पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २१. हिमालयकी गोदमें (१९६५)

Submitted by स्वप्ना_राज on 22 October, 2018 - 14:08

खरं खरं सांगा हं. ह्या चित्रपटाचं नुसतं नाव ऐकून त्याच्या कथेची कल्पना करा असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय सांगाल? दूरवर दिसणारी हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं, त्यांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव, त्यातून खळखळून वाहणारी निर्मळ नदी, तिच्याकाठी पाणी भरायला आलेल्या नदीइतक्याच अवखळ, अल्लड तरुणी, शहरातून तिथे आलेला उमदा तरुण, त्यातल्याच एका सुंदर तरुणीवर त्याचं प्रेम बसणं, निसर्गरम्य प्रदेशातून बागडत गायलेली सुमधुर गाणी, त्यांच्या प्रेमाच्या मार्गात काटा बनून उभा ठाकलेला कोणी व्हिलन, माफक विरह, थोडा अश्रूपात आणि मग गोड शेवट. अहो, मग तुमचा कयास १००% बरोबर आहे. हीच तर आहे आपल्या चित्रपटाची कथा. Happy

काय म्हणताय? थोडं विस्ताराने सांगू? ठीक आहे. तुमची ऐकायची तयारी आहे तर मी सांगायला तयार आहे. तर आपला नायक आहे सुनील मेहरा. त्यावेळच्या प्रथेला अनुसरून तो लंडनवरून डॉक्टर होऊन आलाय. आता हे तेव्हाचे सगळे नायक लोक डॉक्टर व्हायला लंडनलाच का जायचे ह्यावर शेरलॉक होम्सने संशोधन करायला हवे. बरं शिकून तिथेच स्थायिक वगैरे व्हायचा विचार न करता इमानेइतबारे मायदेशी परतही यायचे हेही विशेषच. असो. तर डॉक्टर सुनील विमानाने परत भारतात येत असतो. त्याच्यासोबत शिकायला गेलेली त्याची बालपणीची मैत्रीण नीतासुध्दा बरोबर असते. एका सहप्रवाशाला हार्ट अ‍ॅटॅक येतो म्हणून सुनील विमानाचं इमर्जन्सी लँडींग करायला लावतो. हे लँडिंग कुठल्याश्या एयरपोर्टवर होणार असतं. पण प्रत्यक्षात विमान उतरतं एका दाट जंगलात. का त्याचा काही खुलासा नाही. विमानातून उतरल्याबरोबर सुनील आसपास काही हॉस्पिटल आहे का ते बघायला बाहेर पडतो. आता एव्हढ्या दाट जंगलात कुठून हॉस्पिटल असणार असा प्रश्न आपल्याला पडतो पण सुनील मात्र बेधडक चालत सुटतो. वाटेत त्याला भेटतात डाकू - अगदी 'पाचुंदाभर मिशा व्हटावर', हातात बंदूक, कमरेला काडतुसांचा पट्टा असे ते घोडेस्वार डाकू सुनीलला आडवे येतात. थोडी बोलाचाली होते. थोडी हातापायी होते. त्यात सुनील बेशुध्द पडतो. त्याला तसंच टाकून डाकू पुढे जातात तेव्हा सुनीलला शोधायला आलेली नीता आणि तिच्यासोबतचे २ प्रवाशी त्यांना दिसतात. डाकू त्यांच्याकडचे दागिने, चीजवस्तू वगैरे काढून घेतात. नीता आणि मंडळीना काही सुनील दिसत नाही.

सकाळी सुनील जिथे पडलेला असतो तिथे नेमका गावातल्या काही तरुणींचा घोळका येतो. त्यातली फुलवा नामक तरुणी त्याला आपल्या घरी घेऊन जाते. तिच्याबरोबर घरात तिचे काका दयाल चौधरी रहात असतात. त्या रात्री नीताचे दागिने लुटणारा डाकू लाखन फुलवाच्या घरी येतो आणि झोपलेल्या फुलवाच्या गळ्यात नीताचा नेकलेस घालतो. खरं तर तोच फुलवाचा पिता असतो. फुलवा मात्र आपल्या काकांनाच आपले वडील समजत असते. चोरीचा माल आपल्या घरी पाहून दयाल चौधरी खवळतात आणि लाखनला पोलिसांच्या ताब्यात द्यायची धमकी देतात. पण त्यांनी तो हार परत करायच्या आतच लाखन निघून जातो. दुसर्‍या॑ दिवशी सकाळी सुनील शुद्धीवर येतो. यथावकाश साग्रसंगीत शुश्रुषा झाल्यामुळे ठीकही होतो. पण गावात डॉक्टर नसल्याने आजारी लोक भगतच्या नादी लागत आहेत हे त्याच्या लक्षात येतं.

