STP - सिअ‍ॅटल टू पोर्टलँड सायकल राईड

Submitted by Adm on 6 August, 2018 - 01:53

शेकडो/हजारो मैल अंतराच्या अनेक सायकलास्वार्‍या करणारे मायबोलीकर असताना आपल्या एकदाच केलेल्या दोनशे मैलांबद्दल काय लिहायचं असं आधी वाटलं. पण शेवटी ममव असल्याने भविष्यातल्या स्मरणरंजनाची सोय करण्यासाठी आत्ता केलेलं हे 'डॉक्युमेंटेशन'.

-----

सिअ‍ॅटलला यायचं ठरल्यावर 'सिअ‍ॅटल टू पोर्टलँड' ही साधारण २००मैलांची सायकल राईड एकदातरी करायची असं मनाशी ठरवलेलं होतं. ह्या सायकल राईडबद्दल आधी वाचलं होतंच, शिवाय मायबोलीकर rar हीच्या कडून ऐकलंही होतं. मध्यंतरी पुण्यात असताना मी सायकल चालवायचो पण त्यात मी चालवललें जास्तीत जास्त अंतर होतं ३९ किलोमिटर! पुढे अटलांटाला सायकल घेतली पण त्याने माझे इतके पाय दुखायचे की सायकलवाल्याने ती सायकल माझ्या उंचीला योग्य नाही असं सांगून परत करायचा (योग्य) सल्ला दिला. त्यामुळे इथे आल्यावर STP साठी नाव नोंदवलं पण सुरूवात होती ती सायकल खरेदीपासून! STP दोन प्रकारे करता येते. एकतर तुम्ही एका दिवसात २०६ मैल थेट पोर्टलँडपर्यंत जाऊ शकता किंवा पहिल्या दिवशी १०० ते १२० मैल राईड करून एक दिवस मुक्काम करायचा आणि दुसर्‍या दिवशी उरलेलं अंतर जायचं. मी अर्थातच दुसरा पर्याय निवडला. STP राईडमध्ये साधारण १०,००० लोकं भाग घेतात. त्यातले २०% एका दिवसात करतात आणि उरलेले दोन दिवसांत. १०० मैलांचा मिडपॉईंटपासून कुठेही तुम्ही मुक्काम करू शकता. मुक्कामी सामान पोहोचवायची व्यवस्था त्यांच्यातर्फे केली जाते. ही राईड 'सपोर्टेड' असते म्हणजे मधे फूडस्टॉप तसच मेकॅनिकल सपोर्ट मिळू शकतो.

आम्ही गेल्यावर्षी 'जो जिता वही सिकंदर' सिनेमा पुन्हा एकदा पाहिला. रियानेही पाहीला. त्यामुळे मी सायकल राईडला रजिस्टर केल्याचं सांगितल्यावर ती म्हणे बाबा तू सगळ्यांशी त्या रेडसारखं (म्हणजे रेड टीशर्ट घातलेल्या आमिर खान सारखं) फाईट कर आणि फर्स्ट ये!! म्हटलं वा वा काय कॉन्फिडन्स बापावर !

दरम्यान सायकल घेतली आणि प्रॅक्टीस सुरू केली. सिअ‍ॅटलला सायकलींगच्या ट्रेलचं खूप मोठं जाळं आहे. अगदी शहराच्या कुठल्याही कोपर्‍यात जाता येण्यासाठी वेगळे सायकल मार्ग उपलब्ध आहेत. जिथे वेगळे मार्ग नाहीत तिथे मुख्य रस्त्यांवरच सायकल लेन आहेत. त्यामुळे हिवाळा संपून वसंत ऋतू सुरू झाला आणि जरा ऊन पडलं की सायकलवाल्यांच्या झुंडी घराबाहेर पडायला लागतात. केदार आणि रारला वेळोवेळी प्रॅक्टीसचे अपडेट देत होतोच. केदार म्हणाला एक ६५ मैलांची राईड कर आणि दुसर्‍या दिवशी उठून पुन्हा ४०-५० मैल कर म्हणजे अगदी राईडसारखी प्रॅक्टीस होईल. रार म्हणाली निदान एकतरि ६०-६५ मैलांची राईड कर आणि सपाट मार्गावरून जायचा सराव कर कारण सपाट मार्ग फार पकतात. रारने दिलेला सिलॅबस सोपा होता. त्यामुळे मी तो निवडला आणि केदारचा ऑप्शनला टाकला! आठवड्यात दोन ते तीन दिवस ऑफिसमधून आल्यावर १५-२० मैल आणि शनिवार रविवारी ४० मैल असा सराव सुरू केला. दरम्यान सायकलींग शॉर्ट्स, जर्सी, हवा भरायचा पंप, लॉक, बाटल्या असलं काहीबाही मागवत होतो त्यावरून घरून टोमणे खात होतो.

