काटेभेंडीचं दबदबीत!

Submitted by kulu on 10 September, 2018 - 04:30

आज पर्थात काटेरी भेंड्या मिळाल्या, कधी नव्हे ते, म्हणुन पटकन रस्सा करावा हा विचार आला. हा प्रकार मला माझ्या आईने शिकवला आहे. मायबोली वर आधी कुणी टाकलीय का ही रेसिपि हे बघत होतो पण मिळाली नाही म्हणुन इथे देतो. भरपुर वेळ हातात असताना करायचा हा पदार्थ आहे, आमच्या घरी देखिल फक्त रविवारी सकाळीच हा प्रकार केला जातो!

साहित्यः
काटेरी जाड भेंड्या १२, १३, १४, १५.........इन्फिनिटी!
भरपुर कोथिंबीर
अन्दाजाने कान्दा (मी १५ भेंड्यांसाठी अर्धा कान्दा घेतला)
अन्दाजाने टोमॅटो (मी १५ भेंड्यांसाठी अर्धा टोमॅटो घेतला)
आलं, लसूण अंदाजानेच
ओल्या नारळाचा कीस (मी अर्धी वाटी घेतला)
२ मिरच्या
२ चमचे कांदा लसुण तिखट (कोल्हापुरी)
आमसुल

कृती
आधी हात धुवुन घ्या, कसल्या कसल्या कीबोर्ड वर टाईप करुन येऊन तसल्याच हाताने भेंडी हातात घेतली तर ती चिडते. मग भेंड्या धुवु नका, त्या कोरड्या कापडाने प्रेमाने पुसुन घ्या. प्रेमाने पुसा, रागाने जोराजोरात पुसल्यास भेंडी चा काटा घुसला तर इथे प्रतिसादात येऊन माझ्या माथ्यावर त्याचे खापर फोडाल! आता ते कापड बाजुला ठेवा आणि भेंडीची साले काढुन भेंडीची कणसे दाण्यांसकट वेगळी करा. आणि मग डस्ट्बिन मध्ये टाका. साले टाका म्हणजे, नाहीतर कणसे टाकाल. आणि आता गॅस चालु करा, जो गॅस चालुय त्याच गॅस वर एक तवा ठेवुन द्या. मग टीव्ही चे चॅनेल बदलुन या, तोवर तवा तापेल.... बरोबर गॅस वर ठेवला असेल तर. मग तव्यात ती भेंडीची कणसे टाका, हलकेच परता, देव तुमच्याबरोबर असेल तर दाणे कणसातुन वेगळे होणार नाहीत, ते वेगळे झाले तर सगळं तसंच टाकुन गन्गोत्रीला जाउन डुबकी मारुन या. कणसे करपु द्यायची नाहीत नाहीतर कोळश्यचा रस्सा करावा लागेल. ४-५ मिनिटानी गॅस बंद करा, तवा उघडा ठेवा लगेच झाकु नका. झुरळ पाल कुत्री मांजरी कुणीही त्या तव्यात पडणार नाही गरम वस्तुजवळ जाऊ नये एवढी अक्कल असते त्यांना उपजत!

