पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - १५. ये रात फिर ना आयेगी (१९६६)

Submitted by स्वप्ना_राज on 27 September, 2018 - 12:03

ही मालिका वाचणार्या मायबोलीकरांच्या एव्हाना लक्षात आलं असेल की मला रहस्यमय चित्रपट पहायची फार आवड आहे. पण हेही सांगणं जरुरी आहे की पुनर्जन्मावरचे चित्रपटसुध्दा मी तितक्याच आवडीने पाहते. मग त्यात मधुमती, नीलकमल, महबूबा पासून कर्ज (ऋषी कपूर, टीना मुनीम वाला), कुदरत आणि अगदी अलीकडला ओम शांती ओम असे बरेच चित्रपट येतात. १९६६ साली आलेल्या 'ये रात फिर ना आयेगी' मधली बरीचशी गाणी 'आवडती' ह्या सदरात येत असली तरी मला हा चित्रपट माहित नव्हता. आणि मुख्य म्हणजे तो पुनर्जन्मावर आधारित आहे हे ठाऊक नव्हतं. माहित झालं तेव्हा नटसंचात विश्वजित आणि शर्मिला टागोर ही वात, उच्च रक्तदाब आणि डोकेदुखी हे सर्व विकार एकाच वेळी उत्पन्न करणारी जोडगोळी आहे हे लक्षात आल्यावर हा चित्रपट पाहावा की नाही ह्या दुग्ध्यात मी बरेच दिवस होते. पण विश्वजितला बघून न बघितल्यासारखं करण्याचं कसब कोहरा, बीस साल बाद हे चित्रपट पाहून बर्यापैकी कमावलं असल्याने अर्धी लढाई जिंकल्यागत होती. मग विकांताचा मुहूर्त पाहून चित्रपट युट्युबवरून डाउनलोड करून घेतला आणि काल केबलचं प्रक्षेपण पूर्णपणे बंद आहे ह्याची खात्री झाल्यावर लावला.

चित्रपट सुरु होतो तेव्हा आपल्याला एक कार एका डोंगराळ भागातून जाताना दिसते. कारमधून एक तरुणी एके ठिकाणी उतरते. ही असते रिटा. तिचे प्रोफेसर वडिल जवळच उत्खनन करत असतात. रिटा एका तरुण माणसाला - हा प्रोफेसरांचा सहाय्यक राकेश - ते कुठे आहेत म्हणून विचारते. तिला आपल्या वडिलांसोबत आपल्या लहानपणीच्या मित्राला, सूरजला, घ्यायला ट्रेन स्टेशनवर जायचं असतं. सूरज जवळपास १० वर्षांनी परत येत असतो. प्रोफेसर आपण खूप कामात असल्याचं सांगतात तेव्हा ती एकटीच निघून जाते. प्रोफेसर राकेशला सांगतात की सूरजचे वडील त्यांचे खूप जवळचे मित्र होते. त्यांनी मरताना आपला मुलगा आणि संपत्ती सांभाळ करायला प्रोफेसरांच्या हवाली केलेली होती. आता सूरज वयात आलाय तेव्हा त्याची संपत्ती त्याच्या ताब्यात देऊन आपण ह्या जबाबदारीतून मोकळं व्हायचं तसंच सूरज आणि रिटा ह्यांचं लग्न लहानपणीच ठरलेलं असतं ते आता लावून द्यायचं असं प्रोफेसरांनी ठरवलेलं असतं. सूरजचं सामान त्याच्या वाड्यावर पोचवून त्याला घेऊन कारने रिटा वडिलांच्या उत्खननाच्या जागी येत असते. वाटेत सूरज एका पडक्या हवेलीसमोर कार थांबवतो. मी लहान असताना मला ह्या हवेलीबद्दल एक अनामिक आकर्षण होतं असं तो रिटाला सांगतो. तिथल्या दरवाज्यावर कोरलेलं आपलं नाव तिला दाखवतो. आणि तिथे असलेली एक घंटाही वाजवून पाहतो. उशीर होत असल्याने ते दोघं तिथून निघतात तेव्हा आतून त्या दोघांकडे पाहणाऱ्या एका पांढर्या आकृतीकडे मात्र त्यांचं लक्ष जात नाही.

