©माझ्या नजरेतून भाग २

Submitted by onlynit26 on 30 October, 2018 - 05:42

©माझ्या नजरेतून भाग २

खरंतर ही पोस्ट लिहायला वेळच झाला. असो. नवरात्रीचे नऊ दिवस आपले जीवन कलरफुल करून टाकतात. अशाच एका अत्यंत चांगल्या घटनेचा माझ्या जीवन प्रवासात मला साक्षीदार होता आले. माझ्या मते प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या माणसापासून प्रेरणा घेत असतो. मग त्या बऱ्या असतील किंवा वाईट असतील. आपण सध्या चांगल्याच प्रेरणांचा विचार करू.

तो नवरात्रीचा शेवटचा दिवस होता. लोकल ट्रेनमध्ये दसरा साजरा करण्यासाठी मी आणि माझा मित्र सकाळीच नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकरच मिठाईच्या दुकानात पोचलो होतो. आमच्या ग्रुपमधील काकानी आदल्या दिवशीच सगळ्या सामानाची ऑर्डर देवून ठेवली होती. आम्ही तिथून आमचे सगळे सामान घेऊन स्टेशनला आलो. देशपांडे काकाही स्टेशनला जरा लवकरच आले होते. एक एक जण जमू लागले होते. आमच्यामध्ये आपआपसात मस्करी चालू असतानाच मिस्टर निगेटिव्ह तिथे अवतरला. आमच्याच रेल्वे डब्यात चढणारा हा माणूस कायम आपले रडगाणे गायचा. कधी गरमच होतेय, कधी झोप अर्धवट राहीली, आज टिफीनमध्ये अमकीच भाजी, राजकारण ,क्रिकेट असे त्याचे बरेच नकारात्मक बोलणे वातावरण कायम दुषित करायचे. अंगावर चुरगळलेला शर्ट आणि पँट, बिना पॉलिशचे बूट, चैन बिघडलेली बॅग आणि कायम वाढलेली दाढी अशा अवतारात तो दिसायचा. ऑफीसर लेव्हलला सरकारी खात्यात कामाला असलेला हा माणूस कायम चतुर्थ श्रेणीच्या अवतारात त्याच्या उदासीनतेमुळे येत असावा. त्याच्यात नकारात्मक उर्जा ठासून भरलेली. आम्ही त्याच्या पासून चार पावले दूरच राहायचो.
तर या दिवशी पण त्याचे असेच काहीतरी नकारात्मक बोलणे चालू होते.
" काय यार, तू कायम रडत असतो ? " त्याचे बोलणे मध्येच तोडत एकाने न राहवून विचारले.
" तूला नाय कळणार." असे बोलून त्याला गप्प केले आणि परत त्याने आपले रडगाणे चालूच ठेवले.
एवढ्यात देशपांडे काका बसल्या जागेवरून काहीतरी आठवल्यासारखे उठले.
" मित्रा जरा इकडे येतो का?" काका त्याला उद्देशून म्हणाले.
" काय आहे?" तो गुश्यातच बोलला.
" समोरच्या प्लॅटफॉर्मवर गुलाबी कलरची साडी घातलेल्या बाई दिसतात का?" त्याच्यासकट आम्ही सर्वजण तिकडे पाहू लागलो.
आम्हाला दोन्ही हात नसलेले एक बाई उभ्या असलेल्या दिसल्या. त्यानी छान गुलाबी कलरची साडी नेसली होती. वय साधारण पन्नाशीच्या आसपास. गळ्यात तिरकस लटकवलेल्या शबनम पिशवीशी चाळा करत त्या ट्रेनची वाट बघत होत्या. चेहऱ्यावर ठेवणीतले हसू त्यांच्या सावळ्या चेहऱ्याला खुलवत होते. जणू चेहऱ्यावरच्या सुरकूत्यांचे त्यांना काहीही देणेघेणे नसावे. असा प्रसन्न चेहरा मी तरी प्रथमच पाहत होतो. प्रसन्न चेहरे तसे खुप दिसतात. काही नसून पण चेहरा हसरा ठेवणे खचितच कोणाला जमत असावे.
" काका, त्या बाईंना तुम्ही ओळखता? " मी काकांना विचारले.
