बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) २: पुणे ते सातारा (१०५ किमी)

Submitted by मार्गी on 16 October, 2018 - 05:53

बघता मानस होते दंग २: पुणे ते सातारा (१०५ किमी)

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना

७ सप्टेंबरची सकाळ. आज ह्या प्रवासाचा पहिला मुख्य टप्पा आहे. आज शंभर किलोमीटरपेक्षा जास्त सायकल चालवायची आहे. सकाळी उजाडता उजाडता निघालो. आज लगेचच कात्रज घाट किंवा कात्रज बोगद्याचा चढ लागेल. ह्या रूटवर आधीही गेलो आहे, त्यामुळे काहीच अडचण नाही. पुण्यात धायरीतून निघाल्यानंतर लवकरच कात्रज बोगद्याच्या आधीचा चढ सुरू झाला. सायकलमध्ये ब्लिंकर ऑन केलं. तसेच, सायकल व हेलमेटवरही अनेक लाल पट्ट्या चिटकवल्या आहेत. आणि प्रकाशात चमकणारं रिफ्लेक्टिव्ह जॅकेटही घातलं आहे. आज नक्कीच पाऊस लागणार, त्याचीही तयारी झाली आहे. आता बोगद्यापर्यंत चढ आणि नंतर मोठा उतार! सुमारे आठ किलोमीटरच्या चढानंतर बोगदा आला. सव्वा किलोमीटरचा बोगदा! हा अनुभव आधीही घेतला असला तरी विशेष वाटतो. हळु हळु जसा बोगदा संपत येतो, तसा परत प्रकाश येतो! आपल्या सगळ्यांच्या जीवन कहाण्यांचा हा अविभाज्य भाग! आता इथून सलग पंचवीस किलोमीटर उतार आहे.

लवकरच पाऊस सुरू झाला. पुढे रस्त्यावर मस्त ढग दिसत आहेत. उतार संपायच्या आधी कपूरहोळ गावात नाश्ता केला. मागच्या वर्षी योग- ध्यान सायकल प्रवासासाठी गेलो होतो, तेव्हा इथूनच भोरला वळालो होतो. सुरुवातीला चढ असूनही नंतर उतार असल्यामुळे इथपर्यंत वेगात आलो आहे. पुढे पाऊस वाढत जातोय. आता इथून पुढे हलका चढ सुरू होईल आणि साताराच्या आधी खंबाटकी घाट लागेल. आता मस्त पाऊस सुरू झाला! पण मी पूर्ण तयारी केली आहे, त्यामुळे काहीच अडचण नाही. लॅपटॉपही अनेक आच्छादनांच्या थरांच्या आत सुरक्षित आहे. पावसामुळे फक्त मोबाईलमधून फोटो घेणं थांबवावं लागलं.

खंबाटकी घाट मी आजवर कधी चढलो नाही आहे. पण त्यापेक्षा मोठा असलेला सिंहगड अनेकदा सायकलवर केला आहे. त्यामुळे घाटात काहीच अडचण नाही आली. घाट सुरू होईपर्यंत पाऊस होता. त्यामुळे वाटतंय की, वर घाटात तर मोठा पाऊस असणार. पण घाट सुरू झाल्यावर लगेचच पाऊस थांबला! आणि मग फोटो सुरू झाले. आता जोरदार नजारे दिसत आहेत. ढग खाली राहिल्यामुळे घाटात तर ऊन पडलं आहे! वा! घाटातला रस्ता तितका ओला नसल्यामुळे सायकल स्किड होण्याची भितीही दूर झाली. (नजारे) बघता बघता घाट पार झाला. अर्थात् वेळ लागलाच, पण नजा-यांमुळे तो जाणवला नाही.


घाटामध्ये ऊन!

आता परत उतार लागेल. इथून आणखी नजारे दिसत आहेत. परत एकदा नाश्ता केला. इथून सातारा फक्त ३५ किमी दूर आहे. पण माझं वेळेचं गणित बहुतेक चुकणार. सायकलचा वेग तर छान आहे, उतार लागत असल्यामुळे चढासाठी लागणारा वेळ कव्हर होतोय. पण मध्ये थोडं थांबावं लागतंय व त्यात वेळ जातोय. त्यामुळे चहा- बिस्कीट व चिप्स घेऊन लगेचच निघालो. मागच्या वेळी भोर- वाई करून ज्या रस्त्याने साताराला आलो होतो, तोही येऊन मिळाला. आता परत ओळखीचा रस्ता! हळु हळु सातारा जवळ येत गेलं. मागच्या वेळी ज्या सरांकडे थांबलो होतो, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या रूमवर ह्या वेळी थांबेन. मागच्या वेळी साता-यातल्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात एक कार्यक्रमही झाला होता. ह्या वेळी ह्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या रूमवर थांबेन. जमलं तर त्यांच्यासोबत थोडी बातचीतही करेन. हायवे सोडून सातारा गावाकडे निघालो. समोर अक्षरश: धडकी भरवणारा विराट अजिंक्यतारा दिसतोय! इथून त्यांना फोन करण्यामध्ये व रस्ता विचारण्यात थोडा वेळ गेला. १२ ला साता-याला पोहचेन असं वाटलं होतं, पण सव्वा वाजता पोहचलो. पण काय जबरदस्त प्रवास झाला!