ते दोघं उत्खननाच्या जागी येतात. सूरज प्रोफेसरना भेटतो. त्याची राकेशशी ओळख होते. आणि तेव्हढ्यात तळघराकडे जाणाऱ्या पायर्‍या सापडल्याची बातमी सांगत एकजण प्रोफेसरांकडे येतो. प्रोफेसर त्याच्याबरोबर निघून जातात तेव्हा सूरज आणि रिटा परत घरी जायला निघतात. एव्हढ्यात रिटाला आठवतं की ती वडिलांचं औषध त्यांना द्यायला विसरली आहे. ती ते द्यायला जाते आणि तिची वाट पहात थांबलेल्या सूरजला पैंजणाचा आवाज येतो. तो वळून पाहतो तेव्हा एक तरुणी त्याला ओझरती दिसते.

इथे प्रोफेसरांचे कामगार तळघराकडे जाणारी दगडांची भिंत फोडतात. ते सगळे आत जातात तेव्हा तिथे एक जुना महाल, इतस्तत: लोंबणारी कोळीष्टकं, जुनी शिल्पं, भिंतीवर केलेलं कोरीवकाम असं कायकाय दिसतं. जमिनीवर काय आहे ते बघायला प्रोफेसर बरोबरच्या नोकराला त्यावर उजेड टाकायला सांगतात तेव्हा प्रकाशात जे दिसतं ते पाहून तो जोरात किंचाळतो. जमिनीवर एक मानवी सांगाडा पडलेला असतो.....जो बहुतेक एका स्त्रीचा असतो कारण तिच्या हातात दोन कंकणं असतात. जवळ पडलेल्या सुर्‍यावरून तिचा खून झाला होता हे उघड असतं. प्रोफेसर आणि त्यांचे सहाय्यक हतबुध्द होऊन हे दृश्य पाहत असताना खूप जोराचा वारा येतो. ते मानवी अवशेष इतस्तत: विखुरतात. खिन्न मनाने प्रोफेसर ती कंकणं आणि तो सुरा ताब्यात घेतात. जेव्हा प्रोफेसर आणि राकेश तिथे असलेली शिल्पं तपासतात तेव्हा एका नर्तीकेच्या शिल्पाच्या हातात थेट तशीच कंकणं दिसतात.

एके रात्री सूरज आणि रिटा कारने जात असताना एका सुनसान जागी अचानक त्यांची गाडी बंद पडते. कारण नेहमीचंच. इंजिन गरम झालेलं असतं. अचानक सूरजला स्त्रीच्या हसण्याचा आवाज येतो. तो रिटाला विचारतो देखील पण तिला काहीच ऐकू आलेलं नसतं. तिला कारजवळ थांबायला सांगून तो पाणी आणायला जातो. ओढ्यातून पाणी काढणार एव्हढ्यात त्याला एक गाणं ऐकू येतं. इतकंच काय तर ते गाणारी तरुणीसुध्दा दिसते. त्याला बघून ती गाणं थांबवते आणि म्हणते की मला माहित होतं एक दिवस तू नक्की परत येणार. तिला आपलं नाव ठाऊक आहे हे पाहून सूरज चकित होतो. ती तिचं नाव किरण असं सांगते. तिथून निघताना तो वळून वळून तिच्याकडे पाहत राहतो. शेवटच्या वळणावरून पाहताना मात्र ती गायब झालेली असते.

