“पर्थी”ची वाट!

Submitted by kulu on 7 August, 2018 - 05:20

ईमेल वाचल्या वाचल्या आधी जाऊन मम्मीच्या पाया पडलो. किती दिवस झाले वाट बघत होतो या न्यूज ची. मिळेल कि नाही हि धास्ती होतीच. म्हणजे किती तरी जणांना मिळत नाही. न मिळायला तसं काही कारण नव्हतं पण तरीही धाकधूक असतेच! पण शेवटी मिळालीच गुड न्यूज! खास काही नाही म्हणजे, ऑस्ट्रेलियाला जायचा व्हिसा मिळाला! ते झालं असं कि मार्को ने PhD करायला बोलवलं होतं म्हणून सगळे हे उपद्व्याप. मी छान मोकळा बसलेलं बघवलं नाही त्याला! व्हिसा मिळाल्यावर घरच्यांनी आता तयारी सुरु केली.... म्हणजे खरंतर कायच नाही केलं, उगीच दर तासाला फक्त जायची वेळ जवळ आली असं म्हणायचं आणि हाश हुश करत बसायचं असा उपक्रम आरंभला! शेजारीपाजारी पण उगाच कायतरी मीठ द्या, साखर द्या, तेल द्या, कपडे द्या, म्हशी द्या असं काय वाट्टेल ते मागायचं निमित्त करून येऊन मला सारखं जायची वेळ जवळ आली हे सांगू लागले आणि शेलार वहिनींच्या नणंदेची नटवी पोरगी यावर्षी पण बारावीत कशी फेल झाली आणि त्याला बुटका मध्या कसा कारणीभूत आहे हे किंवा यापेक्षा रोचक असं काहीतरी मम्मीला सांगत बसू लागले! मी मात्र माझ्या ध्येयाशी एकरूप राहून रोज मला जमेल तसं, या वयात जेवढे सोसेल तेवढी तयारी करत होतो.

असं करत करत जायची तारीख आलीच! १३ डिसेंबर ला रात्री विमान होतं मुंबईहून! १२ ला सकाळी मुंबईला आलो, कोल्हापुरहून निघताना माझ्या तिथल्या एकाही नातेवाईकाने डोळ्यातून पाण्याचा ठीपूस देखील काढला नाही. असतं एकेकाचं नशीब! सगळ्यांनाच काही प्रेमळ कुटुंब वगैरे मिळत नाही! तसाच जड अंत:करणाने मी मुंबईला माझ्या सोलापूरच्या मावशीकडे गेलो. म्हणजे ती आता मुंबईत राहते, पण त्याआधी बरीच वर्षे सोलापूरला असल्याने तिला सोलापूरची मावशी असंच म्हणतो. उद्या ती मंगळावर रहायला गेली तरी ती सोलापुरचीच मावशी (अलीकडेच तिथे मंगळावर बोअरला पाणी लागल्याने कोल्हापूरच्या पाचगाव परिसरातील नागरिकांचे तिथे स्थलांतर करण्यात येणार आहे असे ऐकिवात आहे). ती माझी मावशी निरोप देताना हमखास रडते. अगदी दुध आणायला घरातून बाहेर पडलो तरी दूध घेऊन १० मिनिटात घरी येईपर्यंत रडत असते इतकी मायाळू! आता मी ऑस्ट्रेलियाला चाललो म्हटल्यावर तर ती केवढी रडेल अस वाटलेलं! पण तिनेही “यशस्वी हो” वगैरे असला कायतरी आळणी आशीर्वाद देऊन कोरड्या डोळ्याने मला घरातून बाहेर काढले! “हमसे मत पूछो कैसे, मंदिर टूटा सपनों का, लोगों की बात नहीं है, ये किस्सा है अपनों का” अशा अवस्थेत मी विमानात चढलो! त्यात राजेश खन्नाला शर्मिला तरी होती इथे मी एकटाच! हवाईसुंदरी जवळ दु:ख मोकळ करावे अस वाटलेलं पण विमान फुल भरल्याने तिला माझ्यासाठी तेवढा वेळ मिळाला नाही! विमानात अजून एका गोष्टीचं टेन्शन होत ते म्हणजे सतारीचं! सतार मी पूर्ण गुंडाळून तिच्या केस मध्ये ठेवून चेक इन केली होती. पर्थ ला येईपर्यंत तिचा भोपळा वेगळा होऊ नये अशी अपेक्षा होती. त्यामुळे सगळा प्रवास तिची चिंता आणि माझ्या घरचे असे कसे निर्दयी हा विचार करण्यात गेला!

