बाप्पाचे अनुभव

Submitted by राजेश्वर on 11 April, 2011 - 05:32

श्री. आशुचॅम्प चे अमानविय वाचले, त्यांनतर आलेले एका एकाचे अनुभव वाचले. मग प्रश्न पडला की जर हे भुताचे / अमानविय अनुभव येऊ शकतात तर देव बाप्पाचे सुध्दा बर्‍याच व्यक्तींना अनुभव आले असतिल.
ते त्यांनी ईथे जर शेअर केले तर आम्हाला आनंदच होईल आणी परमेश्वरावरची आमची श्रध्दा वाढेल. माझ्या बाबतित म्हणाल तर प्रकाशीत करण्यासारखा मला अजुन कोणत्याच प्रकारचा अनुभव आलेला नाही. (अमानविय आणी देव बाप्पाचा) पण माझा देवा वर विश्वास आहे अर्थात कोणी याला अंधश्रध्दा म्हणेल पण मला त्यांच्या वाटेला जायचे नाही. प्रयत्न हाच असेल की आपल्या अनुभवातुन परमेश्वरी लिलेचा आनंद घेऊ शकु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजे अगदी ..बरोबर

मला आला आहे एक अनुभव...

दोन तिन महिन्या पुर्वी माझी गाडी रस्त्यात बंद पडली... काही केल्या चालु होईना... जवळ पास एकही गाडी दुरुस्त करणारा दिसत नव्हता, बरं गाडीत पेट्रोल पण होते... काय करावे काही सुचत नव्ह्ते... गाडी mechanich कडे न्यावी म्हटले तर ती reverse forward ही होत नव्हती...... बरं फोन ही लागत नव्हता..शेवटी गजानन महाराजांचा धावा केला..... तेवढयात माझा एक मामेभाऊ त्या रस्त्याने चालला होता त्याला मी दिसली... मग त्याने मला मदत केली... .असे बरेच अनुभव येतात आयुष्यात.. कोणी यावर विश्वास ठेवो अगर न ठेवो माझा तर गजानन महाराजांवर खुप विश्वास आहे...काही अनुभव नंतर शेअर करेन....

माझं बाप्पांवर प्रचंड प्रेम आहे !
त्यामुळे कदाचित घडणार्‍या गोष्टींचा तिकडे संबंध लावला जात असेलही,
पण आजवर आयुष्यात ज्या काही चांगल्या घटना घडल्या आहेत, त्या बर्‍याचदा म्हणजे ९९.९९% वेळा मंगळवारीच घडल्या आहेत. आणि त्यातही संकष्टी चतुर्थी किंवा विनायकी चतुर्थीच असते.

उदा: आयुष्यातला पहिला परदेशप्रवास- मंगळवार, विनायकी चतुर्थी.

अजून एक लक्षात राहणारा अनुभव -

मी सातार्‍याचा, त्यामुळे दर चतुर्थीला तिथल्या खिंडीतील गणपती इथे मी अथर्वशीर्षाच्या अभिषेकासाठी जायचो.
नंतर पुण्यात शिक्षणासाठी आलो तेव्हा दर चतुर्थीला सातार्‍याला जाणं जमेलच असं नसायचं.
त्यामुळे पुण्यातल्या बहिणीने तोडगा काढला, की हॉस्टेलवरून मी तिच्या घरी जावं, तिथे तिच्या घरच्या गणपतीला अभिषेक करावा आणि मग उपास सोडून पुन्हा हॉस्टेलवर जावं.
बहीण राहते वारजे नाका- हॉस्टेल- शिवाजीनगर. (नमनाला घडाभर तेल झालं)

तर एका चतुर्थीला मी ताईकडे गेलो. पण त्या दिवशी एखाद्या देवळात जाऊन बाप्पांना नमस्कार झाला नव्हता आणि त्याची रुखरुख लागली होती. कितीही म्हटलं, तरी देवळात गेलं की कसं छान वाटतं.

