वारी - भाग १०

Submitted by टवणे सर on 10 November, 2018 - 14:27

वारी भाग9 - https://www.maayboli.com/node/64902

मी काही वेळाने घोरपडी नाल्याला पोचलो. पण तिथे कुठलाच नाला नव्हता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेदाण्याच्या शेड उभारल्या होत्या. उजव्या बाजूच्या शेडला थोडी गर्दी दिसत होती. मी पुढे पुढे उन्हात चालत आलो तसे गर्दीचे ठिपके विरून त्याजागी माणसे दिसू लागली. एक टेम्पोमधून काही माणसे मोठी भांडी/तपेली उतरवत होती. मी पटपट चालत पुढे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पत्र्याच्या शेड मारलेल्या होत्या. पंधरा-वीस फुटी उंचीच्या या शेडना नुसतेच छप्पर होते, भिंती नव्हत्या. दर दोन-तीन फुटाला आडवे अँगल वेल्ड मारले होते आणि त्यावर फळ्या टाकल्या होत्या बेदाणे वाळत घालायला. पण आत्ता बेदाणे नव्हते.

काका एका शेडखाली झोपले होते. मी रस्त्याकडेच्या गेटने आत शिरलो अन परत मागे चालत काका जिथे पहुडले होते तिथे पोचलो. डोक्यावर टोपी ओढून काका घोरत होते. अजून जेमतेम वीस पंचवीस वारकरीच पोचले होते. आजचं दुपारचं जेवण पण मिरजेतनं कुणीतरी पाठवलेलं होतं. म्हणजे आचार्‍यांना आज दुपारी पण सुट्टी. त्यावरून या वर्षीच्या वारीची वर्गणी कमी करून परतावा दिला पाहिजे असे चिवटे अण्णांचं मत ते कुणालातरी सांगताना केरेवाडीला उप्पीट खाताना माझ्या कानावर पडले होते. तिकडे टेम्पोच्या मागे जी भांडी काढण्याचे, गॅसच्या शेगड्यांना सिलेंडर जोडण्याचे काम सुरू होते ते बहुतेक जेवण गरम करण्यापुरतेच असणार. काय आहे जेवायला बघुया म्हणून मी तिकडे निघालो तर तेव्हड्यात रस्त्यावरून सुभ्या आणि अंत्या बाइकवरून येताना दिसले. बाइक अंत्या चालवत होता. त्याच्या मागे सुभ्या उलटा - मागे तोंड करून - बसला होता आणि त्याच्या खांद्यावर विडिओ कॅमेरा होता. चार-पाच वारकर्‍यांचा एक जथ्था चालत होता त्याचे सुभ्या बाइकवर बसून शुटिंग करत होता. अंत्याने झपाकदिशी गाडी बेदाण्यांच्या शेडकडे वळवली व साइडस्टँडवर लावली. मी आचार्यांकडे जायचे थांबवून उलटपावली सुभ्या-अंत्याकडे निघालो.

माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे असल्याने मी प्रत्यक्षात त्यांना सुभ्यादादा अन अंत्यादादा म्हणायचो. अंत्या गावावरून ओवाळून टाकलेला आहे असे आजीचे म्हणणे होते. रोज संध्याकाळी जिलबी चौकात पाप्या शेटच्या वाड्याच्या कट्ट्यावर अंत्या आणि इतर बरेच असे ओवाळून टाकलेले मोठमोठ्या आवाजात चर्चा करत असत. कधी कधी तालमीतून घरी येताना उशीर झाला तरी हे कट्ट्यावरच दिसत. सुभ्याचा फोटोस्टुडिओ होता. सुभ्या तालमीत संध्याकाळी मल्लखांब, योगासने वगैरे शिकवायला यायचा. तो नेहेमी शांत असायचा. या वर्षी वारीचे शुटिंग करायचे काम त्याला सांगलीच्या कुणीतरी दिले होते. अंत्या रिकामाच असल्याने बहुतेक त्याने बाइक चालवायला आणि मदतीला अंत्याला घेतले असणार.
"काय टण्या पाय दुखायला लागले का?" पचकन मावा थुंकत अंत्याने विचारले.
"छ्या".
"गाडीवर बसून चल जुनोनीला जेवण झालं की. कुठं उन्हात पायपीट करतोस."
चाललाय नेटानं तर चालूदे की त्याला अंत्या. कशाला उगाच पिना घालतोस असं म्हणत सुभ्यादादानं व्हिडिओकॅमेरा त्याच्या बॅगेत नीट भरला. तिथे जवळच दोघे-तिघे जमिनीवर पंचा अंथरून पहुडले होते. सुभ्यादादाने त्यांच्या शेजारी बॅग नेऊन ठेवली अन लक्ष ठेवा, आलोच अर्ध्या तासात असे सांगितले. अंत्याने बाइकला किक मारून बाइक सरळ केली आणि मला म्हणाला येतोस का पोहायला?
'पोहायला? कुठे?'
'कुठं पोहणार? विहिरीत आणि कुठं. च्यायला. येणार का सांग.'
मी पटकन मागं वळून बघितलं तर काका अजूनही झोपलेलेच होते. जेवणाला तसा अजून वेळ दिसत होता. काकांना विचारून जावं असं एकदा मला वाटलं पण जर मी विचारलं असतं तर ते नक्की नाही म्हणाले असते. त्यात सकाळी माझी आंघोळ पण झालेली होती. पण त्यांना जर नंतर कळलं तर ते भडकतील त्यामुळे मी तिथेच उभा राहिलो.
काकांनी विचारलं तर सांगेन मी घेऊन गेलो होतो, चल आता, असं सुभ्यादादा म्हणाल्यावर मी चटकन गाडीवर चढलो. माझ्या मागून सुभ्यादादा गाडीवर बसला. अंत्या आणि सुभ्याच्या मध्ये मी असे आम्ही तिघे गेटातून बाहेर पडून उजवीकडे कच्च्या रस्त्यावर वळलो आणि निघालो. पंढरपूर रोड आता मागे राहिला.
या मुरमाड माळावर शेती अशी फारशी नव्हतीच. म्हणजे शेतं केलेली दिसत होती पण उगवून आलेलं काही पिक म्हणण्यासारखं नव्हतं. सगळं खुरडं कोरडं होतं. बर्‍याच जमिनी पडिक पडलेल्या होत्या. थोडं पुढे गेल्यावर मुरुमासाठी खोदलेले खड्डे दिसू लागले.
तुला माहितीये का इथे कुठे विहिर आहे का ते? मी सुभ्यादादाला विचारले.
अरे जी पहिली दिसेल त्यात मारायची ऊडी, अंत्या म्हणाला.
थोडे पुढे गेलो तर डाव्या हाताला एक मुरुमाचा उंचवटा दिसली. आणि त्याच्या मागे एक इलेक्ट्रिकचा पोल आणि त्याला टांगलेली अॅल्युमिनिअमची पेटी दिसत होती. पाणी उपसायला लावलेल्या पंपाच्या स्विचची पेटी असणार ती. अंत्याने गाडी रस्ता सोडून आत घातली आणि मुरुमाच्या टेकाडाला वळसा घालून बाजूला लावली. विहीर म्हणजे खरेतर मोठा खड्डाच होता हा.
मी शर्ट, हाफचड्डी काढली आणि गुंडाळी करून काखेत घातली आणि विहिरीच्या तोंडाकडे गेलो. मुरुमाड जमिनीत खणलेल्या विहिरीवर एकरभर शेती पाणी पीत होती. आत उतरायला पायर्‍या अश्या नव्हत्या, पण भिंतीकडेने फूटभर रुंदीचा उतार होता. विहिरीत आत हिरवट पाणी शांत पहुडले होते. पाणी हिरवट असले तरी शेवाळले नव्हते आणि घाणपण नव्हती. मी बघत अंदाज घेत होतो तोवर सुभ्या अन अंत्या पटापट उतारावरून अर्ध्यात गेले. सुभ्यादादाने तिथून एक मस्त सूर मारला आणि पाण्यात घुसताना तो जमिनीला समांतर होत झटकन फार खोल न जाता झटकन पाण्याबाहेर आला. अंत्याने मस्त गट्टा मारला. मला सूर मारायला जमत नसे. म्हणजे सूर मारून मी आता जायचो पण असं झटकन पाण्यात शिरताना आडवं होता यायचं नाही त्यामुळे मी फार खाली खोल जायचो. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत शेडजींच्या विहिरीवर पोहायला जायचो तेव्हा खूप प्रयत्न केला होता पण ते काय अजून जमलं नव्हतं. त्यामुळे मी सूर मारला की एव्हडा आतवर जायचो की कपाळ भरून यायचे आणि वर येइतो वाटायचे की नाकात कानात पाणी घुसणार. त्यामुळे मी सुभ्यासारखा सूर न मारता नुसती उडीच मारली.
आणि मी पाण्यात आत आतच जात राहिलो. पाणी फार खोल नव्हतं त्यामुळे लगेचच मी तळाला लागलो. उडी मारल्यावर दोन्ही हात आडवे पसरले की फार खोलवर जात नाही पण ते मला उडी मारल्यावर कधीच लक्षात राहत नसे. नेहेमी खूप आत गेल्यावर व वर येताना नाका-तोंडात पाणी गेले की मगच लक्षात येत असे. पायाला मउसूत थंड गाळ लागल्यावर मी फारच घाबरलो. पाय घोट्यापर्यंतच रुतला होता बहुतेक पण मला जणू काही मी कमरेपर्यंत रुतलो आहे असे वाटू लागले. आणि मी जीवाच्या आकांताने हात आणि पाय मारू लागलो. काही क्षणातच पाय सुटले आणि मी वर येऊ लागलो.
मुंडकं पाण्याबाहेर आल्यावर मी पाहिलं तर सुभ्या अन अंत्या शांतपणे पाठीवर पडून हात आणि पाय आडवे फाकून पाण्यावर तरंगत होते. ज्याअर्थी ते इतके शांतपणे पहुडले होते त्याअर्थी मी फारवर वेळ आत बुडालो नसणार. पण माझ्या छातीत अजून धडधडत होतं. मी पण हात-पाय फाकून पाठीवर उताणा तरंगू लागलो. तेव्हड्या मिनिटभरात आई, बाबा, ताई, मुग्धा, पाटील बाई, क्रिकेट, तालीम असं सगळं माझ्या डोक्यात येऊन गेलं. जर मी गाळात रुतलो असतो तर माझ्यामागे कोण कोण रडलं असतं याचा विचार मी करू लागलो. आई नक्की रडली असती. ताईला पण वाईट वाटलं असतं - जरी माझं तिचं कायम भांडण होत असलं तरी मी मेलो असतो तर ती नक्कीच रडली असती. शाळेत कुणालाच फरक पडला नसता. मुलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळाली असती आणि ती खुशच झाली असती. मी सध्या हुशार विद्यार्थी नसल्याने शिक्षकांना पण किती आठवण आली असती कोण जाणे. पहिली ते चौथीच्या शाळेत मी खूप हुशार होतो त्यामुळे माझे कौतुक होत असे, मी सगळ्यांना माहिती होतो. पाचवीनंतरच्या शाळेत मात्र इतर खूप हुशार मुले होती. मुग्धा तर पहिली येतच असे. ती निबंधांचा पण सराव करायची! मागल्या वर्षी सहामाहीनंतर महाबळेश्वरकर नावाचा एक मुलगा आला होता. त्याचे वडील शासकीय डेरीत अधिकारी होते बहुतेक त्यामुळे त्यांची अशी मध्येच मराठवाड्यातून बदली झाली होती. तो खूपच हुशार होता. सगळ्याच विषयात. तो आल्याआल्याच दुसरा आला वार्षिक परिक्षेत. तो मागल्या बाकावर बसायचा कारण उंच होता. फार पुढे पुढे पण करायचा नाही, उगाच उत्तरं द्यायला हात वर करायचा नाही. पण त्याचा इंग्रजीचा पेपर वाचून आमच्या बाई म्हणाल्या की त्यांनासुद्धा महाबळेश्वरकरने वापरलेले बरेच शब्द माहिती नव्हते. आणि तो बॅटिंग पण एकदम भारी करायचा, स्ट्रेट बॅटने. त्याला कव्हर ड्राइवसुद्धा मारता यायचा. तो आल्यापासून तो वर्गात एकदम स्टार झाला होता. मुग्धापण त्याचाशी बोलायची. तो मेला असता तर शाळेत सगळ्यांना नक्की वाइट वाटले असते. मी मेल्याचे कुणाला काही वाटले नसते. पण मी मेलो असतो तर काकांना लोकं बोलली असती की बरोबर आला होता, काळजी नाही का घेता आली, लक्ष ठेवता नाही का आले. आणि काकांना पण खूप वाइट वाटले असते. ते नक्की रडले असते. पण आत्ता जर काकांना कळले की मी विहिरीत उडी मारली अन खाली तळाशी गाळात पाय गेला तर त्यांनी मला जाम धुतले असते. त्यामुळे काकांना सांगायचे नाही एव्हडं मी नक्की ठरवलं.

