जागीर

Submitted by पायस on 20 July, 2018 - 02:28

१९८१ साली इंडियाना जोन्स अ‍ॅन्ड रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क आला आणि अचानक खजिना-शोध या जॉनरला नवचैतन्य प्राप्त जाहले. त्याला फॉलो अप म्हणून स्पीलबर्गने १९८४ साली टेंपल ऑफ डूम रिलीज केला. एवढे होत असताना बॉलिवूडने मागे राहणे हे बॉलिवूडच्या शान के खिलाफ असल्याने कोणीतरी हे फेकलेले गाँटलेट उचलणे गरजेचे होते. त्यात प्रश्न आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकाला रुचेल असा सिनेमा बनवण्याचा अनुभव असणेही गरजेचे होते. म्हणून "लव्ह इन टोकियो" मधून जपानी लोकांना आशा पारेख जपानी आहे हे पटवून देण्याचे महान कार्य करणार्‍या प्रमोद चक्रवर्तीने त्याच वर्षी जागीर नामे चित्रकलाकृती निर्मिली. या महान कार्याचा आढावा घेण्याकरता हा चिरफाड, आपलं रिव्ह्यू प्रपंच!

१) रम्य ही स्वर्गाहून जागीर

मांगा इन थिअरी अ‍ॅन्ड प्रॅक्टिस या अप्रतिम पुस्तकामध्ये प्रसिद्ध लेखक हिरोहिको अराकी सांगतो की तुमच्या कथेचा मुख्य मुद्दा कथा सुरू झाल्या झाल्या स्पष्ट झाला पाहिजे. जेव्हा अराकी त्याची उमेदवारी करत होता तेव्हाच्या काळात सुद्धा आमच्या चक्रवर्तीकाकांच्या डोक्यात हा मुद्दा पक्का होता. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता ते आपल्याला खजिना दाखवून मोकळे होतात. कारण खजिना किती आहे हे महत्त्वाचे नाही. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास महत्त्वाचा आहे. मग खजिन्याबद्दल रहस्य निर्माण करून काय फायदा?

तर कमल कपूर (अमिताभच्या डॉनमधला नारंग) शूरवीर सिंह म्हणून अंजानगढचा राजा दाखवला आहे. ज्याला इंग्रजीत प्लूम्ड टर्बन म्हणतात आणि ज्याला आपण पीस खोवलेला फेटा म्हणतो असा फेटा, जोधपुरी सूट आणि गळ्यात मोत्यांच्या माळा असल्याने त्याच्या राजेपदावर शिक्कामोर्तब होते. राजा असूनही बिचार्‍याकडे एक जागीरच काय ती असते. त्याचे राज्य नक्की कुठे असते असे भौगोलिक प्रश्न व्यर्थ आहेत. कारण तो कोणत्या तरी मोठ्या शहराच्या जवळ राहत असतो ज्याच्यापासून थोड्याच अंतरावर नदी, जंगल, माळरान, डोंगर, दर्‍या सर्व काही असते यापेक्षा जास्त माहिती चक्रवर्तीकाका आपल्याला देत नाहीत. याच डोंगर दर्‍यांमध्ये कुठेतरी त्याचा राजवाडा असतो. तिथेच कुठेतरी एक पहाडी असते. त्या पहाडीच्या खाली शाही खजिना असतो.

सिनेमा सुरु होतो तो कमल कपूर खजिन्याच्या खोलीत उभा राहून शंकराच्या मूर्तीशी गप्पा मारत असतो. टेंपल ऑफ डूम ला उत्तर द्यायचे असल्याने खजिन्याच्या खोलीला मंदिराचे स्वरुप दिलेले आहे. त्याच्या दरवाज्यावर सात घंटा टांगलेल्या आहेत. खजिना म्हणून जेवढं मध्यम वर्गीय बंगाल्याला सुचू शकतं तेवढं दाखवलेलं आहे. इथे वाचकांनी नोंद घ्यावी की याच व्यक्तीने धर्मेंद्राचा अलिबाबा और चालीस चोर बनवला होता. असो, तर कमल कपूर सांगत असतो की त्याला हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेलेला असल्यामुळे तो आता खजिन्याची जबाबदारी राजकुमारावर सोपवण्याच्या विचारात आहे (इथे मूर्तीच्या चेहर्‍यावर बरी ब्याद टळली असे भाव). तर त्याला आशीर्वाद दे इ. इ. मूर्तीच्या मनातही बहुधा प्रेक्षकाच्या मनात चमकून जातो तोच प्रश्न येतो - ते आशीर्वाद देतो मी पण ज्याला द्यायचा तो राजकुमार कुठे आहे? याला उत्तर म्हणून कमल कपूर घंटा वाजवतो आणि कुठून तरी एक गरुड पैदा करून बाहेर पडतो.