तर मी ताईच्या घरून अभिषेक करून हॉस्टेलला परत जायला निघालो. रुखरुख काही केल्या जात नव्हती.
बस पौडफाट्याजवळ आली तेव्हा विचार आला, इथे उतरूया, दशभुजा गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग हॉस्टेलवर जाऊ. पण आमचं हॉस्टेल कडक होतं, उशीर झाला तर आत प्रवेश मिळत नसे. त्यामुळे मी ती इच्छा तशीच मारली. पण पुढच्या क्षणाला आमची बस बरोब्बर दशभुजा गणपतीच्या देवळासमोर बंद पडली Happy
मनात म्हटलं, बाप्पांनी ओळखलं माझ्या मनातलं, त्यांनीच बस बंद पाडली Happy
बाकीचे सगळे बसवाल्यांना शिव्या देत होते, मी मात्र एकदम प्रसन्नपणे बसमधून उतरलो, मस्तपैकी दर्शन घेतलं. २ मिनिटं जरा देवळात बसलो आणिमग एस.एन.डी.टी स्टॉपवरून मला लगेच पुढची बस मिळाली आणि मी वेळेत हॉस्टेलवरही पोहोचलो. Happy

बाप्पा मोरया !

चैतन्य,
आपल्या सर्व गोष्टी विनायक चतुर्थीला होतात, यावरुन माझा अनुभव सांगतो,

माझी जन्म तारिख ४
नोकरी २०-४-१९९६ = ३१=४
गाडी नं ५९२६ = २२ = ४
लग्न २६-२-२००१ = १३ = ४
मुलीची जन्मतारिख १३ = ४

या ठळक घटना, अजुन बर्‍याच आहे. ४ च्या निगडीत.

आयुष्यात येणार प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीमागे परमेश्वर आहेच
असे अनुभव मलाही आले आहेतच. परंतु कोणत्या देवामुळे असतील सांगता येत नाही
मी मारोती दर्शन नियमित घेतोच, मी हैद्राबाद येथे गेलो होतो. सकाळी आंघोळ झाल्यावर मित्राला मारोती दर्शनाला नेण्याची इच्छा व्यक्त केली, तो म्हणाला येथे मारोती मंदीर नाही . असेल तर खुप लांब.
मी सकाळी काही दर्शनाला जाऊ शकलो नाही. नंतर रात्री सहज बाहेर पडलो. हैद्राबादला पहिल्यादाच आलेलो. गल्ली गल्ली फिरलो १० मि. मारोती मंदिर दिसले दर्शन घेऊन खुप बरे वाटले.

श्री गजाननाचे दर्शन झाले तर मला फार प्रसन्न वाटते मग ते कोणत्याही रुपात असो लालबाग च्या राजाचे असो, सिद्धीविनायक असो, दगडु शेठ किंवा सारस बागेतला गणपती असो. Happy

सदासर्वदा राम सन्नीध आहे |
कृपाळुपणे अल्पधारीष्ट्य पाहे |
सुखानंद आनंद कैवल्यदानी |
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||
____________________________________________________________________

"समर्थे दिले सौख्य नानापरीचे |
सदासर्वदा जाणसी अंतरीचे |
लळे पाळिले तु कृपाळु स्वभावे|
समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे ??
______________________________________________________________________

>>माझं बाप्पांवर प्रचंड प्रेम आहे !
त्यामुळे कदाचित घडणार्‍या गोष्टींचा तिकडे संबंध लावला जात असेलही,

हे माझ्याबाबतीतही सत्य आहे.

एक घटना सांगतो:
एकदा (मुंबईत) पवईहून विक्रोळीकडे मी सायकलवरून येत होतो. टाईमपास म्हणुन कुठलेही गाणे आठवेना तेव्हा चक्क बाप्पाची आरती गुणगुणायला सुरवात केली. कांजूरमार्गच्या अलिकडे उतारावर घसरलो आणि पडलो.
मागून ट्रक, टेम्पो अत्यंत वेगात येत होते. अशा वेळी - म्हणजे वेगात असताना आणि उतारावर - वाहनांवर नियंत्रण ठेवणे कठीण असते. पण कसे कोण जाणे मी पडल्यावर मागचे सगळे माझ्यापासून साधारण एक मीटर अंतरावर थांबले. Happy

हा एक अनुभव माझ्या ओळखीतल्या एका आजोबांचा:

ते गोंदवलेकर महाराजांचे निस्सीम भक्त.
दर पौर्णिमेला गोंदवल्याची वारी कधी चुकत नसे.
तिथे जाऊन दर्शन घेऊन, प्रसाद-भोजन झालं की सेवा म्हणूण तिथल्या ५ पंगतीत वाढणे किंवा खरकटे काढणे वगैरे त्यांचा नेम.

