्य वाटत असते. आपण चुका केल्या तरी मागे कधीतरी इतिहासातल्या चुका दाखवून आपल्या चुकांना पोटाशी धरणारे हेच. एकंदरीत आपल्यावर 'सायलेंट क्रश' असलेले हे लोक आहेत. ह्यांचे शेजारी ओढून नेले, तरी आवाज न करणार्‍यांपैकी हे लोक आहेत. एकंदरीत आपण ह्या घटकाची मशागत कशी करतो, ह्यावर आपल्या पदार्थाची चव इकडेतिकडे होऊ शकते. हे फार जटिल काम आहे. परंतु संघटनेच्या सामर्थ्याने हे नीट जमू शकते.

अश्या अनेक पायर्‍या ह्या पाकृमध्ये आहेत. विरोधकांचा काटा काढणे, न्यायव्यवस्था ताब्यात घेणे इ. तपशील अनुभवानेच जमू शकतात. विस्तारभयास्तव येथेच थांबतो. इति विज्ञापना.

(पाकृ https://www.maayboli.com/node/68066 येथून प्रेरित. त्याबद्दल त्यांचे खास आभार.)

टीप : चित्रे टाकायची गरज नाही. अशी चित्रे इतिहासात आणि इतरत्र जागोजागी दिसतातच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
तात्यांनी यातल्या काही घटकपदार्थांना आणि पायर्‍यांना फाटा देऊनही त्याच चवीचा पदार्थ अत्यंत कमी वेळात उत्तमरीत्त्या घडवून जगापुढे एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे हे नोंदवू इच्छिते. Proud

अवांतरः बर्‍याच दिवसांनी 'एकसमयावच्छेदेकरून' हा शब्द वाचला. (तुझं वय काय? Proud )

भाचा लौ यु फॉर धिस पाकृ Happy

ते 2 वाट्या ट्रोल्स विसरलास बघ,
आपल्या विरुद्ध लॉजिकल प्रश्न विचारणारा नाजूक आवाज चिरडून टाकायला बरे पडतात,
अगदी स्वस्तात मिळतात हल्ली, फक्त आपण त्यांना फॉलो केले की ते खुश असतात, अगदीच जास्त म्हणजे एखाद्य जेवणावळीला बोलावून तुम्हीच खरे लढवय्ये वगैरे ऐकवायचे, फुकटात काम करतात.

धन्यवाद Happy

तुझं वय काय? >> फोटोवरून कितीचा वाटतो? असं विचारून तोंडघशी पडणार होतो, पण जाऊ दे. Proud

सिम्बा, अरे किती किती घटक आहेत. राजेशाही पदार्थ आहे. Proud तुम्ही टाका आता प्रतिसादांत अजून.

अप्रतिम रेसिपी.
हा पदार्थ पुढच्या वर्षीनंतर टिकू नये, अशी अपेक्षा.
हा पदार्थ आवडणारे फार उड्या मारतात. काय करावे?

भा, छान म्हणता येत नाहीये इतकं मर्मभेदी लिहिलंयस.
स्वाती +१ तात्यांकडे ना माध्यमे आहेत, ना पुलिस, ना धार्मिक नेते, ना न्यायालये (आता कदचित असतील हळूहळू) .. एकट्या माणसाच्या अर्वाच्य बडबडीवर (आणि रशियन मेडलिंग वर Wink ) Biggrin जिंकता येतं.

छान लिहिलय. ही पाकृ करून बघायची म्हणता बाकीच्यांनी?

ते प्रचि राहिले बरं! दगडावर झोपलेला नाहीतर हातात तलवारी घेतलेले लोक चालले असते.

कृती छान वाटली तरी मला हा पदार्थ आवडत नाही. आमच्यात करत पण नाहीत. बाबा सांगत होते की साधारण ४०-४५ वर्षांपूर्वी कोणी सुगरण बाई होत्या त्यांनी प्रयत्न केलेला पण तेव्हाही घरच्या लोकांना आवडला नव्हता. हा पदार्थ मंद उबेवर खदखदत असताना एक उग्र दर्प सगळीकडे दरवळतो ज्याने मला गरगरतं

हा पदार्थ ह्या शतकात नवीन प्याकेजिंगमध्ये फार छान वेष्टनात देण्यात येतो. अनेकांना तो फार लोभसवाणा वाटतो.

मस्त.

हा पदार्थ खाल्ला नाही तर लौकर नासतो
आणि खाल्ला तर बरीच वर्षे टिकतो म्हणे.