हिंदी सिनेमात प्राणी-पक्षी अमर्यादित प्रमाणात चतुर असल्याने कमल कपूर सारासार विचार करून राजकुमार खजिन्याची जबाबदारी घेईपर्यंत त्याच्या रक्षणाची जबाबदारी बाजबहादूर शमशेर असे भरभक्कम नाव असलेल्या त्या गरुडावर टाकतो. त्याला हे माहित नसते की आपल्या गरुडावर कोणीतरी नजर ठेवून आहे. तो असतो डाकू लाखन सिंह अर्थात अमरीश पुरी. अमरीश पुरीला या खजिन्यात रस असतो पण अंजानगढचा भूगोल समजायला फारच क्लिष्ट असल्याने त्याला दुर्बिणीतून ती पहाडी दिसत असूनही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नकाशाची गरज असते. शूरवीर सिंगचा भाऊ दिगंबर सिंग (सुब्रतो महापात्रा, सत्यम शिवम सुंदरम मधला शास्त्री) हा अमरीश पुरीला जाऊन मिळालेला असतो. तो खजिन्याच्या अर्ध्या हिश्श्याच्या बदल्यात नकाशा कुठे आहे हे सांगायला तयार होतो. नकाशा एका लॉकेटमध्ये असतो जे कमल कपूर घालून फिरत असतो. अमरीश पुरी लगेच ते लॉकेट ताब्यात घेण्यासाठी अंजानगडाच्या हवेलीकडे कूच करतो.

2) प्राणिमात्रांचे ऋण

2.1) शाही उपसर्गाची संकल्पना

दिगंबरच्या दगाबाजीची कल्पना नसलेला कमल कपूर निवांतपणे प्राणशी गप्पा मारत असतो. प्रत्येक शाही खानदानाचा नोकर असलाच पाहिजे या नियमानुसार प्राण मंगलसिंग नावाने शाही नोकर दाखवला आहे. राजकुमार मोठा होईपर्यंत शाही खजिन्याचे रहस्य आणि नकाशावाल्या ‘लाकट’ ची जबाबदारी कमल कपूर प्राणवर सोपवतो.
याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे की अशा सिनेमात जर शाही हा उपसर्ग नावामागे लावला असला तर तो/ती बाय डिफॉल्ट भारी आणि मरणार नाही हे फिक्स असते. म्हणून राजकुमार कधी मरत नसतात कारण उनके रगों में शाही खून दौडत असते. दुसरं म्हणजे जोवर उघड उघड शाही हा उपसर्ग प्रयुक्त होत नाही तोवर शाही उपसर्गाची सुरक्षा प्राप्त होत नाही. तिसरं म्हणजे या उपसर्गाची प्रयुक्तता तुम्ही स्वतःकरिता करून उपयोग नाही. अन्यथा आत्मप्रौढीचा नियम या उपसर्गाच्या सुरक्षाचक्राचा भेद करतो. चौथे म्हणजे जर तुमच्याकडे एखाद्या शाही वस्तूची जबाबदारी असली तर तुम्ही शाही राजदार बनून तुम्हाला हा नियम लागू होतो. कमल कपूर शाही राजा नसल्याने तो मरणार, दिगंबरमध्ये शाही खून असले तरी त्याचा प्रत्यक्ष उल्लेख न झाल्याने तो मरणार आणि प्राणकडे शाही खजिन्याचा नकाशाचे शाही रहस्य सोपवले असल्याने तो जगणार हे नक्की झाले.