एका पौर्णिमेला, त्यांची बस मध्येच पंक्चर झाली आणि पोहोचायला खूप उशीर झाला.
सगळ्या पंगती संपलेल्या त्यामुळे प्रसाद मिळणार नाही अशी अवस्था.
दर्शन झाले (तेही लांबूनच).
त्यामुळे यांना रुखरुख लागून राहिलेली.
अशात एका ब्राह्मणाने त्यांना हाक मारली.
'या. प्रसाद हवाय ना?'
आजोबा गप्प. निमूटपणे त्या ब्राह्मणाच्या मागे गेले.
तिथे त्याने त्यांना एका स्वच्छ ताटात प्रसादाचं जेवण वाढलं.
आपोष्णी घेऊन त्या ब्राह्मणाला धन्यवाद म्हणायला म्हणून मान वर करतायत तर त्या खोलीत कोणीही नव्हतं.
आणि इतक्यात कोणी तिथून बाहेर पडलंय वगैरे अशी चाहूलही नव्हती.
अतिशय गहिवरून त्यांनी तो प्रसाद घेतला.

माझ्या वहिनीने सांगितलेला अनुभव..

तिच्या नात्यातल्यांकडे मुलाची मौंज होती..ते गृहस्थ सहपरिवार शेगांवला महाराजांना पत्रिका देण्यासाठी आले होते. व त्यांनी मनोमन महाराजांना मौंजेला येण्याचा आग्रह केला..

मौंज व्यवस्थीत पार पडली.. पण त्या गृहस्थाला मनात सारखे वाटत होते.. महाराज आले नाही... नंतर ते मंगलकार्यालयातले ताट्,पेले मोजत असतांना कार्यालयातल्या एका व्यक्तीने एक ताट जास्तीचे आहे म्हणुन त्या गृहस्थाला आणुन दिले. त्या ताटावर श्री गजानन महाराज संस्थान ताट नं ३३ असे लिहले होते..... त्या ताटाची शहनिशा करायची म्हणुन ते गृहस्थ ते ताट घेऊन शेगांवला आले आणी संस्थेतील लोकांना विचारले तर खरचं ३३ नं चे ताट दिसत नव्हते... .. तेव्हा तेथिल लोक म्हणाले गजानन महाराज तुमच्या मुलाला आशिर्वाद द्यायला खरचं आले होते...

काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतील पण हे अगदी सत्य आहे...

मला स्वत:ला आलेला अनुभव..
मी १२ वी त असताना... इकॉनॉमिक्स हा एक दहशतीचा विषय होता माझ्यासाठी. बाकी विषयात मी तरून जाईन अशी खात्री होती, पण इको. चे काही खरे नाही हे पेपर देऊन आलेल्या दिवशीच समजले होते. लवकर उठायची सवय हवी... म्हणा... कसं काय कोणजाणे माझी एक मैत्रिण आणि मी पहाटे ५ ला उठून सारसबागेत जायचो आणि त्याच वेळेला तिथे आरती सुरू असायची म्हणून ती पण अटेंड करायचो.. हे जानेवारीपासून सुरू झाले. १२वी बोर्डाची परिक्षा मार्च मध्ये असते.. सुदैवाने आम्ही एकही दिवस नियम चुकवला नाही. तिथे पहाटे आरती सुरू असताना.. एक मुलगी प्रदक्षिणा घालायची.. काही दिवसांनी दिसायची बंद झाली.. मग कुणाकडून कळले की तिचे लग्न होत नव्हते, आणि आता ते झाले, त्यामूळे ती येत नाही. आम्ही रोज जातोय हे पाहून तिथे कित्येक वर्षांपासून येणार्‍या एका काकांनी आम्हाला दोघिंना आरती आणि गणपती स्त्रोत्र असलेले एकेक पुस्तक दिले. मग आम्ही रोज त्यात पाहून तिथे आरती गायचो..

परिक्षेचा दिवस उजाडला इको (शत्रू) पेपर देऊन आले.. मैत्रिणीला (ही दुसरी) म्हणले काही खरं नाही. Sad

ऐन रिझल्ट च्या दिवशी रांगेत उभे राहिल्यावर नंबर यायला लागला की आम्ही दोघी पुन्हा रांगेच्या शेवटी.. असं करत संध्याकाळचे ५.३० झाले... शेवटी रिझल्ट वाटणार्‍या बाईच म्हणाल्या या आता घ्या रिझल्ट, कधी ना कधी तरी घ्यायलाच लागेल ना? पहिल्यांदा इकोचे मार्क पाहिले... बरोब्बर ३५ पडले होते. (इथे सांगायची भयंकर लाज वाटतेय, पण सत्य आहे ते.) तिथेच जाणवलं की... हे काम इतर कुणाचंही नाही.. फक्त गणपतीबाप्पांचंच आहे, कारण माझ्या आठवणीप्रमाणे मी एकूण पेपर जो सोडवला होता त्यात ३५ मार्क मिळणं निव्वळ अशक्य होतं.. Sad

