बाप्पाचे अनुभव

Submitted by राजेश्वर on 11 April, 2011 - 05:32

श्री. आशुचॅम्प चे अमानविय वाचले, त्यांनतर आलेले एका एकाचे अनुभव वाचले. मग प्रश्न पडला की जर हे भुताचे / अमानविय अनुभव येऊ शकतात तर देव बाप्पाचे सुध्दा बर्‍याच व्यक्तींना अनुभव आले असतिल.
ते त्यांनी ईथे जर शेअर केले तर आम्हाला आनंदच होईल आणी परमेश्वरावरची आमची श्रध्दा वाढेल. माझ्या बाबतित म्हणाल तर प्रकाशीत करण्यासारखा मला अजुन कोणत्याच प्रकारचा अनुभव आलेला नाही. (अमानविय आणी देव बाप्पाचा) पण माझा देवा वर विश्वास आहे अर्थात कोणी याला अंधश्रध्दा म्हणेल पण मला त्यांच्या वाटेला जायचे नाही. प्रयत्न हाच असेल की आपल्या अनुभवातुन परमेश्वरी लिलेचा आनंद घेऊ शकु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स बोकलत, आदूच्या विनंतीला मान दिलात त्याबद्दल.

हा धागा माझ्यासाठी टॉनिक आहे, कित्येक वाईट प्रसंग आयुष्यात चालू आहेत आणि मी सतत हा धागा वाचून 'देव आहे, सगळं नीट होणार आहे' हे स्वतःला बजावतेय.

हा धागा नक्कीच मज्जा किंवा वाचून सोडून द्यावा असा नाही त्यामुळे इथल्या पुरता कल्पना विलास सगळ्यांनीच थांबवूया

अनामीकाचा अनुभव वाचून एक प्रसंग आठवला ( आधी इथे लिहिलाय की नाही ते लक्षात नाही)
हा स्पेसिफिक गणपतीचा अनुभव नाही पण माझ्यासाठी सगळे देव एकच ,त्यामुळे इथे लिहिते -

साधारण 3 एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आईच्या किमोथेअरपीज नुकत्याच संपल्या होत्या आणि गुरुपौर्णिमेचा दिवस आला . आईने हट्ट सुरू केला की तिला गोंदवल्याला जायचंच आहे. खूप विनंती केली की गर्दी असेल, इन्फेक्शन होईल, जेवायला व्यवस्थित मिळणार नाही , आता जाऊ नकोस पण तिचं एकच म्हणणं होतं - माझे महाराज काही तरी सोय करतील.
तो काळ असा होता की आईचं मन आम्ही अजिबात दुखवत नव्हतो.शेवटी मी तिला जा म्हणून सांगितलं.

आई भल्या रात्री गोंदवल्याला पोहचली, तोपर्यन्त प्रसादाची वेळ संपली होती, आता गोळ्या घ्यायच्यात तर खाणार काय असा विचार आई करतच होती तेवढ्यात तिकडे एक काकू आईला बोलवायला आल्या - अगं जेवण करून घे , तुझं ताट बाजूला काढून ठेवलंय म्हणे. आई म्हणाली तुम्हाला कसं माहीत मी येणार आहे त्यावर त्या काकू म्हणाल्या तू दर वर्षी येतेस, या वर्षी कसं चुकेल? आईने महाराजांच्या गाभार्यात बसून महाराजांपुढे ठेवलेलं ताट उघडलं तर त्यात व्यवस्थित पोळे भाजी , भात, आमटी, चटणी आणि शिरा होता, तो खाऊन आई बाबा एका खोलीत झोपायला गेले. नेहमी गोंदवलेला जाणाऱ्यांना माहीत असेलच की रात्री 1 नंतर प्रसाद मिळणं किती अवघड आहे , ते पण भात आणि पोळी दोन्ही..