बघता बघता राईड आठवड्यावर येऊन ठेपली आणि मला वेगळच टेन्शन आलं. मी कधी आयुष्यात सायकलच पंक्चर स्वतः काढलेलं नाही. त्यामुळे इतकं मोठं अंतर चालवताना फ्लॅट टायर झालं तर काय? तिथे मेकॅनिकल सपोर्ट द्यायला लोकं असतात पण तरी! मग पुन्हा केदारला फोन केला त्याने टीप्स दिल्या. शिवाय मी सायकलच्या दुकानात जाऊन टायर काढायचा क्रॅश कोर्स घेऊन आलो. त्या आठवड्यात ऑफिसमध्येही खूप काम होतं. शुक्रवारी दुपारी ४:३० ते ५:००ची मिटींग मात्र मी डिक्लाईन मारली आणि घरी येऊन सामान भरायला लागलो. मित्रांचे बेस्ट ऑफ लक द्यायला फोन वगैरे यायला लागल्यावर मात्र जरा २०६ मैलांचं टेन्शन यायला लागलं. दरम्यान रारने व्हॉअ‍ॅ ग्रुपवर अ‍ॅड केलं.

राईडच्या दिवशी वेळेत उठून आवरलं. काहीतरी खाणं आवश्यक होतं पण इतक्या पहाटे केळं, एनर्जी बार वगैरे तत्सम गोष्टी खायला नको वाटत होतं. तेव्हड्यात आठवलं की आदल्या दिवशी शिल्पाने केलेला शिरा शिल्लक आहे! तोच गरम करून खाल्ला आणि वर चहा प्यायला. पहाटे चार साडेचारला गरम शिरा खायला असलं भारी वाटलं! पावणेपाचला घरून निघून स्टार्ट लाईनला पोहोचलो. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या पार्कींगमध्ये स्टार्ट लाईन होती. सामानाचे ट्रक, पाणी, इलेक्ट्रोलाईट, रेस्टरूम्स सगळी अगदी चोख व्यवस्था होती. दर पाच सात मिनीटांनी सायकलींच्या जथ्थ्याला (वेव्स) सोडत होते. ग्रुपमधले काही जण निघाले होते आणि काही जण यायचे होते. स्टार्ट लाईनला मायबोलीकर नंद्याची बायको संगीता भेटली. नंद्याही राईड करणार होता आणि संगीता आणि तिची एक मैत्रिण आमच्याबरोबर सर्पोर्ट व्हेईकलमध्ये असणार होत्या. त्यामुळे नंबर्सची देवाणघेवाण, स्टेटस अपडेट्स कसे द्यायचे वगैरे बोलणं झालं. संगीताला भेटल्यावर कोणीतरी सपोर्टला असणार आहे हे कळल्याने शिल्पाला एकदम हुश्श झालं! दरम्यान जरा उजाडायला लागल्यावर साधारण साडेपाचच्या सुमारास मी शिल्पा रियाला बाय करून राईडला सुरूवात केली.