नंतर सूरजच्या चित्रांचं प्रदर्शन भरतं तेव्हा किरण ते पाहायला येते. त्याने काढलेल्या रिटाच्या चित्राकडे टक लावून पाहत राहते. पण जेव्हा सूरज तिला चित्रं कशी वाटली असं विचारतो तेव्हा ती 'ही जादू तुझ्या हातात फार पूर्वीपासून आहे' असं कोड्यात टाकणारं बोलतेच. वर 'कधीपासून अपूर्ण ठेवलेलं एक चित्र तू कधी पूर्ण करणार' असा सवाल करून त्याला अधिक बुचकळ्यात टाकते. ती घोडागाडीत बसून तिथून निघते तेव्हा सूरज कारने तिचा पाठलाग करतो. पण तिची बग्गी एका बोगद्यात शिरते. पाठोपाठ सूरजची कार जेव्हा बोगद्याबाहेर पडते तेव्हा बाहेर बग्गीचं नामोनिशाण नसतं. रस्त्याच्या कडेला दगड फोडणारा पाथरवट कुठलीच बग्गी तिथून गेली नाही असं सांगतो.

पुढे एका पावसाळी रात्री सूरज एका पार्टीत रिटासोबत असताना पुन्हा तेच गाण्याचे सूर ऐकू येतात. तो त्या सुरांचा शोध घेतो तेव्हा त्याला किरण त्याच्या लहानपणच्या त्या पडक्या हवेलीत शिरताना दिसते. तो तिथे असलेली घंटा वाजवतो तेव्हा तोच पांढर्या कपड्यातला माणूस येऊन त्याला तुला किरणला भेटता येणार नाही असं सांगतो. सूरज दुसर्‍या दिवशी त्याच्या घरी असलेल्या पार्टीत यायचं निमंत्रण किरणला दे असा निरोप त्या माणसाकडे देतो. किरणला पार्टीत बघून सूरजसोबतच्या तिच्या जवळिकीने आधीच अस्वस्थ असलेली रिटा चवताळते. तर किरणच्या हातात असलेली कंकणं बघून प्रोफेसर अवाक होतात. ती हुबेहूब त्या सांगाड्याजवळ सापडलेल्या कंकणांसारखीच असतात. किरण ती २००० वर्षांपूर्वीची आहेत आणि माझी आहेत असं सांगते. प्रोफेसर जेव्हा त्यांना उत्खननात सापडलेली कंकणं जागेवर आहेत का हे पहायला जातात तेव्हा ती तिथून गायब झाल्याचं त्यांना दिसतं. रिटा किरणला 'तू ह्या शहरात कधी आलीस'असं विचारते तेव्हा ती '२००० वर्षांपूर्वी' असं उत्तर देते. 'ती पडकी हवेली मला त्या काळाची आठवण करून देते म्हणून मी तिथे राहते' असंही म्हणते. आधीच वैतागलेली रिटा ही असली चमत्कारिक उत्तरं ऐकून अधिक कावते. ती आणि तिच्या मैत्रिणी किरणची टर उडवतात पण सूरजला मात्र किरणचा अपमान झालेला अजिबात आवडत नाही. किरण रागावून आपल्या बग्गीतून निघून गेल्यावर प्रोफेसर आणि राकेश उत्खननाच्या जागी सापडलेल्या महालात जातात तर काय......... ती नर्तिकेची मूर्तीसुध्दा चक्क तिथून गायब झालेली असते.

कोण असते ही किरण? पडक्या महालाच्या अवशेषांत असलेल्या नर्तिकेच्या मूर्तीच्या हातातली कंकणं तिच्याकडे कशी असतात? ती त्या जुन्या हवेलीत का राहत असते? पडक्या महालात सापडलेला मानवी सांगाडा राजनर्तकी किरण्मयीचा असतो का? तिचा खून कोणी केलेला असतो? का? किरण्मयी हीच किरण असते का? नर्तिकेची मूर्ती गायब कशी होते? ह्या सगळ्याचा सूरजशी काय संबंध असतो? का दिसत असते किरण सूरजला? सवाल पे सवाल! सवाल पे सवाल! पर जवाब चाहिये तो मुव्ही देखनी पडेगी मेरे दोस्त Happy माझं प्रांजळ मत विचाराल तर पुनर्जन्माच्या संकल्पनेचं आकर्षण असेल किंवा थोडंफार रहस्य असलेले चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट एकदा पाहावा असा नक्कीच आहे. नाहीतर उरलेला लेख वाचून प्रश्नांची थोडीफार उत्तरं मिळतीलच. हां.....आता शर्मिला, मुमताझ किंवा विश्वजीतचे (हसू नका हो.... माझ्या आईच्या ओळखीच्या एक काकू विश्वजितवर फुल्टू लट्टू होत्या म्हणे!) फॅन असाल तर गोष्ट निराळी.