कृष्णा नदी!

थोडा उशीर झाल्यामुळे माझ्या रूटीन कामाची थोडी काळजी वाटत होती. पण काही अर्जंट सबमिशन्स नसल्यामुळे मला फ्रेश होण्याइतका वेळ मिळाला. पण नंतर जेवण्यासाठी फुरसत नाही मिळाली. एक तर पुढे सबमिशन होते आणि जेवलो असतो तर झोप येण्याची भिती होती. तसंच सायकल चालवताना मध्ये मध्ये काही ना काही खात होतोच. त्यामुळे जेवण टाळून लॅपटॉपवर कामाला बसलो. मध्ये मध्ये थोडा आराम करत राहिलो. संध्याकाळी मागच्या वेळी भेटलो होतो त्यांना भेटलो. कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांसोबत गप्पाही मारल्या. काय दिवस गेला आजचा! कोंकण जवळ येतंय हळु हळु!


आज १०५ किलोमीटर झाले. दोन मध्यम श्रेणीचे घाट आणि एकूण हाईट गेन ९६० मीटर

पुढील भाग: बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ३: सातारा- कराड- मलकापूर (११४ किमी)

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults

मस्तं भाग झालाय. फोटोही मस्तं!

सायकलला लॅपटॉप ठेवलाय. तो कशाला बरोबर घेतात? सामानातलं वजन वाढत नाही का? आणि त्याची सुरक्षितता कशी करता. म्हणजे चोरीमारी, धाकधपटशा वगैरे होत नाही का? बरं, सायकल सोडून जास्तं लांब जाताही येत नसेल ना?

उत्सुकतेमुळे मला पुष्कळ प्रश्न पडताहेत. विचारलेले चालतील ना?

@ सचिन जी, अहो त्यात काय! विचारा ना! तुम्ही वाचताय ह्याचा आनंद आहे. मी माझ्या सगळ्या सायकल मोहीमा वेगळी सुट्टी न घेता काम करत करतच केल्या आहेत. व्यवसायाने स्वतंत्र अनुवादक व पूर्णत: ऑनलाईन काम (स्थळाचं बंधन नसलेलं) असल्याचा (गैर) फायदा घेऊन सकाळच्या ४-५ तासांमध्ये सायकल चालवत व नंतर काम करत तीन मोहीमा केल्या आहेत. आणि सुरक्षिततेबद्दल म्हणाल तर सायकल सोडून कुठे जातच नाही. आणि नंतर लॅपटॉप व सायकल दोन्ही सुरक्षित जागी ठेवतो. अद्याप तरी त्रास झालेला नाही. लॅपटॉप व सामानामुळे वजन वाढतं. पण वजनापेक्षाही ते नीट लावणं जास्त गरजेचं. ते शिकलोय. शिवाय माझं वजन ६० किलो, सायकलीचं १२ किलो असतंच. ७२ किलो वजनात आणखी १० जास्त झाल्याने फरक काहीच पडत नाही. थोडा मानसिक फरक पडतो; पण त्याचीही कधीच सवय होऊन गेलीय! Happy

सकाळच्या ४-५ तासांमध्ये सायकल चालवत व नंतर काम करत तीन मोहीमा केल्या आहेत. >>>> वा:! मस्तंच!!

तरीच मला प्रश्न पडला होता की तुम्ही दिवसभर सायकल का चालवत नाहीत आहात.

सायकलवरून शेकडो किलोमीटर. बापरे! थरारक आहे Happy माझ्यासाठी तर अविश्वसनीय असाच हा प्रवास आहे. आपले मन:पूर्वक अभिनंदन! माझे काही फारच बेसिक प्रश्न आहेत:

१. हायवेवरून इतका मोठा पल्ला गाठणारा प्रवास करताना बाजूने (कधीकधी जवळून) प्रचंड वेगाने जाणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे असुरक्षित वाटून दडपण आले नाही का? तसेच यातील अनेक मोठ्या वाहनांच्या धुरामुळे हायवेवर जे प्रचंड प्रमाणात प्रदूषण असते (विषारी वायू) त्याचा त्रास झाला नाही का?

२. इतक्या मोठ्या अंतराचा प्रवास त्यात आणि प्रचंड मोठे चढउतार यामुळे डिहायड्रेशन तर होणारच. अधूनमधून पाणी पिणे गरजेचे. त्यावर कशी मात केलीत (पाण्याच्या बाटल्या हव्या तेंव्हा त्या ठिकाणी उपलब्ध होतीलच असे नाही)

३. निर्जनस्थळी आल्यानंतर प्रचंड थकायला झाले ऊन असेल व आसपास निवारा पण नसेल, किंवा समजा अशावेळी सायकलला काही समस्या आली तर काय करता? (थोडक्यात: इमर्जन्सी सिच्युएशन कशी हाताळता?)

धन्यवाद अतुलजी! Happy ह्या सगळ्या गोष्टी सवयीने सहज जमत जातात. इच्छा व इंटरेस्ट असेल तर माझ्या ब्लॉगवर येऊन जा. इथे मी माझ्या सायकलिंगच्या अनुभवाबद्दल सुरुवातीपासून- शून्यापासून सविस्तर लिहिलं आहे- http://niranjan-vichar.blogspot.com/p/blog-page_0.html धन्यवाद!