"उजाले उनकी यादों के...."

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

काही गोष्टी, आठवणी, वस्तू अक्षरश: आपलं आयुष्य घडवतात. आणि अंशी आयुष्य बनूनच राहतात.
साधारण तेरा चौदा वर्षापुर्वीची आठवण असेल. मी आणि माझी मैत्रीण एक अतिशय छोटी सदनिका भाडे तत्वावर घेऊन रहात होतो. आमच्या कडे टिव्ही नव्हता. मोबाईल तर तेव्हा फक्त बोलणे यासाठीच वापरात होता किंवा फारतर त्यावर एफ एम रेडिओ चालत असे. विरंगुळ्याचे असे साधन म्हणजे फक्त एक म्युझिक सिस्टिम होती आणि काही मोजक्या सीडीज. त्या उप्पर सतत सुरू असे ते म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्र (१०१.१)

परिस्थिती यथातथाच होती. अतिशय गरजेच्या वस्तू.. मोजकं सामान, एकच छोटा कॉट.... फक्त नोकरी भक्कम होती आणि एक म्युझिक सिस्टिम हिच त्यातल्या त्यात मोठी चैनीची गोष्ट होती. मैत्रिणीला रेडिओ ऐकायची अजिबात सवय नव्हती. पण मला मात्र सतत आजूबाजूला काहितरी कानावर पडणारे लागायचेच. मग मैत्रिणीलाही हळूहळू सवय झाली.

रविवार म्हटलं की आमची आराम आणि आनंद उपभोगण्याची परिसीमा म्हणजे सकाळी साधारण ८ च्या आसपास उठणे...आणि आरामात एक टेमरूक (मोठा मग) भरून चहा घेणे.. त्याच्याबरोबर असतील तर बिस्किटं, ब्रेड किंवा काही नसेल तर नुसता चहा... रविवारी नाश्त्याला पुर्णपणे फाटा देऊन थेट जेवण (ब्रंच) ला प्राधान्य असे. त्यासाठी शनिवारीच 'उद्या काय करायचे?" या वर चर्चा होऊन मेनू पक्का होत असे.

स्वयंपाकापेक्षा मला स्वच्छ्तेची आवड असल्याने तो विभाग माझ्याकडे, आणि मैत्रिणीला स्वयंपाकाची आवड आणि भलता उरक असल्याने तो विभाग ती सांभाळत असे. चहा आणि पेपर रेंगाळत चाळून झाला की आम्ही कामाला लागायचो. आठवड्याची नेहमीची साफसफाईची कामं, कपडे इस्त्रीला टाकणे, कपड्यांचा रॅक आवरणे (तेव्हा आमच्याकडे तिजोरी सुद्धा नव्हती) घरी चार दोन कुंड्या होत्या त्यातली माती सारखी करणे... इ. कामे साधारण साडेआकरा, पावणेबारा पर्यंत आटोपत. मग रहात त्या फक्त अंघोळी. स्वयंपाकही जवळ जवळ उरकलेलाच असे. अंघोळी उरकेपर्यंत पोटात कावळे ओरडू लागायचे. मैत्रिण कायम पहिल्यांदा अन्घोळ करून जेवण गरम करून ताटं घेण्याच्या तयारीला लागे. बेत आटोपशीर असला तरीही फक्कड असे. बर्‍याचदा भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी, भाकरी, ठेचा, कांदा आणि सोबत खरपूस भाजलेले शेंगदाणे, आणि शेवटी गरम गरम तूप भात त्यावर अगदीच वाटलं तर थोडी भाजी. जेवण झाल्यावर मात्र दोघींचीही विकेट पडलेली असायची त्यामुळे संगनमताने पाठिमागचे आवरून आम्ही, 'आहा काय जेवलो मस्त गं' असं म्हणून झालेल्या पोटपूजेची भरपेट तारिफ करायचो. रविवारच्या मेनू मध्ये फार फरक होत नसत. भाज्या बदलून कधी पिठ्लं, तर कधी सांडग्याची भाजी इतकाच काय तो फरक असे.

