उत्क्रान्ती आणि स्त्री मुक्ती

Submitted by अननस on 15 November, 2018 - 20:34

मी एका लेखामध्ये - what does a woman want ? मध्ये स्त्रीयांच्या नक्की गरजा काय, स्त्रियांच्या जगातील वेगवेगळ्या देशातील परिस्थिती काय दर्शवते याविषयी थोडी माहिती दिली आणि काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर काही चर्चा होत आहे आणि त्यातून नवीन दृष्टिकोन मिळत राहतील, सध्याच्या धारणांची पडताळणी होत राहील अशी मी आशा करतो.

त्या लेखात जो एक मुद्दा मांडला होता, कि सौदी अरेबिया सारख्या धर्मनिष्ठ देशामध्ये स्त्रियांची स्थिती अगदी वाईटच आहे असे जे चित्रण अनेक प्रसार माध्यमांमधून दाखवले जाते ते सर्वच बाबतीत वस्तुस्थितीला धरून आहे असे म्हणता येत नाही किंवा ज्याला अनेक व्यक्तीस्वातंत्र्याधिष्टित समाज म्हणतात त्यामध्येही वेगळ्या प्रकाच्या संकटांना स्त्रियांना तोंड द्यावे लागते याला धरून थोडे अजून खोलात विचार करून हा विषय मांडावासा वाटतो. कोणत्या समाजात स्त्री चे स्थान काय हे समजून घेण्याआधी, हे मान्यच करायला हवं कि यामध्ये स्त्री पुरुषांमध्ये असलेले नैसर्गिक आकर्षण हा एक महत्वाचा घटक आहे. या आकर्षणाचे स्त्री पुरुष यांच्या जीवनात मानसिक आणि सामाजिक परिणाम बघायला मिळतात. जगातील सर्वच संस्कृतींमधे पाश्चात्य असो, भारतीय असो किंवा अरेबिक असो यामध्ये स्त्री-पुरुष आकर्षण सकारात्मक रित्या वापर करायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे वर वर वेगळ्या दिसणाऱ्या संस्कृतींमध्ये सुद्धा काही मूलभूत सारखे दुवे असतात. हे सर्व समजण्यासाठी आपण मानवी समाज विकसित कसा झाला, त्यामध्ये स्त्रियांची भूमिका काय होती हे नीट समजून घेतले पाहिजे. त्यातूनच कोणत्या समाजात स्त्रियांचे स्थान काय हे समजेल.

बहुसंख्य सस्तन प्राण्यांमध्ये किंवा इतरही अनेक प्राण्यांमध्ये पुनरुत्पादनासाठी योग्य मादी मिळवण्यासाठी नरांमध्ये स्पर्धा असते. त्यापैकी जो नर ही स्पर्धा जिंकतो त्याला पुनरुत्पादनाची संधी अधिक मिळते. ही स्पर्धा अनेक स्थरांवर होत असते. शारीरिक बळ, आकर्षकपणा अशा अनेक स्थरांवर ही स्पर्धा होत असते. उदाहरणे द्यायची झाली तर कोंबड्याला, मोराला आकर्षक पिसे असतात, सिंहाला आयाळ असते, लांडगे,कुत्रे, बैल, बकरे यांच्यामध्ये मादी मिळवण्यासाठी मारामाऱ्या होतात, त्यामध्ये वरचढ ठरलेला नर त्या मादीबरोबर पुनरुत्पादन करतो.