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे विश्वजितने चित्रपटाच्या नायकाची म्हणजेच सूरजची भूमिका केलेली आहे. तुम्ही कोहरा किंवा बीस साल बाद पाहिला असेल तर 'अभिनय' ह्या नावाखाली त्याने नेमकं काय केलंय (आणि काय केलेलं नाहिये!) ह्याबद्दल वेगळं काही सांगायला नको. एका सीनमध्ये तर तो आणि शर्मिला पावसाळी रात्री गुहेत एकत्र असतात तेव्हा ह्यांचं 'रूप तेरा मस्ताना' होतंय का काय ह्यापेक्षा 'हा बाबा आता आपला शर्ट तर काढणार नाही ना' ह्या भीतीने माझी दातखीळ बसली होती. Happy ह्या चित्रपटात तो का कोण जाणे पण थोडा थकलेलाही दिसतो. त्याच्या डोळ्याखाली चक्क काळी वर्तुळं दिसतात काही सिन्समध्ये. किरण झालेल्या शर्मिलाला रोशोगुल्ल्याला लाजवेल असा गोड गोड अभिनय करायचा आणि छान दिसायचं ह्यापलीकडे काम नाही. एरव्हीही ती तिच्या नाटकी अभिनयाने आणि डोक्यावरच्या टोपल्याने माझ्या पार डोक्यात जाते. फक्त एका प्रसंगात तिचं रिटाकडे विखारी नजरेने रोखून पाहणं आपल्याही काळजाचा ठोका चुकवून जातं. बर्याच प्रसंगात शर्मिलाचा आवाज घुमल्यासारखा येतो. तो मुद्दाम तसा ठेवला होता का इतक्या वर्षानंतर चित्रपटाच्या साऊंड ट्रॅकमध्ये काही खराबी झाली आहे काही कळलं नाही. कारण त्याच प्रसंगात बाकी पात्रांचा आवाज बरोबर ऐकू येत होता. असो. रिटा झालेली मुमताझ त्यामानाने खूप चांगला अभिनय करते - तिच्या वाट्याला आलेली भूमिका तुलनेने छोटी असली तरी. एक मात्र आहे शर्मिला, मुमताझ आणि एका गाण्यापुरत्या असलेल्या हेलन-मधुमती ह्या बायांनी आपल्या Hourglass Figure ने माझा मात्र कोळसा केला. Happy

प्रोफेसरच्या भूमिकेत पृथ्वीराज कपूर आहेत. त्यांनी बहुतेक ह्या भूमिकेसाठी मेकअप करून घ्यायला नकार दिला असावा अशी शंका त्यांचा चेहेरा पाहून बर्याच ठिकाणी येते. Sad त्यांचे संवादसुध्दा बर्याच ठिकाणी समजत नाहीत. पण उत्खननाच्या कामात बुडून गेलेले, किरणच्या रहस्यमयी अस्तित्वाने कोड्यात पडलेले, 'मी रिटाशी लग्न करू शकत नाही' असं सूरजने म्हणताच भडकलेले आणि तरीही शेवटी त्याला वाचवायला धडपडणारे वृध्द प्रोफेसर त्यांनी चांगले रंगवलेत. राकेशच्या भूमिकेत कोणी शैलेश कुमार म्हणून नट आहे. त्यानेही आपल्या अभिनयातून 'हा व्हिलन आहे की नाही' ह्या संभ्रमात आपल्याला पाडायचं काम यथास्थित केलंय. विश्वजितच्या घरातला नोकर गंगाराम म्हणून असित सेन अगदीच नगण्य रोलमध्ये दिसतो.