राईडसाठी शहरातला ट्रॅफिक बंद केला जात नाही. पण सुरूवातीला खूप सायकली एकत्र असल्याने पोलीस ट्रॅफिक कंट्रोल करत असतात. उन्हाळा उसूनही पहाटे छान गार होतं. सुरुवातीला लेक वॉशिंग्टनच्या काठाने बरच अंतर काटायचं होतं. सुर्योदय होता होता लेकच्या काठाने सायकल चालवायला एमदम मस्त वाटत होतं. एकीकडे लक्षात आलं की अगदी सर्व वयोगटातले आबलवृद्ध रायडर्स होते. बरीच जोडपी टँडम सायकलींवरही दिसत होती. १०-१२ वयाची मुलं होती. काही दिव्यांग रायडर्स त्यांच्याकरता बनवलेल्या स्पेशल सायकलींवरून आले होते. पुढे तर काही जण स्केटबोर्डवरही दिसले. ते म्हणे पूर्ण २०६ मैलांचं अंतर स्केटबोर्डवरून काटतात. ह्यांना बघितल्यावर साष्टांग नमस्कार घालत कैलास परिक्रमा करणार्‍या तिबेटी लोकांची आठवण झाली! दरम्यान चांगलं उजाडलं होतं. लेकच्या पलिकडे माऊंट रेनियरही दर्शन द्यायला लागला. ते दृष्य इतकं सुंदर होतं की मला आता कविता होतात का काय अशी भितीच वाटली एकदम. पण अचानक एक वळण आलं आणि भसकन चढ आला आणि सगळे विचार एकदम गद्द्यात आले! मजल दरमजल करत २० मैलांच्या पहिल्या रेस्टस्टॉपला पोहोचलो. मी प्रॅक्टीसराईड दरम्यान काही खायचो नाही पण इथे मात्र मी बेगल, क्रीमचीज, केळं वगैरे खाऊन घेतलं. मधे मधे खाण्याचा निर्णय एकंदरीत चांगला होता. ग्रुपवर बघितलं तर रार आणि तिच्या नवरा मुकूल सगळ्यात पुढे होते ते जवळ जवळ अर्धातास आधी ह्या रेस्टस्टॉपवरून निघाले होते तर नंद्या आणि अंकित नुकतेच निघाले होते. विवेक आणि किशोर पाच मिनिटांपूर्वी स्टार्टलाईनहून निघाले होते. बाटल्या भरून मी ही पुढे निघालो. पुढचा मिनी रेस्ट स्टॉप नऊ मैलांवर होता. आता शहरी भाग मागे पडून आसपासची गावं, शेतं वगैरे यायला लागली. बराच वेळ झाला तरी तो मिनीस्टॉप येईचना. म्हंटलं नऊ मैलांना इतका वेळ का लागतोय आपल्याला म्हणून शेवटी फोन काढून बघितला तर मी १९ मैल अंतर आलो होतो! तो मिनीस्टॉप कधी गेला कळलच नाही! त्यापुढचा रेस्टस्टॉप ५४व्या मैलावर (म्हणजे अजून १४ मैलांनी) स्पॅनावे नावाच्या गावात होता. पण त्याआधी राईडमधला सर्वात मोठा चढाव म्हणजे पुयालपचा डोंगर चढायचा होता. हा ४३ ते ४६ मैल दरम्यान होता. तेव्हड्यात मला साधारण माझ्या स्पीडने जाणारे एक काका सापडले. मी बराच वेळ त्यांचा ड्राफ्ट घेत जात राहिलो. मला ड्राफ्टींगमधले एटिकेट्स वगैरे माहित नाही पण त्यांना काही प्रॉब्लेम नसावा बहुतेक. पुयालपचा डोंगर सुरू व्हायच्या थोडसं आधी अचानक त्यांची चेन पडली आणि ते थांबले. मीही बराच वेळ थांबलो नव्हतो त्यामुळे मी पण त्यांच्याबरोबर थांबलो. त्यांना विचारलं काही मदत हवी आहे का? अर्थात माझ्या मदतीपेक्षा त्रासच जास्त झाला असता कारण मला काहीच माहित नव्हतं! ते म्हणे १५-१६ वर्ष ही राईड करत आहेत. त्यांच्या कंपूतला एकजण आल्यावर मग मी पुढे निघालो. पुयालपचा डोंगर चांगला होता. म्हणजे बराच चढ होता पण १५-२० मिनीटांत झाला पार. या डोंगराबद्दल मी इंटरनेटवर एक सल्ला वाचला होता "Put your head down and keep pedaling till you reach atop" तो अगदी योग्य होता. एकदम वर गेल्यावर दोन मोठेच्या मोठे रोलर कोस्टरसारखे चढ उतार होते. त्यावरून जायला मस्त मजा आली! स्पॅनावेच्या रेस्टस्टॉपवर मी आणि नंद्या/अंकीत एकाच वेळी होती असं नंतर समजलं. मी नंद्याला पाहिलेलं नसल्याने तो समोर दिसूनही ओळखलं नसण्याची शक्यता आहे. इथेही मी मागच्यासारखं काहीबाही खाऊन घेतलं.

स्पॅनावेच्या पुढे साधारण ५-६ मैलांनी अमेरीकन आर्मीचा JBLM नावाचा बेस लागला. STP राईडर्सना त्याला वळसा घालून जायच्या ऐवजी आतून जायची परनावगी होती. त्यामुळे पुढचा ६-७ मैलांचा रस्ता एकदम मोकळा आणि छान झाडीतून होता. आर्मी एरिया मग तो कुठल्याही देशाचा असो, तिथे एकदम शिस्त जाणवते! अगदी झाडं, गवत वगैरेही एकदम शिस्तीने वाढलेलं आहे असं वाटतं. ह्या JBLM मधे जाणवलेली एक गोष्ट म्हणजे झाडीतला आणि वळणाचा रस्ता असल्याने पुढे नक्की काय आहे तेच कळत नव्हतं. म्हणजे पुढची काहीच व्हिजीबीलिटी नव्हती, फक्त पुढच्या सायकलवाल्याच्या मागे चालवत रहा! अचानक एक वळण येऊन JBLM मधून बाहेरही पडलो.