एके काळी माणसांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा संघर्ष असावा. परंतु शारीरिक दृष्ट्या मनुष्य प्राणी इतर सर्व प्राण्यांपेक्षा दुबळा होता. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी मनुष्य प्राण्याने एकत्र राहणे आवश्यक होते. त्यामुळे मनुष्य प्राण्यांनी या स्पर्धेला थोडे वेगळ्या प्रकारचे स्वरूप दिले. जो नर मनुष्य प्राण्यांच्या मुलांच्या वाढीसाठी जास्त योग्य वातावरण निर्माण करेल तो नर पुनरुत्पादनासाठी जास्त योग्य. मग हे मनुष्य प्राण्यांचे इतर आक्रमकांपासून, तसेच अंतर्गत आक्रमकांपासून संरक्षण असेल जे अनेक पूर्वीच्या टोळ्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये राज्याचे किंवा क्षत्रियांचे काम होते. दुसरे असेच उदाहरण द्यायचे झाले तर जे नर अधिक प्रमाणात समाजाच्या किंवा मुलांच्या पालन पोषणासाठी साधने गोळा करतील किंवा निर्माण करतील त्यांना पुनरुत्पादनाच्या अधिक संधी मिळतील जसे शेतकरी, लाकूडतोडे, शिकारी, फळे गोळा करणारे इत्यादी. अशा प्रकारच्या ज्याला सकारात्मक स्पर्धा म्हणता येईल, त्यामुळे मानवी समाज फार वेगाने प्रगत झाला आणि शारीरिक दृष्ट्या दुबळा असूनही अनेक प्राण्यांपेक्षा वरचढ होऊ लागला. जसे कुत्रे, लांडगे, बैल, बकरे, एकमेकांचा विनाश करून पुनरुत्पादनाच्या संधी मिळवायचा प्रयत्न करतात त्या ऐवजी, माणसांमध्ये इतर मानवांना संरक्षण देऊन, त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करून त्यांना पुनरुत्पादनाची संधी मिळू लागली. या स्पर्धेमध्ये जास्त चांगले करणाऱ्या पुरुषांना अधिक पुनरुत्पादनाच्या संधी किंवा अधिक आकर्षक स्त्रियांबरोबर पुनरुत्पादनाच्या संधी मिळत होत्या. उदाहरण द्यायचे झाले तर अगदी आता पर्यंत म्हणजे १-२ शतके मागच्या काळापर्यंत (मानवी उत्क्रांतीचा काळ काही लाख वर्षांचा धरला तर १-२ शतके हा अगदी छोटा काळ आहे) अनेक राजांना, धनाढ्य शेतकरी, व्यापारी यांना एक पेक्षा जास्त पत्न्या असत, अधिक आकर्षक स्त्रिया राजे, धनाढ्य शेतकरी, व्यापारी यांच्याकडे असत.

यातून मानवी समाजामध्ये आणि त्याहून जास्त पुरुषांमध्ये 'पौरुषत्व' ही धारणा विकसित झाली. ज्यामध्ये पौरुष प्रयत्न करून मग ते लढण्याचे असतील, कष्टाचे असतील, काही सकारात्मक घडवण्याचे असतील, समाजाचे, स्त्रियांचे मन जिंकून घेणे हे अंतर्भूत होते. 'पौरुषत्व' या धारणेतून अनेक समाजामध्ये पुरुषांमध्ये मोठेपणा किंवा काही प्रमाणात अहंकार निर्माण होऊ लागला. जो एका टप्प्या पर्यंत नैसर्गिक असू शकतो.

त्यामुळे लग्न व्यवस्था किंवा स्त्रीसुख ही समाजाकडून पुरुषांना मिळालेली पुनरुत्पादनाची एक संधी असते असे मानले पाहिजे. धर्म जे सांगतात, स्त्रियांचा आत्यंतिक संग धरू नये, किंवा स्त्रीवादी स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांची मालकत्वाची भावना ही पुरुषी अहंकारातून येते ही धारणा या दोन्हीही, वर सांगितलेल्या निष्कर्षाशी सुसंगतआहे कारण त्यामागे पुरुषाचे पौरुष प्रयत्न असले तरीहि त्याचा मानवी समाजासाठी सकारात्मक उपयोग होतो तेव्हाच त्याला समाज यश असं संबोधतो आणि व्यक्तीला पुनरुत्पादनाची संधी देतो किंवा त्यांच्या पुनरुत्पादनास विरोध करत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर समाजासाठी पुरेसे अन्न तयार करणारा शेतकरी हा चांगला किंवा यशस्वी शेतकरी मानला जायचा, किंवा जेथे अन्न धान्याचा तुटवडा आहे अशा ठिकाणी अन्न धान्य पुरविणाऱ्या व्यापाऱ्याला अधिक उत्पन्न मिळत असे त्यामुळे तो अधिक श्रीमंत होत असे आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी स्त्रिया जास्त सहज तयार होत असत. या उलट समाजाचे धन लुटणारा एखादा लुटारू असेल तर त्याच्याशी लग्न करायला फार क्वचित स्त्रिया तयार होत. अशा पुरुषांना पुनरुत्पादन करण्यासाठी अनेक वेळा स्त्रिया पळवून न्याव्या लागत.