असंच मी भाऊंना पण सांगायचं नाही असं ठरवायचो जेव्हा मी गच्चीतल्या टाकीत उतरायचो. कधी कधी भाऊ बाहेर गेले आणि घरात कोणी नसले की गच्चीत सिमेंटची चौकोनी टाकी होती त्यात उतरायचो. ती टाकी मी बुडेन इतकी खोल नव्हती. मला अजून पोहायला येत नव्हते पण पोहायला शिकण्याची खूप इच्छा होती. मी लायब्ररीतून पोहायचे कसे याचे पुस्तक पण आणून सुट्टीत वाचले होते. पण त्या सुट्टीत मी पोहायला गेलो तरी बिंडा सोडून मला सुट्टं पोहायला जमलं नव्हतं. मग दुपारी नाहीतर संध्याकाळी घरी कोणी नसेल तर मी टाकीत उतरून सराव करायचो. टाकीत आत तळाशी एक लोखंडी गंजलेला पाइप बसवला होता ज्यातून पाणी खाली घरात यायचे. त्या पाइपला माझा एक दोनदा पाय खरचटला होता आणि आपल्याला धनुर्वात होणार आणि पाठ वाकून कुबड्या होणार अशी मला अधून मधून भितीपण वाटायची. पण कसे खरचटले ते सांगताना टाकीत उतरतो असं सांगितलं असतं तर अजून ओरडा खायला लागला असता. मी भाऊ लांबून येताना दिसले की पटकन बाहेर येऊन पंच्याने स्वच्छ कोरडं अंग पुसून खाली येऊन बसत असे. आणि भाऊंनी घरात पाय टाकला आणि माझ्याकडे बघितले की विचारत 'वर टाकीत डुंबलास ना?'. मी भाऊंना विचारले तुम्हाला कसे समजते तर ते नुसते हसत. बहुतेक माझे केस ओलसर राहत असतील किंवा हाताची बोटं पोहल्यावर सुरकुतलेली त्यांना दिसून येत असतील, पण त्यांना कळायचे नक्की. पण भाऊ कधी ओरडत नसत. 'मुतला नाहीस ना टाकीत' एव्हडच विचारत. आता मला पोहायला येत होते त्यामुळे टाकीत उतरायला लागत नव्हते. आणि आता भाऊ पण नव्हते.