तुम्हीही माझ्यासारखेच गोल्डन एरामधल्या गाण्यांचे चाहते असाल तर आशा भोसले आणि मोहम्मद रफी ह्यांनी गायलेली आणि ओ.पी. नय्यरने संगीतबध्द केलेली ह्या चित्रपटातली बरीच गाणी तुम्ही ऐकली असतील - हुजुर-ए-वाला जो हो इजाजत, फिर मिलोगे कभी इस बातका वादा कर लो, मै शायद तुम्हारे लिये अजनबी हूं, आपसे मैने मेरी जान मुहोबत की है आणि यही वो जगह है यही वो फिझा है. तसंच महेंद्र कपूरने म्हटलेलं 'मेरा प्यार वो है के मरकरभी तुमको'. त्यामानाने किरण सूरजला पाहून म्हणते ते 'हर टुकडा मेरे दिलका' निदान मी तरी आधी कधी ऐकलं नव्हतं.

तसं नाही म्हटलं तरी रुढार्थाने ही पुनर्जन्माची कथा नाही म्हटल्यावर माझी थोडी निराशाच झाली. पण अगदी मनापासून सांगायचं तर मला तरी चित्रपट आवडला. अनेक हिंदी चित्रपट पाहिलेले असल्यामुळे राकेशचा आपल्याला आधीपासूनच संशय येतो. पण तरी 'किरण आत्मा नाहीच' ह्याही निष्कर्षाप्रत आपण ठामपणे येऊ शकत नाही. शेवटचा ट्विस्ट तर अगदीच अनपेक्षित. प्रोफेसरांची टीम तळघरात पोचायच्या आधीच सूरजला किरण दिसते ही कथानकातली त्रुटी का प्रेक्षकांना दिलेला क्लू हे कळायला मार्ग नाही. सूरजच्या वडिलांनी मृत्यूआधी कायदेशीर बाबी नीट पूर्ण केल्या असतील तर सूरज वयात आल्यावर त्याची संपत्ती आपोआप त्याला मिळायला हवी, नाही का? मग 'तू रिटाशी लग्न केलं नाहीस तर मी तुला तुझी संपत्ती मिळू देणार नाही' ह्या प्रोफेसरांच्या धमकीला तसा काही अर्थ नाही. चित्रपट संपल्यावरही आणखीही काही प्रश्न अनुत्तरित रहातात. उदा. किरण्मयीची कथा खरी असते का नाही? तळघरात सापडलेला सांगाडा कोणाचा असतो? राकेश सूरज आणि किरणच्या फोटोतून किरणला कसं गायब करतो? इन्स्पेक्टरला जर तो वेडा माणूस माहित असतो तर त्याने त्याच गावात राहून किरणला कसं कधी बघितलेलं नसतं?

शेवटी कुठलाही चित्रपट म्हटला की त्यात काही ना काही त्रुटी असणारच. कारण अनेक हिंदी चित्रपटांत म्हटल्याप्रमाणे 'हम इन्सान है, भगवान नही और गलतियां इन्सानोंसेही होती है’. तेव्हा त्या त्रुटी स्वीकारून दोन-सव्वा दोन तास मनोरंजन झालं की गंगेत घोडं न्हालं, काय?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे. हा माझा आवडता चित्रपट आहे. रहस्य बर्‍यापैकी आहे आणि शेवटची कलाटणीही थोडी अनपेक्षित आहे.
विश्वजितला तीन चित्रपटातून तुम्ही सहन केलंच आहे (कोहरा, बीस साल बाद, ये रात फिर ना आयेगी) तर पुनर्जन्मावर आधारीत असलेला त्याचा अजून एक आणि बहुतेक शेवटचाच रहस्यमय चित्रपट (बिन बादल बरसात) आपण जरूर पाहावा ही विनंती. त्यात आशा पारेख आहे पण शर्मिलापेक्षा सुसह्य आहे आणि हेमंतकुमारने सुरेल संगीत दिले आहे. 'एक बार जरा फिर कह दो', 'जब जाग उठे अरमान', 'जिंदगी कितनी खूबसूरत है' ही गाणी अतिशय सुश्राव्य आहेत.