याच धारणेतून स्त्रियांचे हक्क पण उदयाला आले. समाजासाठी सकारात्मक काम करणाऱ्या पुरुषांना जास्त साधने मिळत आणि त्यामुळे जास्त स्त्रिया त्यांच्या बरोबर पुनरुत्पादन करण्यास तयार होत. त्यामुळे जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाबरोबर पुनरुत्पादन करण्यास तयार होत नसेल किंवा तिच्या मनाविरुद्ध एखादा पुरुष जबरदस्ती करत असेल किंवा स्त्री त्याला नकार देत असेल तर त्याने समाजाच्या सकारात्मक विकासासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे (सेवाभावी संस्था चालवणे हे प्रत्यक्ष काम झाले, वैयक्तिक व्यापार करणे हे अप्रत्यक्ष काम झाले ) पुरेसे काम केले आहे का? याची पडताळणी होऊ लागली. त्यामुळे स्त्रियांना काही प्रमाणात पुरुषांना नकार देण्याचा हक्क मिळाला. आज तो हक्क सर्वच समाजामध्ये तसाच सारख्याच प्रकारचा आहे असे नाही. आपण त्याचा सविस्तर विचार नंतर करणार आहोत. यातून हे पण लक्षात येईल कि पुरुषाला स्त्रीने दिलेला नकार हे बहुसंख्य पुरुष कळत अथवा नकळत पणे त्यांच्या 'पौरुष्यावर' उपस्थित केलेला प्रश्न अशा प्रकारे घेतात आणि एका वेगळ्या सकारात्म दृष्टीने विचार केल्यास ते योग्यच आहे.

हे सगळे समजून घेतल्यावर आपण वेगवेगळ्या समाजामधल्या स्त्रियांच्या स्थिती कडे बघू. पाश्चात्य देशांमध्ये कुमार वयातच मुलं - मुली डेटिंग करायला सुरुवात करतात. त्यातून त्यांना त्यांच्या त्या त्या वयाच्या गरजांसाठी योग्य जोडीदार मिळवायचा असतो. याला कोठेही समाज विरोध करत नाही. थोडक्यात आत्ता पर्यंत चर्चा केलेल्या मुद्द्याला अनुसरून बोलायचे झाल्यास, पुनरुत्पादनाची संधी ही पुरुषांना कुमार वयापासून मिळू शकते त्यामध्ये समाज आड येत नाही. परंतु, त्याच बरोबर, समाजासाठी सकारात्मक काम करण्याची किंवा स्त्रियांच्या, मुलांच्या संगोपनासाठी संसाधने जमवण्याची जबाबदारी सर्वस्वी पुरुषांची (आणि आताच्या काळात स्त्री - पुरुष दोघांची) असते. यामध्ये इतर समाज किंवा इतर कुटुंब जबाबदारी घेत नाही. ती संसाधने पुरेशी नसतील तर कधीही पुरुषाला सोडून जाण्याचा आणि दुसऱ्या पुरुषाबरोबर जो ती संसाधने अधिक योग्य प्रमाणात आणि अधिक योग्य प्रकारे मिळवत आहे त्याच्याबरोबर संसार मांडण्याचा स्त्रीला अधिकार आहे.