दक्षिणा रिझल्ट चा अजुन एक अनुभव

हा माझ्या बॉस चा अनुभव, मी साक्षीदार होतो

आम्ही ज्या कंपनीत काम करतो, त्याच कंपनीचा एक प्लँन्ट रांजणगांव पुणे येथे आहे.
काही कारणास्तव त्या कंपनीवर आमचे मल्टीनॅशनल कस्टमर नाराज झाले अन त्याच्या ऑडीट मध्ये पास झाले नाही तर त्यांनी बिझनेस धोक्यात येण्याची सुचना दिली.
प्रेसिडेंट नी कस्टमरची नाराजी दुर करण्याची जबाबदारी आमच्या साहेबावर पर्यायाने आमच्यावर पण टाकली.
साहेब रांजणगांव ला पोहचले आणी गेट मध्येच त्यांनी महागणपतीची प्रार्थना केली, ऑडीट मध्ये पास होऊ द्या.
सर्व जण कामाला लागले, मुक्काम रांजणगांव, जसा जसा ऑडीटचा दिवस येऊ लागला तसे आमचे साहेब जास्त टेन्शन मध्ये दिसु लागले आणी त्यांची चिडचिड वाढु लागली आम्ही सारखे त्यांना शांत राहण्याचे सांगत होतो. साहेब स्वतः उभे राहुन काम बघत होते सोबत महागणपतीचे दर्शन न चुकता घेत होते.
ठरल्या दिवशी ऑडीटर आले त्या दिवशी प्रेसिडेंट सुध्दा म्हणाले " मी देवळात कधीच जात नाही पण हे जर ऑडीट सक्सेस झाले तर मी पण गणपतीच्या दर्शनाला येईल"
पहिला दिवस व्यवस्थीत गेला, थोडे टेन्शन कमी झाले.
दुसर्‍या दिवस फारच खराब गेला,
रिझल्ट तिसर्‍या दिवशी होता.
आदल्या दिवशी आम्ही आमचे रेंटीग काढुन ठेवले ते होते ८२ मार्क्स - ब ग्रेड. म्हणजे बिझनेस सुरु राहील.
तिसरा दिवस उजाडला साहेब सकाळी मंदिरात जाऊन आले.
बरोबर २ वाजता ऑडीटर ने मिटींग बोलावली आणी रिझल्ट सांगितला ८२ मार्क्स- ब ग्रेड.

प्रेसिडेंट सह सर्वजण ३ वाजता रांजणगांव महागणपतीच्या मंदिरात होते. Happy

गणपती बाप्पा मोरया.

वरिल विनायक चतुर्थी चे अनुभव वाचुन हे इथे लिहित आहे. हा फक्त योगायोग असु शकतो, पण मला हे इथे लिहावेसे वाटले. माझा देवा वर विश्वास आहे.

गेल्या वर्षि मला डिलिवारि डेट २२ सप्टे. दिलि होति. आनि ११ सप्टे. ल गणेश चतुर्थी होती.
माझ्या office च्या रस्त्यात एक गणेशमंदिर आहे. आधि मी कधीही तिथे पाया पडायला गेले नव्हते. पन प्रेग्नंसीच्या काळात ७ व्या अनि ८व्या महिन्यात जोपर्यन्त मि office ला जात होते, तेवढे दिवस मि रोज तेथे दर्शनाला जात असे. मला मनापासुन वाटत होते कि बाळ गणेश चतुर्थी किंवा गौरी पूजन च्या दिवशि व्हावे.

आनि ११ सप्टे. ला गणेश चतुर्थी दिवशीच मला मुलगा झाला.

राजेश्वर, बहुदा बाप्पचे आलेले अनुभव हे आपल्यासाठी खास असतात.. कोणाला सांगावेत की नाही हा वै.प्र. आहे.. पण बहुदा त्यामुळेच कोणी जास्त शेअर करेल असे वाटत नाही.