आता ते गार होईपर्यंत मसाला करायचा. तर कोथिंबीर (चवीनुसार, मला आवडते म्हणुन मी बरीच घालतो), आले, लसूण, नाराळाचा कीस, मिरच्या हे मिक्सर मध्ये बारीक वाटुन घ्या. घरी असताना आई मला हे खलबत्त्यात वाटायला लावते, त्याने "वेगळीच चव" येते. तेवढा पेशन्स असेल तर ते करा हो नक्की! मग परत गॅस चालु करा, वेगळा गॅस, नाहीतर पुन्हा कणसे भाजलेला गॅस चालु कराल आणि पुन्हा कोळसा! त्या गॅस वर कढईला बसवा. मगापासुन एकच चॅनेल चालु आहे ते बदलुन या टीव्ही चे परत. तापलेल्या कढईत जरा तेल सोडा. डाएट कॉन्शस असाल तरी जरा सढळ हाताने सोडा, नंतर खाताना कमी खा! (कमी खावं, खरं चवीनं आणि चवीचं खावं असं आई म्हणते) उगाच डाएट च्या नावाखाली कायतरी कमी तेल घातलं आणि रस्सा चांगला झाला नाही तर तुमच्यावर नाव! तापलेल्या तेलात कांदा घाला. कसा म्हणुन काय विचारताय? चिरुन मग घाला नाहीतर आर्धा कांदा भसकन् घालाल तसाच्या तसा. तो लालसर झाला कि त्यात टोमॅटो घाला. हो, टोमॅटो पण कापुनच घाला अणि एखादी फोड खाऊन बघा की तो कडु आहे का ते! आता त्यात लाल कांदा लसुण तिखट घाला. त्या तिखटाचं तेल सुटलं कि त्यात ती कणसे घाला भाजलेली. जरा बसा दोन तीन मिनिटं, दमल्याचा आव आणुन. आर्धा कांदा आणि आर्धा टोमॅटो कापुन हात दुखले असतील नाही तुमचे? उठा आता, बसायला संगितलेलं झोपायला नव्हे! आता त्यात आमसुल घाला, ते नसेल तर चिंच घाला, ती नसेल तर लिम्बुचा रस, तो नसेल तर एडिबल सायट्रीक अ‍ॅसिड घाला आणि तेही नसेल तर पृथ्वीवर या पटकन कारण तुम्ही मंगळावर गेलेले आहात राहायला! वाटण घाला मग त्यात आणि चांगलं ढवळुन त्यावर झाकण घाला आणि रामभरोसे सोडुन द्या रस्श्याला! १५ मिनिटात वगैरे रस्सा तयार होईल, मग झाकण काढा आणि रस्श्यावर चिरलेली कोथिंबीर फेका जराशी, नेम धरुन जोरात फेकु नका लांबुन, नाहीतर गरम रस्सा अंगावर येईल आणि परत माझ्या नावाने खडी फोडाल! आता परत झाकण ठेवा आणि गॅस बंद करा. दोन मिनिटे वाफेवर कोथिंबिरीचा स्वाद त्या रस्श्यात उतरु द्या!

गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर हा रस्सा खा आणि माझी आठवण काढा!

Webp.net-compress-image_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भेंडी शब्द वाचुन रेसिपी उघडणारच नव्हते..पण कुलु असा शब्द पुढे होता म्हणुन उघडली..
मस्त लिहिलय :-)..वाचायला मजा आली...
कोल्हापुर कर कोणात्यापण भाजीचा "रस्सा" करु शकतात राव...भारीच...रस्सेदार तर्रीदार लिहिलय... Happy

ओ कुलुदादा ते भेंडी रस्सा खाउन झाला की "“पर्थी”ची वाट" चा पुढचा भाग पण टाका की वाईच जरा...लई दिवस झाले नवीन भाग आला नाही. Happy

किल्ली खुप खुप धन्यवाद पहिल्या वहिल्या प्रतिसादासाठी!

भेंडी शब्द वाचुन रेसिपी उघडणारच नव्हते..पण कुलु असा शब्द पुढे होता म्हणुन उघडली..>>>> आईशप्पथ असलं भारी वाटलं ही वाचुन! कित्ति विश्वास तुमचा माझ्यावर.
कोल्हापुर कर कोणात्यापण भाजीचा "रस्सा" करु शकतात राव.>>>> हो खरं ! आज्जी याला "भेंडीचं दबदबीत" असं म्हणते!

ओ कुलुदादा ते भेंडी रस्सा खाउन झाला की "“पर्थी”ची वाट" चा पुढचा भाग पण टाका की वाईच जरा...लई दिवस झाले नवीन भाग आला नाही. >>>> भाग तयार आहे उद्या परवा मध्ये टाकतो नक्की! Happy

भेंडी म्हणजे भेंडीची बुळबळीत भाजी म्हणतो तीच की हे काही दुसरं प्रकरण आहे?? ते कणसं बिणसं म्हणालात रेसिपीत म्हणून विचारतेय.
बाकी रेसिपी फटुवरून तरी चमचमीत दिसतेय.
आमच्याकडे भेंडी ची कढी बनवतात( हो त्याच मी वर ऊल्लेख केलेल्या) पण त्यात भेंडीचे तुकडे घालतात आणि वाटणात कोथिंबीर नसते धणे घालतात.

Lol भारी!
पण हे काटेभेंडी काय प्रकरण आहे? भेंडीची चिंचगुळाची रसभाजी माहीत आहे.