अरब किंवा अनेक आशियाई देशांमध्ये, लग्नापूर्वी मुलामुलींच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांवर सामाजिक बंधने आहेत. समाजाच्या किंवा कुटुंबियांच्या मुलाकडून, धर्माचे, समाजातीं रूढी परंपरांचे पालन, अथार्जन अशा प्रकारच्या अपेक्षा असतात. त्या ज्या प्रमाणात पूर्ण होतात, त्याप्रमाणात आजू बाजूचा समाज किंवा कुटुंबीय थोडक्यात ज्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या गेलेल्या असतात अशा व्यक्ती त्याच्यासाठी योग्य मुलगी बघतात. या निर्णयामध्ये काही प्रमाणामध्ये त्या मुलाला आणि मुलीलाआपले मत मांडण्याचा हक्क असला तरी त्यावर खूप मर्यादा आहेत आणि मुलींच्या बाबतीत तर खूपच मर्यादा आहेत. वर लिहिलेल्या मुद्द्याच्या संदर्भात बोलायचे झालेले तर जेव्हा समाज त्या मुलाने केलेल्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सकारात्मक सामाजिक घडवणूकी बद्दल समाधानी असतो तेव्हा तो समाज त्याला लग्न करू देतोआणि त्याच्या पुनरुत्पादन किंवा स्त्रीसुख याला विरोध करत नाही. लग्नानंतर पुरुषाला सुखात ठेवणे हेच त्या स्त्रीचे महत्वाचे कर्तव्य मानले जाते. जे प्रजोत्पादन करायचे वयाचे नाहीत किंवा धार्मिक कारणांसाठी करत नाहीत त्यांची जबाबदारीजवळच्या व्यक्तीनी किंवा समाजाने घ्यावी अशी धारणा आहे नाहीतर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होते.

आता आपण या समाजातील स्त्रियांचे स्थान किंवा भूमिका याकडे वळू. पुनरुत्पादनाची संधी कधी मिळावी - समाजविकासासाठी हातभार लावण्याच्या पूर्वी का समाजविकासासाठी प्रयत्न केल्या नंतर यावरून संपूर्ण समाज बदलतो, समाजाची चांगली वाईट अंग बदलतात. जसे पाश्चात्य समाजामध्ये जेथे पुनरुत्पादनाची संधी किंवा स्त्री सुखाची संधी पुरुषांना अगदी कुमार वयापासून कायम असते ज्याला समाज विरोध करत नाही, अशा समाजामध्ये एखादा मुलगा मी विशेष अर्थार्जन करणार नाही किंवा किंवा लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभा राहणार नाही, इतर प्रकारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सकारात्मक समाज घडवणूकी साठी हातभार लावणार नाही , असं म्हणत असेल तर हा त्याच्या घराच्या व्यक्ती आणि त्या जोडीने आजूबाजूचा समाज यांच्यावर अन्याय झाल्यासारखे आहे. आणि हा समाजावर अन्याय निश्चितच आहे जर असा मुलगा स्त्री सुख उपभोगत असेल किंवा पूर्वी उपभोगले असेल तर. त्यामुळे अशा समाजात, एखादी स्त्री तिचा नवरा किंवा बॉय फ्रेंड पुरेसे पैसे मिळवत नाही म्हणून त्याला सोडून गेली आणि सर्व समाजाने तिची पाठराखण केली तर हे त्या मुलाच्या दृष्टीने अन्याय्य असले तरीहि समाज व्यवस्थेचा सर्व समावेशक पद्धतीने विचार केल्यास योग्यच आहे. किंवा डेटिंग करणाऱ्या मुलाचा शिक्षणाचा, राहण्याखाण्याचा खर्च आई-वडील घेत नाहीत हे सर्व समावेशक पद्धतीने समाजाचा विचार केल्यास योग्यच आहे. त्यामुळे कदाचित असा समाज इतरांच्या विशेष करून अरेबिक किंवा आशियाई समाजांच्या मते आत्यंतिक इहवादी (मटेरियलिस्टिक) किंवा अकौटुंबिक (कौटुंबिकता न मानणारा) असला तरीही सर्व समावेशक दृष्टीने न्याय्यच आहे.