माझ्या मामांच्या बाबतीतला एक प्रसंगः

माझे मामा गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांचा इन्टरव्यु पुण्याला होता. मुलाखत आणि निकाल यात २-३ तासांचा वेळ होता म्हणुन ते श्रीमंत दगडुशेट गणपतीच्या दर्शनाला गेले. मुलाखत काही विशेष झाली नव्हती. बहुतेक घरी खालीहात परत जावे लागेल असे वाटत होते. त्यांनी मनोमन गणपतीची विनवणी केली.
दर्शन करुन बाहेर आल्यावर एक लठ्ठ्सा माणुस समोर आला. आणि म्हणाला "पेढा दे, पेढा".
तो थोडा मतिमंदच वाटत होता म्हणुन मामांनी त्याला ताटातील मोद्क पेढा दिला. हि घटना सामान्य म्हणुन ते विसरले देखील.
परत जावुन निकाल पाहिला तर त्यांचे सिलेक्शन झाले होते. परत बाप्पाला धन्यवाद देण्यासाठी ते देवळात गेले आणि बाप्पासमोर डोळे मिटताच ती व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहीली.
मामा म्हणतात की तो माणुस म्हणजेच बाप्पा असेल. खरच आम्हाला देखील तेच वाटते.

माझा बाप्पा वर खुप विश्वास...
अनुभव १:
माझी आत्या कल्याणची. त्यामुळे माझी कल्याणवारी दर शनिवार रविवार व्हायची. माझ्या वडिलांना आवडायचे नाही. मी तेव्हा नुकतेच कॉलेज कम्प्लीट केले होते. त्यामुळे तिकीटासाठी वडिलाकडे पैसे मागावे लागले. वडिलांनी खुप बडबड करुन दोनशे रुपये दिले. ते घेऊन, खुष होऊन, स्टेशनला गेली. स्टेशन जवळ आल्यावर मी शंभर रुपये काढुन हातात घेतले. पण तिकीट काढण्यापुर्वी च ते माझ्याकडून गहाळ झाले. माझ्या मनात धस्स झाले. मी सम्पुर्ण रस्ता दोन वेळा पालथा घातला. पण पैसे काहि सापड्ले नाहीत. मी मनातल्या मनात बाप्पाला म्हट्लं देखील की इतकी बोलणी ऐकुन मी हे पैसे मिळवले होते आणि एका क्षणात ते हरवले. पण बाप्पाला दोष देऊन उपयोग नव्हता चुक माझी होती. मी खिन्न मनाने स्टेशनला येऊन तिकिट काऊटंर ला ऊभी राहिले. मनात अजुन ते शंभर रुपये होतेच. आणि काय आश्चर्य! मला माझ्याच पायाखाली शंभर रुपयाची नोट सापडली. ती नोट म्हणजे माझ्यासाठी देणगी होती.. मी मनोमन बाप्पाचे आभार मानले.
अनुभव २:
याच्यानंतर साधारण एक वर्षानंतर माझी एक जवळची मैत्रीण आजारी पड्ली. इतकी कि एका रात्री तिला खुप प्रमाणात रक्ताची गरज लागली. माझा जीव टांगणीला लागलेला. त्याच रात्री ठरवलं ऊद्या ऊठुन सिध्द्धीविनायक (प्रभादेवी) गाठायचं. सकाळी ऊठुन अनवाणी दर्शन घेऊन थेट हॉस्पिटल गाठलं. पण मैत्रीण तिथे नव्हती. नको नको ते विचार डोक्यात घेऊन रिसेप्शन वर गेले. तिथे कळलं की सकाळीच तिची तब्येत सुधारुन डीचार्ज सुध्धा दिला.. मी पुन्हा एकदा नमस्कार केला.
अनुभव ३:
माझा प्रेमविवाह.. अर्थात घरुन थोडासा विरोध.. त्यावेळी मी मोटोरोला या कंपनीत एक्झुक्युटिव्ह म्हणुन काम करत होते. रोज माझ्याकडे वेगवेगळ्या प्रॉब्लेम घेऊन कस्ट्मर्स यायचे. एके दिवशी घरुन थोडासा वाद करुन मी कामावर निघाले. आल्या आल्या एक वयस्कर बाई माझी वाट बघत होत्या. त्यानी आल्या आल्या माहिती विचारायला सुरुवात केली.(फोन ची माहिती देणे हे आमचे काम नव्हते. ते सेल्स एक्झुक्युटिव्ह चे असते.) मी अर्थातच वैतागुन, जितक्या शांतपणे समजावण्यास सुरुवात केली. साधारण ४५ मिनीटांनंतर त्याचे समाधान झाले. त्यानी माझे आभार मानले. पण जाताना त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या," तु काळजी करु नकोस. सगळं व्यवस्थित होईल. गणपती माझ्या स्वप्नात येतो. त्याने मला सांगितले आहे.(हा एकेरी उल्लेख मला खटकला.असो). त्याच तुझ्यावर लक्ष आहे. तु घाबरु नकोस." मी हे सर्व एकुन भारावल्या सारखी त्यांच्याकडे बघत राहिले... एक गोष्ट नमुद कराविशी वाटतेय की त्याचा हात त्यावेळी मला खुप गरम लागला.
असे बरेच आहेत पण वेळेअभावी नाहि लिहीले..
जसा माझ्यावर बाप्पाचा आशिर्वाद आहे तसा तुमच्यावर पण राहो ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना..

