काटेभेंडीचं दबदबीत!

Submitted by kulu on 10 September, 2018 - 04:30

आज पर्थात काटेरी भेंड्या मिळाल्या, कधी नव्हे ते, म्हणुन पटकन रस्सा करावा हा विचार आला. हा प्रकार मला माझ्या आईने शिकवला आहे. मायबोली वर आधी कुणी टाकलीय का ही रेसिपि हे बघत होतो पण मिळाली नाही म्हणुन इथे देतो. भरपुर वेळ हातात असताना करायचा हा पदार्थ आहे, आमच्या घरी देखिल फक्त रविवारी सकाळीच हा प्रकार केला जातो!

साहित्यः
काटेरी जाड भेंड्या १२, १३, १४, १५.........इन्फिनिटी!
भरपुर कोथिंबीर
अन्दाजाने कान्दा (मी १५ भेंड्यांसाठी अर्धा कान्दा घेतला)
अन्दाजाने टोमॅटो (मी १५ भेंड्यांसाठी अर्धा टोमॅटो घेतला)
आलं, लसूण अंदाजानेच
ओल्या नारळाचा कीस (मी अर्धी वाटी घेतला)
२ मिरच्या
२ चमचे कांदा लसुण तिखट (कोल्हापुरी)
आमसुल

कृती
आधी हात धुवुन घ्या, कसल्या कसल्या कीबोर्ड वर टाईप करुन येऊन तसल्याच हाताने भेंडी हातात घेतली तर ती चिडते. मग भेंड्या धुवु नका, त्या कोरड्या कापडाने प्रेमाने पुसुन घ्या. प्रेमाने पुसा, रागाने जोराजोरात पुसल्यास भेंडी चा काटा घुसला तर इथे प्रतिसादात येऊन माझ्या माथ्यावर त्याचे खापर फोडाल! आता ते कापड बाजुला ठेवा आणि भेंडीची साले काढुन भेंडीची कणसे दाण्यांसकट वेगळी करा. आणि मग डस्ट्बिन मध्ये टाका. साले टाका म्हणजे, नाहीतर कणसे टाकाल. आणि आता गॅस चालु करा, जो गॅस चालुय त्याच गॅस वर एक तवा ठेवुन द्या. मग टीव्ही चे चॅनेल बदलुन या, तोवर तवा तापेल.... बरोबर गॅस वर ठेवला असेल तर. मग तव्यात ती भेंडीची कणसे टाका, हलकेच परता, देव तुमच्याबरोबर असेल तर दाणे कणसातुन वेगळे होणार नाहीत, ते वेगळे झाले तर सगळं तसंच टाकुन गन्गोत्रीला जाउन डुबकी मारुन या. कणसे करपु द्यायची नाहीत नाहीतर कोळश्यचा रस्सा करावा लागेल. ४-५ मिनिटानी गॅस बंद करा, तवा उघडा ठेवा लगेच झाकु नका. झुरळ पाल कुत्री मांजरी कुणीही त्या तव्यात पडणार नाही गरम वस्तुजवळ जाऊ नये एवढी अक्कल असते त्यांना उपजत!

आता ते गार होईपर्यंत मसाला करायचा. तर कोथिंबीर (चवीनुसार, मला आवडते म्हणुन मी बरीच घालतो), आले, लसूण, नाराळाचा कीस, मिरच्या हे मिक्सर मध्ये बारीक वाटुन घ्या. घरी असताना आई मला हे खलबत्त्यात वाटायला लावते, त्याने "वेगळीच चव" येते. तेवढा पेशन्स असेल तर ते करा हो नक्की! मग परत गॅस चालु करा, वेगळा गॅस, नाहीतर पुन्हा कणसे भाजलेला गॅस चालु कराल आणि पुन्हा कोळसा! त्या गॅस वर कढईला बसवा. मगापासुन एकच चॅनेल चालु आहे ते बदलुन या टीव्ही चे परत. तापलेल्या कढईत जरा तेल सोडा. डाएट कॉन्शस असाल तरी जरा सढळ हाताने सोडा, नंतर खाताना कमी खा! (कमी खावं, खरं चवीनं आणि चवीचं खावं असं आई म्हणते) उगाच डाएट च्या नावाखाली कायतरी कमी तेल घातलं आणि रस्सा चांगला झाला नाही तर तुमच्यावर नाव! तापलेल्या तेलात कांदा घाला. कसा म्हणुन काय विचारताय? चिरुन मग घाला नाहीतर आर्धा कांदा भसकन् घालाल तसाच्या तसा. तो लालसर झाला कि त्यात टोमॅटो घाला. हो, टोमॅटो पण कापुनच घाला अणि एखादी फोड खाऊन बघा की तो कडु आहे का ते! आता त्यात लाल कांदा लसुण तिखट घाला. त्या तिखटाचं तेल सुटलं कि त्यात ती कणसे घाला भाजलेली. जरा बसा दोन तीन मिनिटं, दमल्याचा आव आणुन. आर्धा कांदा आणि आर्धा टोमॅटो कापुन हात दुखले असतील नाही तुमचे? उठा आता, बसायला संगितलेलं झोपायला नव्हे! आता त्यात आमसुल घाला, ते नसेल तर चिंच घाला, ती नसेल तर लिम्बुचा रस, तो नसेल तर एडिबल सायट्रीक अ‍ॅसिड घाला आणि तेही नसेल तर पृथ्वीवर या पटकन कारण तुम्ही मंगळावर गेलेले आहात राहायला! वाटण घाला मग त्यात आणि चांगलं ढवळुन त्यावर झाकण घाला आणि रामभरोसे सोडुन द्या रस्श्याला! १५ मिनिटात वगैरे रस्सा तयार होईल, मग झाकण काढा आणि रस्श्यावर चिरलेली कोथिंबीर फेका जराशी, नेम धरुन जोरात फेकु नका लांबुन, नाहीतर गरम रस्सा अंगावर येईल आणि परत माझ्या नावाने खडी फोडाल! आता परत झाकण ठेवा आणि गॅस बंद करा. दोन मिनिटे वाफेवर कोथिंबिरीचा स्वाद त्या रस्श्यात उतरु द्या!

गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर हा रस्सा खा आणि माझी आठवण काढा!

Webp.net-compress-image_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान वेगळी रेसिपी.

खुसखुशीत लिहीलंय. दबदबीत नांव पहील्यांदा ऐकलं.

चिंच गुळाची भेंडी आणि ताकातली भेंडी ह्या रस्सा भाज्या माहीती होत्या. अशी नव्हती माहीती.

छे छे भेंडीला बुळबुळीत वगैरे काय नावं ठेवायची ती. भेंडीएवढी देखणी, नाजुक आणि चविष्ट भाजी नाही कुठली! आणि काटेभेंडी बुळबुळीत वगैरे मुळात एवढी नसतेच! खाऊन बघा सगळ्यानी, आयुष्यात ज्या महत्वाच्या गोष्टी करयच्या असतात त्यात भेंडी खाणे हे फार टॉप ला आहे!

पाऊस सुरू झाला की अंगणात आळी खणून त्यात ह्या भेंड्याच्या दोन दोन बिया लावतात. शेणखत आणि पावसाच्या पाण्यावर पोसून अगदी दिवाळीपर्यंत भरपूर भेंडे मिळतात. शेवट शेवटचे जून झालेले भेंडे कडकडीत उन्हात वाळवून पुढच्या वर्षीच्या बियाण्यासाठी जपून ठेवतात.>>>>>मॅगी मी घरी असताना हेच करायचो! भारी वाटलं तुमच्याकडे पण हेच करतात ते बघुन! मम्मी मला लक्ष्मीपुरीच्या बाजारात घेउन जायची आणि आम्ही मग तिथुन काटेभेंडी, दोडका, भोपळ्याच्या बिया आणायचो आणि मग शेती चालु, हे दरवर्षी!

इथे काटेभेंडी चा आणि कणसाचा फोटो देतो आहे. काटेभेंडी चा फोटो Sheetal - Crafts & Recipes या युट्युब चॅनेल वरुन घेतला आहे. कणसांचा माझाच आहे!

_20180911_063614.JPG_20180911_063418.JPG

मला वाटतं आमच्यात पण ही रेसिपी कोकणातुनच आली असावी, मुळ मलकापुरचे माझे आजोबा! (कसलं गाव त्ये, धड कोकणात नव्हं न धड घाटावर बी नव्हं, आदे न मद्येच - आजी!) त्यामुळे तिकडुन आली असणार हि रेसिपी!

छे छे भेंडीला बुळबुळीत वगैरे काय नावं ठेवायची ती. भेंडीएवढी देखणी, नाजुक आणि चविष्ट भाजी नाही कुठली! >>>+१.
मला घरी केलेली भेंडीची कोरडी भाजी खूप आवडते. हॉटेलातली भिंडी मसाला वगैरे बुळबुळीत लागते. आमच्या घरी रस्सा भाजी कधीच करत नाही, पण ही रेसीपी करून बघावी वाटतेय, काटे भेंडी मिळाली तर.

इथल्या पटेलमधे जी भेंडी मिळते त्यात सुद्धा थोडे काटे लागायला लागलेत. एक दिवस पुर्ण काटेरी भेंडी मिळेल तेव्हा हि भाजी करता येईल Happy

माझ्या माहेरी पण होते काटे भेंड्याची आमटी...मस्त लागते...आई यात मिळाले तर आवर्जून बेलंगावी ( चेरी टोमॅटो सारखे टोमॅटो) घालते .त्याने अजूनच छान चव येते.
पुण्यात काटेभेंडी मिळाली नाही कधी.

