ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ४

Submitted by संजय भावे on 19 October, 2018 - 03:29

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ४

.

सकाळी ६:०० वाजता जाग तर आली, पण ती नक्की कशामुळे आली हे सांगणे अवघड आहे, कारण तेव्हा साईड टेबलवर ठेवलेल्या फोनचा अलार्म आणि चर्चची घंटा दोन्ही एकाचवेळी वाजत होते. थंडी चांगलीच होती. उबदार रजई मधून बाहेर पडायची इच्छा होत नसली तरी उठणे भाग होते.

ब्रश करून कालच्याप्रमाणेच स्वतःच चहा बनवून आणला. मग आरामात तयारी करून ६:५० ला रूम मधून बाहेर पडलो.

रिसेप्शनमध्ये मेहमूद एका व्यक्तीशी बोलत बसला होता, ती व्यक्ती म्हणजे माझ्या आजच्या अलेक्झांड्रीया टूर साठीचा ड्रायव्हर ‘मोहम्मद’ होता. ईजिप्त मध्ये भेटणाऱ्या १० पुरुषांमधले ढोबळमानाने ४ पुरुष ‘मोहम्मद’, २ ‘अहमद’, १ ‘मेहमूद’ १ ‘मुस्तफा’, आणि १ खालिद, हमादा, हुसेन, आयमन, जॉर्ज, जोसेफ वगैरे पैकी एका नावाचा आणि १ ह्यापेक्षा वेगळ्या कुठल्यातरी नावाचा असतो, पण मुलींच्या नावांमध्ये मात्र विविधता आढळते.

ह्या मोहम्मदचा इथे चांगला राबता असल्याने मेहमूद बरोबरचे त्याचे संबंध मैत्रीपूर्ण दिसत होते. ब्रेकफास्ट मिळण्याची वेळ सकाळी आठ वाजताची होती, पण सात वाजता ड्युटीवर येणारी, पँट्रिची व्यवस्था बघणारी ‘मानल’ नावाची मध्यमवयीन महिला दोन-पाच मिनिटे वेळे आधीच आल्यामुळे, चहा बिस्कीटे खाऊनच आम्ही तिथून निघालो.
आज BYD हि चीनी बनावटीची गाडी दिमतीला होती. कैरो ते अलेक्झांड्रीया पर्यंतचा आपला प्रवास २२० किलोमीटर्सचा असून आपण कैरो- अलेक्झांड्रीया फ्रीवे वरून तो तीन तासात पूर्ण करू अशी माहिती मोहम्मदने दिली.

६ ऑक्टोबर ब्रिज, झमालेक, गेझीरा असे कैरोचे भाग पार करत करत सुमारे २० किलोमीटर अंतरावर आम्ही कैरो- अलेक्झांड्रीया फ्रीवेला लागलो. थोडसं पुढे गेल्यावर टोल नाका लागला, तिथे टोल भरून पावती घेतल्यावर मोहम्मदने गाडी भरधाव पळवायला सुरुवात केली. स्पीडोमीटरचा काटा १२० ते १४० किमीच्या मधेच थरथरत होता.

येण्या-जाण्याच्या प्रत्येक बाजूला चार लेन कार्स साठी आणि थोडं अंतर सोडून दोन स्वतंत्र लेन अवजड वाहनांसाठी असलेल्या ह्या फ्रीवे वरुन प्रवास करायला मजा येत होती. १८० किलोमीटर्सचा प्रवास ह्या रस्त्यावरून करायचा असल्याचे मोहम्मदने सांगितले.
सव्वाआठला एका फूड-मॉल मध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलो. तिथे बऱ्यापैकी गर्दी होती. मी एक लहानसा त्रिकोणी पिझ्झा आणि कॅपुचीनो घेतली आणि मोहम्मद त्याच्याकरिता टूरिस्ट ड्रायव्हर्स साठी तेथे विनामुल्य मिळणारे कुठलंतरी सँडविच आणि चहा घेऊन आला. नाश्ता झाल्यावर पुढचा प्रवास सुरु झाला.


.

अलेक्झांड्रिया टूर साठीचा ड्रायव्हर मोहम्मद.

रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार शेतं, खेडेगावं, नव्याने बनलेली आणि बनत असलेली छोटी शहरे म्हणता येतील एवढी विशाल अशी निवासी संकुले, मोठमोठे कारखाने असलेली औद्योगिक क्षेत्रे, कारागृह असं बरंच काही बघायला मिळालं. अनेक ठिकाणी दूरवर देवळाच्या कळसासारखे बांधकाम दिसत होते ते देवळांचे कळस नसून विटा आणि मातीने बांधून चुन्याने रंगवलेली कबुतरांची खुराडी असल्याचा खुलासा मोहम्मदने केला. आपल्या इथे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी कुक्कुट पालन करतात तसे इथे खेड्यांमध्ये शेतकरी, ज्यांना हॉटेल्स कडून चांगली मागणी आहे अशा करडया रंगाच्या कबुतरांचे पालन करतात. (रेस्टॉरंटस च्या मेनुकार्ड मध्ये ‘स्टफ्ड पिजन’, ‘रोस्टेड पिजन’ असे पदार्थ आढळतात.)

