अशी ही बनवाबनवी

Submitted by प्रकाशपुत्र on 24 September, 2018 - 00:34

आज व्हाट्सअँप वरती एक मेसेज आला कि 'अशी ही बनवाबनवी' ला ३० वर्षे पूर्ण झाली. ते वाचून मला बनवाबनवीबद्दल काहीतरी लिहावे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. २३ सप्टेंबर १९८८ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या पिक्चरला लोकांनी अफाट प्रेम दिले. हा पिक्चर अफाट गाजला आणि अजूनही गाजतोच आहे. 'Cult Following' असं जे म्हणतात ते या पिक्चरला मिळाले. मी दादा कोंडक्यांच्या जमान्यातला नाही, त्यामुळे त्यांचे चित्रपट किती गाजायचे याचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही, पण त्याबद्दल ऐकून आहे. तेवढेच किंवा जास्तच प्रेम बनवाबनवीला मिळाले. दादांचे चित्रपट आता एवढे बघितले जात नाहीत, पण बनवाबनवी अजूनही कायम बघितला जातो, बाप आपल्या मुलांना त्याची ओळख करून देतो आणि पुढची पिढीपण बनवाबनवीच्या प्रेमात पडती. मी अमेरिकेत शिकायला आलो तेंव्हा Torrent वरून जे काही चित्रपट डाउनलोड करून बघितले त्यात पहिल्यांदा होते ते म्हणजे बनवाबनवी, एकापेक्षा एक, गोलमाल आणि अंगूर. (आतातर सगळंच युट्युबवर उपलब्ध असते, तरीपण कधीकाळी प्रलय आला आणि इंटरनेट नसेल, तर हाताशी असावेत म्हणून या सगळ्या पिक्चरच्या CD /DVD मी साठवून ठेवल्यात.) माझी मुलगी मोठी झाल्यावर, पालकांवर जी नैतिक जबाबदारी असती, ती जबाबदारी मी हे सगळे पिक्चर तिला दाखवून पार पाडलीय.

आत्तासुद्धा जेंव्हा हा लेख मी लिहायला बसलो तेव्हा बनवाबनवीतले प्रसंग आठवून हसू यायला लागले आणि मग बनवाबनवी परत बघायला लागला आणि म्हणूनच लेख पूर्ण करायला वेळ लागला. मी बनवाबनवी पहिल्यांदा केंव्हा बघितला हे मला लख्ख आठवतंय. माझ्या वडिलांची सगळी भावंडे आणि त्यांची सगळी मुले दिवाळीला आजी आजोबांकडे सांगलीला जमली होती. स्वतःहून पिक्चरला जाण्याची परवानगी मागण्याचे वय झाले नव्हते, चोरून जाण्याची अजून सवय लागली नव्हती (ती पुढे लागली आणि त्यावर एक कादंबरीचं होईल), त्यामुळे आम्हाला मोठ्या भावंडांवर किंवा काकांवर अवलंबून राहावे लागायचे. मुंबईचा कॉलेजला असणारा एक चुलतभाऊ सांगलीला आला होता, मग आम्ही त्यालाच खुप गळ घातली आणि तो मग आम्हाला घेऊन गेला. सांगलीला त्यावेळी एकंदर नऊ चित्रपटगृहे होती आणि त्याची सगळी नावे मला त्यावेळी (आणि अजूनही ) पाठ होती. माझी एक गंमतच होती, कुठलं गाव किती मोठे आहे याचा अंदाज मी तिथे किती चित्रपटगृहे आहेत यावरून लावायचो. त्यामुळे एखादा चुलतभाऊ किंवा मामेभाऊ आमचं गाव एवढं मोठं आहे वगैरे सांगू लागला तर मी त्याला तिथे थिएटर्स किती आहेत ते विचारायचो आणि त्या गावाची सांगलीशी तुलना करायचो.