१४ ला सकाळी मी आणि माझी सतार पर्थ ला आलो! पर्थ चे विमानतळ अतिशय लहान आणि घरगुती आहे! घरगुती म्हणजे आल्या आल्या पाटावर बसवून वरण-भात देतात अशा अर्थाने नव्हे, पण कारभार बराच कॅज्युअल आहे! माझी सतार लाकडी असूनही त्यावर इम्मिग्रेशन वाल्यांनी काहीही तक्रार केली नाही त्यामुळे तो एक आनंदच होता! पर्थ बद्दल, "इथे क्रिकेट च्या म्याच्येस असतात कधीकधी" एवढी भरगच्च माहिती घेऊन आलो होतो, त्यामुळे काहीही अपेक्षाच नव्हत्या! मस्त ऊन पडलं होतं. ज्याच्यामुळे मला एवढा उपद्व्याप करावा लागला तो मार्को मला न्यायला आला होता. मला त्रास दिल्याचं गिल्ट कुठेही त्याच्या तोंडावर दिसत नव्हतं! उलट आनंदच झाल्यासारखा वाटत होतं! घोर कलियुग!! मार्कोच्या बमव मधून मी त्याच्या घरी निघालो! बमव हि एक छान गाडी आहे हे त्यादिवशी कळलं, बमव ला इंग्लिश मध्ये BMW असंही म्हणतात! मार्को च घर कालामुंडा या टेकडी वर पिंडारी रोड वर होत! पिंडारी हा संस्कृत शब्द आहे आणि पिंडाचा अरी म्हणजे शरीराचा शत्रू या अर्थाने हे रोड च नाव खूप जुन्या भारतीयांनी इथे ठेवलं हे मी त्याला पटवून सांगत भारताचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न होतो, पण त्याला काही ते फारसं पटलेलं दिसलं नाही! असो आपण ज्ञान वाटत राहावे, ज्याने घेतले नाही त्याचा तोटा अशी मनाची समजूत घालून मी आजूबाजूला बघू लागलो!

कालामुन्डा चा aboriginal भाषेत अर्थ जंगलातलं घर असा होतो. पर्थ च्या पूर्वेला एक वीस बावीस किलोमीटर वर ही टेकडी आहे. पर्थ ची चंबुखडी (किंवा पर्वती म्हणू शकतो, पण कालामुन्डा ला झोपड्या नसल्यामुळे ती उपमा तोकडी पडते)! इथून सगळं पर्थ खाली पसरलेलं दिसतं. शहर सुंदर दिसत होतं पण मी नुकताच आलो असल्या कारणाने यापेक्षा जास्त निरीक्षण मी केलं नाही. घरी गेल्यावर कोर्नेलीयाने स्वागत केले. कोर्नेलीया म्हणजे मार्कोची बायडी! मस्त आंघोळ केली तोवर कोर्नेलीयाने गरम waffles दिले मेपल सिरप टाकून! देव तिचं भलं करो! आम्ही ब्रेकफास्ट करत मार्कोच्या घराच्या बाल्कनीत उन्हात बसलो! मार्को चा बंगला भलताच मोठा होता. दुमजली आणि टुमदार. परसदारी स्विमिंग पूल आणि द्राक्षांचे वेल आणि समोरच्या अंगणात निलगिरीची उंच उंच झाडे! मार्को आणि कोर्नेलीया दोघ पण भलतेच आनंदित दिसत होते माझ्या येण्याने. १८७ मिलियन वर्षे जूने डायनासोरचं हाडूक मार्को ने कुठूनसं आणलं होतं आणि त्यावर सध्या काम चालू होतं. मार्को त्याविषयी सांगत होता. प्रोजेक्ट मधल्या अवघड गोष्टी ऐकून मी घाबरलो आणि ज्या विमानाने आलो ते विमान फलाटावरून सुटायच्या आत पकडून परत कोल्हापूरला जावे असा विचार आला, पण घरच्यांनी न रडून दाखवून दिलं होतं कि “ये गलियाँ ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा” ते आठवलं आणि गप्प बसून राहिलो! मी अरेबियन सी, ब्लॅक सी आणि रेड सी च्या सेडीमेंट्स वर काम करायचं हे सांगितलं! मज्जा येणार होती आवडत्या विषयावर काम करायला!

