आठवणींचा ठेवा अन विचारांची शिदोरी

Submitted by स्मिता द on 17 August, 2018 - 07:20

आठवणींचा ठेवा अन विचारांची शिदोरी

आठवणींचा ठेवा अन विचारांची शिदोरी

फ्रेंडशिप डे च्या दिवशीच हा मोठा आघात होता माझ्या वर सकाळी, सकाळी फोन आला ; आजी अत्यवस्थ आहे. आजी म्हणजे तर माझी अगदी जिवलग मैत्रीण.. किती आणि काय म्हणू तिच्या बद्दल ती माझी आजी होती, माझी गुरू होती, तीच वागणं ,बोलणं मी लहानपणापासून कॉपी करत आले . कारण ती होतीच अजब रसायन. आजी म्हटले की गेल्या गेल्या डोक्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकणारी अन् मग एकदम जवळ घेऊन पापे घेणारी. आणि मग लगेच सुरू हे खा ते पी. आमचे एक तर लक्ष्य सगळे मावसं , मामे भावंडांना भेटून, गप्पा मारणे. खेळणे यात तर हिचे आपले सतत पोर आली मग काय खायला करू काय नको. आणि सतत घरात या आणि खाऊन घ्या चा जप. लहानपणी तिच्या या सतत खा म्हणण्याचा, अन् जेवायला घालण्याचा राग यायचा. पण आज मोठे झाल्यावर कळते किती होते त्यात तिचे प्रेम. माझ्या दुधावरच्या सायी आल्या त्यांचे किती लाड करू आणि किती नको.
आजी कडे जायचे म्हणजे मात्र चंगळच असायची. एक तर ती सुगरण..नाही मी तर तिला अन्नपूर्णाच म्हणेल . मिडास राजाची गोष्ट ऐकलेली लहान पणी त्याने हात लावला की सोने व्हायचे तशी आमची आजी जे काही करेल तिच्या हाताने ते खूपच रुचकर व्हायचे. अजून ही आजी सारखे झालेच नाही हा विचार येतोच. चव असते म्हणतात हाताची तसा प्रकार . तिचा हातगुणच होता तो. किंवा तिने ते करताना त्याबरोबर ओतलेली तिची माया.. अगदी शिळ्या राहिलेल्या पोळी, भाकरी, भात भाजी चे तिने लावलेले धपाटे असू दे. किंवा तिने केलेले भरले वांगे. ती खात नव्हती तरी तिने केले मटण तर लाजबाबच असायचे. पुरणपोळी खावी तर तिच्याच हातची. आणि ते मांडे.. ओ हो त्याची तर खासियतीच वेगळी. मला आठवते आम्ही लहान होतो. ताईचे लग्न होते. आमच्या कॉलनीतल्या ब.-याच लोकांना तिचे मांडे कसे असतात , मांडे कसे लागतात या विषयी आकर्षणपण होते. तिने मग शेजारच्या आजी जवळ, काकू जवळ जाहीर केले मी माझ्या नातीचे गडंणेर इथेच करते, थांबा. सगळ्या कॉलनीला मांड्यांचे जेवण घालते. आणि तिने ते खरेच केले . मामाला खापर गावावरून आणायला लावले. त्यात मग मांड्यासाठी काय म्हणायची ती वैच गाळ करायची ती केली तिने. मग जात्यावर ते गहू दळले आणि मग इतक्या लोकांच्या जेवणाचे भले थोरले पुरण घातले, पाट्यांवर वाटले. आणि मग तिचे त्या जादुई मांडे करणे सुरू झाले असे कोपरा पर्यंत हात मस्त हालवतं ती ते मोठे करायची आणि मग एकदम त्या खापरावर अंथरायची. खूपच लयदार काम होते ते. अशी ही माझी आजी.
आजोबा होते तोवर भले थोरले कुंकू लावणारी. अगदी तिचे ते कुंकू लावणे हे ही मी बघत बसायचे ते मेण लागेल मग अगदी गिरवून गिरवून त्यावर कुंकू लावणे मग ते असे बसवणे. फारच विलोभनीय. ती काष्ट्याचे लुगडे नेसायची. तिचे ते लुगडे नेसताना मी आपली पाहतं बसायची तो काष्टा काढणे. त्याच्या निऱ्या घालणे मग ते असे मागे खोचणे. त्याचे काठ बरोबर वर यायचे. तो हातभर पदर काढून मग तो असा डोक्यावरून घेणे. कशी भारदस्त दिसायची मग आजी. तिला दागिन्यांची ही मोठा आवड.. हे सगळे आजी म्हटले की लहानपणा पासून डोळ्यापुढे येते. तिची ती उंची पुरी मूर्ती. डोक्यावरून पदर घेतलेले. अन् सतत सारखे काम करणारी. कामाला तर तिच्या भाषेतल्यासारखे ती वाघ होती. सतत कामात असायची. आई सांगते खूप काष्ट केले माझ्या बाईने. हो तिला सगळे 'बाई'चं म्हणायचे. ती तिच्या सगळ्या भावंडात मोठी होती. सासरी ,माहेरी मोठी होर्ती. पण हे मोठेपण तिने आजन्म सांभाळले. सगळ्यांना कायम आपल्या छताखाली धरले. कुणाचा आधार झाली. तर कुणाचा खांदा. ती जगमित्र होती. वाटच्या वाटसरूला, अगदी दारात येणा-या फेरीवाल्याला देखील ती खा काही तरी म्हणवून भाकर तुकडा द्यायची, पाणी पाजायची..एक म्हातारा फिरस्ती विक्रेता तर अगदी न चुकता यायचा तिच्या दाराशी..आणि दर वेळेस म्हणायचा..शंभर वर्ष जगशील बघ बाई...त्याचे आशीर्वादाचे बोल तिच्यासाठी खरे ठरले. तिचे नक्की वय माहीत नाही पण ती असेल ९९ च्या आसपास असे तिचे भाऊ सांगतात. 'शतायुषी हो' हा मोठ्यांचा आशीर्वाद तिच्या कर्तृत्वाने उजळून निघाला.