खूपच छान
जरा स्पोईलर अलर्ट टाकून पूर्ण स्टोरी पण लिहा न Happy

छान लिहिलंय. चित्रपट बऱ्यापैकी आवडला होता.

> विश्वजीतचे (हसू नका हो.... माझ्या आईच्या ओळखीच्या एक काकू विश्वजितवर फुल्टू लट्टू होत्या म्हणे!) फॅन असाल तर गोष्ट निराळी. > फॅन नाही पण दिसायला चांगला वाटतो तो मला. काळ्यापांढर्या चित्रपटात तर छानच दिसतो अगदी. अभिनयाच्या फार अपेक्षा नसतात माझ्या कोणाकडून.

शर्मिलामात्र डोक्यात जाते. मेकअप फारच केला आहे आणि तिला.
मुमताज चांगली वाटली त्यामानाने आणि तो शैलेश कुमारपण आवडला.

यही वो जगह गाणं मस्तच आहे.

स्वप्ना , तुझ्या लेखामुळे माझी 'पाहवयचे चित्रपट' अशी एक लिस्ट तयार झालीये..
आता वीकान्ताला तुझे लेख घेउन बसेन आणि एक एक करुन चित्रपटान्चा फडशा पाडेन..
पॉप्कोर्न ची सोय करायला हवी

बाकी, मस्तच लिहिल आहेस नेहमीप्रमाणे Happy

बघितला. बरा वाटला. चित्रपटाला बऱ्यापैकी ग्रिप आहे. डेटा वसूल.
शेवटली कलाटणी अनपेक्षीत वाटली +१.
आणि शेवटी प्रेक्षकांना काय काय प्रश्न पडू शकतील त्याचे खुलासे बऱ्यापैकी केलेत.

चीकू, नक्की पाहेन हा चित्रपट. धन्यवाद!
किल्ली, हे लेख वाचून कोणी पुन्हा हे चित्रपट पाहिले तर लेख लिहिल्याचं सार्थक झालं असंच मी म्हणेन.

आदू, चैत्रगंधा.......उरलेली स्टोरी थोडक्यात पुढे देत आहे.

**** स्पॉयलर अलर्ट ******

रिटा आणि राकेश ह्यांचं अफेअर असतं. किरण एक गरीब मुलगी असते. तिला पैश्यांचं आमिष दाखवून हा सगळा बनाव रचलेला असतो. प्रोफेसरना मानवी सांगाडा मिळाल्यावर ही कल्पना राकेशच्या डोक्यात आलेली असते. किरणने सूरजला आपलं मीलन व्हावं म्हणून जीव द्यायला भाग पाडायचं आणि तो गेला की त्याची संपत्ती आपोआप रिटा आणि राकेशला मिळणार असा हा कट असतो. पण किरण खरोखरच सूरजच्या प्रेमात पडते त्यामुळे ती त्याला जीव देऊ देत नाही. सूरजला मारायला निघालेल्या राकेशला प्रोफेसरांसोबत आलेले पोलिस रिटाबरोबरच अटक करतात. इथून बग्गी गेली नाही असं सांगणारा पाथरवट राकेशनेच अ‍ॅरेंज केलेला असतो. पोलिस सूरजला सांगतात की तुम्ही थोडं अंतर पुढे गेला असतात तर तुम्हाला ती बग्गी दिसली असती.

कालच पाहिला !! मस्त जमला आहे एकदम. शेवटचा आर्धा धक्का कळलेला असला तरी आर्धा अगदीच आश्चर्यकारक वाटला. त्या शक्यतेचा अगदीच विचार केलेला नव्हता.