सांगलीला त्यावेळी गावभागातच 'जयश्री' म्हणून थिएटर होते (आता ते पाडून तिथे मोठी इमारत झालीय) आणि बनवाबनवी जयश्रीला लागला होता. आम्ही सगळे दिवाळीचे नवे कपडे घालून बनवाबनवीला गेलो. तुफान गर्दी, तिकिटे ब्लॅकनेच घ्यावी लागली. त्यावेळी बाल्कनीचे तिकीट फक्त ४-५ रुपये होते. बनवाबनवीने त्यावेळी तीन कोटींचा व्यवसाय केला, आजची तुलना केली तर ते जवळपास ७०-८० कोटी होतील. त्यावेळी मला अजून एका गोष्टीचे आकर्षण वाटायचे ते म्हणजे मध्यंतरात मिळणारा वडा-पाव. सांगलीतला वडा मुंबई-पुण्यापेक्षा वेगळा. सांगलीत गोल आणि खुप मोठा वडा मिळायचा. वड्याचा पापुद्रा खुप जाड असायचा. त्या वड्याबरोबर त्रिकोणी पाव मिळायचा. वडा -पावची किंमत फक्त सव्वा रुपया.

तर ती बनवाबनवीशी पहिली ओळख, मग असंख्य वेळेला तो पिक्चर बघितला, मित्रांबरोबर बघितला, नातेवाईक आले कि व्हिडिओ आणून बघितला. गणपतीला आमच्याकडची मंडळे व्हिडिओ आणून किंवा पडद्यावर पिक्चर दाखवायची, तिथे परत बघितला. अमेरिकत आल्यावर जेंव्हा जेंव्हा आपल्या मातीची आणि आपल्या माणसांची ओढ लागायची तेंव्हा तेंव्हा अशा पिक्चरनी आणि गाण्यांनी जीवन सुसह्य बनवले. अमेरिकेत शिक्षण घेत असताना तर दाक्षिण्यात रूममेट्सनासुद्धा बनवाबनवी आवडला होता. आता तर बनवाबनवी युट्युबवर सारखा बघितला जातो.

बनवाबनवी हा निखळ व्यावसायिक पिक्चर आहे, निखळ मनोरंजन, कसला संदेश द्यायची फुशारकी नाही, एक साधीसुधी कलाकृती, पण मनाला भिडणारी. एक गोष्ट खुप जणांना माहित नाही, ती म्हणजे, बनवाबनवी घेतलाय ह्रिषीकेश मुखर्जीच्या 'बीवी और मकान ' या १९६६ च्या चित्रपटावरून. त्यात होते विश्वजीत आणि मेहमूद. पण सचिनने एक सच्ची मराठी कलाकृती बनवलीय. मला डायरेक्टर सचिन हा ऍक्टर सचिनपेक्षा जास्त आवडतो. सचिनचा अभिनय मला थोडा कृत्रीम वाटतो. सचिन अभिनय करताना खूप जास्त प्रयत्न करतोय असं वाटतं. पण बनवाबनवीत सचिनने सुधाचा अभिनय खुप छान केलाय. सुधीरपेक्षा सुधाच्याच भूमिकेत सचिन जास्त रमलाय असं वाटतं. सराफमामांबद्दल काय बोलायचं ? लक्ष्याबरोबरचे किंवा सुधीर जोशींबरोबरचे सराफमामांचे सगळे सीन्स हिट. एक साधारण रूपाचा कलाकार, यथा तथा नाच करणारा, निव्वळ अभिनयाच्या जोरावर किती पुढे जाऊ शकतो हे सराफमामांकडे बघून पटते. सुधीर जोशींनी पुणेरी घरमालक काय रंगवलाय ? त्यांना बघताना आपण पिक्चर बघतोय असं वाटतच नाही, हे प्रत्यक्षात घडतंय असंच वाटतं. राहून राहून असं वाटतं की त्यांचे अजून २-३ सीन्स टाकायला पाहिजे होते.