आजी आमच्या साठी काय नव्हती.. ती चुकले तर रागावली पण आणि आईच्या रागापासून तिने वाचवले पण. ती एक गुरुकुल होती .आम्हाला कायम सांगायची, 'कुठलंही काम करायला लाजू नये. लाजावं फक्त चोरी आणि शिंदळकीला . या शब्दाचा अर्थ करण्याचे ते वय नव्हते. पण शब्द मात्र घट्ट स्मरणात बसले. आज कळते अरे, खरंच हा मोठा जीवनपाठ होता. आज घडणा-या गुन्ह्यापाठीमागे निम्मे गुन्हे तरी चोरी अन् अनैतिक कृत्ये असतात.
मी कामावरून कधी आदळआपट केली तर आजी म्हणायची, काम करावे बाई, माणसाच काम प्यारं असत, माणूस नसतो प्यारा. तीच हे तत्त्वज्ञान अजब वाटायचे. काम काय आवडते, माणूस आवडायला पाहिजे न. अर्थात हे शब्द उमगण्याचे तेव्हा वय नव्हते आज कळते खरंच कामाने माणूस मोठा होतो ,माणसापेक्षा त्यामाणसाचे काम हवेहवेसे असते. तिच्या बोली भाषेत सांगितलेले हे तत्त्वज्ञान मात्र माझ्यावर कायमचे कोरले गेले. ती गेली तरी तिची ही शिकवण हे शब्द अजरामर आहेत. आई म्हणाले रडताना, 'माझ्या बाईला सुख कधी मिळाले नाही' खरे आहे आई ते पण हा विचार कर ती माझी मुले आणि माझा नवरा यात रमणारी नव्हतीच कधी. एखाद्या वटवृक्षाप्रमाणे तिने तिच्या परिघातल्या प्रत्येकाला आपलं मानलं होत. आणि त्याचं करण्यातच ती कायम समाधान पावली.' तिचा परिघही मोठा होता. फक्त सासर अन् माहेर इतकाच परिघ नव्हता तो. त्यात खूप लोक होते. तिची गंमत वाटते तिने माहेर आणि सासर असा आपपर भाव ही केला नाही. तिच्या नणंदेचे यजमान वारले तेव्हा नणंदेच्या दोन्ही मुलांची लग्ने तिने आपल्या दारात मांडव घालून लावून दिली होती.
कुणासाठी काही करायचे म्हणजे मग तिचे हात जणू शिवशिवायचे . प्रत्येकासाठी कायम आपण काही करावे ही तिची धडपड असायची. माझ्या आजोबांचे एक कौतुक वाटते , त्यांनी तिला कधी अडवले नाही. हे करू नको ते करू नको असे. त्यांचे महिन्याच्या पगाराचे ठराविक पैसे ते सुपूर्त करत तिच्या कडे यात बसव तुला काय करायचे ते. हिचे तर करण्याचे अंगण मोठे असायचे मग त्यासाठी काय काय उद्योग हिने केले नाही, ती कुशल व्यावसायिक ही होती. अगदी संगमनेरहून तांदूळ आणवून त्याचा व्यापार, गायी म्हशी पाळून त्यांच्या दुधविक्रीचा व्यापार तिने केलाच. तिच्या कर्तृत्वात स्त्री आणि पुरुष असा आपपर भाव कुठे दिसलाच नाही. तिच्यावर असलेल्या अन्नपूर्णेचा आशीर्वादाने, सुग्रणपणे तिने 'मेस' चालून कित्येक जणांना ममतेने जेवू खाऊ घातले. हा स्त्रीचा अंगभूत गुणावरच व्यवसाय तिने केला नाही तर संगमनेरला असताना वडिलार्ज़िक चुन्याच्या भट्ट्याही ती ने चालवल्या. भट्टी साठी लागणारी चुनखडी झाडून , गाड्या आणणे, आणि मग त्या चुनखडीच्या भट्ट्या रचणे, भट्ट्या लावणे, तो चुना तयार करणे ही पुरुषाची असलेली कामे देखील तिने हिकमतीने केली. कष्टाला ती कधी घाबरली नाहीच. कामाची कसली लाज हे तीच्या ब्रीद तिने कायम खरे करून आम्हाला दाखविले. अगदी तिच्या सासरकडच्यांना ही कौतुक वाटेल असेच तिचे काम होते. एकट्या बाईने स्वतः:च्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर मोठ्या हिकमतीने आठ एकर जमीन घेऊन दाखवली. हे काही ये-या गबाळ्याचे काम नव्हे. पण तिने ते केले. पुरुषांनी देखील आश्चर्याने आणि अचंब्याने तोंडात बोट घातले. हा तिच्या कर्तृत्वाचा आलेख पाहिला की थक्क व्हायला होते. शितू त्या दिवशी म्हणाला,she is legend हे अगदी खरे आहे. legend याशिवाय तिच्यासाठी दुसरा शब्द योग्य नाही आणि सुचतही नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही माझ्या आज्जीचे व्यक्तीचित्र का रंगवले आहे? Happy
विशेष म्हणजे माझ्या आज्जीलाही आई 'बाई' या नावानेच हाक मारी. त्यामुळे आम्हीही बाईआज्जीच म्हणत असू.
खुप छान लिहिलं आहे.
मला वाटते त्याकाळातल्या सगळ्या आज्ज्या थोड्याफार फरकाने अशाच असायच्या.
पुलेशु!