खुराडे
कबुतरांच खुराडं. बरीचशी घरांच्या वर बांधलेली असल्याने लांबून देवळाच्या कळसा सारखी दिसत होती. हे जमिनीवर आणि त्यातल्यात्यात जवळ होते. (झूम करून काढल्याने फोटो तेवढा क्लियर नाहीये)

फ्रीवे वरचा वेगवान प्रवास संपुष्टात येऊन आम्ही आंतरराष्ट्रीय सागरी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला लागलो. अलेक्झांड्रीया शहराची हद्द सुरु होते तिथे पोलीस चेकपोस्ट वर गाडीची तपासणी झाली, आणि आम्ही शहरात प्रवेश केला.

अलेक्झांड्रिया. भूमध्य समुद्राचा (Mediterranean Sea) ३२ किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेलं, ‘अलेक्झांडर द ग्रेट’ ह्याने ई.स.पुं. ३३२ मध्ये वसवलेलं आणि भरभराटीला आणलेलं हे शहर ईजिप्त मधलं कैरो नंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. देशाची तीन चतुर्थांश आंतरराष्ट्रीय मालवाहतूक हाताळणारे महत्वाचे बंदर येथे आहे. ई.स. ६४१ मध्ये मुस्लीम अंमल प्रस्थापित होईपर्यंत ग्रीक आणि रोमन राजवटीत जवळपास १००० वर्षे अलेक्झांड्रिया हि ईजिप्तची राजधानी होती. ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे शहर आज एक महत्वाचं औद्योगिक, व्यापारी केंद्र आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिध्द आहे.

प्रशस्त रस्ते मागे पडून आता शहरातल्या भरपूर रहदारी असलेल्या तुलनात्मक कमी रुंदीच्या रस्त्यांवरून मार्गक्रमण सुरु होतं. आजू-बाजूला दिसणाऱ्या वेगळ्या धाटणीच्या इमारती, लोकांचे पोशाख, फुटपाथवर मासे विकणाऱ्यांचे अनोखे स्टॉल्स, रशियन बनावटीच्या LADA 1600 मॉडेलच्या जुन्या टॅक्सी, आपल्या बजाज च्या ऑटो रिक्षा, रस्त्याच्या मधूनच जाणाऱ्या ट्राम, ह्या सगळ्या गोष्टी अलेक्झांड्रिया शहराचं वेगळेपण ठळकपणे दर्शवत होत्या.

ट्राम
.
ट्राम १
.
ट्राम २
.
ट्राम ३
.
इमारत
.
इमारत १
.
इमारत २
.
मासे
.

मुख्य रस्ता सोडून एका अरुंद गल्लीमध्ये थोडं पुढे गेल्यावर ‘कोम एल शोकाफा कॅटाकोंब’ (Catacombs of Kom El Shoqafa) च्या प्रवेशद्वारा समोर मोहम्मदने गाडी थांबवली. तिथे उतरून मी ६० पाउंडसचे एन्ट्री तिकीट घेतले त्यावेळी तिकीट काउंटरच्या भिंतीवरील घड्याळात १०:१५ वाजलेले दिसत होते.

कॅताकॉंब गेट
.
कॅताकॉंब तिकीट
.
ई.स. १९०० मध्ये ओझ्याची गाडी वाहणारे एक गाढव अपघाताने एका खोल खड्ड्यात पडले. त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आजूबाजूची जमीन खणताना गाढवाच्या मालकाला काहीतरी कोरीवकाम केलेली वस्तू, मूर्ती कि खांब दिसला म्हणून त्याने पुरातत्व विभागाला ह्या घटनेची माहिती दिली आणि ई.स. दुसऱ्या शतकात रोमन राजवटीत अस्तित्वात आल्यानंतर पुढे कधीतरी शेकडो वर्षे लुप्त झालेल्या ह्या कॅटाकोंबचा पुन्हा शोध लागला अशी आख्यायिका आहे.

कॅटाकोंब म्हणजे रोमन लोकांची भूमिगत दफनभूमी (प्रेत पुरण्याचे वा ठेवण्याचे तळघर.) आणि ‘कोम एल शोकाफा’ हे त्या जागेचे नाव जेथे हे कॅटाकोंब सापडले. ‘कोम एल शोकाफा’ ह्या अरबी शब्दांचा अर्थ इंग्रजीत "Mound of Shards." आणि मराठीत ‘‘खापरींचा ढिगारा’’ असा होतो. प्राचीनकाळी तेथे दफन केलेल्या मृत व्यक्तीचे नातलग व मित्रमंडळी मृताच्या स्मृतीदिनी त्याठिकाणी येताना त्याला अर्पण करण्यासाठी आणलेले खाद्यपदार्थ अर्पण करून झाल्यावर ते ज्या मातीच्या भांड्यांमधून आणले जात, ती भांडी बाहेर आल्यावर फोडून तिथेच आजूबाजूला फेकून देत असत. कित्येक वर्षे चालू असलेल्या ह्या परंपरेमुळे त्याजागी फुटक्या मातीच्या भांड्यांच्या खापरींचा भलामोठा ढिगारा तयार झाल्यामुळे ही जागा ‘कोम एल शोकाफा’ ह्या नावाने ओळखली जात होती.

