सेटलमेन्ट बाबा: भाग २

Submitted by मोरपिस on 27 September, 2018 - 05:37

माझा मित्र रामू याने सांगितल्याप्रमाणे मी 'सेटलमेंट बाबा'कडे जायचा निर्णय घेतला. माझ्या मित्राने त्या बाबांचा पत्ता मला वॉटसपवर टाकला होता. तो पत्ता होता- मैनापुर, कबुतर चौक. कबुतर चौकापासून ५ किमीवर राघूवाडी हे छोटेसे गाव आहे. त्या गावापासून अर्धा किमीच्या कच्च्या रस्त्यानंतर बाबांचा मठ आहे.
मी मैनापूर स्टेशनपासून कबुतर चौकला जाण्यासाठी रिक्षा शोधत होतो. तेवढ्यात एक रिक्षा आली.
'काका तुम्हाला कबुतर चौकला जायचंय का?' रिक्षावाल्याने विचारलं.
'इथेसुद्धा काका? हा 'काका' नावाचा टॅग माझ्या नशीबातून केव्हा जाणार आहे देव जाणो.
'मला नाही जायचंय तुझ्या रिक्षातून' मी ऐटीत रिक्षावाल्याला सांगितलं.
'काका, फक्त वीस रुपये द्या' रिक्षावाला म्हणाला.
'अरे, नाही जायचंय बोललो ना' मी ओरडून म्हणालो.
'अहो काका, रागावता कशाला? तुमच्या वयाचा मान ठेवतोय म्हणून, नायतर…! रिक्षेवला आगीत तेल ओतून निघून गेला.
काही वेळाने दुसरा रिक्षावाला आला.
'कबुतर चौकला जायचंय' मी म्हणालो.
'ठीक आहे साहेब. पण तीस रुपये होतील' .
'ठीक आहे. देईन'.
मी त्याला दहा रुपये जास्त द्यायला तयार झालो कारण त्याने मला काका नाही तर साहेब म्हटलं होतं.नंतर राघुवाडीला पोहोचण्यात काहीच अडचण आली नाही. आता बाबांचा मठ फक्त अर्धा किमी दूर होता म्हणजे माझी स्वप्नपूर्ती अर्धा किमी दूर होती. स्वप्नपूर्ती होणार या आनंदात आणि हातामध्ये सुटकेस घेऊन मी निघालो बाबांच्या मठाकडे.
बाबांच्या मठात जाण्याआधी मला नवरीचा मेकअप करणं गरजेचं होतं. मेकअपची काहीच समस्या नव्हती कारण आजपर्यंत मी बऱ्याच हीरोइन्सचा मेकअप केला होता. मी मेकअपच सगळं सामान घेऊन आलो होतो. पण मेकअप करायचा कुठे? अनोळखी गाव. कोणाची ओळख ना पाळख. मेकअप करण्यासाठी कोण आपल्याला जागा देईल? इकडे-तिकडे नजर फिरवल्यावर मला एक आशेचा किरण दिसला. 'सुलभ शौचालय'! तिथे प्रसाधनगृहाची राखण करत असलेल्या मुलाला सुट्टे पैसे देऊन मी आत गेलो. बहुतेक त्या मुलाने माझ्याकडे बघितले नसावे कारण तो मुलगा कानाला हेडफोन लावून आयटम सॉंग ऐकण्यात व्यस्त होता. मेकअप करण्याचा सराव असल्याने मला जास्त वेळ लागला नाही. आता मी नवरीच्या वेशात सज्ज होतो. जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा तो मुलगा एखादी सुंदर, तरुण मुलगी बघितल्यासारखा माझ्याकडे डोळे फाडून बघत होता. मला पहिल्यांदाच मी मेकअपमन असल्याचा अभिमान वाटला. मला स्वतःलाच शाबासकी द्यावीशी वाटत होती, पण मी इथे शाबासकी घ्यायला नाही तर लग्न ठरवायला आलो होतो. त्यामुळे निघालो सेटलमेंट बाबांकडे. मला वाटले होते की इथे फार फार तर दहा-पंधरा लोक असतील. कोण येईल एवढ्या लांब? पण माझा अंदाज खोटा ठरला. इथे तर लोकांची जत्राच भरली होती. मला असंही वाटलं होतं की इथे माझ्यासारखा एकच नमुना असेल पण इथे तर माझ्यासारख्यांची लाईन लागली होती. कोणी डॉक्टरच्या वेशात होत तर कोणी वकील. कोणी सिंगर तर कोणी डान्सर होत. एक जण तर साधू बाबाच बनला होता.
थोडा वेळ रांगेत उभं राहिल्यावर दुरून बाबाजींची झलक दिसली. बाबाजी आपल्या हॉटसीटवर बसून लोकांवर कृपा करत होते. बाबा, फकिरांचं नाव ऐकताच आपण आजपर्यंत पाहत आलेली तीच छबी डोळ्यासमोर येते. जसे- लांब केस, वाढलेली दाढी-मिशी, गळ्यात निरनिराळ्या रुद्राक्षाच्या माळा, भगवा वेष! पण या बाबांचा वेष निराळाच होता. बाबाजी खूप स्टायलिश होते. दाढी-मिशी होती, पण फ्रेंच कट, केस वाढलेले होते, पण इतकेही नाही की त्याचा अंबाडा बांधता येईल. डोळ्यावर चष्मा आणि पांढरा कुडता घालून सगळ्यांना 'जा बाळा, तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार असं सांगत होते'.
आता माझी पाळी होती. का कोणास ठाऊक हृदयात धडधडत होतं. काय होणार! कोणाचा बळी द्यावा लागणार? कि माझाच बळी जाणार!

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच सायली..नवीन वेगळी कन्सेप्ट आहे... मज्जा येते आहे वाचताना..पण भाग खूपच लहान आहेत...थोडे मोठे भाग टाक ना.. आणि लवकर टाक.. पु ले शु Happy

छान सुरुय कथा
भाग छोटे असले तरी लवकर पुढला भाग आला तर कन्टीन्यूटी राहील ... उगीच मोठा भाग कसा करू ह्याचे टेंशन नको घ्यायला
पुलेशु