या उलट अरब किंवा काही आशियाई देशांमध्ये जेथे समाज विकासासाठी पुरेसा हातभार लावल्या नंतरच पुनरुत्पादनाची संधी मिळते अशा समाजात पुरुषाला सुख न देता स्वतःच्या मताप्रमाणे वागणाऱ्या स्त्रीला समाज विरोध करत असेल तर हे त्या स्त्रीच्या दृष्टीने दुःखद असले तरीहि समाजाचा सर्व समावेशक विचार करता समाजाने त्या पुरुषाला न्याय मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नाचा भाग आहे असे मानले पाहिजे कारण त्याच्याकडून समाजविकासासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हातभार लावण्याचे काम समाजाने त्याच्याकडून आधी करून घेतलेले आहे.अशा समाजामध्ये स्त्रियांच्या अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, शिक्षण अशा गरजा समाज म्हणजे थोडक्यात अप्रत्यक्ष रित्या इतर पुरुष घेत असतात (कदाचित सर्व स्त्रियांना त्या समान प्रमाणात मिळत असतील असे नाही ) त्यामुळे असा समाज स्त्री विरोधी किंवा स्त्रियांचे शोषण करणारा दिसला तरीहि सर्वसमावेशक दृष्टया न्याय्य आहे.

भारताची सांस्कृतिक समस्या किंवा स्त्रियांच्या हक्काची पहिली समस्या इथे आहे कि या दोन टोकाच्या वेगळ्या पण त्यांच्या त्यांच्या पातळीवर न्याय्य समाज व्यवस्था असताना आम्ही नक्की कोणत्या प्रकारची समाज रचना स्वीकारावी? भारतात पाश्चात्य धारणांची स्त्रीमुक्ती किंवा स्त्रियांचे अधिकार आम्ही स्वीकारले तर इहवाद, अकौटुंबिकता हे ओघाने येणारच. तसं न झाल्यास कोणावर तरी अन्याय होईल. उदाहरण द्यायचे झाले तर, पुरुषांना कुमार वयापासून किंवा लग्नापर्यंत पुनरुत्पादनाच्या संधी असू नयेत, त्या काळात त्यांनी समाज किंवा कौटुंबिक प्रगतीत हातभार लावावा आणि स्त्रियांना पुरुषांना सोडून जाण्याचा हक्क असावा हे पुरुषांच्या दृष्टीने अन्याय्य आहे. किंवा कुमार वयातच एखादा मुलगा डेटिंग करत आहे पण त्याची सर्व जबाबदारी कुटुंबावर आहे हा त्या कुटुंबावर अन्याय आहे. स्त्री सुख भोगणारा आणि अर्थार्जन न करणाऱ्या किंवा कौटुंबिक सामाजिक जबाबदारी न घेणाऱ्या पुरुषाबरोबर स्त्रीने राहावे हा त्या स्त्रीवर अन्याय आहे.