Happy

श्रीगणेश स्मरणाने माझी दिवसाची सुरुवात व शेवट होतो. काहीही स्ट्रेसफुल क्षणी पहिले त्यांचे स्मरण असते.

मी गाडी नवीन घेतली तेव्हा डिलिवरी घ्यायला नवखा चालक होता. तो नवखा आहे हे त्यांनी मला सांगितले नव्हते. विश्वासाने ठेवलेला. डिलिवरीच्या वेळेसच दिवे गेले, मी गाडीत बसल्यावर जय बजरंग बली म्हटले. त्याला गाडीचा काहीही अंदाज आला नाही जी बाहेर काढली ती बसला व एका गाडीला ठोकून थांबली गाडी. केवळ देवाची कृपा म्हणून काही इजा झाली नाही किंवा कुणा दुसर्‍या माणसाचा जीव गेला नाही. परवा पहाटे एअर्पोर्ट ला जाताना जो बदली चालक ठेवला तो प्रचंड झोपेत व दारू प्यायलेला होता. टॅक्सी ही मागविता येइना. बरोबर अश्राप पोर व तितकीच अश्राप म्हातारी आई. हिम्मत करून बोलत बोलत त्या चालकाला ४० च्या स्पीडने नेले तो जागा राहवा म्हणून एफेम लावून ठेवला.
प्रवासाच्या शेवटास कसे कोण जाणे, मनोजवं मारुतितुल्य वेगं हे स्तोत्र लागले. पाच मिनिटात दोघींना उतरवून चालकाला रामराम ठोकला. पुढील सर्व प्रवास व्यवस्थित झाला.

आमच्या घरासमोर मारुतीचे मंदिर आहे. घरचे सर्व अश्रद्ध. इतक्या वर्षात कधीच गेले नाहीत तिथे.
हनुमानजयंतीला तिथे दिवसभर गाणी लागत. मिस्टरांना ते आवड्त नसे व फार नावे ठेवत. ते गेल्यानंतर मी त्या मंदिरात गेले. साधे स्वच्छ मंदिर आहे. मला तर फार मनःशांती लाभली. पुढील वर्शापासून ते जोरात गाणी लावणे वगैरे बंदच झाले.

मी सेकन्ड ईयरला असताना, ईलेक्ट्रोनिक्स म्हणजे माझा जानी दुश्मन. काही केल्या अभ्यासच होत नसे त्याचा. तशी मी पहिल्यापसुनच अभ्यासात खुप हुशार आहे (किन्वा होते, आता आहे कि नाहि ते माहित नाही...)पण त्या ईलेक्ट्रोनिक्स ने माझी पार वाट लावुन टाकली होती. Exam च्या वेळी question paper हातात आला आणी पायाच्या अंगठ्या पासुन डोक्यापर्यन्त १ जोराचा shock लागला... काहिच आठवेना.. आयुषयात पहिल्यांदा असे झाले होते.. मग बाजुच्याच बाकावर बसलेल्या माझ्या best friend कडे पाहिले..
तर ती पण माझ्याकडेच पाहत होती हताश होउन.. वर्गातल्या बाकिच्यांचि अवस्था पण याहुन काहि वेगळी नव्हती..
जवळ जवळ ३० मिनिटातच सर्व जन पेपर देउन निघुन पण जाऊ लागले... मग जवळ जवळ १ तासाने हातात पेन घेतला आणि गण्पतिबाप्पाच्चे नाव घेतले मनात आणि लागले लिहायला जे आठवेल ते.
डोळयातून पानी काही थांबेना.. कसतरी करुन २५ marks चे questions अटेंड केले आणि पेपर देऊन निघुन गेले (अर्थातच रडत निघुन आले तिथुन).. १०० पैकी ४० ला पास होते.. त्यामुळे १००% guarantee होति कि आता fail चा ठपका बसनारच..
ज्यादिवशी result declare झाला, माझी हीम्मतच होईना ओन्लाईन result चेक करायचि.. finally, संध्याकाळी माझ्या त्या best friend चा फोन आला.. तिनेच माझा result चेक केला होता ओन्लाईन.. आणि मि चक्क Full Pass होते.. आईशप्पथ........ कुणालाच विश्वास बसेना.. मार्क्स चेक केले तर कळाले कि ईलेक्ट्रोनिक्स मध्ये मला ४१ मार्क्स मिळाले होते.. पुर्ण वर्गात ७७ जणांमधे फक्त ५ जन ईलेक्ट्रोनिक्स मधे पास होते आनि त्या ५ मधे मी पण १ होते....
माझी ति मैत्रिण आजहि मला विचारते.. की मी नक्कि पास कसे झाले ते.. पण मलाच त्याचे उत्तर नाहि माहीत तर तिला काय सांगु... जेव्हा पण हे सगळे आठवते तेव्हा फक्त १च म्हणावेसे वाटते,... गणपति बाप्पा... मोरया.................