एका नैसर्गिक कातळात विहिरी सारखा गोल आकारात खोदलेला १०० फुट खोल खड्डा आणि त्याच्या बाजूने गोलाकार खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या असे त्याचे बाह्यस्वरूप आहे. जमिनीच्या पृष्ठभागावर केवळ १८ फुट व्यासाचा दिसणारा हा कॅटाकोंब जसजसे आपण पायऱ्या उतरून खाली जाऊ लागतो तसतसे त्याचं अनेक कप्पे असलेलं तीन माजली भव्य स्वरूप दाखवून आश्चर्यचकित करतो. सर्वात खालचा तिसरा मजला आता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, परंतु वरच्या दोन मजल्यांवर दगडी भिंतींमध्ये शवपेट्या ठेवण्यासाठी खोदलेले कप्पे व ईजिप्शियन, ग्रीक आणि रोमन ह्या तीनही संस्कृतींचा सुरेख मिलाप झालेली लेण्यांसारखी कोरीव कामे बघायला मिळतात.

कॅटाकोंब
जमिनीच्या वर दिसणारा कॅटाकोंबचा भाग, खाली उतरायला मागच्या बाजूला पायऱ्या आहेत.

कॅटाकोंबच्या आतली काही छायाचित्रे.

पायऱ्या
खाली उतरण्यासाठी पायऱ्या.

कप्पा
.
कप्पा १
.
कप्पा २
.
दालन
.
दालन १
.
शिल्प
.
शिल्प १
.
शिल्प २
.
दालन २
.
शिल्प ३
.
शिल्प ४
.
दालन ३
.
शिल्प ५
.
दालन ४
.
दालन ५
.
मुळात एकाच कुठल्यातरी अतिश्रीमंत कुटुंबाच्या दफनासाठी खणलेल्या ह्या कॅटाकोंबचा पुढे इतर अनेक व्यक्तींच्या दफनासाठी विस्तार कशासाठी केला गेला असावा हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. आत्तापर्यंत तीन-चार दगडी शवपेट्या आणि काही व्यक्तींचे आणि प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत. दगडी शवपेट्या आणि काही शिल्पे, खांब वरती आवारात अस्ताव्यस्त ठेवलेले असून रिस्टोरेशनचे काही काम सुरु आहे.

कॅटाकोंबच्या आवारातली काही छायाचित्रे.

बाह्य ०
.
बाह्य
.
पेटी
.
पेटी १
.
टोंब
.
टोंब १
.
टोंब २
.
टोंब ३
.
बाह्य १
.
बाह्य २
.
बाह्य ३
तुळशी वृंदावना सारखी दिसणारी वस्तू.

कॅटाकोंब बघून बाहेर पडलो आणि जवळच जागा बघून मोहम्मदने पार्क केलेल्या गाडीजवळ पोचलो तेव्हा १०:५० झाले होते. आमचा पुढचा थांबा तिथून अगदीच जवळ असलेलं ‘अमूद एल सवारी’ (Amud El-Sawari) होता. पाच मिनिटांत आम्ही तिथे पोचलो. ६० पाउंडसचं तिकीट घेऊन मी सेरापियम (Serapeum of Alexandria) आणि पॉम्पे चा स्तंभ (Pompey’s Pillar) ह्या वास्तू बघण्यासाठी आत गेलो.

पोम्पे एन्ट्री तिकीट
.
सेरापिम
.
सेरापियम हे ईजिप्तमधील ग्रीक राजवटीत ई.स.पु. तिसऱ्या शतकात बांधलेले सेरापिस ह्या देवाचे प्राचीन मंदिर होते. आता त्याचे फक्त जोत्याचे अवशेष ह्याठिकाणी उरले आहेत.
परंतु तिसऱ्या शतकात रोमन राजवटीत उभारलेला पॉम्पे चा स्तंभ म्हणून प्रसिध्द असलेला विजयस्तंभ आणि ग्रीको-रोमन साज चढवलेले दोन स्फिंक्स मात्र बघण्यालायक आहेत.
जवळपास २७ मीटर्स (८९ फुट) उंचीचा असलेला हा स्तंभ अस्वान मधील ग्रॅनाइट पासून बनवलेला आहे. ह्याच्या तळाकडचा भाग आणि वरच्या टोकाच्या नक्षीदार भागाला जोडणारा ६७ फुट उंचीचा मधला खांब हा अखंड ग्रॅनाइटचा आहे.