सुनीलचा काही पत्ता लागत नसल्याने त्याचे आईवडील काळजीत पडतात. त्यातून डीआयजी असलेले सुनीलचे वडिल त्या इलाक्यातल्या डाकूंना पकडायचा अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असल्याने सुनील आपला मुलगा आहे हे जर त्या डाकूंना कळलं तर ते सुनीलच्या जीवाला धोका पोचू शकतो हेही त्यांच्या लक्षात येतं. पण तेव्हढ्यात सुनील सुखरूप घरी आल्याने त्यांचा जीव भांड्यात पडतो. लगेच नीताशी त्याच्या लग्नाची बोलणी चालू होतात. नीताचे वडील तर होणाऱ्या जावयाला आपल्या नर्सिंग होममध्ये काम करायची ऑफरही देतात. सुनीलची वाडवडिलार्जित जायदाद असल्याने त्याला भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद करायची गरज नसते. त्यामुळे तो थेट पब्लिक हॉस्पिटलमध्ये नोकरी धरतो. तिथे एक दिवस फुलवा तापाने आजारी असलेल्या काकांना उपचारांसाठी घेऊन येते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेऊन सुनील फुलवाला आपल्या घरी आणतो. डॉक्टरी उपचारांनी आपल्याला बरं वाटल्याचं पाहून दयाल चौधरीना आपल्या गावात डॉक्टर हवा ह्याची जाणीव होते आणि ते सुनीलला तसं बोलूनही दाखवतात. सुनील गावात जाऊन काम करायचं ठरवतो. त्याचे वडील त्याला 'लाखन डाकूला तू माझा मुलगा असल्याचं कळू देऊ नकोस' असं बजावतात. लाखन सुनीलच्या जीवावर उठू शकतो हे लक्षात येताच दयाल चौधरी त्याला गावात येण्यापासून परावृत्त करू पाहतात पण सुनील त्यांचं अजिबात ऐकत नाही.

सुनीलला गावात पाहून लाखन आणि त्याच्या डाकूंची अशी समजूत होते की पोलिसांनी त्याला पकडायला ठेवलेल्या २०००० रुपयांच्या इनामाच्या हव्यासापोटी तो इथे आलाय. ते त्याला एकदा एकटा गाठून गाव सोडून निघून जायला सांगतात. त्यावेळी सुनीलला गोळी घालायच्या प्रयत्नात लाखनकडून त्याचा एक साथीदार जखमी होतो तेव्हा सुनील त्याला इंजक्शन देऊन (!) वाचवतो. गावाला आपली गरज आहे हे पाहून सुनील आयुष्यभर तिथेच राहून लोकांची सेवा करायचं ठरवतो. अर्थात त्याचं फुलवावर प्रेम बसलेलं असतं हेही ह्या निर्णयामागचं एक महत्त्वाचं कारण हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. लाखन सुनीलचा पिच्छा सोडायला तयार नसतो म्हणून दयाल चौधरी पुन्हा एकदा त्याला गाव सोडून जायची विनंती करतात. सुनीलचे वडील त्याला परत घेऊन जायलाही येतात. पण सुनील आपल्या निर्णयावर ठाम असतो. त्याचा जीव फुलवामध्ये अडकलाय हे त्यांच्या लक्षात येतं. ते कळताच सुनीलची आई नीताला सुनीलला आणायला पाठवते. पण काही उपयोग होत नाही म्हणून नीताही परत निघून जाते. लाखन दयाल चौधरीना भेटून 'सुनील फुलवात गुंततोय तेव्हा तिचं दुसऱ्या कोणाशी लग्न करून द्या' असं बजावतो. सुनीलच्या आईवडिलांना फुलवा पसंत नसते तर दयाल चौधरी फुलवा लाखनची मुलगी असल्याने तिच्या आणि सुनीलच्या नात्याला भविष्य नाही हे जाणून दोघांना भेटायला बंदी घालतात.

सुनील आणि फुलवाचं मीलन होणार की नाही आणि लाखनला शिक्षा होणार का ह्या २ महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरं आपल्या देशातलं एखादं छोटं पोरही देईल. Happy त्यामुळे ती मिळवण्यासाठी हा चित्रपट पहायची गरज नाही. एक साधासरळ, थोडा भाबडा, माफक अश्रुपात असलेला असा रोमँटिक चित्रपट पाहायचा असेल तर पाहायला हरकत नाही. पण ह्या पठडीत बसणारा दुसरा एखादा चित्रपट पाहिलेला असल्यास हा नाही पाहिला तरी आकाश कोसळणार नाही.