आता दुसऱ्या पहाटे आई बाबा उठले, मी फोन करून आईला म्हणलं झालंय तेवढं दर्शन पुरे की आता, मंदिरात असंख्य भक्त असतील, इन्फेक्शन होईल, तेवढ्यात एक माणूस तिला सांगत आला, लवकर चला दार उघडतायेत. तशी आई पळत गेली तर गाभारा मोकळा आणि पूजेची तयारी सुरू झाली होती. आई बाबा आत गेल्या गेल्या त्यांनी इतर कोणालाही आत येऊ देणं बंद केलं. व्यवस्थित एका कोपऱ्यात बसून आई बाबांनी सगळी पूजा पाहिली, महाराजांना दाखवलेल्या नाष्ट्याचं ताट आईला दिलं गेलं, आरती झाली , आई गाभार्यातून बाहेर आली आणि मग इतर भक्त आत यायला सुरुवात झाली.
आईने लगेच फोन केला मला - बघ म्हणलं होतं ना , महाराज सांभाळतील मला... शेजारून जाणाऱ्या कोणीतरी आईचं फोनवर बोलणं ऐकलं आणि म्हणाले , 'महाराजांच्या दारात तुझी जबाबदारी रामावर आहे, विश्वासाने आलीस तर असं कसं तुला एकटं टाकतील ते?'

ऐकून आम्हा दोघींच्याही डोळ्यातून घळाघळा पाणी यायला सुरुवात झाली.

रीया, मस्त अनुभव..
माझा पण एक अनुभव आहे महाराजांचा.
मी ६ महिन्याची गरोदर होते..आणि बरेच दिवस मागे लागले होते घरच्यांच्या की मला गोंदवल्याला महाराजांचं दर्शन घ्यायचय आणि प्रासादाचा आमटी-भात आणी ताक जेवायचय...घरचे म्हणायचे तुला आमटी भाताचे डोहाळे लागले की काय..( गोंदवल्यातली आमटी भात आणि ताक ज्यानी खाल्ले असेल त्यानाच समजेल की त्यात काय विशेष असतं ते)...बरेच दिवस काही ना काही कारणाने पुढे पुढे जात शेवटी एका शनिवारी पुण्यातुन निघालो...निघायला बर्यापैकी उशीर झालेला तरी १ पर्यंत पोचु असं वाटलं...पण वाटेत खुप जास्त ट्रॅफिक लागल्याने पोचायला खुपच उशीर झाला..दुपारची जेवणाची वेळ संपली होती...घाईघाईने दर्शन घेउन मागे प्रसादाच्या मंडपाजवळ पोचलो..तर सगळे दरवाजे बंद झालेले होते..
मला खुप वाईट वाटलं की ईतक्या लांबुन येउन प्रसाद हुकणार..ईतक्यात मागचा एक दरवाजा उघडला आणि त्यातुन एक जण बाहेर आले..जेवायचं राहिलय का विचारायला लागले...आम्ही हो म्हणून लगेच आत शिरलो...शेवटची पंगत संपली होती आणि सगळी पदार्थांची भांडी उचलत होते..आम्ही ताट , वाट्या घेउन लाईन मधुन पुढे गेलो तर तिथे फक्त आमटी-भात आणि ताकच शिल्लक होतं Happy

( तु सारखी आमटी-भात-ताक घोकत होतीस म्हणून आम्हाला खीर,पोळी,भाजी पण दिली नाही महाराजांनी असं साबा न नवरा खुप दिवस मला चिडवत होते :-)..)