पिलर
.
पिलर आणि मी
.
स्फिंक्स
.
स्फिंक्स १
.
अर्थात ह्या स्तंभाच्या बाबतीतही बरेच मतभेद आहेत. काही ईतिहास संशोधकांच्या मते ई.स.पु. पहिल्या शतकात निवर्तलेल्या पॉम्पेशी ह्या स्तंभाचा कोणताही संबंध नसून चुकून त्याचे नाव ह्या स्तंभाशी जोडले गेले आहे. हा स्तंभ ग्रीक राजवटीत बांधलेल्या सेरापियमचाच भाग होता. रोमन लोकांनी ख्रिस्ती धर्माचा भरपूर प्रचार व प्रसार करून झाल्यावर चौथ्या शतकात चर्च च्या माध्यमातून नागरिकांना सेरापिसचे मंदिर उध्वस्त करण्यास प्रवृत्त केले आणि हा स्तंभ त्यांचा विजयस्तंभ असल्याचा खोटा प्रचार केला आहे. तर काहींच्या मते हा चौथ्या शतकात उभारला आहे. खरे खोटे देव जाणे.

येथे केलेल्या उत्खननात सापडलेल्या सेरापियम मधील शिल्पांची व खांबांची काही छायाचित्रे.

सेरापियम
.
सेरापियम 1
.
सेरापियम २
.
सेरापियम ३
.
सेरापियम ४
.
सेरापियम ५
.
सेरापियम ६
.
सेरापियम ७

इथे फार काही बघण्यासारखे नसल्याने थोडेफार फोटो काढून वीस-पंचवीस मिनिटांत बाहेर पडलो, आणि इथून २ किलोमीटर अंतरावर असलेले पुढचे ठिकाण रोमन थिएटर च्या दिशेने निघालो.

रोमन थिएटरच्या प्रवेशासाठी ८० पाउंडसचं तिकीट असून आत बघण्यालायक काहीही पूर्णावस्थेत राहिलेलं नाहीये. त्यामुळे आत प्रवेश न करता अर्ध गोलाकार बागेसारख्या असलेल्या ह्या ओपन थिएटरच्या कुंपणाच्या रेलिंगला लागून असलेल्या फुटपाथवरून चालत चालत तुम्ही आतले सर्व काही बघू शकता अशी महत्वाची माहिती मोहम्मदने दिली आणि ती प्रमाण मानून मी त्याप्रमाणे करायचे ठरवले. मग मला प्रवेशद्वारापाशी सोडून तो शेवटच्या टोकाला जाऊन थांबतो असे सांगून पुढे निघून गेला, आणि मी सहा फुट उंचीच्या त्या कुंपणाच्या रेलिंग मधून दिसणारे प्राचीन थिएटरचे भग्नावशेष बघत, त्यांचे फोटो काढत चालत निघालो.

1
.
२
.
३
.
४
.
५
.
६
.
७
.
८
.
९
.
१०
.
११
.
१२
.
१३
.
थिएटरच्या शेवटच्या टोकाला एका पुतळ्याजवळ गाडी पार्क करून मोहम्मद थांबला होता, तिथे पोचलो तेव्हा पावणे बारा वाजले होते. एकेक पायनॅपल ज्यूस पिऊन आम्ही तिथून ५ कि.मी. अंतरावरच्या सिटाडेल ऑफ कैतबे. (Citadel of Qaitbay) म्हणजे कैतबे चा किल्ला बघायला निघालो.
एखाद किलोमीटर पुढे गेल्यावर अगदी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह ची कार्बन कॉपी वाटावा असा रस्ता लागला. उजव्या बाजूला भूमध्य समुद्र आणि त्याच्या किनाऱ्याला लागून उजवीकडे गोलाकार वळत जाणारा रस्ता. फार सुंदर वाटत होता हा परिसर. मधेच एका ठिकाणी मोहम्मदला गाडी थांबवायला सांगून ३-४ फोटो काढले आणि पुढे निघालो.

समुद्र
.
समुद्र १
.
समुद्र २
.
किल्ल्याच्या पार्किंग लॉट मध्ये आम्ही पोचलो तेव्हा १२:२० झाले होते. बाहेरून दिसणारी किल्ल्याची तटबंदी बघून त्याच्या भव्यतेचा अंदाज आला तसे मोहम्मदला “मला किल्ला बघायला भरपूर वेळ लागेल त्यामुळे, तू मस्तपैकी झोप काढ, भूक लागली कि जेवायला जा, आणि जेवून परत येताना माझ्यासाठी एक फ्राईड पोटॅटो सँडविच, एक फलाफेल सँडविच आणि एखादा ज्यूसचा कॅन पार्सल आणून ठेव” असे सांगून तिकीट काउंटर कडे मोर्चा वळवला आणि ४० पाउंडस चे एन्ट्री तिकीट घेऊन आत प्रवेश केला.