कडक!
दहाव्या पॉईंटासाठी विशेष टाळ्या कारण अनेकांना आपण हा घटक आहोत हेच माहिती नसते किंवा असले तरी मान्य करायचे नसते. आर्थिक प्रगती(?) होतेय ना मग थोडा इतिहास किंवा विज्ञान बदलले, थोडे लिंचिंग झाले तर चालवून घ्या म्हणणारे हे लोक याआधी ही रेसिपी यशस्वी झाली तेंव्हाही होतेच.

आहाहा!!
डायरेक्ट उचलून देशात टाकावी वाटतेय.
ह्या पदार्थात 'खसखस' आजिबात चालत नाही.

बाप रे! भारी आहे हे!
मोहन-बिहन... किती बारीकसारीक विचार केलाय... !! असा व्यासंग करायची माझी इच्छा आहे. __/\__

भा,
हैद्राबादी बिर्याणी सारखी फारच लांबलचक कृती आहे,
काही स्टेप्स गाळून थोडी सोपी करता येईल का?
WA वर शेअर करायला बरी पडेल.

जबरी लिहीले आहे! 'दारात रणगाडे येइपर्यंत...' वाला भाग सर्वात जास्त आवडला. तसेच "मोहन" ही. पाकृ चा फॉर्म आणि मुद्द्यांमधला अर्थ दोन्ही जमले आहे.

आणखीही बरेच लोक प्रत्यक्षपणे/अप्रत्यक्षपणे मदत करतातः
- आपल्या आवडीचा पदार्थ मिळाल्याने या खेळात आपण राजे आहोत असा समज करून या पदार्थावर जराही टीका सहन न होणारे. यथावकाश त्यांना आपण यात फक्त प्यादे होतो हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते, पण तोपर्यंत यांच्याकडून आपल्याला मदत होते. मग यांना झिडकारले तरी काही फरक पडत नाही. दुसरे म्हणजे लॉजिकल कन्सिस्टन्सीचा अभाव हा यांचा गुण पथ्यावर पडतो. म्हणजे युद्ध वगैरे वगळता एरव्ही एका नागरिकाने दुसर्‍याला ठार मारणे हे चुकीचे आहे हे एक मूल्य झाले. पण ते कोण कोणाविरूद्ध वापरतो, किंवा वापरणार्‍याचे जस्टिफिकेशन काय असते यावर ते बरोबर की चूक असते असे यांचे लॉजिक असते.
- या पदार्थावर टीका आणि फक्त टीकाच करणारे. वरच्या गटातील लोकांना तसेच ठेवण्याचे काम हे अप्रत्यक्षपणे करतात. कारण यांची टीका पदार्थावर तर असतेच पण त्यातून वरच्या गटातील लोकांनाही बिनडोक व तुच्छ लेखण्यात जी मजा असते, ती हे लोक कंट्रोल करू शकत नाहीत. त्यामुळे यांची कोणतीही टीका वरच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा चान्स हे घालवून बसतात. तसेच ज्या कारणाकरता यांना तुमचा पदार्थ आवडत नाही ती कारणे इतरांच्या पदार्थात दिसली, तर त्याकडे हे दुर्लक्ष करतात. त्यामुळेही पहिल्या गटातील लोक आणि यांच्यात जी दरी पडते ती कधीच बुजत नाही, आणि पहिल्या गटातील लोकांना तुमच्याच बाजूला ठेवण्याचे काम अप्रत्यक्षपणे हे लोक करतात.
- तिसरा गट म्हणजे तुम्ही प्रॉमिस केलेला पदार्थ आधीच्या पेक्षा चांगला असेल या आशेने तो विकत घेणारे. हा गट म्हणजे तुमचे हुकमी फॅन नव्हेत. यांना तुम्ही सध्या देत असलेला पदार्थ आवडत नाही, आधीचा पदार्थही त्यांच्या पूर्ण नावडीचा नव्हता पण तो खराब झाल्याने आणि तुम्ही ज्या पदार्थाचे प्रॉमिस दिले होते ते प्रॉमिस आवडून तुमचा पदार्थ त्यांनी विकत घेतला. पण तुमच्या पदार्थाला पर्याय काय आहे यावर यांचे ठरते. मार्केट मधे पूर्वी आजोबा पणजोबांनी स्थापन केलेले दुकान तेव्हा कितीही चांगले असले, तरी त्यांचे आता मिळणारे पदार्थ "फीका पकवान" आहेत हे यांना दिसते. नाहीतर त्या ब्रॅण्डचे शिक्षण घेउन बाहेर पडलेले आणि मग ते शिक्षण विसरून त्यापेक्षाही सडके पदार्थ विकणारे - त्यांचा पदार्थ सध्याच्या पदार्थाची वेगळी आवृत्ती आहे हे त्यांना कळते. ते पर्याय सुधारत नाहीत तोपर्यंत हाही गट तुमचा पदार्थ आवडीने किंवा नाईलाजाने खाईल.

झकास Happy ...