माझा एक अनुभव...
भिमाशंकरला जायचे बरेच दिवस मनात होते, पण दरवेळी काहीतरी कारण निघून जाणे रद्द व्हायचे. शेवटी ठरवले आणि जायला निघालो त्या दिवशी नाताळची सुट्टी होती त्यामुळे मनात धाकधूक होती की दर्शन मिळेल की नाही?
रस्त्यात एके ठिकाणी थांबलो आणि फोटो काढत होतो अचानक एक खूप मोठा साप सळसळत जाताना दिसला. तिथून पटकन निघालो आणि पुढे थोड्याच वेळात एक आजोबा दिसले रस्त्यात. हातात एक घुंगरू लावलेली काठी होती. त्यांनी हात दाखवून गाडी थांबवली आणि म्हणाले "पुढे गावात सोडशील का?" मी हो म्हणाले आणि गाडीत बसवून घेतलं. आजोबा खूप खुष झाले होते. पुढे ५ च मिनिटात गाव आलं त्यांना तिथे सोडलं त्यांनी हसत आमचा निरोप घेतला आणि आम्ही पुढे मार्गस्थ झालो.

मंदिरापाशी पोहोचलो तर प्रचंड मोठी रांग होती. दर्शन काही घेता आलं नाही, कारण रांगेत थांबलो असतो तर घरी वेळेत परत यायला जमलं नसतं. मन थोडं खट्टू झालं. घरी आल्यावर विचार मनात आला की देवच त्या आजोबांच्या रूपाने भेटायला आला असेल की काय?

राजे, अतिशय चांगला, सात्विक धागा काढलात तुम्ही.
नको त्या चर्चा आणि वाद घालून हाती दुसर्‍याबद्दल राग, द्वेष, आकस याशिवाय काहीच नाही, असं होण्यापेक्षा हे वाचून भगवंताबद्दल प्रेम आणि आनंद वाढेल असा धागा काढलात याबद्दल तुमचं अभिनंदन. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इथल्या पोस्ट्स वाचून बाकी काही विचार मनात न येता, त्याचं स्मरण राहील हे महत्वाचं.

विनंती एकच.. या विषयाला नावं ठेवणारी किंवा विषयाला धरून नसलेली पोस्ट, काहीही प्रतिक्रिया न देता दुर्लक्षित करण्यात यावी.

भौतिक गोष्टींमध्ये बाप्पाला शोधणे ही खरं तर पहिली पायरी. पुढे पुढे एकदा त्याच्या स्मरणाच्या नेमाचं त्याच्या प्रेमात रुपांतर झालं की सगळे अनुभव केवळ आपल्याकरताच होऊन जातात.

माझा एक अनुभव इथे नमुद करावासा वाटतो.
मी दर गुरूवारी, पार्ल्यात, हनुमान रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठात सकाळच्या आरतीकरता जायचो. तिथूनच पुढे विक्रोळीला ऑफीसला जायचो.
काही गुरुवार नियमित जाता आले पण पुढे काही गोष्टींमुळे जाणे जमेना. असाच एखादा महिना गेला असेल. एका बुधवारी असाच ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो डेस्कवर. दुपारी साडेबारा वाजता डेस्कवरचा मोबाईल वाजला. नंबर ओळखीचा वाटला नाही म्हणून फोन घेतला नाही, तशीच रिंग वाजू दिली. काही सेकंदानंतर पुन्हा रिंग वाजली. तोच नंबर. मी पुन्हा दुर्लक्ष केलं. त्यानंतर जेवून वगैरे दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा डेस्कवर आलो. सहज कोणाचा नंबर आहे ते बघावं म्हणून True Caller च्या सहाय्याने पाहिले आणि मला धक्काच बसला...
फोन करणार्‍याच्या नावाच्या जागी 'स्वामी समर्थ मठ, पार्ले' असे दिसत होते. मी चक्राऊन गेलो. मठात माझ्या ओळखीचे कोणी असण्याचे कारण नव्हते. बरं माझ्या ओळखीच्या, पार्ल्यातल्या एखाद्या गृहस्थाने मठातून फोन करण्याचे कारण नव्हते.
मी लगेच त्या नंबरवर फोन केला. समोरून एका व्यक्तीचा आवाज आला.