JBLM मधून बाहेर पडल्यावर मकेन्ना नावाच्या गावत मिनीस्टॉप लागला. मिनीस्टॉपला खायला नसायचं. फक्त पाणी आणि इलेक्ट्रोलाईट मिळायचं. अर्थात मला त्यावेळी भूक नव्हतीच. त्यामुळे फक्त बाटल्या भरून घेऊन लगेच पुढे निघालो. आता रार, मुकूल माझ्या पुढे कुठेतरी आणि नंद्या, अंकित, विवेक, किशोर माझ्या मागे कुठेतरी होते. राईड सुरू होऊन ७१ मैला झाले होते आणि ग्रुपमधल्या कोणालाही मी अजून भेटलो नव्हतो. दरम्यान एक मोठाच्या मोठा ट्रेल सुरू झाला. संपूर्ण राईडमधला हा एकमेव ट्रेल! पण हा तब्बल १४ मैलांचा होता. ट्रेल असल्याने बर्‍यापैकी सपाट होता. पण पूर्ण सपाट रस्ते जरा त्रासदायक होतात! चढ असला की एकप्रकारचं आव्हान वाटतं आणि मग जीव खाऊन पेडल मारलं जातं आणि मुख्य म्हणजे दुसर्‍या बाजूचा उतार पायांना जरा आराम देतो. सपाट रस्त्यांवर एकाच गतीने पेडल मारतच रहावं लागतं.
आता उन्हं तापायला लागली असल्याने मधली मधली झाडी छान वाटत होती. जवळजवळ तासभर गेल्यावर ट्रेल संपला आणि शेवटी टेनीनो नावाच्या गावात मिनीस्टॉप लागला. तिथल्या एका बास्केटबॉल क्लबने थोडंफार खाणं ठेवलं होतं. गारेगार कलींगडाच्या फोडी आणि स्ट्रॉबेर्‍या बर्‍याच खाऊन घेतल्या! इथे एक मजाच झाली. बरेच जण झाडांच्या सावलीत बसले होते. मी पण एका मातीच्या ढिगार्‍यावर जाऊन बसलो. थोड्यावेळाने जवळच बसलेला एक माणूस सांगायला आला की तू बसलास तो ढिगारा बसायला मस्त आहे फक्त थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण तू बसलायस ते लाल मुंग्यांचं भलंमोठं वारूळ आहे! बघितलं तर खरच मातीखाली मुंग्या होत्या. नशिब त्या चावायच्या आधी लक्षात आलं नाहीतर सॅडल सोअर + मुंग्या चावणं हे कॉम्बो जरा त्रासदायक प्रकरण झालं असतं!