चित्रपट पाहण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे डॉक्टर सुनील मेहरा झालेला मनोजकुमार. तो ह्या चित्रपटात भारी म्हणजे भारीच क्युट दिसलाय. एव्हढा चिकणा डॉक्टर असेल तर निदान मी तरी डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या वगैरे काहीही न होता (किंवा सगळं काही होऊनही!) हॉस्पिटलमध्ये २४ * ७ * ३६५ जाऊन पडायला एका पायावर तयार आहे. Happy अकारण मान तिरपी करायची त्याची वैतागवाणी सवय त्याला ह्या काळात जडलेली नसल्याने त्याचा अभिनय बराच सुसह्य आहे. फुलवा झालेल्या माला सिन्हाची पंढरी पिकली आहे अगदी. बाकी तिच्या वाट्याला 'गांवकी गोरी' ची चावून चोथा झालेली भूमिका आलेली असल्याने सुनीलच्या अवतीभवती फिरणे, ओढ्या-झऱ्यांच्या काठी बागडत गाणी गाणे, मुरकणे वगैरे अभिनयक्षमतेची कसोटी न पाहणाऱ्या गोष्टींव्यतिरिक्त तिला फारसं काम नाही. डॉक्टर नीता वर्माची भूमिका शशिकलाने नेहमीच्या टेचात केली आहे. फक्त तिच्या ह्याच टाईपच्या बाकीच्या भूमिकांइतकी ती ह्या वेळी नायिकेला नडली नाहीये इतकंच. असला 'परफेक्ट नवरा मटेरियल' मित्र आपल्या हातून जातोय हे कळल्यावर निदान मी तरी बाबा अधिक तांडव केलं असतं. असो. परिस्थितीवश डाकू झालेला लाखन अमजदखानचे पिताश्री जयंत (उर्फ झकारिया खान) ह्यांनी चांगला वठवलाय. बाकी भूमिकांत डेव्हिड (दयाल चौधरी), सप्रू (सुनीलचे वडील) आणि अचला सचदेव (सुनीलची आई) दिसतात.

आनंद बक्षी, इंदीवर आणि कमार जलालाबादी ह्यांचे शब्द, कल्याणजी-आनंदजी ह्यांचं संगीत आणि लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि मुकेश ह्यांचे स्वर असा सुरेख मिलाफ झाल्याने उंचे हिमालयके नीचे, तू रात खडी थी छतपे, इक तू जो मिला सारी दुनिया मिली, कंकरिया मारके जगाया, मै तो इक ख्वाब हु आणि चांदसी महबूबा हो मेरी कब ही सर्व गाणी अत्यंत सुरेल झालेली आहेत.

त्रुटी म्हणाव्यात असं मला तरी चित्रपटात फारसं काही दिसलं नाही. फक्त लंडनवरून शिकून आलेला डॉक्टर आणि सातच्या पुढे मोजता न येणारी गावातली अशिक्षित तरुणी ह्यांचं आयुष्यभर कसं निभणार एव्हढी एकच काळजी आपल्या मेंदूला चित्रपटभर लागते. तेव्हढी बाजूला ठेवली तर १९६६ सालचं सर्वोत्तम चित्रपटाचं फिल्मफेअर पारितोषिक जिंकणारा हा चित्रपट 'रुमानी मिजाज' असलेल्यांना आवडून जाईल हेमावैम Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही ! खरच मनोजकुमार प्रचंड देखणा दिसायचा त्या काळी. आधी इतरांच्या हाताखाली काम करत होता तेव्हा बरा होता, पण मला वाटत ते भारत प्रेम वाढले तेव्हा त्याचा पाचकळपणा सुरु झाला असावा.

छन लिहिलंय स्वप्ना.
हिकिगोमे पाहिलाय. मला हा सिनेमा आणि हरियाली और रास्ता मधे जरा कंफ्युजन होतं Happy

> डॉक्टर सुनील मेहरा झालेला मनोजकुमार. तो ह्या चित्रपटात भारी म्हणजे भारीच क्युट दिसलाय. एव्हढा चिकणा डॉक्टर असेल तर निदान मी तरी डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या वगैरे काहीही न होता (किंवा सगळं काही होऊनही!) हॉस्पिटलमध्ये २४ * ७ * ३६५ जाऊन पडायला एका पायावर तयार आहे.

असला 'परफेक्ट नवरा मटेरियल' मित्र आपल्या हातून जातोय हे कळल्यावर निदान मी तरी बाबा अधिक तांडव केलं असतं. >
Proud Proud
१९६६ सालचं सर्वोत्तम चित्रपटाचं फिल्मफेअर?
रंगीत आहे ना हा सिनेमा?
बघेन असे वाटत नाही.