चला निघुया असं म्हणत अंत्या पोटावर वळला आणि पोहत तो उतार पाण्यात जिथे उतरला होता तिथवर गेला आणि बाहेर पडला. त्याच्या मागोमाग सुभ्यादादापण पाण्याबाहेर निघाला. मी अजून दोन मिनिटात येतो म्हणून ओरडलो आणि उताणा उन खात डोळे मिटून तरंगू लागलो. किती वेळ गेला माहिती नाही पण आता डोळ्यात आत मस्त गरम गरम लालसर रंग दिसू लागला. कधी कधी डोळे न उघडता पण असे पापणीच्या आतलेच दिसे, कधी कधी त्यात काळसर ठिपके पण दिसत. मी डोळे उघडले तर वर विहिरीच्या कडेला सुभ्यादादा अंग वाळवत उभा होता. मी पण मग पाण्याबाहेर आलो आणि उन्हात उभा राहिलो. अंत्या कपडे घालून तयार होता कारण त्याने बरोबर पंचा आणि बदलायची चड्डी आणली होती. माझी सकाळीच आंघोळ झाली असल्याने अंगावरच चड्डी वाळवण्याशिवाय पर्याय नव्हता. आतली चड्डी काढून नुसती हाफ पँट चढवली असती तर मग परत घोरपडी नाल्याकडे जाताना डोक्यावर चड्डी अडकवून गेलो असतो तर ती वाळली असती. पण आता असं चड्डी काढून नागडं व्हायला लाज वाटत होती. त्यामुळे मी उन्हात अंगावरच चड्डी वाळवत उभा राहिलो. पुढचा आणि मागचा भाग तसा लवकर वाळला पण आतला जांघेतला भाग काही वाळेना कारण तिथे थेट ऊन लागत नव्हतं. शीर्षासन करून दोन्ही पाय फाकवले असते तर तिथे थेट ऊन लागले असते पण तसं करायला मला लाज वाटली. मग सुभ्यादादाने पण कपडे घातल्यावर मी पण तशीच अर्धवट ओल्या चड्डीवर हाफपँट चढवली आणि आम्ही तिघे परत घोरपडी नाल्याला परतलो.