किल्ला तिकीट
.
किल्ला
.
ईजिप्त मधील ग्रीक राजवटीत टॉलेमिक राजवंशाचा दुसरा टॉलेमि फिलाडेल्फस ह्याच्या राजवटीत, भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर, ई.स.पु. तिसऱ्या शतकात बांधले गेलेले, १०० मीटर्स (३३० फुट.) उंचीचे आणि पुढील अनेक शतके जगातील सात प्राचीन आश्चर्यातील एक असलेले, अलेक्झांड्रियाचे दीपगृह (Lighthouse of Alexandria) १० व्या ते १३ व्या शतकात झालेल्या तीन भूकंपांमध्ये पडझड होत होत, १४ व्या शतकात झालेल्या प्रलयकारी भूकंपात संपूर्णपणे जमीनदोस्त झाले.
पंधराव्या शतकात ईजिप्त चा सुलतान असलेल्या ‘अल-अश्रफ सैफ अल-दीन कैतबे’ ह्याने त्या जमीनदोस्त झालेल्या दीपगृहाच्या मूळ जागेवरच, बऱ्याचशा त्याच्याच पडलेल्या दगडांचा वापर करून १४७७ साली एक लाख दिनार पेक्षा अधिक रक्कम खर्चून, निर्माण कार्यात जातीने लक्ष घालून दोन वर्षात हा ‘कैतबेचा किल्ला’ म्हणजेच ‘सिटाडेल ऑफ कैतबे’ बांधला.
त्याकाळी तुर्कांपासून ईजिप्तला असलेला धोका ओळखून कैतबे ने देशाच्या सागरी सीमेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने बांधलेल्या ह्या किल्ल्याचा भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीवर असलेल्या सगळ्या देशांमध्ये, इजिप्तची मजबूत संरक्षक तटबंदी असा दबदबा होता आणि १८८२ मध्ये ब्रिटिश आरमाराच्या युद्धनौकांनी तोफांचा भडीमार करून ह्या किल्ल्याची अतोनात हानी करेपर्यंत तो नावलौकिक टिकून होता. त्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या ह्या किल्ल्याचा विसाव्या शतकात ईजिप्त सरकारच्या पुरातन वास्तू विभागाने जीर्णोद्धार केला.
अलेक्झांड्रिया मधील सर्वात प्रेक्षणीय पर्यटनस्थळ असूनही आश्चर्यकारकरीत्या सर्वात कमी प्रवेश शुल्क आकारण्यात येणाऱ्या ह्या किल्ल्यात पर्याटकांच्या बरोबरच स्थानिक कुटुंबांची उपस्थितीही लक्षणीय होती.

कैतबे च्या किल्ल्याची, परिसराची व त्यातून दिसणाऱ्या भूमध्य समुद्राची (Mediterranean Sea) छायाचित्रे.

a
.
b
.
c
.
d
.
e
.
f
.
g
.
h
.
i
.
j
.
k
.
l
.
m
.
n
.
o
.
p
.
q
.
r
.
s
.
t
.

किल्ल्यात मनसोक्त भटकंती करून ३:३० ला मी बाहेर पडलो तेव्हा कडकडून भुक लागली होती. पार्किंग मध्ये गाडीजवळ आलो तर मोहम्मद साहेब गाडी लॉक करून, ए.सी. वगैरे लाऊन आतमध्ये मस्तपैकी झोपले होते. त्याची झोपमोड करणे खरंतर जीवावर आले होते पण भुकेमुळे नाईलाज होता. गाडीच्या दरवाजाच्या काचेवर टकटक केली तसा तो लगेच जागा होऊन सावरून बसला आणि मला आत येण्यासाठी दरवाजा अनलॉक केला. गाडीत बसून आधी त्याने पार्सल आणलेल्या सँडविचेसचा फडशा पाडला आणि डाळींबाच्या ज्यूसचा आस्वाद घेत इथून चार कि.मी. अंतरावर असलेले पुढचे स्थळ ‘बिब्लिओथिका अलेक्झांड्रिना’ म्हणजेच अलेक्झांड्रियाचे जगप्रसिध्द वाचनालय (Library Of Alexandria) च्या दिशेने निघालो.
ग्रीक राजवटीत ई.स.पु. तिसऱ्या शतकात अस्तित्वात आलेलं आणि टॉलेमिक राजवंशाच्या काळात समृध्द झालेलं अलेक्झांड्रियाचं वाचनालय हे प्राचीनकाळी जगातलं एक मोठं आणि महत्वाचं वाचनालय म्हणून ओळखलं जात होतं. अंदाजे ४०००० ते ४००००० पपायरसच्या गुंडाळ्यांच्या स्वरुपात असलेल्या लिखित साहित्याचे संग्रहालय, सभागृहे, अभ्यासवर्ग, संशोधन केंद्र अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेल्या ह्या वाचनालयामुळे अलेक्झांड्रिया शहराला त्याकाळी ज्ञान आणि शिक्षणाच्या राजधानीचा दर्जा प्राप्त झाला होता.
दुर्दैवाने युद्धात व अंतर्गत यादवी मध्ये लागलेल्या आगीत आणि मानवी आपत्तींमुळे ऱ्हास होत होत सातव्या शतकात हे वाचनालय पूर्णपणे नष्ट झाले परंतु ह्यातील काही साहित्य वेळोवेळी स्थलांतरित केले गेल्यामुळे ईजिप्त मध्ये आणि परदेशात टिकून राहिले.
१९७४ मध्ये प्राचीन वाचनालय जिथे होतं तिथून जवळच, अलेक्झांड्रिया युनिव्हर्सिटीने त्यांच्या प्रस्तावित वाचनालयासाठी घेतलेल्या जागेवर ह्या प्राचीन वाचनालयाचे पुनरुज्जीवन करण्याची कल्पना पुढे आली, नागरिक आणि सरकारी संस्थांनी हि कल्पना उचलून धरली, त्यानंतर ईजिप्त सरकार आणि युनेस्को च्या पुढाकाराने निधी संकलनाचे प्रयत्न होऊन, १९९५ मध्ये प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली. सात वर्षात सुमारे २२ कोटी अमेरीकन डॉलर्स खर्चून बांधलेल्या ह्या संकुलाचे २००२ साली उद्घाटन होऊन, प्राचीन वाचनालयाचा अत्याधुनिक रूपात पुनर्जन्म झाला.
बिब्लिओथिका अलेक्झांड्रिनाचे प्रवेश शुल्क ७० पाउंडस आहे आणि हे संकुल बघण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. वेळेअभावी मी आत नाही जाऊ शकलो, परंतु बिब्लिओथिका अलेक्झांड्रिना च्या (Bibliotheca Alexandrina) अधिकृत वेबसाईटवर आणि ईतर काही वेबसाईटसवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आधुनिक स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या ह्या वाचनालय संकुलात ८० लाख पुस्तके व २५०० वाचक सामावून घेण्याची क्षमता असलेले अकरा स्तरीय मुख्य वाचनालय आणि त्याच्याशी संलग्न सहा विशेष वाचनालये, चार संग्रहालये, तारांगण आणि विज्ञान केंद्र, तेरा शैक्षणिक संशोधन केंद्रे, पंधरा कायमस्वरूपी प्रदर्शने, चार कला दालने आणि बरंच काही आहे.