बनवाबनवीचे संवाद तर तीस वर्षे झाली तरी अजून हिट आहेत. "धनंजय माने इथेच राहतात का ? " , "तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे", "हा माझा बायको, पार्वती ", "हि सुधा, त्याचा बायको", आठवून आठवून हसायला येतं . संवादाबरोबरच काही दृश्येतर कायमची डोळ्यांवर कोरली गेलीत. जेव्हा साडी नेसून लक्ष्या लीलाबाई काळभोरांकडे रिक्षातून जातो आणि जेव्हा तो रिक्षातून उतरतो, ते म्हणजे युद्धाच्या पावित्र्यातच, अशोकला त्याला सांगायला लागतं कि जरा बाईसारखे वाग म्हणून. जेव्हा पार्वतीला बाळ होणार म्हणून सगळे तिला भेटायला जातात तेव्हा पार्वती बिडी ओढत बसलेली असते तो प्रसंग. सचिन लक्ष्याला म्हणतो, "जाऊबाई", तर लक्ष्या म्हणतो, "नका बाई इतक्यात जाऊ". सगळे प्रसंग एकापेक्षा एक. अजूनही हे प्रसंग काही विनोदी गोष्टींसाठी आणि इंटरनेटवर मिम्ससाठी वापरले जातात. जेव्हा पंतप्रधान मोदी इस्त्रायलला चालले, तेंव्हा त्यांना "मधुमेहाचे औषध" आणायला सांगणे. कोर्टाने जेंव्हा समलिंगी संबंधांना मान्यता दिली तेंव्हा धनंजय मानेंचे "हा माझा बायको" हे वाक्य सांगून धनंजय मानेंना किती दूरदृष्टी होती हे सांगणे. या सगळ्या गोष्टीतून हा चित्रपट सतत जिवंत राहतो. मला सचिन, अशोक, लक्ष्याचा "एकापेक्षा एक " पण खुप आवडतो, पण त्याला बनवाबनवीएवढे Cult Following नाही लाभले.

बनवाबनवीला तीस वर्षे झाली, पार्वतीला बाळ झालं असतं तर ते तीस वर्षाचं झालं असतं आणि कदाचित त्यालाही घर शोधण्यासाठी अशीच धडपड करायला लागली असती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा.....काल च पहिला.... काय लिहू??? हा मुव्ही फक्त अनुभवण्याची चीज आहे.... माझ्या घरात सर्व कझिन , माझा नवरा, मम्मी सगळे याचे फॅन....
धनंजय माने इथेच राहतात का?

ही कोण आणली??

तुम्ही केला होता काय कधी अभ्यास???

निवेदिता जेव्हा सुधा ला म्हणते तुझ्याबद्दल कळलं तेव्हा सचिन जे भाव दाखवतो आणि पटकन म्हणतो " काय कळलं? " ते निव्वळ महान....

अर्रे सारख सारख त्याच झाडावर काय????

छान लिहीलंय. अबब कॉलेजला असताना लागला होता तेव्हा बघितला, खूप हसवलं या चित्रपटाने, आणि होस्टेलवर त्यावरील चर्चा / नकला नुसती धमाल.

अर्रे सारख सारख त्याच झाडावर काय???? >>.... Lol Lol Lol
पुर्ण सिनेमा पाठ आहे आमचा घरी सगळ्याना......कितीहीवेळा कधीपण बघुशकतो.,...... Happy

भारी आहे खरच ..... Lol
लेख छान लिहीलाय ..... Happy

जेव्हा सिनेमा आला तेव्हा मी तिसरीत असेन. प्लाझाला गेलो होतो आम्ही सिनेमा पाह्यला अशी अंधुक आठवण आहे.
त्यानंतर टीव्हीवर वैगेरे पाहिलाय. तेव्हा अर्थातच त्या वयात किंवा तेव्हा असे पिच्चर आवडण्याचा काळ होता म्हणुन आवड्ला.
पिच्चर उत्तमच आहे. टायमिंग वेगेरे अशोक सराफ, लक्ष्या, सचिन अस्ल्याने भारीच आहे.
पण आजही हा सिनेमा बघुन लोक खळ्खळुन हसतात हे मात्र पटत नाही. आचरटपणा ओव्हरपॉवर करु लागतो आता बघताना.
आता एक चांग्ला जमलेला जुना विनोदी पिच्चर हे एकच फिलींग आहे ह्या सिनेम्याबद्दल.
खळखळुन हसु येत नाही. पण मन आनंदी होतं हे खरंय.

आता मला च्रपस सारखे प्प्रतिसाद येणार Proud

सस्मित + १.
लहानपणी / कॉलेजपणी खळाळून हसवणारे / अति आवडलेले चित्रपट आताही तेव्हढीच मजा देत नाहीत. काही अपवाद वगळता. माझ्या करता जे अपवाद आहेत, त्यात विनोदी चित्रपट नाहीय.

