गुरुजींचे भावं विश्व!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 2 August, 2013 - 13:17

खुलासा-भिक्षुकी/पुरोहितपणा/भटजीगिरी, हा या लेखनाचा गाभा आहे... पण तरिही,यातले अनुभव मांडणारा जो कुणी भटजी आहे,तो मी (स्वतः) नसून,आमच्यातल्या अनेक सर्वसामान्य भटजींचं ते एकत्रित व्यक्तित्व आहे असे समजावे!
===============================================================================

लेखाचं नाव,हे हल्ली चित्रपटांचं शीर्षक जसं लांब लचक असतं,तसं ठेवावं असं वाटत होतं...म्हणजे-गुरुजिंचे भावं विश्व..याच्या ऐवजी,"आज-कालच्या विश्वात गुरुजी लोकांना मिळणारा भाव!" पण तो मोह आवरला.चित्रपटाच्या तंत्राचं अनुकरण करून भाव खावा,असं वाटलच नाही!चित्रपटांना दोन ते तीन अक्षरी "छोटस्सं" नाव द्यायचं पण फॅड असतं,पण तो(ही) मोह अवरला..."लहान मोह टाळतो,तोच मोठा मोह टाळू शकतो" अशी विद्वानांची वर्तमान पत्रातून ,लोकांच्या मते वेचक(आणी आमच्या मते-जाचक) विधानं छापून येत असतात,त्याची अठवण जाहली! माझ्या बाबतीत मोठा मोह अधी टाळला गेला,,,लहान नंतर! इष्ट परिणाम साधला गेला,पण तो विद्वानांच्या वचना प्रमाणे साधला गेला नाही..म्हणून मी असामान्य होण्यापासून मुकलो! (असामान्य ही वर्तमान जगातली एक भारी जमात आहे.असं आमचं खाजगी मत आहे!)

"अ"सामान्य/"ब"सामान्य/"क"सामान्य असण्यापेक्षा सर्वसामान्यच असणं मला बरं वाटतं.खरंतर सर्व सामान्यही नको,कारण त्यातला सा वगळला की माणूस सर्वमान्य होतो.लोकमान्य/सर्वमान्य...हेही आपल्याला परवडणारं नाही. तेंव्हा आपण आपलं सामान्यच असलेलं बरं! अता अश्या या सर्व मतामतांच्या गराड्यात माझ्या सारख्या सामान्य भिक्षुकानी ही भिक्षुकिच्या धंद्याची आत्मकथा का सांगावी? तर...एका धंद्याची आत्मकथा,ही दुसर्‍या धंद्याची बोधकथा ठरते,असं पर्वाच कुठेसं वाचलेलं अठवलं...म्हणून! (तसच,माझे एक काका मला नेहमी म्हणत,"अरे आत्मू...आपले अनुभव दुसर्‍याबरोबर नेहमी शेअर करावे...गुरु करण्यापेक्षा हे "करणं"..फार मोलाचं असतं...बरं का???...म्हणूनही!)

पौरोहित्याचा व्यवसाय झालाय हे सत्यच आहे.कुठल्याही गोष्टिची मागणी वाढली,की तिचा व्यवसाय होतोच.त्याला पौरोहित्यही अपवाद उरलेलं नाही! हा व्यवसाय अलिकडे तेजीत आलाय,म्हणजे गेल्या पन्नास एक वर्षातली मंदी संपली हे उघड आहे!प्रत्येक व्यवसायाला ही तेजी/मंदी असतेच.पण जो व्यवसाय तेजीत असेल त्याच्यावर स्तुती-सुमनं उधळणारे जास्त तेजीत असतात,असा आमचा एक नम्र अंदाज आहे.गुरुजी लोकांकडे असणार्‍या गाड्या...(म्हणजे-टू व्हिलर हो!!!पुण्यात अजूनही टू व्हिलरलाच गाडी म्हणतात,आणी फोर व्हिलरला-"कार"..!!!) मोबॉईलं ,स्वच्छ टापटीप कपडे(धोत्रा-सह! ) व काहि प्रमाणात यजमानांना समाधान देण्याची धडपड...त्यामुळे होणारा धनं-लाभ!आणी मिळणारी प्रतिष्ठा-(आहा...क्या केहेने!!!? ) या गोष्टी विद्वान टिकाकारांच्या नजरेत न भरल्या तरच नवल! ह्या टीकाकारांची क्षेत्र सुद्धा निरनिराळ्या आघाड्यांवर टिकून असतात... विद्वान टीकाकार असोत,किंवा टीकाकार विद्धान असोत! मला ती "ऊंची" गाठणंही जमल नाही.
नीट निरिक्षणा अंती,कुठल्याही क्षेत्रातल्या फार थोड्या विद्वानांनी "विद्या विनयेनं" ह्या त्यांच्यातल्याच उक्तिनुसार ही उंची गाठलेली दिसून येते.बाकिचे तळातल्या-रसाशीच स्वारस्य ठेऊन असतात.आणी त्यालाच ते (विद्वत्ततेचं)रहस्यही म्हणत असतात! (असोत....आंम्हास काय त्याचे?)