अलेक्झांड्रिया युनिव्हर्सिटीच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या बिब्लिओथिका अलेक्झांड्रिनाची काही छायाचित्रे.

aa
.
bb
.
cc
.
dd
.
ee
.
ff
.
gg
.
सव्वा चार वाजून गेले होते. इथली बहुतांश पर्यटन स्थळे ५ वाजता बंद होत असल्याने आता तिकडे जाण्यात काही अर्थ नव्हता, त्यामुळे शहरातील रस्त्यांवरून गाडीतून फेरफटका मारत, प्रसिध्द स्टॅनले ब्रिज पर्यंत जाऊन मग पाच वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
बडबड्या आणि सुशिक्षित मोहम्मदशी ईजिप्त आणि भारतातील राजकारण, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक समस्या, रूढी परंपरा, खाद्यसंस्कृती अशा अनेक विषयांवर गप्पा मारत परतीचा कैरो पर्यंतचा प्रवास छान झाला. त्याने त्याच्या फोनवर इंग्लिश टू अरेबिक ट्रान्सलेटर उघडून तो माझ्या हातात देऊन ठेवला होता, एखादा प्रश्न किंवा शब्द त्याला नाही समजला तर तो मला टाईप करायला सांगे आणि त्याचा अरबी अनुवाद बघून उत्तर देई.

गेल्या तीन दिवसांत एकदाही पूर्ण जेवण असे झाले नसल्याने आज भारतीय पद्धतीचे जेवायचा मूड होता. गुगलवर इंडियन रेस्टॉरंटस इन कैरो असा सर्च केल्यावर माझ्या मुक्कामापासून सगळ्यात जवळ असलेले रॅमसेस हिल्टन ह्या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांच्या चार आंतरराष्ट्रीय उपहारगृहांपैकी एक असलेले ‘महाराजा इंडियन रेस्टॉरंट’ रिझल्ट्स मध्ये दिसत होते त्यामुळे साडेआठला कैरोला पोचल्यावर मी मोहम्मदला मला माझ्या हॉटेलवर न सोडता, तिथून जवळच असलेल्या रॅमसेस हिल्टन हॉटेलजवळ सोडायला सांगितले आणि तिथे जेवायला कंपनी देणार का असे विचारले, पण त्याला घरी जायच्या आधी अजून काही काम उरकायचे असल्याने जेवायला थांबू शकत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माझा निरोप घेऊन तो निघून गेला.

एअरपोर्ट वरच्या सुरक्षा तपासणीच्या तोडीची सुरक्षा तपासणी पार पाडून हॉटेल रॅमसेस हिल्टनच्या गगनचुंबी इमारतीत प्रवेश केला.
पहिल्या मजल्यावर असलेल्या महाराजा इंडियन रेस्टॉरंट मध्ये प्रवेश केल्यावर समोरच असलेली गणपतीची मूर्ती, चकचकीत पितळी समया, त्याभोवतीची फुलांची सजावट आणि मेनू कार्ड वरचे पदार्थ बघितल्यावर ह्या रेस्टॉरंटचे व्यवस्थापन दक्षिण भारतीय व्यक्ती वा कंपनीकडे असावे असा अंदाज आला होता, पण कॉम्पलीमेंटरी स्टार्टर म्हणून सर्व्ह केलेले उत्कृष्ठ असे ३ छोटे डाळवडे आणि खोबऱ्याची चटणी चाखल्यावर त्याची खात्रीच पटली.
व्हेज जालफ्रेझी, बटर गार्लिक नान, स्टीम राईस आणि रसम असं भरपेट जेवण झाले. अर्थात आलेले सगळे पदार्थ चविष्ट असलेतरी माझ्या एकट्यासाठी जरासे जास्तीच होते त्यामुळे सगळे खाऊन संपवणे काही शक्य नाही झाले.
मनासारखे जेवण झाल्यावर खाली उतरून चालत चालत सव्वा दहाला मुक्कामावर पोचलो.