" हो, ओळखतो ना. रोज याच वेळेला त्या बाई स्टेशनला असतात. अगदी नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या परिधान करताना पण त्याच्या आड त्यांचे अपंगत्व कधी आले नाही. किंवा त्यांचे निर्भेळ हास्यही तसूभर कमी झाले नाही. कुठून आणत असतील एवढी पॉझिटिव्ह एनर्जी? मी म्हणतो कुठून आणायची गरजच काय?. ती आपल्यातच असते. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. अगोदर मी ज्या सोसायटीमध्ये राहायचो, त्या सोसायटीमध्ये राहतात त्या. पंधरा वर्षापूर्वी एका अपघातात त्यांचा नवरा आणि दोन हात देवाने कायमचे हिरावून घेतले. त्यानंतर वर्षभर त्यांनी स्वताला घरात कोंडून घेतले. त्यानंतर त्यांना पार नैराश्याने घेरले होते. काही दिवसांनी कोणीतरी त्यांना एका लायब्ररीत कामाला लावले. दिवस जात होते पण त्यांचे नैराश्य काही संपत नव्हते. अशातच त्यांना वाचनाची आवड लागली. त्यापासून त्यांच्यात थोडा थोडा बदल दिसू लागला. तिथून त्यांनी पुस्तकांच्या सानिध्यात स्वताला झोकून दिले. कोणाशीही फारसे न बोलणाऱ्या त्या लोकांमध्ये मिसळू लागल्या. तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की आपले हे दु:ख इतर लोकांच्या दु:खापेक्षा भले वेगळे असेल पण त्याचा प्रभाव कमी करणे आपल्याच हातात आहे. एकदा त्यांना प्लॅटफॉर्मवर एक हात नसलेला माणूस एक हात आणि पायाने बुटपॉलीश करताना दिसला. तिथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यापासून त्यांनी आपल्या अपंगत्वाचा विचार झटकून त्यावर मात कशी करता येईल हे पाहीले. आज त्या दोन मुलांचे चांगले संगोपन करत एक नॉर्मल लाईफ जगत आहेत. दोन हात नसल्यामुळे कदाचित त्यांना खुप अडचणींना सामोरे जावे लागत असेल पण त्यांचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बघा ना. त्या अडचणींचा बाऊ करत रडत बसल्या नाहीत , जी परीस्थिती आहे ती त्यांनी स्वीकारली. आपल्याला समजून घ्यायला किंवा मदत करायला एकदा कोणीतरी येईल नंतर आपणच आपले मन घट्ट करून संकटांना सामोरे गेले पाहीजे. मला जेव्हा नैराश्य येते तेव्हा त्या बाईंचा चेहरा नजरेसमोर आणतो. जगात अशी अनेक लोकं आहेत पण त्यामानाने नशीबाला कोचणारी आणि तक्रार करणारी लोकंच जास्त आहेत. अडचण, समस्या कोणाला चुकलीय, पण त्याचा बाऊ करून काहीच फायदा नसतो. अशावेळी फक्त एकच करायचे आपल्यापेक्षा जास्त दुखी माणसाचा चेहरा समोर आणायचा. मग आपल्याला असे लक्षात येते की आपले दु:ख त्या दु:खापुढे काहीच नाही. " काका बोलायचे थांबले होते. मिस्टर निगेटिव्ह खाली मान घालून उभा होता. इतक्यात समोरच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली तशा त्या बाई आत दिशेनाश्या झाल्या. पण आम्हाला एक चांगली प्रेरणा देऊन गेल्या. मिस्टर निगेटिव्हही त्यावेळी काही न बोलता ट्रेनमध्ये चढला. नंतर तो आम्हाला त्या गाडीला कधीच दिसला नाही. कदाचित तो ऑफिसला वेळेवर जाऊ लागला असेल.
त्या दिवसापासून मी पण कधी काही अडचण आली की त्या बाईंचा चेहरा आठवतो. मग कळून चुकते की आपली अडचण काहीच नाही.

समाप्त..

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - २५.१०.२०१८

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

खरच खुप छान. देवाने भरभरुन देऊनही रडणारे लोक असतात, त्या मानाने ज्यांनी सर्वस्व गमावले आहे तेच उलट कुठलाही बाऊ न करता आनंदाने जगतात.