आता बेदाण्यांच्या शेडच्या आणि रस्त्याच्या मध्ये असलेली पट्टी वारकर्‍यांनी पूर्ण भरून गेली होती. दिंडीपण पोचलेली दिसत होती. रस्त्याला समांतर चार-पाच रांगात सगळे पंगतीला बसतात तसे बसले होते. काका मला लगेचच दिसले. त्यांनी त्यांच्याशेजारी माझ्यासाठी जागा पण ठेवली होती. त्यांच्यापलिकडे चिवटे अण्णा, मग धनंजय, मग सुधीर, विनोबा भावे, डिके असे ओळीने बसलेले होते. आईने पाठवलेलं माझं खड्याखड्याचं ताट काकांनी पिशवीतून काढून मांडलं होतं. माझ्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. पोहून आलं की का कोणास ठाऊक पण प्रचंड भूक लागे. घरी तर मी चार-पाच पोळ्या खायचो मग. समोरच्या रांगेत एका मोठ्या परातीत भात, त्याच्या मागे बादलीतून वांगं-बटाट्याची पातळ भाजी घेऊन वाढप्यांनी वाढायला सुरुवात केली होती.
मी कधी एकदा माज्या पानात वाढतात त्याची वाट बघत होतो.
काकांनी पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले 'पोहून आलास काय?'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पण आत्ता बेदाणे नव्हते Happy
मेल्यानंतर कोण रडेल याची उजळणी वाचून पण हसायला आलं. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!

सुंदर डिटेलिंग. अगदी चित्रदर्शी. आधीचे भाग वाचले नाहीत पण आता वाचेल.

जाम हसायला आल काही ठिकाणी.
शीर्षासन करून दोन्ही पाय फाकवले असते तर तिथे थेट ऊन लागले असते >>>> Rofl

मागे महाबळेश्वरकर पुण्याहुन आलाय असा उल्लेख आलाय, इथे मराठवाड्यातून Happy

Best

Best

मस्त आहे हा भाग टवणे सर... विहिरीत पोहण्याची मजाच वेगळी असेल... मी कालिदास मुलुंड मध्ये शिकलो ते दिवस आठवले...

मस्त लिहिताय ..... सर्व भाग एका बैठकीत वाचून काढले.

पुधिल भागान्चि लिन्क द्या ना....