उद्याचा दिवस हॉटेलच्या समोरच असलेले ईजिप्शियन अँटीक्विटी म्युझीयम साठी राखून ठेवलेला होता. सकाळी ९ वाजता म्युझियम उघडल्यावर संध्याकाळी ५ वाजता बंद होईपर्यंत ते बघण्यासाठी भरपूर वेळ हातात होता. आणि आस्वानला जाण्यासाठीची फ्लाईट रात्री १०:१५ ची होती त्यामुळे संध्याकाळी सात वाजता एअरपोर्टला जायला निघालं तरी चालण्या सारखं होतं. सकाळी लवकर उठण्याची कोणतीही घाई नसल्याने कॉमनरुम मध्ये मेहमूद आणि आज गिझाला जाऊन आलेल्या जिल बरोबर गप्पा मारत थांबलो. मग मात्र आज सकाळी लवकर उठून दिवसभरात केलेल्या साडेचारशे किलोमीटर्सहून अधिकच्या प्रवासामुळे ११:०० च्या आसपास झोप अनावर झाल्याने रुम मध्ये आलो, आणि चेंज करून झोपी गेलो.

क्रमश:

संजय भावे

****

आधीचे भाग:

पुढील भाग:

तळटिप: १२ भागांची ही लेख मालिका ‘मिसळपाव डॉट कॉम’ संस्थळावर माझ्या तिथल्या ‘टर्मीनेटर’ ह्या सदस्य नावाने ३ जून २०१८ ते २३ ऑगस्ट २०१८ ह्या कालावधीत आधी प्रकाशित झालेली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचते आहे. तुमच्यासोबतच प्रवास केल्यासारखा वाटावा असे खूप छान आणी सहज लिहीलेत. फोटो आवडलेच, पण नेहेमीपेक्षा वेगळे पण वाटले.

सुंदर झालाय हा भाग पण. माझी virtual सफर घडते आहे. कधी जमलं तर कर्नाटकातील चित्रदुर्ग बघा . प्रचंड मोठ्या चौरसकृती , आयताकृती शिळा एकावर एक ठेऊन किल्ल्याची तटबंदी केली आहे.

सिटाडेल/ किल्ल्याचे आणि भूमध्य समुद्राचे फोटो बघायला आवडले.
इतर पुरान अवशेष जतन करण्यात बरीच भारतासारखीच उदासीनता असावी असं वाटलं. फोटोंमध्ये ह्या अवशेषांच्या चहू बाजूला इतर कन्स्ट्रक्शन वगैरे बघता ती उदासीनता आणखी हायलाईट होते.
नाईल नदीमधल्या क्रूझ बद्दल बरंच ऐकून आहे. पुढच्या भागात त्याचं वर्णन असणार असेल काय? Happy

@ राजसी - धन्यवाद.
चित्रदुर्गाच्या माहिती साठी आभार. डिसेंबर महिन्यात कर्नाटकातील हम्पी आणि मुरुडेश्वर भेटीचा कार्यक्रम ठरला आहे, त्यावेळी चित्रदुर्ग बघता येईल का ते तपासून बघतो.

@ सशल - धन्यवाद.
"इतर पुरान अवशेष जतन करण्यात बरीच भारतासारखीच उदासीनता असावी असं वाटलं."
अलेक्झांड्रिया हे अगदी मुंबई सारखे दाट लोकवस्तीचे शहर असल्याने असे वाटणे साहजिक आहे. परंतु उर्वरित ईजिप्त मध्ये त्यांनी केलेले पुरातन अवशेष जतन करण्याचे प्रयत्न प्रशंसनीय आणि थक्क करणारे आहेत, त्याबद्दलची माहिती पुढील भागांमध्ये येईलच.

‘कोम एल शोकाफा’ येथील कॅटाकोंब अपघाताने सापडले पण त्या सारखे अजून कितीतरी कॅटाकोंब्ज अलेक्झांड्रिया मध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु त्या जागांवर आज घरे आणि मोठ्या इमारती उभ्या राहिल्यामुळे त्यांचा शोध लावणे अशक्य झाले आहे. भविष्यात त्या घरांच्या व इमारतींच्या पुनर्विकासाची वेळ येईल तेव्हा उत्खनन केल्यावर अशा पुरातन वास्तूंचा नव्याने शोध लागण्याची आशा आहे.

... मग बेलूर-हलेबीडू पण नक्की करा, मी दोनदा जाऊन आले आहे. बेलवडी ला काहीतरी शिवाजी महाराजांचा संदर्भ आहे हे मला नंतर कळाले, तिथे गेलो नव्हतो.