अन्घोळ केल्या केल्या जेवल्याने अर्धवट ओले केस तसेच असत, त्यात जेवण झाल्याने अंगात थोड़ी थंडी शिरे. मग आम्ही पडदे वगैरे ओढून घेऊन. त्या एका छोट्याश्या कॉटवर अंगाची मुटकुळी करून, अंगावर पांघरूण घेऊन, रेडिओ अगदी बारिक आवाजात लावायचो तेव्हा नेमका "उजाले उनकी यादों के" हा कार्यक्रम बरोब्बर सुरू व्हायचा. आमचं रविवारचं वेळापत्रक इतकं भक्कम बसलं होतं की आम्ही कॉटवर आडवं पडून रेडिओ सुरू केला की हा कार्यक्रम सुरू व्हायचा. त्यात विविध संगितकारांनी/गीतकारांनी त्यांच्या कारकिर्दितल्या आठवणी धीम्या आणि धीरगंभीर आवाजात सांगायला सुरूवात केली की आम्हाला गुंगी यायला लागायची. कधी कार्यक्रम सुरू झाल्यावर काही मिनिटांतच मैत्रिण छान पेंगू लागे.. किंवा कधी मी... पण आम्ही दोघींनी तो कार्यक्रम क्वचितच जागं राहून संपुर्ण ऐकला असेल (निदान रविवारी तरी)

आज रविवार आणि मी नेमकी दुपारच्या जेवणात वांग्याची भाजी खाल्ली. रविवार दुपार आणि मला "उजाले उनकी..." ची आठवण नाही आली तरच नवल. आता सर्व बदलले आहे. करमणुकिची खूप साधनं आली, कामाचा प्राधान्यक्रम बदलला... आणि करमणुकिचा सुद्धा. वाटा वेगळ्या झाल्या, स्वत:ची घरं झाली....पण एकत्र रहात असताना "उजाले उनकी यादों के" नं आमचे अनेक रविवार आणि त्या जोडीने आयुष्य पण समृद्ध केलं.

#UnforgottableSundays
#PuneAkashawaniKendra
#LoveUjaleUnakiYadonKe

१२ ऑगस्ट २०१८
वेळ दुपारी १.५३ (1353 hrs.)

विषय: 
प्रकार: 

मस्तच लिहिलंय...यावरुन आठवल फार पूर्वी आमच्या घरी पण निजताना 'बेलाके फुल 'हा कार्यक्रम सर्वजण ऐकत.
सुरांच आभाळ असं अलगद ओढून निजणंही तेव्हा सुखाची परिसीमा होती.

वाह, कित्ती सुरेख लिहिलंस दक्षे.

रविवारी दुपारी एक मराठी नाटक लागायचे मुंबई आकाशवाणी वर आणि नंतर विविधभारतीवर फौजी भाईयोसाठी गाणी असायची आणि रात्री कॉफी हाऊस असायचं, हे आठवतं. चाळीतले बरेच जण आम्ही एकत्र ऐकायचो हे.

किती भारी लिहिलंयस दक्षे!
माझे bsc तळे दिवस आठवले सोलापूरला असताना। आम्ही बऱ्याचदा लेक्चर्स बंक करून रेडिओ ऐकत बसायचो हॉस्टेल वर, माझ्या रूम मेट बापूला रेडिओ ची प्रचंड आवड, पुढे स्मार्ट फोन आल्यावर पण त्याने आधी रेडिओ ऑप्शन शोधून काढला मग बाकी! सिंग इज किंग रिलीज झालेलं त्यावेळी, त्यातल्या 'तेरी ओर 'तेरी ओर या गाण्यावर आख्ख पाहिलं वर्ष काढलं रेडिओ वर ऐकत ऐकत!
थांक्यू त्या दिवसांची माझी आठवण ताजी केल्याबद्दल!

छान लिहिलंय,
अशा काही खास आठवणी आहेत, वाशी, पुणे, हैदराबाद इथे मित्रांसोबत १ BHK त रहात होतो तेव्हाच्या, त्यांची तीव्रतेने आठवण झाली.