आता ८८ मैल झाले होते आणि १००व्या मैलावर सेंट्रलिया नावाच्या गावात ऑफिशियल मिडपॉईंट होता. बरेच जण इथे मुक्काम करतात. टेनीनो ते सेंट्रलिया हे १२ मैल फार पकले. एकतर उन्ह खूप वाढलं होतं आणि स्टेट हायवे असल्याने रस्त्याकडेला झाडंही नव्हती. शिवाय इतकं अंतर सायकल मी पहिल्यांदाच चालवत होतो त्यामुळे जरा दमायलाही झालं होतं. एका ग्रुपबरोबर चिकटून कसेबसे ते १२ मैल संपवले आणि सेंट्रलियाच्या मिडपॉईंटला पोहोचलो. तिथे एक जण शहाळी विकत होता. शहाळ्याचं थंडगार गोड पाणी आणि खोबरं खाल्ल्यावर एकदम तरतरी आली! आमचं मुक्कामाचं ठिकाण अजून १६ मैल पुढे होतं. सेंट्रलियाला एका कॉलेजमध्ये रहायची, जेवायची सोय असते. दरवर्षी इथेच फूडस्टॉप आणि दुपारच्या जेवणाची सोय असते पण ह्यावर्षी त्यांनी जेवण इथून ८ मैल पुढे चेहालिसला ठेवलं होतं. म्हटलं चांगलं आहे इथून निघू अर्ध्या अंतरावर चेहालिसला जेऊ आणि पुढे मुक्कामी पोचू. तितक्यात रार आणि मुकूल चेहालिसच्या पोहोचल्याचा मेसेज आला. मुकूलने सांगितलं की चेहालिसहून निघाल्यावर थोड्या अंतरावर एक टेकडी लागेल आणि ती टेकडी पूर्ण चढून गेल्यावर आमच्या मुक्कामाची शाळा (नॅपाव्हाईन हायस्कूल) आहे. थोड्यावेळाने मी पण सेंट्रलियाहून पुढे निघालो. आता रस्ता I-5 च्या जवळून जाणारा होता. आम्ही जेव्हा ड्राइव्ह ट्रीप्सना जातो तेव्हा (विशेषत: परतीच्या प्रवासात) इंटरस्टेट लागला की माणसांत आल्यासारखं वाटतं! तसचं आताही I-5 दिसल्यावर मला उगीचच बरं वाटलं. दरम्यान माझ्याबरोबर एक ६८ वर्षांचे आजोबा होते. ते १९९३ पासून ही राईड करत आहेत आणि आता ते सुपर राईडर म्हणजे जे बाकींच्यांना काही प्रॉब्लेम आला तर मदत करणार्‍यांच्या गटात आहेत. ते बराच वेळ गप्पा मारत होते. ते सांगत होते की आता ते कुठलीही प्रॅक्टीस न करता थेट ह्या राईडला येतात. कारण एकतर तशी गरज नसते आणि दुसरं म्हणजे बायको सोडत नाही. त्यांना म्हटलं हो माझी बायकोपण मला "उतार वयातली अ‍ॅडव्हेन्चर्स" म्हणून चिडवत असते. तर ते म्हणे तू मला नंतर भेट मी तुला अजून ह्या वयात (!) काय काय अ‍ॅडव्हेंचर्स करता येतील ते सांगतो. बोलता बोलता सायकल चालवायची माझी बहुतेक पहिलीच वेळ असावी. छान वाटलं आणि अंतरही भराभर कापल्यासारखं वाटलं पण तरीही तो चेहालिसचा रेस्ट स्टॉप येईचना. त्यात एक न संपणारा चढ सुरू झाला! तेव्हा वाटलं ही एक टेकडी शिवाय त्या नॅपाव्हाईन हायस्कूलच्या आधीची अजून एक टेकडी. कुठे बुकींग केलय म्हणून मनात रारला थोड्या थोड्या शिव्याही घातल्या. त्या चढावर अखेरीस एक झाड सापडलं. त्या झाडाखाली ते आजोबा त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणाचं अंतर बघत होते. त्यांना म्हटलं माझंही बघा. एकदम आश्चर्याचा धक्का म्हणजे नॅपाव्हाईन हायस्कूल तिथून फक्त अर्ध्या मैलवर होतं. मला पुन्हा एकदा मिनीस्टॉप दिसला नव्हता! अर्धा मैल ऐकून माझ्यात एकदम उत्साह संचारला आणि झाडाखालून निघून शाळेसदृष्य एका इमारतीसमोर थांबलो. रार आणि मुकूल मला बघून आलेच! एकूण ११६ मैल अंतर सगळे स्टॉप धरून साधारण १० तासांत (साडे तीनच्या सुमारास) पोहोचलो. थोडं थकायला झालं होतं पण पाय वगैरे फार दुखत नव्हते. आम्हांला सात जणांत मिळून एक वर्ग दिला होता. शॉवर, कँटीन वगैरे सगळ्या सोई होत्याच. गरम पाण्याचा शॉवर घेऊन आवरेपर्यंत बाकीची मंडळी पोहोचत होती. सगळ्यांशी भेटी-गप्पा सुरू होत्या. दरम्यान नक्की काय खायचं ह्यावर खूप चर्चा झाल्या आणि सरतेशेवटी संगीता जाऊन पिज्झा घेऊन आली. खाऊन झाल्यावर मात्र एकेकाच्या विकेट पडायला लागल्या आणि सात सव्वासातच्या आसपास एकदम झोपाझोपच झाली!