हा भाग पण आवडला . सढळ हाताने फोटो पण असल्याने मजा आली वाचताना. कॅटाकोंब ची माहिती आणि फोटो विशेष आवडले.

@ राजसी
आमच्या आधीच्या ठरवलेल्या कच्च्या कार्यक्रमा प्रमाणे : कोल्हापूर - हम्पी - मुरुडेश्वर - गोकर्ण - कोल्हापूर करून परत. असा करण्याचा विचार होता.
आता त्यात बदल करून कोल्हापूर - बदामी - हम्पी - चित्रदुर्ग - बेलूर/ हळेबीडू - हुबळी - कोल्हापूर करून परत. असा प्रवास करण्याचा विचार केलाय. ८ च्या जागी १० दिवस लागतील पण टप्पे थोडे छोटे झाल्याने ड्रायव्हिंग करायला जास्त कंटाळा नाही येणार Happy आणि कोस्टल कर्नाटक स्वतंत्रपणे करताना मुरुडेश्वर - गोकर्ण बघता येईल. हम्पी सोडून कुठल्याही दुसऱ्या हॉटेलचे बुकिंग केलेले नसल्याने हा बदल करणे शक्य आहे. योग्यवेळी सुचवलेल्या ह्या ठिकाणांसाठी आभारी आहे.

@ मित - धन्यवाद.
"सढळ हाताने फोटो पण असल्याने मजा आली वाचताना."
मोजून १०० फोटो आहेत ह्या भागात. Happy

पट्टडक्कल पण बघा तुम्हाला इंटरेस्टींग वाटतंय का ! जाताना आणि येताना वेगवेगळे मार्ग (कोल्हापूर, सोलापूर) धरल्यास जास्त ठिकाणं बघून होतील (अंबाबाई आणि विठोबा पण). गोमटेश्वर पण तिथेच जवळ आहे, मराठीतला पहिला शिलालेख. (तुम्ही वैतागायच्या आधी मी ठिकाणं वाढवणं थांबवते Happy )

कोस्टल कर्नाटक स्वतंत्रपणे करताना मुरुडेश्वर - गोकर्ण बघता येईल.  --- हो, ती पाच महादेवाची देवळं आहेत, आम्हाला तिकडे गेल्यावर कळाले, त्यामुळे वेळ नव्हता. मारवंठे आणि उडुपी पण तिथेच आहे. मंगलोर पर्यंत आलात तर धर्मस्थळ आणि कुक्के सुब्रमण्यम पण करा.

@ राजसी
पट्टदकल बघता येऊ शकेल ह्या रूट मध्ये. जाता किंवा येताना एकावेळी सोलापूर मार्ग घेणेही सोयीस्कर पडेल. गोमटेश्वर मात्र नाही करता येणार, ते कोस्टल कर्नाटक करताना बघता येईल.
"तुम्ही वैतागायच्या आधी मी ठिकाणं वाढवणं थांबवते"
भटकंती हा माझा सगळ्यात आवडता उद्योग असल्याने मला त्या विषयीच्या सूचनांचा कधीच वैताग येत नाही Happy

राजसी, हे सगळं इजिप्तमध्ये आहे का?  --- नाही हो Happy ( आता थांबते आहे मी !)
ते किल्ल्याचं वर्णन आणि आधीच्या भागात पण तसच वाचून, मला आपल्याकडे पाहिलेलं आठवलं Happy
भावे, सॉरी!

@ अश्विनी के - धन्यवाद.
"राजसी, हे सगळं इजिप्तमध्ये आहे का?"
विषय भटकंतीशी संबंधित असल्याने नवीन उपयुक्त माहिती मिळत आहे त्या निमित्ताने. Happy

सॉरी कशासाठी? खरंच उपयुक्त माहिती दिली आहे तुम्ही, जी मला आणि इतरांनाही कार्यक्रम ठरवताना उपयोगी पडेल.

हो ग अश्विनी Happy
मला पण इजिप्त वाचायला मजा येते आहे.

@ संजय भावे,

तिकडे वाचली आहेच मालिका पण इथे परत वाचायलाही आवडत आहे.
इथे काही फोटो नवीन आहेत Happy

@ मॅगी आणि अनिंद्य - धन्यवाद.
@ अनिंद्य : काही फोटो वेगळे येऊ शकतील पुढच्याही भागांमध्ये, कारण इथे स्लाईड शो टाकता येण्याची सोय नसल्याने (Full HTML Blocked) प्रत्येक फोटो स्वतंत्रपणे टाकावा लागेल. तुम्ही परत हि मालिका वाचताय हे वाचून आनंद झाला. Happy

Khup chhan...!!! Vachat astanach Igypt mde pochalya sarkha vataty..
Tasa kadhi ektine dur cha pravas kela nahiye pn jr ase chhan anubhav yet astil mala ashi solotrip kryla nakkich aavdel.. Happy

@ प्राची - धन्यवाद.
जरूर सोलोट्रीप करा, छान अनुभव येतील.

Pages