अश्याच एका विद्द्वानांची व आमची एक दिवस "गाठ पडली ठका-ठका" की कायशी म्हणतात ती पडलीच एक दिवस! कुठल्याही व्यवसायात "छळ" होण्याच्या काही कॉमन जागा आहेत,ही पुढे सादर होणारी त्यातलीच एक ! यातल्या आमच्या दिव्य नशिबी आलेल्या या ठका'ला आपण,संवाद रसं-ग्रहणाच्या (काय मराठी फ्रेज सुचली तिच्यायला...!) सोईखातर "ठ" म्हणूया... आणी हे'ही अक्षर धंद्यातल्या सवयीनुसार बरोबरच आलं हो! शेवटी हे विद्वान असोत वा धार्मिक...कर्म'ठ पणा हा स्थायीभाव...त्यामुळे "ठ" हे अक्षर अगदी बरोब्बर आलं! अता या व्यक्ति विशेषांचं अजून एक वैशिष्ठ्य- हे अर्ध्या हळकुंडाने पार पिवळे झालेले असतात,पण ते मान्य असण्याची धमक यांच्यात नसते... आणी ती तशिही असो/नसो..आंम्हास काय त्याचे ? पण हे आमचा छळ करतात.. हे नक्की! प्रसंग असा अस्तो,आपण एखाद्या कार्यालयात लग्नविधिंची गाडी अर्ध्यावर आणून-सोडलेली असते...यजमानपक्षातील वधूसह असलेला स्त्री-समूह..वधूची साडी बदलणे या महान कार्यास हातभार लावावयास गेलेला असतो! आपण मनात काम लांबण्याची कटकट साठवत,आणी हतात कुणितरी दिलेला त्या कार्यालया इतकाच मिळमिळीत चहा अटवत बसलेलो असतो...आणी तेवढ्यात....आपल्या कानावर मागून "नमस्कार...नमस्कार..नमस्कार..." असा प्रतिध्वनी येतो... आणी आमची व त्यांची म्याच सुरू होते.

ठ विरुद्ध अ

ठ-नमस्कार...नमस्कार..नमस्कार...

अ-नमस्कार...बोला...

ठ-आपण काय पुण्याचे का? (हे ठ लोक कध्धिही मूळ विषयावर येत नाहीत!)

अ- ..हो...! (संक्षिप्त उत्तर-सावध पवित्रा..!)

त्यानंतर बरच अवांतर करून ठ एकदाचे मुद्द्यावर येतात...

ठ-अहो..माझी एक शंका आहे...

अ- क्काय?

ठ- जानव्याला तीनच पदर का असतात?

अ-(कुणाच्या?-हा प्रश्ण मनात दाबून) अहो चार नसतात,म्हणून तीन असतात!!!

ठ-हॅ..हॅ...हॅ...युक्तिवाद करू नका..खरं उत्तर द्या...!!!(यावर आंम्हाला तात्काळ खुलासा करू न देता..पुढे..प्रश्णांचा भडीमार होतो)
ठ-नै मंजे....वेद तर चार आहेत ना?...आणी सगळे समान आहेत ना? मग हा एकच मुद्दा असा असमानतेचा कसा काय? आणी माहित्ये का...मी असं ऐकलय की जानव्याच्या तिन दोरकांपैकी प्रत्येक दोरकाच्या तंतूवर एकेक देवता सूक्ष्म(जंतू) सारखी बसलेली असते!!! हे ख्वरय का?