निजताना 'बेलाके फुल 'हा कार्यक्रम सर्वजण ऐकत.
सुरांच आभाळ असं अलगद ओढून निजणंही तेव्हा सुखाची परिसीमा होती.
>>>>
अगदी अगदी,

दक्षिणे,
एकदम नॉस्टेल्जिक केलसं बघ तु!!
असा एक मनाशी ठसलेला कार्यक्रम म्हणजे जयमाला. नागपुर ला रहात असताना बरोब्बर ७.०० वाजलेले असताना मी कुठुन तरि खेळुन किंवा उंडारुन आलेलो असायचो, आई संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत असायची, बाबा देवापाशी दिवा लावुन उदबत्ती ओवाळत असायचे आणि आमच्या प्रेस मध्ये काम करणारा धर्मेन्द्र (आमचा प्रिटंर) घरी निघालेला असायचा आणि बरोब्बर तेव्हाच जयमाला चे ते बिगुल वाजायचं.. आता आम्हि प्रेस चालवत नाही, आई-बाबांचे रुटिन हि वेगळवेगळं, ते आमच्या बरोबर इथे पुण्यात च असतात, पण अजुन हि कॅब मधुन घरी येताना जयमाला चे म्युझिक वाजलं कि वरिल प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसे च्या तसे उभे राहतात.

- प्रसन्न

रच्याकने, रेडियो ऐकत रहाणे हा आमचा खानदानी षौक आहे बहुदा.... पपा (बाबांचे बाबा), बाबा, काका, मी सगळे रेडियो प्रेमी त्यात ही विविध भारती च !! Wink Happy

दक्षिणा, छान लिहलयं ! Happy

रेडिओ सारखी खरे तर करमणूक नाही! रात्री अगदी बेला के फूल संपे पर्यन्त रेडिओ ऐकलाय!

छान लिहले आहे.
आमच्या घरी टीव्ही न्हवता त्यामुळे रेडियो हेच मनोरंजनाचे साधन. रात्री "आपली आवड" संपल की रेडियो बंद मग तो सकाळी ६.१५ वाजता परत चालु. फक्त ९-३० ते ११, दुपारी ३-५.३० आणि ८ ते १० बंद असायचा. फक्त मुंबई आकाशवाणी आणि विविध भारती ह्या मध्ये चॅनल बदलत होते.

एक वर्ष हॉस्टेल वर होतो तेव्हा विविध भारतीवर बेला के फुल संपले की ऑल इडीया रेडियोवर अर्धा तास हिंदी गाणी लागायची ती झाल्यावर रेडियो बंद.

"बेला के फूल" ऐकताना बर्याच वेळा झोप लागायची आणि रेडिओ तसाच चालू रहायचा...
मग पहाटे साडेपाच वाजता आकाशवाणी परत सुरू होउन रेडिओ वाजायचा आणि जाग यायची....

>>"बेला के फूल" ऐकताना बर्याच वेळा झोप लागायची आणि रेडिओ तसाच चालू रहायचा...
>>मग पहाटे साडेपाच वाजता आकाशवाणी परत सुरू होउन रेडिओ वाजायचा आणि जाग यायची....
सेम सेम Lol

दक्षे, सुंदर आठवण.
पूर्वी खरचं करमणूकीची बाकी काही साधन नसल्यामुळे, रेडिओ ऐकला जायचाच. "नभोनाट्य" हा आवचा सर्वांचा आवडता कार्यक्रम होता. कधी कधी कथाकथनही असायचं. "बेला के फुल" पण ऐकायचो. खूप छान छान कार्यक्रम होते.
संजय गांधी गेले तेव्हा, "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा", हे गाण लावलं होतं ते अजून आठवत.

आताच हा धागा वाचला.

"उजाले उनकी यादों के" - मी सुद्धा ऐकलाय , पुण्यामध्ये च असताना.
ते छोटस title ज्या पद्धतिने गायल आहे आणि background music खरच छान.
कार्यक्रम तर छानच होता एका जुन्या कलाकारा बद्दल माहिति आणि hindi जुनी गाणी असायचि .

फार छान आठवण.