स्त्रियांना विशेष न्याय किंवा हक्क मिळण्यासाठी उचलेले पाश्चात्य देशातले पाऊल जामागे भारतही जात आहे ते म्हणजे स्त्रियांनी समाजघडवणुकीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या हातभार लावणे (समाजसेवा, नोकरी-व्यवसाय इत्यादी) आणि समाजाने त्यांच्या हक्काचे किंवा न्यायाचे संरक्षण करणे. जसे पौरुषत्व ही संकल्पना सामाजिक उत्क्रांतीतून निर्माण झाली तशी स्त्रीत्व ही संकल्पना सामाजिक उत्क्रांतीतून या समाजांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. स्त्रीत्व ही संकल्पना पूर्वीसुद्धा होती पण त्याचे स्वरूप बदलत आहे आणि ते योग्य दिशेने बदलणे आवश्यक आहे.अजून विस्ताराने सांगायचे झाले तर, जेव्हा सामाजिक उत्क्रांतीमध्ये पुरुषांना सामाजिक किंवा कौटुंबिक विकासात हातभार लावण्याचे फळ म्हणून समाज पुनरुत्पादनाचा किंवा स्त्रीसुखाचा हक्क देत असे तेव्हा पुरुषाने स्त्रीकडे आकर्षित न होणे हे इतर समाज त्या पुरुषाला पुरेसा मोबदला देऊ न शकल्याचे लक्षण मानले जाऊ लागले आणि त्यामुळे समाज कायम पुरुषांना विशेष आकर्षित करून घेणाऱ्या स्त्रियांना महत्व देऊ लागला. त्यातून सौंदर्य, शरीर सौष्ठव, शृगांरिकता, कमनीयता,प्रेम, सुख देण्याची प्रवृत्ती या सर्वाना स्त्रीत्वामध्ये स्थान येऊ लागले. त्यातून अधिक शृंगारिक, कमनीय, सौष्ठव युक्त स्त्रियांना समाजामध्ये महत्व प्राप्त होऊ लागले. त्यामुळे आजही अनेक बाबतीत, पुरुषांकडून नाकारली गेलेली स्त्री बहुसंख्य वेळेला आपण सौंदर्य, सौष्ठव, कमनीयता, शृंगारिकता यामध्ये कमी पडल्याचे मानते.

भारताची सांस्कृतिक आणि स्त्रियांच्या हक्काची दुसरी समस्या इथे आहे कि स्त्रीत्वाची हजारो वर्षाच्या उत्क्रांतीला धरून निर्माण झालेली धारणा बदलायला हवी आणि ती कशी बदलणार? ही बदलण्यामध्ये अनेक स्त्रिया आड येणार आहेत कारण जे सामाजिक स्थान एखाद्या स्त्रीला पुरुषांप्रमाणे शिकून, कष्ट करून, वेळ प्रसंगी धोका पत्करून प्राप्त होते तेच सामाजिक स्थान एखादीला फक्त शृंगारिकता, कमनीयता, सौष्ठव जपून फक्त 'शयनेषु रंभा' होऊनही प्राप्त होऊ शकते. आजही शहरांमध्ये लागणाऱ्या दहीहंडी, गणेशोत्सव अशा वेळेच्या कार्यक्रमाच्या लागणाऱ्या भित्तीपत्रिकांमध्ये स्थानिक नगरसेवक राजकीय पक्षाचा उमेदवार यांच्या बरोबरीने कोणत्यातरी नटीला किंवा स्त्री मॉडेल ला बोलावले जाते. इतर अनेक स्त्रियांच्या तुलनेत अधिक मानाचे, पैशाचे, सामाजिक वर्चस्वाचे स्थान फक्त आपले सौंदर्य, सौष्ठव, कमनीयता, शृंगारिकता जपून मिळते. जो पर्यंत अशा प्रकारे हे स्थान मिळत आहे तो पर्यंत समाज पाश्चात्य आणि अरबी/ आशियाई संस्कृतीचा प्रभाव असलेल्या गटांमध्ये विभागला जाणार आहे. वर लिहील्या प्रमाणे भारतीय समाजाची, संस्कृतीची, स्त्रीमुक्तीची जी पहिली समस्या आहे - पाश्चात्य आणि अरेबिक किंवा दक्षिण आशियाई या अंत्यतिक विरोधी परंतु त्यांच्या पातळीवर न्याय्य सांस्कृतिक प्रभावांमध्ये सुवर्णमध्य साधणे. हा सुवर्ण मध्य काढायचा असेल तर दुसरी समस्या सोडवण्यावर प्रामुख्याने भर दिला पाहिजे. स्त्री शिक्षण, स्त्रियांची आत्मनिर्भरता यामुळे ही समस्या कमी होऊ शकते परंतु पूर्ण सोडवायची असेल तर, स्त्रीत्व म्हणजे सौष्ठव, शृंगार,कमनीयता, प्रेम अशी निर्माण झालेली प्रतिमा सोडून (वर लिहिल्या प्रमाणे पाश्चात्य जगात स्त्रीत्व अर्थाने प्रतिमा सौष्ठव, शृंगार,कमनीयता, प्रेम अशाच स्वरूपाची आहे या बाबतीत अरबी संस्कृती किंवा मागच्या शतकातली भारतीय संस्कृती या मध्ये हा एक सामान दुवा आहे) समाजाची जडण घडण करण्यात सहभाग किंवा सकारात्मक कौटुंबिक, सामाजिक कार्य अशाच प्रकारची केली पाहिजे. मग ती कदाचित संशोधन करणारी मारी क्युरी असेल, मदरतेरेसा असेल, घर सांभाळणारी श्यामची आई असेल, सावित्रीबाई फुले असतील, सरोजिनी नायडू असतील, नीरजा असेल, किंवा एखाद्या वेळी सौंदर्य, सौष्ठव, कमनीयता याने परिपूर्ण मस्तानी असेल परंतु फक्त सौंदर्य, सौष्ठव, कमनीयता आणि ऐहिक प्रेम याच्या पलीकडे जाऊन स्त्रीत्वाची संकल्पना रुजवली पाहिजे. तरच समाजामध्ये स्त्रियांची परिस्थिती खऱ्या अर्थाने आणि शाश्वतपणे सुधारू शकते.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