कसली भारी लिहिलीयेस रेसिपी...वाचताना तुझ्याच आवाजात ऐकू आल्या सगळ्या सूचना.
स्वराला करायला सांगतो आता काटे भेंडीचे दबदबीत

सग्ळ्यांनी काय भरभरुन प्रतिसाद दिले आहेत. भारीच! धन्यवाद सर्वांचे!
सर्वांनी नक्की करुन बघा, ज्यांना आवडत नाही त्यांनीही! Happy

रेसीपी छान आहे. जुन भेंडी (दाणे आत झालेली ) त्याच केल तर कसं लागेल असा विचार करतीये. आम्ही त्या जुन भेंडीचे दाणे काढून थोडे तव्यावर परतून ते थोडे मिरचीसह ठेचून घेतो आणि त्याची कढी करतो. फार छान लागते.

सीमा,
या अशा ऑड रेसिपीज नीट करून फोटोसह टाकाव्या. डॉक्युमेंटेशन होते. परंपरागत पाककृती जतन होतात.
लिहा पाहू.

या अशा ऑड रेसिपीज नीट करून फोटोसह टाकाव्या. डॉक्युमेंटेशन होते. परंपरागत पाककृती जतन होतात.>> +1

रेसिपी भारी दिसतेय.
काटेभेंडी आहे का? असं भाजीवाल्याला विचारुन घ्यावी लागेल कारण मला फरक कळत नाही.

काटेभेंडी गुळगुळीत दिसत नाही.म्हणजे साधी भेंडी सुबोध भावे असेल तर काटेभेंडी सयाजी शिंदे.थोडी लठ्ठ आणि बुटकी असते.कलर फिका असतो.

☺️☺️☺️कोणीही क्लीन शेव्हन गुळगुळीत कुमार चालेल.
स्वजो पण.
Submitted by mi_anu on 19 September, 2018 - 19:31
>>>>
राजेंद्र कुमार ? तो तसाही अभिनयात भेंडी होता हेमावैम आहे.

वाह सगळ्यांनी अगदी दबब्दबीत प्रतिसाद दिले आहेत!

न भेंडी (दाणे आत झालेली ) त्याच केल तर कसं लागेल असा विचार करतीये. >>>>> सीमा तसं देखिल करता येतं, चांगली लागते, फक्त कमी शिजवायचं.... कारण जुन झाली तरी साध्या भेंडीची साल काटेभेंडीपेक्षा पातळच असते!

आज ह्या अश्या दिसणार्‍या भेंड्या पाठवल्या एका नातेवाईकांनी. महाकाय आहेत - आठ-नऊ इंच असतील लांबीला. आता ही रेसिपी करून बघण्यात येईल.
IMG_20181102_191213868.jpg

आता सगळे प्रतिसाद वगैरे नीट वाचल्यावर असं दिसतय की सर्वानुमते काटेभेंड्या बुटक्या असतात... मग ही वरील फोटोतली काटेभेंडी नाहीच की काय.

धन्यवाद मॅगी Happy येत्या रविवारी नक्की करणार दबदबीत. पण सालं म्हणजे नक्की काय काढायचं? त्या हिरव्या आवरणाची नेहमीसारखी भाजी करू शकतो ना?

काटे भेंडी चे साल थोडे केसाळ असल्याने युजेबल नसते.केळे सोळावे तसे काळजीने वरचे हिरवे काढून आतला फक्त बिया ज्याला वेढलेला असतो तो गाभा आमटीत वापरतात.इथे पाहिल्यास कल्पना येईल.
https://goo.gl/images/jtwhXV

वर फोटोतली काटेभेंडी वाटत नाहीय.काटेभेंडी पाहिल्या पाहिल्या तुम्हाला 'हे असे साल वाली भेंडी सालासकट कशी शिजणार असा प्रश्न पडतो आणि तुम्ही सालं काढायला लागता.
बाकी वरची काटेभेंडीची एखादी जात आहे का हे इथले कुकिंग एक्स्पर्ट सांगतील.मला वाटत नाहीये.

वरती अनेकांनी जे फोटो चिकटवले आहेत त्यातल्या भेंड्या/ भेंडे लांब, नऊधारी आणि पोपटी रंगाचे जे आहेत त्यांना मुंबईत आणि लगतच्या मराठी टापूत ' श्रावणभेंडा' म्हणतात. महाग असतो. नऊ धारांमुळे मोहक दिसतो. श्रावणभाद्रपदातल्या काही सणांच्यावेळी जेवणात तो आवर्जून वापरतात. हा भेंडा काटेरी नसतो. काटेभेंडी हा वेगळाच प्रकार दिसतोय. मुंबईत सर्वकाही मिळते म्हणतात पण ही भेंडी पाहाण्यात आली नाही.

Pages