छान लिहीलंय. माझा मात्र या सिनेमाला पास Happy पण तू इतकं कौतुक करतेयस म्हणून एकदा मनोजकुमारचा एखादा सीन पाहायचा विचार आहे Proud

चांगलं लिहिलं आहे. हा चित्रपट पण फार आवडीचा नाही. मनोजकुमार त्याच्या black and white चित्रपटांमधे जास्त देखणा दिसतो (हरियाली और रास्ता, वह कौन थी) असं वैयक्तिक मत Happy

तुमच्या चित्रपटमालेत जमलं तर 'देवर' हा चित्रपटही आणा. शर्मिला, धर्मेंद्र, देवेन, शशिकला - अनुपमाचीच टीम आणि त्याच वेळी चित्रीत झालेला सिनेमा. पण सर्वांच्याच भूमिका एकदम वेगळ्या आहेत.

सस्मित हो......माझंही व्हायचं कन्फ्यूजन पूर्वी. Happy अ‍ॅमी, निदान विकिवर तरी ह्या सिनेमाने फिल्मफेअर जिंकलंय असं म्हटलंय. अनिष्का, त्या हार्ट अ‍ॅटॅक आलेल्या माणसाचं पुढे काय झालं ते दाखवलेलं नाहिये.

चीकू.......मला वाटतं 'अनुपमा' वरच्या लेखात साधनानेही 'देवर' सुचवला होता. पण तो जरा रडका आहे असं आईने सांगितलं आणि मला रडक्या चित्रपटांची अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळे सध्या तरी पहायची हिंमत नाही. इन फॅक्ट म्हणूनच दिल एक मंदिर, हरियाली और रास्ता, साहब बीबी और गुलाम वगैरे जरा बाजूला ठेवलेत. सुचवल्याबद्द्ल धन्यवाद Happy

सर्वांचे मनापासून आभार!

छान लिहीलंय.
` दिल एक मंदिर है` एकदा थोडा पाहिला होता. नवर्‍याच ऑपरेशन होणार असतं, तर सती-सावित्री-पतिव्रता मीनाकुमारी त्याला हॉस्पिटल मधे औक्षण करत असते. त्यात दिवा विझतो ; आणि तिथेच हिची रडारड ! वैतागून टीव्ही बंद केला. दिल एक मंदिर है गाणं छान आहे.

छान लिहिले आहे.

हा चित्रपट दोन तीनदा तरी पाहून झालाय. झोपडीत का कुठेतरी जिथे रुग्णाला जंतुसंसर्ग होईल का नाही याचे उत्तर 100 टक्के होईल अशा जागी ऑपरेशन करणारा मनोज, ऑपरेशन ऐन भरात आल्यावर नेमके फ्यूज उडवणारे विजमंडळ व मग तळवे भाजले तरी कंदिल विझू न देता ऑपरेशनला मदत करणारी माला हा मसाला यातच की अजून कुठे हे मात्र आठवत नाहीय.

गाणी कसली भारी होती यात. तेव्हा बहुतेक भारी गाणी असतील तर कथेकडे फारसे लक्ष न द्यायची प्रथा होती. टीव्ही व यु ट्यूब नसल्याने लोक झक मारत परत परत गाणी पाहायला जात असणार व पिक्चर हिट होत असणार.

अनिष्का, मलाही पेशंटचे काय झाले याचे कुतूहल वाटले पण जिथे डायरेक्टर कुठल्याही जंगलात धावपट्टीविना विमान उतरऊ शकतो, जिथे लंडनमध्ये शिकलेल्या डॉक्टरला जंगलात iccu नसणार हे समजत नसते तिथे हार्ट अटॅक आलेला माणूस, सर्दी झालेल्या माणसासारखा आपोआप बरा होत असणार.

अनिष्का, वरच्या पोस्टीत लिहिलंय की. त्या माणसाचं काय होतं ते दाखवलेलंच नाहिये नंतर.

साधना, हे अचाट आणि अतर्क्य सीन्स ह्याच चित्रपटातले. Proud

तळवे भाजले तरी कंदिल विझू न देता ऑपरेशनला मदत करणारी माला हा मसाला यातच की अजून कुठे हे मात्र आठवत नाहीय.<<<<<<
तळहातांना पट्ट्या बांधलेल्या असतानाच 'चांद सी मेहबूबा हो मेरी कब' गाणे आहे ना!