दिवसभर इतके कष्ट झाल्यावर इतकी गाढ झोप लागली की बस! एकदम पहाटे पावणेचारला जाग आली. आज कालच्यापेक्षा गरम होऊन तापमान ३५ डि.से.च्या वर जाण्याचा अंदाज होता आणि त्यामुळे आम्हांला लवकरात लवकर निघायचं होतं. शाळेत ब्रेकफास्ट पाच वाजता मिळणार होता पण मी आवरून झाल्यावर साडेचारलाच विचारलं तर पॅनकेक तयार होते. म्हटलं द्या जे काय असेल ते. खाऊन झाल्यावर ग्रुपची शोधाशोधी केली. रार आणि मुकूल दिसले नाहीत. त्यामुळे ते निघाले असं गृहीत धरलं (आणि ते खरच निघाले होते). बाहेर फटफटलं होतं पण पूर्ण उजेड नव्हता. माझ्या सायकलला दिवा नव्हता. किशोर आणि विवेक आवरत होते त्यामुळे मी नंद्या आणि अंकीत असे तिघे पाचच्या सुमारास निघालो. आजच्या मार्गावर सुरुवातीला पस्तिस चाळीस मैल रोलींग हिल्स होत्या. दिवसाच्या उद्घाटनालाच टेकडी चढण्यापेक्षा ती कालच चढून टाकली ते बरं केलं असा विचार करून काल रार घातलेल्या शिव्या मागे घेतल्या. रात्री व्यवस्थित झोप झाली होती, खाणं झालं होती, पहाटे पहाटे गारही होतं त्यामुळे मस्त वेग मिळाला. नीट उजाडल्यावर मी नंद्या अणि अंकितला मागे टाकून माझ्या वेगाने पुढे निघालो. दुसर्‍या दिवशी सगळे रायडर्स एकाच ठिकाणहून निघत नसल्याने कालच्या सारखे जथ्थे दिसत नव्हते. आजचा पहिला फूडस्टॉप तीस मैलांवर (एकूण १४६व्या मैलवर) लेग्झिंटनला होता. मी बरोबर दोन तासांत लेग्झिंटनला पोहोचलो. तो फूडस्टॉप आठला उघडणार होता पण मी तिथे तासभर आधीच पोहोचलो होतो त्यामुळे तिथे काही नव्हतं आणि तसही त्यावेळी काही नको होतं. त्यामुळे तसाच पुढे निघालो.

पुढे साधारण १० मैलांवर कोलंबिया नदीवरचा लुईस अँड क्लार्क पूल लागतो. ही नदी म्हणजे वॉशिंग्टन आणि ऑरेगन राज्यांची सीमा आहे. हा पूल खूपच उंच आहे. त्यामुळे तो पूल पार करणे म्हणजे स्वर्गापर्यंत चढा आणि मग पाताळापर्यंत उतरा असा प्रकार! शिवाय पूल ओलांडल्यावर पूर्ण गोल वळण घेऊन मग ऑरेगन ३० नावाचा जाचक हायवे सुरू झाला. ह्या हायवेवर थेट पोर्टलँडपर्यंतचं ४८ मैल अंतर काटायचं होतं. सुरूवातीला छान झाडी होती. १०-११ मैलांवर गोबेल नावाच्या गावात मिनीस्टॉप आला. निघाल्यापासून ४५ मैलांपेक्षा जास्त अंतर झालं होतं त्यामुळे मी थांबलो. पाणी आणि इलेक्ट्रोलाईट भरून घेतलं आणि कुक्या वगैरे खाऊन घेतल्या. तिकडे रार आणि मुकूल भेटले. ते पाच-सात मिनीटांत निघाले. पुढच्या म्हणजे सेंट हेलनच्या फूड स्टॉपवर भेटायचं ठरलं. खरतर साडेआठच वाजले होते पण ऊन चांगलच तापायला लागलं होतं. गोबेलहून निघाल्यावर पुढे हायवे ३० मोठा झाला आणि झाडी रस्त्यापासून दूर गेली. त्यामुळे अगदी "दुरून डोंगरे साजरे" व्हायला लागले. पॅसिफीक नॉर्थवेस्टातले सुंदर डोंगर, त्यावरची ती सुचीपर्णी, सदाहरीत झाडं, डोंगरमाथ्यांवर रेंगाळणारे ढग, उतारावरची हिरवळ वगैरे वगैरे.. पण आमच्या डोक्यावर मात्र भाजून काढणारं टळटळीत ऊन! त्यांनी STP वाल्यांना सावली मिळावी म्हणून रस्त्यावर झाडं लावावी अशी अपेक्षा नाही पण तरी!

पुढे १२ मैलांवर सेंट हेलनचा फूडस्टॉप आला. हा आज आम्हांला मिळालेला पहिलाच (आणि शेवटचा) फूड स्टॉप होता. रार आणि मुकूल माझ्या थोडे आधी पोचले होते त्यामुळे त्यांनी सावलीतली जागा पकडली होती. आम्ही अगदी पंगत मांडून व्यवस्थित सँडविच, कलींगडं, कुक्या वगैरे नीट खाऊन घेतलं. पुढे ३० मैल होते आणि रस्त्यात काही मिळणार नव्हतं. त्यामुळे पाणी आणि इलेक्ट्रोलाईटपण भरून घेतलं. अजून हायवे-३०वरच होतो. उन्हं तापली होती. तिथेच सावलीत पडून रहावसं वाटत होतं. थोड्यावेळाने निघून परत रस्त्याला लागलो. आता रायडर्सची गर्दीपण वाढली होती. उन्हात पेडल मारत अंतर काटत होतो. मधेच एकेठिकाणी कुठल्यातरी 'पास'ची पाटी आली. म्हटलं आता पास, वॅली, खिंडी, दरी, माऊंटन वगैरे कुठलंही भौगोलीक आकर्षण न दाखवता सावलीचा रस्ता द्या आणि पोर्टलँड आणा!