हा अगदी कालचा अनुभव - अनेकांच्या लेखी हा काहीही, उगाचच वगैरे असू शकतो पण तरीही लिहिते -

काल मी भारतातून परत आले अमेरिकेत. फार धावती भेट होती. दिल्ली ते न्यूयॉर्क जवळपास 15 तासाची फ्लाईट होती, मी प्रेग्नन्ट असल्याने इतक्या तास बसवेल का याची मला चिंता होती. त्यात मी पुण्यात चेक इन केल्याने त्यांनी मला न्यूयॉर्कचं तिकीट पण दिलं पण ती होती मधली सीट.
घरातून निघता निघता समोरच्या भवानी मातेचे मंदिरात गेले आणि निघताना तिला सांगितलं होतं की प्लिज मला चांगली सीट मिळू देत बसायला. एअरपोर्ट वर जाऊन बघते तर असली सीट. शांत राहिले आणि देवीला म्हणलं तुझ्या मनात असेल तसं...!
दिल्लीला पोहचल्यावर काउंटर वर रिक्वेस्ट केली की मला जमल्यास अशी सीट द्या ज्याच्या शेजारची सीट रिकामी असेल, म्हणजे किमान मला मांडी घालून बसता येईल, तो माणूस म्हणाला - फ्लाईट पूर्ण बुक आहे पण काही ऍडजस्ट झालं तर सांगतो. मी ठीक आहे म्हणून सांगितलं आणि मनात देविचा धावा करत शांत बसून राहिले.
फ्लाईट बोर्डिंग सुरू होईला 5 चं मिनिटं होते तेवढ्यात त्याने मला बोलावलं आणि म्हणाला आमच्याकडे 22F अवलेबल झालंय आताच, आयल आहे पण 22 E वर एक जण आहे बसायला, 22D मोकळी आहे, तुम्ही तिच्याशी बोलून बघा काही होतंय का, मी म्हणलं बरं, द्या 22F..
विमानात गेले, 22E ची वाट बघत बसले, विमान सुरू झालं तरी 22E आली नाही. मला 22D, 22E, 22F तिन्ही सीट मिळाले आणि मी आरामात झोपून 15 तासाचा प्रवास करून आले ( अशीच सीट मी देवीकडे मागितली होती ).
बरं गंमत अशी की संपूर्ण विमानात 22 आकडा सोडला तर इतर सगळ्या सीट accupied होत्या.

मला भगवंताचे अनुभव एका एका क्षणाला येतात, सगळे इथे नाही लिहिता येणार पण भवानी आई आहे म्हणून माझा श्वास चालू आहे.

स्मिता Happy
हे अनुभव नुसते सांगून समजणार नाहीत लोकांना किंवा वाचून ह्या त्यात काय असं वाटेल पण ज्याने घेतलेत त्यालाच त्यातलं सुख माहिती असणार Happy

ऐकून आम्हा दोघींच्याही डोळ्यातून घळाघळा पाणी यायला सुरुवात झाली. >>> माझ्याही आलं ग डोळ्यात पाणी नुसते वाचून. ग्रेट.

स्मिता, रिया सर्व अनुभव छान.

धन्यवाद अन्जू. सगळ्यांचे अनुभव ग्रेट.
हे अनुभव नुसते सांगून समजणार नाहीत लोकांना किंवा वाचून ह्या त्यात काय असं वाटेल पण ज्याने घेतलेत त्यालाच त्यातलं सुख माहिती असणार >>>>>>>अगदी अगदी.

ऑगस्ट महिन्यात मी आणि एक सहकर्मी मैत्रीण कस्टमर लोकेशनला हॉटेल मधे रहात होतो. काही कारणास्तव ती रूम बदलावी लागली. आम्ही सर्व सामान नवीन रूममधे हलवले. आधीच्या रूमची कार्ड वाली किल्ली पण परत केली. मात्र मला त्या रूम मधे काहीतर विसरले आहे असे सतत वाटत होते. शेवटी मी रिसेप्शनवरून कार्ड घेऊन त्या रूममधे गेलेच तर तिथे टेबलावर मैत्रिणीने आणलेली गणपतीची छोटी मूर्ती !! बाप्पा जणू वाट बघत बसले होते.