विना ऑपरेशन हार्ट ऍटॅक बरा करण्याची क्रांतिकारी पद्धत याच सिनेमात मनोजकुमारने शोधून काढली असावी. 'क्लर्क' सिनेमात ती तपशीलवार दाखवली आहे.

बाकी तिच्या वाट्याला 'गांवकी गोरी' ची चावून चोथा झालेली भूमिका आलेली असल्याने सुनीलच्या अवतीभवती फिरणे, ओढ्या-झऱ्यांच्या काठी बागडत गाणी गाणे, मुरकणे वगैरे अभिनयक्षमतेची कसोटी न पाहणाऱ्या गोष्टींव्यतिरिक्त तिला फारसं काम नाही >> अगदी अगदी Proud

चांगले लिहिले आहे. खूप गाजलेला चित्रपट होता. बघितला नाही. पण आता बघितला असे वाटत आहे. Happy

>> पण या सर्वात त्या सुरुवातीला अटॅक आलेल्या माणसाचं काय होतं??? तो जगतो की मरतो
>> Submitted by अनिश्का. on 24 October, 2018 - 23:24

+१
हा/असा प्रश्न मलाही पडायचा. त्या काळात अनेक चित्रपटात सुरवातीची दृश्ये अशी मुख्य कथेशी थेट संबंध नसलेली दाखवली जात. लोक तिकीट काढून येऊन जागेवर येऊन बसेपर्यंत पंधरा वीस मिनिटे जातच (ऑनलाईन वगैरे नव्हतं. रांगेत उभे राहून तिकीट काढणे हा एकच पर्याय). तोपर्यंत हे सगळं होऊन गेलेलं असे. सुरवातीला महत्वाचं काही चुकू नये म्हणून दाखवत असावेत.

बाकी हा चित्रपट राज कपूरचा असेल असे वाटायचे. (कदाचित ते "चांद सी महबूबा" गाणारा मुकेश, हिमालय, "एक सूरत भोली भाली है, दो नैना सीधे साधे है" वगैरे मुळे असेल)

हा पिक्चर पाहिला नाही.ते मेहबुबा ला 'जाऊदे, नाहीस चंद्रासारखी ओके आहे.मी पण काय लै ऋतिक नाय.चालतंय आपल्याला थोडं कमी जास्त.' सांगणारा धाडसी हिरो यातच आहे का?

एक आठवलं.मैने प्यार किया वाल्या भाग्यश्री ने लग्न झाल्यावर फक्त नवऱ्याबरोबर काम करणार असा आग्रह धरला होता.तेव्हा फिल्म मासिकं हिमालय की गोद मे असं हेडर देऊन तिच्या आणि नवऱ्याबद्दल च्या बातम्या लिहायची.या जोडीचे कैद मे है बुलबुल आणि पायल हे 2 पिक्चर येऊन गेले.

अनु, आपको थोडी गलतफहमी हुई है... Proud

'चांद सी मेहबूबा हो मेरी कब, ऐसा मैने सोचा था' स्वल्पविराम कब नंतर आहे, मेरी नंतर नोहे! म्हणजे 'चंद्रासारखी मेहबूबा केव्हा मला मिळेल बरं?' ऐसा मैने सोचा था.

अय्यो असं आहे होय.
लग्नानंतर शब्द जपून वापरले पाहिजेत गड्याला.प्रत्येक वेळी काय बायको स्वल्पविराम योग्य जागी मनात टाकूनच घेईल असं नाही. ☺️☺️☺️

mi_anu, माझीही गाणं प्रथम ऐकलं तेव्हा तुमच्यासारखीच समजूत झाली होती. नंतर खुलासा झाला. Happy बाकी बायको ७ च्या पुढे मोजताही न येणारी अनपढ असल्याने गैरसमज होण्याची शक्यता कमी. आणि त्यातून लग्नानंतर सगळी प्रश्नचिन्हं, उद्गारचिन्हं...नाहीतर शेवटी पूर्णविराम. नाही का?

लग्नानंतर सगळे अर्धविराम.कारण समोरच्या पार्टीचे बोलणे, त्यावर आपले बोलणे आणि मग परत समोरच्या पार्टीचे बोलणे हे अखंड चालूच असते ☺️☺️☺️☺️

श्रद्धा, मला सुद्धा ते गाणं, मी काही कधी अगदी चंद्रासारखी वगैरे महबूबा अपेक्षिली नव्हती. तू अगदी माझ्या अपेक्षेप्रमाणे (दो नैना सीधे-साधे है, इक सूरत भोली-भाली है - थोडक्यात नाकी डोळी नीटस आहेस) आहेस, असंच वाटतं.

फेफ +१
ती स्वल्पविरामाची जागा चालीत बसवायला हलवली असावी.