{{{ पण आजही हा सिनेमा बघुन लोक खळ्खळुन हसतात हे मात्र पटत नाही. आचरटपणा ओव्हरपॉवर करु लागतो आता बघताना.
आता एक चांग्ला जमलेला जुना विनोदी पिच्चर हे एकच फिलींग आहे ह्या सिनेम्याबद्दल.
खळखळुन हसु येत नाही. पण मन आनंदी होतं हे खरंय.

आता मला च्रपस सारखे प्प्रतिसाद येणार}}}

नाही येणार. ज्यांनी ओरिजिनल हिंदी (काय माहीत ते तरी ओरिजिनल होते की कुठल्या हॉलिवूडची कॉपी होते) सिनेमे पाह्यलेत त्यांना सच्याचे हे रिमेक फारसे भावणार नाहीत. खाली वानगीदाखल यादी देत आहे. -

सत्तेपे सत्ता - आम्ही सातपुते
दिल दौलत दुनिया - आयत्या घरात घरोबा
लाखोंकी बात - आयडियाची कल्पना

सचिनचा शोलेच्या वेळचा किस्सा ऐकल्यापासून तो डोक्यात गेला. त्यामुळे त्याच्या पुढच्या सिनेमांविषयीची माझी मतं "नावडतीचं मीठ अळणी" या सदराखाली टाकता येतील.

असो. पण तरीही मला त्याचा "माझा पती करोडपती" फार आवडला. तो (बहुदा) रिमेक नसावा त्यात कटी पतंगचं थोडंसं विडंबन केलंय इतकंच. त्यातले ते डायलॉग्स - किशोरी शहाणेनं लुकतुकेची आठवण काढल्यावर तिच्या बापाला (जयराम कुलकर्णी) येणारा ठसका आणि विशेषकरुन आमचे परममित्र कै. निळू भाऊंचं वाक्य - रात्रीची धावपळ करायचं आपलं वय राहिलं नाही हे प्रचंड हसवून जातात.

कोणीतरी आता करोडपतीवरही एक धागा काढा.

सत्तेपे सत्ता - आम्ही सातपुते
दिल दौलत दुनिया - आयत्या घरात घरोबा
लाखोंकी बात - आयडियाची कल्पना>>>
प्यार किये जा - धुमधडाका

अशोक सराफ आणि अश्विनी भावे यांचे प्रसंग अर्वोत्तम !
लक्ष्मीकांत ओके , सचिन - कधीच आवडला नाही !
चित्रपट ओके ओके ! खूप अतिरेकी जास्त कौतूक झाले या चित्रपटाचे!

बिपिन जी सचिन चा नवरा माझा नवसाचा सुद्धा असच मिश्रण आहे ' बॉम्बे टु गोवा' आणि "साधु और शैतान' चं. पर बात कुछ जमी नही.

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे खुप आभार. हे खरे आहे कि लहानपणी बघितलेले काही पिक्चर्स आपल्याला खुप आवडतात पण मोठेपणी तोच पिक्चर परत बघितला तर आपल्यालाच प्रश्न पडतो कि अरेच्च्या , आपल्याला हा पिक्चर का आवडला होता ? अमिताभचे बरेचसे (मि .नटवरलाल , खुद्दार , वगैरे ) पिक्चर्स बघताना असे होते.

याऊलट काही चांगले पिक्चर्स परत बघताना काही जागा नव्याने सापडतात आणि अजून मजा येते.

प्यार किये जा - धुमधडाका
नवीन Submitted by सामी on 24 September, 2018 - 13:55 }}}

हा रिमेक सचिनने नाही तर महेश कोठारे ने केलाय. त्यानेही बरेच रिमेक केले पण ते सुसह्य होते. चाईल्ड्स प्ले वरुन केलेला झपाटलेला तर अत्युत्तम होता.

चित्रपट ओके ओके ! खूप अतिरेकी जास्त कौतूक झाले या चित्रपटाचे!
नवीन Submitted by पशुपत on 24 September, 2018 - 04:29

झाली थोडी मराठी सिनेमाची जास्त वाहवाह तर कुठे बिघडले, शोले मुवि चे कौतुक केले तर चालते तसे बनवाबनवीचे.