पुढे रस्त्यात दोन सायकलवाले फ्लॅट टायर काढत होते. त्यांना विचारलं अजून किती मैल राहिलेत तर म्हणे बरोब्बर १४! पुढे जाऊन बघतो तर 'वेलकम टू पोर्टलँड'ची पाटी आली पण. पोर्टलँड शहराच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतरही १० मैल फिरवतात. आता भर शहरातला रस्ता सुरू झाला. कोलंबिया नदीवरचा अजून एक पूल ऊंचावर दिसायला लागला. मला आधी वाटलं की तो I-5चा पुल आहे आणि त्यामुळे आम्हांला लागणार नाही. पण तो आम्ही चाललो होतो त्या हायवे-३० वरचाच होता आणि तिथपर्यंत जाण्यासाठी उभाच्या उभा चढ सुरू झाला. त्या पुलावर मात्र मस्त वारा होता आणि खालची एव्हडी मोठ्ठी नदी बघून एकदम ताजतवानं वाटलं.

पोर्टलँड शहरातले तमाम सगळे सिग्नल पार पडल्यावर आता जवळ आलं असं वाटत असतानाच डावीकडचं वळण गेल्यावर एकदम फिनीश लाईन आलीच! तिथे भरपूर लोकं चिअर करत होते. बँड सुरू होता. माईकवरून एक माणूस येणार्‍या राईडर्सचं स्वागत करत होता. रार आणि मुकूल माझ्याआधी ५-१० मिनीटं पोचले होते. आज ९० मैल अंतराला ७.३० तास लागले. आमच्या मागे थोड्यावेळाने नंद्या आणि अंकित आणि त्यानंतर विवेक आणि किशोरही आलेच. सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं आणि फोटोसेशन केलं. मायबोली परंपरेला शोभेल अशी खादडीची सोय संगीताने केली होती. ती येताना सगळ्यांसाठी घरी केलेला वडापाव आणि दाण्याचे लाडू घेऊन आली होती. अंकितची बायको आणि आई बाबाही बर्‍याच प्रकारचे गुज्जू पदार्थ घेऊन आले होते. एकंदरीत शिरा खाऊन सुरू झालेली STP २०६ मैलांनी वडापाव खाऊन सुफळ संपूर्ण झाली. यथाअवकाश पोर्टलँडहून बसने निघून वेळेत सिअ‍ॅटलला घरी पोचलो.

राईडच्या आधी तसच दरम्यान मी भरपूर पाणी प्यायल्याने एव्हड्या उन्हातही अजिबात डीहायड्रेशन झालं नाही. शिवाय पायात एकदाही क्रँप आले नाहीत. पाय दुखले पण फार नाहीत. मी दुसर्‍या दिवशीपासून व्यवस्थित ऑफिसलाही जाऊ शकलो. उतार वयातलं अजून एक साहस पार पडलं आता पुढचं कुठलं करावं ह्याचा विचार करतो आहे!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Congrats
BTW where is Kedar nowadays? Not seen on Maayboli for long time.

भारी!
वर्णन मस्त केलं आहेस. मजा आली वाचायला.
वाचताना मी पण मनातल्या मनात जीव खाऊन पेडल मारत होते. Lol

पहाटे चार साडेचारला गरम शिरा खायला असलं भारी वाटलं! >>> कुणाचं काय, तर कुणाचं काय!! Biggrin

मस्त रे पराग. मोठीच अचिवमेंट आहे ही. खूप खूप अभिनंदन!
त्याचबरोबर रार, नंद्या आणि सगळ्याच कंपनीचं सुद्धा अभिनंदन.

कुटुंबाच्या साक्षीनं केलेली ऊतारवयातली साहसं (ईतरांसाठी थेरं Wink ) जास्तं फुलफिलिंग असतात. तेवढाच दोन चार दिवस घरात जरा जास्तं भाव मिळतो. Proud
आता पुढच्यावर्षी ही रेस नॉनस्टॉप करायची मनावर घे, नक्कीच करू शकशील तू.

जमल्यास शेवटी सायकल, कशी आणि कुठली निवडली ते सुद्धा लिहिशील का?

अरे वा!!

