मातलेला पाऊस

Submitted by दत्तात्रय साळुंके on 8 October, 2018 - 07:43

मातलेला पाऊस

मी आता पावसावर कविता करत नाही
कारण पाऊस कसा असतो नीट कळत नाही
कुठेतरी पाऊस मातला नदी नाल्यात
जनावरे माणसांची थडगी गल्लीबोळात

चाटूनपुसून गावासोबत जवळचा डोंगर सुद्धा नेला
तरी उन्मत हत्तीचा उतमात थांबेना , कुठे
गारपिटीत आशाआकांक्षा गोठवून गेला
गावाला आली स्मशानकळा
स्मशानभूमीत कधी मळा पिकत नाही
मी आता पावसावर कविता करत नाही

असाच तो करतो कुठे कानाडोळा
कुठेतरी बरसतो फक्त आगीचा गोळा
कुणासाठी तो फक्त आख्यायिका झालाय
गरीब स्वप्नाचा इंद्रधनू थडग्यात पुरलाय

सत्त्यात आणि स्वप्नात फक्त धूळ पेरीचे
आशाळभूत आकाशाकडे लागलेले डोळे
खपाटी गेलेलं पोट अन आतड्याचे पिळे
म्हणतात इंद्रधनूत असतात सात रंग
आमच्या साठी सारे फक्त काळे काळे
हिरवा शालू ना मागते रंडकी धरा
धुळीला मिळालाय संसार सारा
पाचूचा किमती ऐवज शब्दकोशात राही
गावाला आमच्या त्याचा मागमूस नाही
गावावर असते फक्त कोरड्या ढगाची छाया
अन् दुष्काळाची आभाळमाया

विश्वव्यापी तो जेव्हा टॅंकरमधे बंद होतो
निराशेचा फुफाटा टॅंकरमागं उडतो
विजेच्या चपळाईने धावतात खंगलेली शरीरं
बादलीपुरता उरतो तो थेंब थोर
बादलीतल्या पावसाची कविता झरत नाही
मी आता पावसावर कविता करत नाही

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वा!

जबरदस्त....
काळजात रुततीये पार....

जबरदस्त!

पण पावसाच दोष नाही त्यात, झाडं कमी झालीत, निसर्गाच संतुलन ढासळलंय, मग दुसरं काय होणार?

अशी पण एक कविता करा कोणीतरी

मी आता माणसावर कविता करत नाही
कारण माणूस मला चांगलाच कळलाय

माणूस मातलाय सगळीकडचा पार गावाखेड्यात
कत्तली झाल्यात झाडाजंगलांच्या डोंगरदर्‍यांत
रानासोबत जवळचा डोंगर सुद्धा गिळंकृत केला
गोठवलेल्या हिमनद्यांना वितळवून गेला

तरी उन्मत माणसाचा विकास काही थांबेना
रानाशिवाराला आली शहराची अवकळा
शहरातल्या काँक्रिटच्या जंगलात कधी मळा पिकत नाही
मी आता माणसावर कविता करत नाही

भास्कराचार्य, शशांक, मॅगी, Sherlock, किल्ली, हर्पेन खूप आभार प्रतिसादासाठी.

@ किल्ली, हर्पेन
मी आपल्या मताशी 100% सहमत आहे. पण मी परिणामाविषयी लिहिले आहे. मला चराचरात चैतन्य फुलवणाऱ्या पावसाविषयी लिहिणे सुचत नाही कारण मला चेतना देणारे त्याचे दर्शन होत नाही.
जैवविविधता नष्ट होत आहे . काही दिवसाने थुई थुई नाचणारा मोर चित्रातच दिसेल आणि मुलांना मोर कसा असतो हे चित्रातूनच समजून घ्यावे लागेल. त्या अर्थाने मला पाऊस नीट कळत नाही असे लिहिले.

तुम्ही कारण मीमांसा केली आहे. एवढे भयानक परिणाम भोगूनही मानव सुधारत नाही ही खरी शोकांतिका आहे. विकसनशील देश आणि विकसित देश यांच्यात पर्यावरण रक्षणाबाबत असलेले मतभेद सर्वश्रुत आहेत . मी आपली संवेदना समजू शकतो. शेवटी एकच म्हणेल
"Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed."
Mahatma Gandhi

भेदक!