अमिताभचे बरेचसे (मि .नटवरलाल , खुद्दार , वगैरे ) पिक्चर्स बघताना असे होते.>>>> अ ग दी खरय ! अगदी दीवार सुद्धा बोअर होतो आता...

याऊलट काही चांगले पिक्चर्स परत बघताना काही जागा नव्याने सापडतात आणि अजून मजा येते.
नवीन Submitted by प्रकाशपुत्र on 25 September, 2018 - 06:26
+११११११११
उदा. बावर्ची , अमर प्रेम , चुपके चुपके , आनंद ...( जास्ती नाव काकाच्या सिनेमांचीच येताहेत !)
अमोल पालेकरचे जवळ जवळ सगळेच सिनेमे ...

मी इस्लामपुरात जयहिंद ला पाहिला होता हा सिनेमा!

बाय द वे, तो लीलाताई काळभोरांचा बंगला खरच आहे का त्या पाषाण रस्त्यावर?
मी एकदोनदा जाताजाता शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही सापडला!

सध्याच्या 'महागुरू' अवतारातल्या सचिन ला अजिब्बात पाहावत नाही, तरीपण बनवाबनवी, करोडपती वगैरे चित्रपट अजूनही पाहू शकतो आणि त्या चित्रपटांची मजा घेउ शकतो.

सचिनचा शोलेच्या वेळचा किस्सा ऐकल्यापासून तो डोक्यात गेला. त्यामुळे त्याच्या पुढच्या सिनेमांविषयीची माझी मतं "नावडतीचं मीठ अळणी" या सदराखाली टाकता येतील.>>>>>. काय किस्सा आहे तो? लिहु शकाल अथवा त्याची लिंक देऊ शकाल का?

बाकी खरच बनवाबनवी म्हणजे निखळ मनोरंजन. जास्त काय लिहीणार? पण एक प्रसंग पण जाम हसवतो. लक्षा, प्रेग्नंट असल्याचे ढोंग करत असतांना स्वेटर विणत बसलेला असतो, पण त्याला ते जमतच नाही. त्याची पुटपुट ऐकुन जाम हसले होते.

बनवाबनवी मला फक्त अशोक सराफ आणि लक्ष्यासाठी आवडतो.. एकदम natural आहेत दोघे.. कॉमिक टायमिंग पण जबरदस्त..
'मी तुमाला टाटा करायला आले धनी.. ताsssता..'
'सारखं सारखं त्याच झाडावर काय'
'रोज आमचा पेपर वाचायला नेऊन रद्दीचे पैसे खिशात घालायचात ते?!'
'तुम्ही केला होता काय कधी अभ्यास'

एक से एक डायलॉग आहेत सगळे..
माझा पती करोडपती पण तसंच.. अशोक सराफने खाल्लाय

लक्ष्मीकांत बेर्डे चं बेअरिंग सुटतं बर्याच ठिकाणी, तो एका सीन मधे ग्रामीण मराठी, तर पुढच्याच सीन मधे नागर मराठी वापरतो.

पण आजही हा सिनेमा बघुन लोक खळ्खळुन हसतात हे मात्र पटत नाही. आचरटपणा ओव्हरपॉवर करु लागतो आता बघताना.
>>
स्मिते खरंच?
मी आजही खळख्ळून हसते हा सिनेमा बघताना, एकुण एक डायलॉग मला आवडतो. असं शक्यतो माझं फार कमी सिनेमांबद्दल होतं.

कालच पाहिला

अशोक सराफ सेक्रेटरीच्या पदराला फेव्हीकोल लावतो तो पिक्चर मला खूप आवडतो.
बनवा बनवि मस्त जुळून आलाय.मला खूप आवडतो.
लक्ष्मीकांत यांना सुरुवातीला ज्या स्टाईल ने यश मिळाले ती नंतर सेफ अप्रोच म्हणून स्टिरिओटाईप झाली असेल.पण तरीही मैने प्यार किया, बनवाबनवी मधला अभिनय आवडतो.धुमधडाका मधला पण.

Pages