मस्त दिसतोय रस्सा.
असते कशी ही काटेभेंडी?
कच्च्या काटेभेंडीचा फोटो आहे का?

ही काटेरी भेंडी म्हणजे नक्की कुठली भेंडी? कच्च्या भेंडीचा फोटो टाकलात तर बरं होइल. बाकी रस्सा मात्र दिसतोय एक नंबर Happy

आज्जी याला "भेंडीचं दबदबीत" असं म्हणते, असं कुठल्याही भाजीचं दबदबीत म्हणजे रस्सा!>> नाही रे रस्सा , दबदबीतापेक्षा जास्त व्हिस्कस असतो! Happy भाजी - दबदबीत अन रस्सा , मेस मधला रस्सा अस चढत्या क्रमाने पात्तळ!
मस्त लिहिलयस! :ड

ओके.
मी काटेभेंडी असे सर्च केले तर " ऐसे काटे भेंडी" असे रिझल्ट्स आलेले.

दिसतेय तरी छान .. पण मला रसभाजी नाही आवडत सो माझा अल्मोस्ट पास Sad
काटे भेंडी म्हणजे बहुतेक ती जाड, बुटकी, दिसायला जून, थोडी पिवळट पांढरी अशी असते ..
आणि तिच्या बिया पण जरा मोठया आणि टप्पोर्या असतात .. नॉर्मल भेंडी छान हिरवीगार बोटांपेक्षा थोडी लांबट असते आणि फक्त पाचधारी असते
हि काटेभेंडी बहुतेक नउधारी असते .. आणि बियानी गच्च भरलेली असते .. साल हि जाड असावी म्हणून सालं सोलून आतल्या बियांचा भाग वापरतात याची आमटी / रस्सा करताना
पण तरी कच्या भेंडीचा फोटो टाकच !

छाने रेसेपी. रस्सा प्रकरण जोमात असतं आमच्याकडे, करुन बघु. मागे दिनेशजींनी केनयातल्या नऊधारी भेंडीचा फोटो टाकला होता. आता ते सगळे विरल्याने ती लिंक देता येणार नाही.

नाही रे रस्सा , दबदबीतापेक्षा जास्त व्हिस्कस असतो>>>> हो ईन्ना बरोबर आहे तुझं। हे दबदबीत च खरं। पातळ नसतं रश्या सारखं। नाव बदलतो। कोल्हापुरात एक तांबडा पांढरा सोडला तर रश्यापेक्षा दबदबीत वर जास्त जीव आहे!

काटेभेंडीचा फोटो नाही आहे, पोटात गेली ती!

ऐसी काटे भेंडी >>> :हहपुवा:

भन्नाट रेसिपी आणि लिखाण! भेन्डीची रसभाजी असेल अशी कधी कल्पनाच नव्हती केलेली.
फोटु एकदम तोम्पासु!!! Happy

कुलु, मस्त.

बिडाच्या खोलगट तव्यात केलेल्या भेंडीची चव कशाला नाही. (आमची पद्धत नारळाविना).

माझं चित्र फ़ौल समजा रे आता खरं चित्र धागा मालकांकडून आल्यावर..माझ्या आठवणीत होती त्याला मिळतं जुळतं गुगल करून टाकलं होतं.

कुलु, काय मस्त रेसिपी!
आमच्याकडे (कोकणात) ह्या प्रकाराला 'भेंडा' अनेकवचन: 'भेंडे' म्हणतात. पाऊस सुरू झाला की अंगणात आळी खणून त्यात ह्या भेंड्याच्या दोन दोन बिया लावतात. शेणखत आणि पावसाच्या पाण्यावर पोसून अगदी दिवाळीपर्यंत भरपूर भेंडे मिळतात. शेवट शेवटचे जून झालेले भेंडे कडकडीत उन्हात वाळवून पुढच्या वर्षीच्या बियाण्यासाठी जपून ठेवतात. घरी चिंचगुळाची रस्सा भाजी होते, आता ह्या दबदबीतची आयडिया देते घरी Happy

मस्त , almost आमच्या कोकणातली भेंडी ची आमटी. आम्ही फक्त वाटपात थोडे धने add करतो. साध्या भेंडीचे तुकडे करून आधी थोडे परतायचे आणि वाटपाला फोडणी द्यायची .माशाच्या आमटीला श्रावण तला पर्याय म्हणून किंवा तोंडाला चव आणायला .

Pages