मस्त अ‍ॅडव्हेन्चर आणि त्यावरचं लिखाण. ही असली (माझ्या दृष्टीने अघोरी ) साहसं करणार्‍यांचं मला भारी अप्रूप आणि अमाप आदर वाटतो! अभिनंदन!! Happy

पग्या अभिनंदन..

आता बी आर एम करायचं मनावर घे... तुला मार्गदर्शन करायला केदार आहेच...

अभिनंदन. मस्त लिहिलंय.

मायबोलीकर रायगडचा नवरा गेले काही वर्षं यात भाग घेत आहे. गेले दोन वर्षांपासून तिचा ११ वर्षांचा मुलगा देखिल STP करतो.

ही असली (माझ्या दृष्टीने अघोरी ) साहसं करणार्‍यांचं मला भारी अप्रूप आणि अमाप आदर वाटतो! >>> +१११

अभिनंदन!!

अभिनंदन! STP हा फार मस्त अनुभव आहे. अडम, तुम्ही सिअँटलला असता का?

वर मामीने लिहील्याप्रमाणे माझा नवरा गेली ४ वर्षे (एकदा एका दिवसात पूर्ण केली.) करतो आहे. बापाकडे बघून गेल्या वर्षी १० वर्षीय लेकाने पण सुरूवात केली. गेले दोन वर्षे बाप लेक दोघे सायकलवरून व मी (a/c) गाडीत बसून STP करत आहोत.. Happy

सही लिहीलं आहे! अभिनंदन!

बाकी नंद्या, रार - या नेहमी करणार्‍यांचेही अभिनंदन परत एकदा.

ही असली (माझ्या दृष्टीने अघोरी ) साहसं करणार्‍यांचं मला भारी अप्रूप आणि अमाप आदर वाटतो! >>. टोटली.

जबरदस्त. ओघवतं लिहीलंय. अभिनंदन.

ज्या मायबोलीकरांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी भाग घेतला त्या सर्वांचं अभिनंदन.

रायगड मस्तच ग.

सगळ्यांना प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. Happy

लिखाणावर पूर्वार्धात कुठे कुठे त्या ह्यांची छाप वाटतेय. >>>> कोण ते? Uhoh

तू एकदम किरकोळीत पार केलेले दिसते >>>> अगदी किरकोळीत नाही पण माझ्या अपेक्षेपेक्षा चांगली झाली राईड.

तेवढाच दोन चार दिवस घरात जरा जास्तं भाव मिळतो. Proud >>>> नंतर भाव लगेच उतरतो पण!! Happy
आता पुढच्यावर्षी ही रेस नॉनस्टॉप करायची मनावर घे, नक्कीच करू शकशील तू. >>>>> आधीपासून तसं ट्रेनींग करायला पाहिजे. तर प्रयत्न करता येईल.

जमल्यास शेवटी सायकल, कशी आणि कुठली निवडली ते सुद्धा लिहिशील का? >>>> मी ट्रेक ब्रँडची सायकल घेतली. फ्रेम साईज वगैरे प्रत्येक दुकानातली लोकं सजेस्ट करायची. गियरचे ब्रँड बरेच ठिकाणी सेम होते. त्यामुळे शेवटी किंमत आणि सायकल चालवतानाची कंफर्ट ह्यावरून निवडली. प्रत्येक शोरूममध्ये आवडलेल्या सायकलचे फोटो काढून केदारला पाठवयचो. तो इन्पूट द्यायचा लगेच. Happy

माझ्या दृष्टीने अघोरी >>>> मी आईबाबांना राईडबद्दल सांगितलं तेव्हा आई पण हेच म्हणाली.. कशाला असे अघोरी प्रकार करायचे??! Happy

आता बी आर एम करायचं मनावर घे... तुला मार्गदर्शन करायला केदार आहेच... >>>> बीआरएमला अजिबात सपोर्ट नसतो, त्यामुळे ह्या पेक्षा अवघड असेल असं वाटतय.

अडम, तुम्ही सिअँटलला असता का? >>>> रायगड हो!! तुम्ही सिअ‍ॅटलला असता असं कळलं होतं आमचं इथे यायचं ठरलं तेव्हा पण मी विसरून गेलो नंतर. गटग करू एकदा. Happy
१० वर्षांचा मुलगा STP करतो म्हणजे फारच भारी! एकत्र राईडही करू मग! Happy

पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना. Happy

नवीन माझा गृप वगैरे भानगडी झाल्यामुळे हे लेखन मला दिसलंच नव्हतं.
मस्त खुसखुशीत शैलीत लिहिलं आहेस. सगळ्या सहभागी मायबोलीकरांचं अभिनंदन.