आता आज १४ डिसेम्बर हा विद्यापीठाचा रजिस्ट्रेशन साठीचा शेवटचा दिवस होता कारण १५ डिसेंबर पासून नाताळ ची सुट्टी सुरु होणार होती, म्हणून आधी ते केलं, विनासायास काम झालं! मग मी आणि मार्को विद्यापीठाच्याच वसतीगृहात रूम बुक केली होती माझ्यासाठी, तिथे गेलो. $१८० देऊन एक अंधारी, दळभद्री खोली मला विद्यापीठाने दिली हे लक्ष्यात आलं म्हणून तडक जाऊन मार्को ने रेक्टर ला दुसरी रूम दाखवायला सांगितलं, तेव्हा लक्ष्यात आलं कि सगळ्या खोल्या तसल्याच आहेत. ज्याने हे हॉस्टेल बांधले त्यानेच कोल्हापुरात संभाजी नगर परिसरातील घरे बांधली असणार हि माझी खात्री पटली! मार्को ला राग यायला लागला त्या डिप्रेसिंग रूम्स बघून.... मी त्याला म्हटल तू जा, I can manage in this room. तो म्हणत होता कि त्याच्याच घरी ये म्हणून, जोवर राहायला चांगली रूम मिळत नाही तोवर! मोठ्या मुश्किलीने त्याला समजाऊन सांगून घरी पाठवलं. मला ती रूम आवडलीच नव्हती, पण म्हटलं राहू सहा महिने, मग बघू! थकलो होतो, एक आम्लेट खाऊन झोपी गेलो. सकाळी रूम च्या दारावर जोरात थापा पडल्या, दार उघडलं तर होस्टेल चा रेक्टर मला म्हटला कि कोण तरी भेटायला आलं आहे. बाहेर येऊन बघतो तर हॉलमध्ये मार्को आणि कोर्नेलीया उभे! त्या दोघांनी परस्पर माझे होस्टेल च वास्तव्य रद्द केल, डिपोजिट विद्यापीठाकडून परत घेऊन आले आणि आता मला न्यायला आले होते! आम्ही तिघे मिळून माझ्यासाठी योग्य स्थळ (राहण्यासाठी) शोधणार आणि तोवर मी त्यांच्या घरी च मुक्काम ठोकायचा अस ठरले! पटकन मी खोलीतले माझे सामान आवरले आणि त्यांच्या बमव मधून जंगलातल्या घरी निघालो! त्याक्षणी मला समजले कि PhD तर चांगली होणार आहेच पण पर्थ मधल वास्तव्य देखील सुखाचं ठरणार आहे हे नक्की!

“पर्थी”ची वाट! भाग २ - मुरो कट्टा https://www.maayboli.com/node/67131

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

मस्तच Happy
पुढे काय झाल मग? तेही येउ द्या Happy
पु भा प्र

किती सुंदर लिहिलंय... छान ओघ आहे तुझ्या लिखाणाला... संपू नये असं वाटत असताना संपलंय.. अजून लिही... आम्हाला आवडेल वाचायला तुझ्या आणि मार्कोबद्दल... Happy

मस्त सुरुवात.
तुम्ही पूर्वी स्वित्झर्लंडला होतात ना? तिकडे जाताना साश्रू नयनांनी निरोप दिला असेल की. सारखं तरी किती रडायचं मेलं असा विचार करुन नसतील रडले. Wink

मस्त खुसखुशीत लिहिलंयस रे.
>>कोर्नेलीया म्हणजे मार्कोची बायडी! मस्त
यातलं ते उद्गारवाचक चिन्ह नीट वाचलं म्हणून बरं Proud

अवांतर- केलं, होतं वगैरे शेवटच्या अक्षरांवरचे अनुस्वार देता आले तर पाहा.

वाह कुलुभाय खूप दिवसांनी दर्शन.

खुसखुशीत लेख, लय भारी Lol

ह्या लेखाचा शेवट गोड, लकी यु, ग्रेट मार्को.

पुढचं पण लवकर लिही.

सर्वांचे खुप खुप आभार! Happy पुढचा भाग नक्की लिहीणार आहे. शेअर करण्यासारखं भरपुर आहे!

>>कोर्नेलीया म्हणजे मार्कोची बायडी! मस्त
यातलं ते उद्गारवाचक चिन्ह नीट वाचलं म्हणून बरं >>>>>>>>> Biggrin

अवांतर- केलं, होतं वगैरे शेवटच्या अक्षरांवरचे अनुस्वार देता आले तर पाहा>>>>> केलं बघ!

Pages