विश्वजीत मला तरी या पिक्चर मध्ये आवडला. चांगले काम केले आहे त्याने. आणि चेहर्यावर नीट वेगवेगळे भावही दिसतात. उगीचच एक शंका येते की ज्या ज्या समिक्षकांच्या गर्लफ्रेंडी / बायका विश्वजीत वर लट्टू होत्या त्यांनी जळून जळून त्याचे ठोकळा असे नामकरण केलेले असणार Proud

कालच पाहिला..
विश्वजित सपाट चेहर्‍याने वावरत असला तरी दिसतो छानच त्या काळातल्या अभिनेत्यांमधे..
पार्टि मधे सुरज किरणला आमंत्रित करतो तेव्हा किरण अन रिटा बोलतात त्यावेळी त्यांचे अंबाडे बघुन अबबब झालेलं मला.. बाकी अवरग्लास फिगरबद्दल अनुमोदन..
त्या राकेश झालेल्या अभिनेत्याचा अभिनय मस्तच होता.. खरच कळू देत नाही.. त्या पाथरवटाने मात्र घाण केलीच हसताना तेव्हा लक्षात आलच मला जरा... अन मग मिस्टरी अनफोल्ड करताना एक एक चुका धडाधड लक्षात आल्या..
जसे सुरज अन रिटा पहिल्यांदा त्या जुनाट हवेलीला भेट देतात तेव्हा ती पांढरी आकृती, नविन तयखाना उघडायच्या आधीच किरणचे सुरजला दिसणे..हिरोईन कुठच्या कुठ गाणं म्हणत असताना हिरोला आवाज ऐकु येणे अन प्रोफेसरने गाफिल राहणे.. हिरोला अगदी ट्रेनमधे सुद्धा तिचा आवाज ऐकु येणे..बर ते मनातल्या मनात आधीच्या प्रसंगाची उजळणी जरी असेल तरीही त्याने ट्रेनमधुन उडी मारुन धावत तिच्याकडे जाणे वगैरे...
शेवटी प्रश्नांची उत्तरे दिली आहे तर ज्या खुनाच्या माहितीच्या जोरावर राकेश किरण अन तिच्या बापाला ब्लॅकमेल करत होता तो नेमका खुन कुणाचा केला ते रिवील केलच नाहीए..

पण एकंदर पिच्चर छाण होता.. मजा आली पाहताना..

पाहिला हा सिनेमा, विशेष नाय आवडला.. ठीक ठीक आहे
विश्वजित सपाट चेहर्‍याने वावरत असला तरी दिसतो छानच त्या काळातल्या अभिनेत्यांमधे..+११११११११११
विश्वजित आवडला मला, मस्त दिसतो.. त्यचे इतर सिनेमे गुगलुन पाहिले.. पण तो कृष्ण धवल मध्ये जरा जास्तीच छान दिसतो नै Proud

अवांतरः
चुप्के चुपके, जुना वारंवार पाहते मी.. अतिशय क्लास आहे Happy

स्वप्ना तु 'बहुरानी' पाहिलास का रेखाचा, छान आहे.. अर्थात तर्क लावायल जाता येत नै, पण करमणूक होते Happy
उत्पल दत्त कूल आहे राव.. गोड म्हातारा Happy

तीन बहुरानिया म्हणून एक जुना पिक्चर होता. खूप विनोदी वाटलेला तेव्हा. आता काय वाटेल माहीत नाही. मूळ दाक्षिणात्य चित्रपटाची हिंदी कॉपी होती.

बर्‍याच दिवसांनी या सिरीज मधला लेख वाचला. छान लिहीले आहे नेहमीप्रमाणेच. तो स्पॉइलर वाला शेवट वाचल्यावर पिक्चर बराच स्मार्टली लिहीलेला होता असे वाटले.

किरण झालेल्या शर्मिलाला रोशोगुल्ल्याला लाजवेल असा गोड गोड अभिनय करायचा आणि छान दिसायचं ह्यापलीकडे काम नाही. एरव्हीही ती तिच्या नाटकी अभिनयाने आणि डोक्यावरच्या टोपल्याने माझ्या पार डोक्यात जाते.>> नाहीतर काय Happy