सांग मी काय करू ?

Submitted by Malkans on 9 September, 2018 - 22:04

प्रिय आईस ,
आई --- उतू गेलेल्या दुधावरची साय .... प्रेमाची सर्व नाती जपणारी ..... गेले कित्येक वर्षात तुझा स्पर्श तर नाहीच पण तुझी माझी साधी भेटही नाही. तुझ्या भेटीसाठी मी व्याकुळ ,मनातील तळमळ , या वेदना कुणाला सांगू , राहवलं नाही , निदान अश्रूंची शाई करून कागदावर लिहून मन मोकळं करावं
आई ---- तुझा स्पर्श , तुझ्या कुशीत शिरून घळा घळा रडावं असं खूप खूप वाटत ,पण तुझी वाट पाहूनच डोळे सुकले. बाळाला कुशीत घेऊन त्याच पोट भरून तृप्त होणारी तू-- कुठे गेलं तुझं मातृत्व,.जन्म देणारी एक जन्मदात्री इतकीच तुझी आता ओळख राहावी ? . कुत्री मांजरीची पिल्ले त्यांच्या आईच्या कुशीत शिरतांना आजही दिसतात दगडाच्या सुंदर मूर्ती घडविणारे मूर्तिकार हि दिसतात पण आपल्या पिल्लांना संस्काराचे बाळकडु पाजून त्यांचे उज्वल भवितव्य घडविणारी तू मात्र अलिप्त झालीस. आई चे दूध म्हणजे अमृत - पण हे अमृत पाजायलाच तू आता नाकारतेस. तू बदलली आहेस . हो तू नक्कीच बदलली आहेस , स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरणारी तू आता स्वतःच्याच भुकेचा विचार करतेस . दुष्ट प्रवृत्ती पासून परावृत्त करण्याची तुझी शिकवण -- याची तुला आता गरजच वाटत नाही - त्यामुळे आम्ही भरकटलो आहोत , प्रवाहात कसेही वाहत आहोत ! घर - केवळ जिच्या मुळे - प्रेम , वात्सल्य , त्याग , ओढ ,घरात इकत्र नांदत , त्याच घरात आता तू पाहुणी म्हणून राहतेस भाडोत्री असल्यासारखी ! केवळ रस्त्यावर आम्हाला सोडता येत नाही म्हणून पाळणा घरात भरती करतेस . नाईलाज असा हा शब्द कि समर्थन करावयास पुरेसा होतो . मानव आणि मानवतेला जन्म देणारी तू आता तुझाच जन्म हे जग नाकारताय ! या युगात तुझी माझी कधी भेट होईल हि आशाच मी सोडून दिली आहे . वेदना असह्य होतात पण डोळेही कायमचे मिटता येत नाहीत , आई विना घडलेला हा समाज त्याच्याकडून तरी कोणती अपेक्षा करावी ? नरपशू घडत आहेत , तूच सांग मी काय करू ?
तुझं लेकरू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users