उत्क्रांती वगैरे काही नसते. ब्रह्मदेवाने सृष्टी बनवली आहे. मनूने समाजाने कसे वागायचे याचे नियम घालून दिले आहेत.

What did I just read? >>
खालुन वर असं वाचा! Wink

अतिशय सखोल, अभ्यासपूर्ण लेख. शेवटच्या ओळींतला संदेश खूप भावला.
जसा डार्विनच्या ऊत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावरही प्रथमतः टीका झाली होती तशीच ती कुठल्याही ऊत्क्रांतीवादाबद्दलच्या लेखावर होते.
तुम्ही लिहित रहा.

ब्रह्मदेवाने सृष्टी बनवली आहे. मनूने समाजाने कसे वागायचे याचे नियम घालून दिले आहेत. >> दोन वाक्यांच्या मध्ये अ‍ॅडम, ईव, सफरचंद आणि स्नेक प्रकरण येते.

<<<स्त्रीत्व म्हणजे सौष्ठव, शृंगार,कमनीयता, प्रेम अशी निर्माण झालेली प्रतिमा सोडून>>>
ते कठीण आहे. या गोष्टी स्त्रियांचे गुण आहेत. फक्त कमालीच्या बाहेर प्रमाणात जनता अशिक्षित, नि मनाने जनावरांपेक्षा जास्त उत्क्रांत झालेली नसल्याने, स्वार्थी लोक स्त्रियांचा "उपयोग" करून घेतात.
<<<तेच सामाजिक स्थान एखादीला फक्त शृंगारिकता, कमनीयता, सौष्ठव जपून फक्त 'शयनेषु रंभा' होऊनही प्राप्त होऊ शकते. >>>
कारण येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् तसेच स्त्रियांनाहि पैसा, प्रसिद्धि हवीशी वाटणे साहाजिक आहे. पुरुषहि मुख्यतः बळजबरी, फसवाफसवी, थिल्लरपणा (विनोदाच्या नावाखाली) वगैरे करून प्रसिद्धी नि पैसा नि सत्ता मिळवतातच.
एकूण पैसा, प्रसिद्धी, सत्ता यांचा सर्व जगाला सध्या एव्हढा मोह पडला आहे की जे जमेल ते वापरून पुरुष काय नि स्त्रिया दोघेहि ते मिळवायचा प्रयत्न करतात.