व्यक्ती : 'श्री स्वामी समर्थ!'
मी : 'स्वामी समर्थ. मला तासाभरापूर्वी या नंबरवरून फोन आला होता. एकदा नाही दोनदा रिंग
वाजली.'
व्यक्ती : 'नाही हो. कसं शक्य आहे! हा मठातल्या लँड्लाईनचा नंबर आहे आणि सकाळपासून मठात
आम्ही दोघेच आहोत. आमच्यापैकी तुम्हाला कोणीच फोन केलेला नाही.'

मी 'बरं' एवढच म्हटलं आणि फोन ठेवून दिला. विचार करूनही उत्तर मिळेना. तेवढ्यात लक्षात आलं की उद्या गुरुवार आहे. विचार केला की हे स्वामींचे बोलावणेच आहे, तेंव्हा उद्या कसही करून मठात जायला हवं. पण कसं? सकाळी तर जमणंच शक्य नव्हतं. म्हटलं स्वामींनी बोलावलय.. तेच व्यवस्था करतील.
दुसर्‍या दिवशी सकाळी काही जमलं नाही मठात जायला. दुपारपासून काळजी लागून राहिली की कसं जायला मिळेल. संध्याकाळी ऑफीसमधून निघण्याची वेळ पावणेसातची. विक्रोळी ते पार्ले तुफान ट्रॅफिक. पोहोचेपर्यंत मठ बंद होणार. अगदीच बंद नसेल झाला तरी संध्याकाळची आरती मिळणार नाही, हीच काळजी. एकीकडे मन ही काळजी करतय तर दुसरीकडे 'कसली काळजी करतोयस. स्वामींनी बोलावलय ना.. स्वामीच व्यवस्था करणार.' असं दुसरं मन म्हणतय.
दुपारी साडेतीनपर्यंत काहीच ठरलं नव्हतं. चार वाजता सहज ऑफिसमधल्या पँट्रीमध्ये गेलो तर समोर...
पार्ल्यातलाच जूना मित्र बसलेला.. मी अवाक्!!
म्हटलं 'अरे !! तु इकडे कुठे??'
तो म्हणाला 'मी CG join केली. आता याच ऑफिसला आहे सध्या.'
म्हटलं 'मी आज पार्ल्यालाच येतोय. संध्याकाळी कितीला निघणार आहेस?'
म्हणाला 'साडेसहापर्यंत निघेन'
'मी पण येईन तुझ्याबरोबर. पावणेसातची बस आपल्याला कितीपर्यंत पोहोचवेल पार्ल्याला?'
'अरे बस कशाला. बाईक आहे माझी. बाईकवरून जाऊ. पार्ल्यात कुठे जायचय?'
'स्वामींच्या मठात. सोडशील?'
तो हसून म्हणाला 'बरोब्बर साडेसहाला निघालास तर नेईन. मीही येईन तुझ्याबरोबर मठात. पुष्कळ दिवसांत जाणं झालं नाही'.
डोळ्यातलं पाणी मी पटकन लपवलं. स्वामींना मनोमन, 'अगदी आतून' नमस्कार केला.

संध्याकाळी साडेसहाला निघालो. इतक्या ट्रॅफिकमधूनही आम्ही सव्वासातपर्यंत मठात पोहोचलो. आरती सुरू व्हायची तयारी झालीच होती. स्वामींनी स्वतः बोलावून, सगळी व्यवस्था करून त्यांच्यापर्यंत मला पोहोचवलं होतं. रात्री बोरीवलीला घरी जाताना एका वेगळयाच मनःस्थितीत होतो..

किरु, सध्याच्या धांगड-धिंग्यात तुमचा हा अनुभव वाचायला खुपच छान वाटले.

Pages