छान लिहीलय.
खरंच कामाने माणूस मोठा होतो >> माझी आजी हेच म्हणायची. आता आईही काम कर, कामाने माणूस मरत नाही हेच सांगत असते.

> ती माझी मुले आणि माझा नवरा यात रमणारी नव्हतीच कधी. एखाद्या वटवृक्षाप्रमाणे तिने तिच्या परिघातल्या प्रत्येकाला आपलं मानलं होत. आणि त्याचं करण्यातच ती कायम समाधान पावली.' तिचा परिघही मोठा होता. फक्त सासर अन् माहेर इतकाच परिघ नव्हता तो. त्यात खूप लोक होते. >

∆ या आणि

> ती कुशल व्यावसायिक ही होती. अगदी संगमनेरहून तांदूळ आणवून त्याचा व्यापार, गायी म्हशी पाळून त्यांच्या दुधविक्रीचा व्यापार तिने केलाच. तिच्या कर्तृत्वात स्त्री आणि पुरुष असा आपपर भाव कुठे दिसलाच नाही. तिच्यावर असलेल्या अन्नपूर्णेचा आशीर्वादाने, सुग्रणपणे तिने 'मेस' चालून कित्येक जणांना ममतेने जेवू खाऊ घातले. हा स्त्रीचा अंगभूत गुणावरच व्यवसाय तिने केला नाही तर संगमनेरला असताना वडिलार्ज़िक चुन्याच्या भट्ट्याही ती ने चालवल्या. भट्टी साठी लागणारी चुनखडी झाडून , गाड्या आणणे, आणि मग त्या चुनखडीच्या भट्ट्या रचणे, भट्ट्या लावणे, तो चुना तयार करणे ही पुरुषाची असलेली कामे देखील तिने हिकमतीने केली. कष्टाला ती कधी घाबरली नाहीच. कामाची कसली लाज हे तीच्या ब्रीद तिने कायम खरे करून आम्हाला दाखविले. अगदी तिच्या सासरकडच्यांना ही कौतुक वाटेल असेच तिचे काम होते. एकट्या बाईने स्वतः:च्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर मोठ्या हिकमतीने आठ एकर जमीन घेऊन दाखवली. हे काही ये-या गबाळ्याचे काम नव्हे. पण तिने ते केले. पुरुषांनी देखील आश्चर्याने आणि अचंब्याने तोंडात बोट घातले. हा तिच्या कर्तृत्वाचा आलेख पाहिला की थक्क व्हायला होते. >
∆ या भागाबद्दल अधिक लिहायला हवे होते.