(ह्या टी टाइम मधल्या मिळणार्‍या शांततेचा झालेला भंग/त्यामुळे मनात आलेला राग आणी हतात चहा संपल्यावर घेतलेली तंबाखू एकत्रित चोळत...मग आंम्ही स्वैर फटकेबाजीचं तंत्र अवलंबतो!)

अ-अजोबा...रिक्षाला चाकं किति असतात..तीन!!! आणी आतल्या हँडलरूपी चवथ्या सूत्राशी त्यांची गाठ पक्की बसलेली असते... तसच नै का जानव्याचं सगळ...!? एकमेकावर अवलंबून आणी समसमान! है कि नै!!! आपल्याला ते कळत नाही,आणी त्यामुळे ख्वरं/ख्वरं उत्तर मिळत नाही.. है कि नै!!! (वीरेंद्र सेहेवाग की जय!!!-हा अजोबांचा निष्प्रभ चेहेरा पाहून आलेला मनातला आवाज! )

ठ-आणी ते तंतूवरच्या अधिष्ठीत असणार्‍या देवतांच क्काय? (हे हल्लीच्या धर्माची माहिती देणार्‍या पुस्तकांचे प्र-ताप...ही पुस्तकं धर्माची माहिती देतात,पण त्यांना माहितीचा धर्म कसा पाळावा..?हे अजिबातच कळत नाही!..असो!)

अ-(त्याच जोशात..! ) जंतू हेच त्या देवतेचं नाव आहे... तीचं मूळ कापसात आहे..म्हणून ते जानव्याच्या दोर्‍यात आहे,तीच त्याची शक्ति आहे..आणी नीट केली तर भक्तिही आहे.

ठ-(अत्यंत आनंदून) अरे व्वा...! फ्फारच छान माहिती दिलित हो गुर्जी...तुमचं कार्डं द्या ना...!

अ-(ह्हा....!चेहेर्‍यावर आलेला सुटकेचा आविर्भाव दडवत) हे घ्या...

ते कार्ड घेऊन टळतात... आणी मागे ही मज्जा वेंजॉय करत(तश्याच उभ्या) असलेल्या वधूच्या करवल्या(ह्या हल्ली अ नेक असतात!) आंम्हाला बोलवायला,आमच्याकडे वळतात...
===========================================
छळ छावणी क्रमांक दोन- ठिकाण ..कोणत्यातरी यजमानाचं नवं घर,प्रसंग-अर्थातच वास्तु-शांतिचा!

इथे साहित्य क्षेत्री विदुषी शोभावी अशी एक महिला आमचे समोर(म्हणजे बाजूला) अवतरते...

गुरुजीईईईईईईईईईई...........ही हाक अतीव आदरानी काठोकाठ भरलेली असते... अता गुरुजीपणाच्या नवेपणात ह्याला आपलंही मन सज्जनपणा/श्रद्धा म्हणून जातं पण नंतर काहि पावसाळे गेल्यानंतर यातलं हीण कोणतं आणी कसं कोणता हेही ओळखायची सवय होते..!

त्या-मला ना...आमच्या मासिकासाठी तुमची मुलाखत हवी आहे? इथेच द्याल का? हा कर्यक्रम संपल्यावर... सुशी ओरडणार नै कै मला...(ही त्यांची- सुशी..म्हण्जे आमच्या यजमानांच्या सुविद्य पत्नी असतात..असं नंतरहून आंम्हाला..त्यांचा(ही) सह भाग मुलाखतीत झाल्यानंतर कळतं..)

......................
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय.. Happy

वेगळ्या क्षेत्रातील अनुभव.
लिम्ब्या येइलच त्याचेही किस्से घेउन.. Happy

लहान मोह टाळतो,तोच मोठा मोह टाळू शकतो >>> Lol

एका धंद्याची आत्मकथा,ही दुसर्‍या धंद्याची बोधकथा ठरते >>> भारीये हे.