आपण पुष्कळदा, म्हणजे श्रावणात किंवा मार्गशीर्षात एखादं पारायण वगैरे करतो, तसच मीही करते. किंवा कधीही आंतरिक इच्छा झाल्यावर. अगदी ब्राह्मणाकडून नाही, मीच माझ्या परीने जमेल तसं करते. एका गुरुवारी गुरूचरित्र (सप्तशती टेंबेस्वामिंचं) वाचायचं ठरवलं. प्रसादाला काय करायचं ते ठरवत होते. माझा मेनू अगदी साधाच असतो बरं. वरण भात, भाजी एक तळण, व काही तरी गोड. शिरा किंवा खीर. अगदी लवकर आवरून आॅफिसला जायचं असलं तर खिचडी. गुरुवारी वरणभात व घेवड्याची भाजी करायचे ठरवले. बाकी सामान होतं घरी. घेवड्याची भाजी दत्तगुरूंना आवडते असं ऐकलंय, व दोन दिवसांपूर्वी मी स्वतःला स्वप्नात एका दुकानातून ती भाजी आणतेय असं दिसल्याने तीच भाजी फिक्स केली. भाजी बुधवारी ऑफिसमधून येताना संध्याकाळी आणणार होते, पण बुधवारी अचानक प्रोजेक्ट साइट वर जावे लागले व यायला नेमका उशीर झाला. वाटेत दोन तीन ठिकाणी थांबले पण कुठेच घेवडा मिळाला नाही. तशीच मुख्य मार्केटला गेले तिथे पण घेवडा कुणाकडेच नव्हता. उगाच मग बॅकपसाठी फरसबी घेतली, व घरी निघाले. कधी कधी मेन मार्केटला जाण्याचा कंटाळा आला तर एका भैयाच्या भाजी दुकानात मी घेते भाजी, तिथे एक शेवटचा प्रयास म्हणून गेले.( ह्याच दुकानातनं घेवडा घेतांना स्वप्नात दिसलं होतं खरं तर पण कदाचित तिथे पोहोचेपर्यंत ते बंद होईल म्हणून मेन मार्केटला आधी गेले.) तो दुकान बंदच करत होता. मी धावत जाऊन घेवडा आहे का विचारलं तो नाही म्हणाला मी अगदी खट्टू झाले. तरी शेवटी स्वप्नात नक्की कुठे दिसलेला घेवडा ते नीट आठवलं त्याच्या दुकानाच्या उजव्या बाजूला खाली टोपलीत. तिथे बघीतल्यावर काय आश्चर्य तिथे घेवडा होता. मी विचारलं असा असतांना नाही का म्हणतोस? तर एवढूसा तर आहे म्हणून नाही म्हणालो. त्याचं उत्तर. अगदी एकाच माणसापुरती भाजी होईल एवढाच होता. तो घेतला. व दुसऱ्या दिवशी वाचन झाल्यावर नैवेद्य केला. अगदी आपल्या छोट्या छोट्या ईच्छा पण देव पूर्ण करतो. फक्त श्रद्धा हवी हे परत एकदा अनुभवले.

<<< घेवड्याची भाजी दत्तगुरूंना आवडते असं ऐकलंय, व दोन दिवसांपूर्वी मी स्वतःला स्वप्नात एका दुकानातून ती भाजी आणतेय असं दिसल्याने तीच भाजी फिक्स केली. >>>
हे फार आवडले. जरा नवी माहिती पण मिळाली, धन्यवाद.

अगदी आपल्या छोट्या छोट्या ईच्छा पण देव पूर्ण करतो. फक्त श्रद्धा हवी हे परत एकदा अनुभवले. >>> अगदी सत्य. मला पण परवा ब्रेकफास्टला उकडलेली अंडी खायची खूप इच्छा झाली होती. आता आयत्या वेळी, सकाळच्या गडबडीत अशी अंडी कुठे मिळणार. दिवसभर फार हुरहूर लागली होती. संध्याकाळी सहज मित्राकडे गेलो, तर म्हणाला चल पार्टी करूया आज. जरा बसलो आणि बघतो तर काय? समोर उकडलेली अंडी पण. खरंच देवाची लीला अगाध आहे. फक्त श्रद्धा हवी हे परत एकदा अनुभवले.

Pages