2.2) मूर्ख राजाकडे नोकरी करू नये

कमल कपूर अशक्यप्राय मूर्ख दाखवला आहे. अमरीश पुरी राजवाड्यात येतो. त्याला ते लाकट हवे असते. कमल कपूर विचारतो की तुला कोणी सांगितलं, लगेच मागून दिगंबर सिंग म्हणतो की मी. त्या दिवशी तू मला ५००० रुपये द्यायला नकार दिलेला आता मला अमरीश पुरी 5 कोटी देणार आहे. थोडं गणित करूयात. सिनेमा १९८४ चा. यानंतर तरी पंचवीस तीस वर्षे निघून जातात (ही कमीच आहेत. प्रत्यक्षात धर्मेंद्र पन्नाशीचा दिसतो). दिगंबरला खजिन्याचा अर्धा हिस्सा मिळणार म्हणजे खजिन्याची तेव्हाची किंमत १० कोटी रुपये. सध्याच्या भावाने तरी ५०० कोटी रुपये. हा आकडा नंतर कामी येईल.

५००० हजार देऊन जे टाळता आले असते ते न टाळल्याचा मूर्खपणा लपवण्याकरिता कमल कपूर विषय दगाबाजीकडे वळवतो. त्यावर अमरीश पुरी म्हणतो "आज के जमाने में वफादारी की उम्मीद तो आजकल सिर्फ कुत्ते से की जा सकती हैं. फिर ये तो इन्सान हैं."

इथे मौका देख के संकलक चौका मारतो. कट टू वफादार प्राण. प्राण तिकडे राजकुमारच्या गळ्यात ते लाकट टाकून त्याला चेतक नावाच्या घोड्यावर बसवून जायला सांगतो. इथे राजकुमारचे नाव प्रताप ठेवून पोएटिक जस्टिस साधण्याची संधी दिग्दर्शक दवडतो. चेतकला एस पी साबचे घर ठाऊक असल्याने प्राण सर्वकाही समजावणारी चिठ्ठी देण्याचे काम घोड्याला सांगतो. घोडासुद्धा समजूतदारपणे मान हलवतो. मग राजकुमार आणि घोडा एस पी इफ्तेकारच्या घराच्या दिशेने पळतात. इथे प्राणच्या मुलाकडे घोड्याइतका समजूतदारपणा नसल्याने तो फक्त चड्डी घालून हिंडत असतो. मग प्राण त्याला राजकुमारचे भरजरी कपडे घालायला देतो.

इकडे लॉकेट देत नसल्याने लाखन आणि दिगंबर राजावर बंदूक ताणून उभे असतात. तेवढ्यात प्राण मध्ये पडतो. प्रजा का सबसे बडा खजाना कमल कपूर असल्याचे सांगून तो तसेच गरुडाच्या आकाराचे नकली लॉकेट देतो. कधीतरी महाराज आपल्याला त्यांच्या गळ्यातले लॉकेट देतील आणि ते शत्रूला हवे असू शकते म्हणून नकली लॉकेट बनवून ठेवावे एवढा अंतर्यामी प्राण असतो. म्हणून दिगंबर आपण राजा शूरवीर सिंगचेच बंधुराज असल्याचा पुरावा देत केवळ ते गरुडाच्या आकाराचे आहे म्हणून खरे लॉकेट असल्याचे छातीठोकपणे सांगतो. लाखन मात्र अधिक हुशार असल्यामुळे तो आधी नकाशा चेक करायचे ठरवतो. तेव्हा प्राण थातुर मातुर कारण देऊन ते टाळतो.

इथे कमल कपूर मूर्खपणा नंबर दोन करतो. अमरीश पुरीचे समाधान झालेले असल्याने तो घरी जायला निघालेला असतो तर विनाकारण कमल कपूर त्याच्या सोबत असलेल्या सुब्रतो महापात्रावर गोळी चालवतो. दिगंबर जरी शाही खानदानाचा असला तरी उपरोक्त नियमानुसार त्याच्यासाठी शाही उपसर्ग थेट प्रयुक्त झाला नसल्याने त्याला संरक्षण मिळत नाही आणि तो मरतो. इंटरेस्टिंगली कमल कपूरच्या दुनळी बंदूकीत दोन गोळ्यांची जागा असताना त्याने एकच गोळी भरलेली असते कारण तो एकच चाप ओढतो आणि एकाच गोळीचा आवाज होतो. जर दोन गोळ्या असत्या तर त्याला अमरीश पुरीला मारायचा चान्स होता. या सिनेमात अमरीश पुरी जरा उसुलों वाला व्हिलन असल्याने तो दिगंबरची शेवटची इच्छा (मेरे बेटे रणजीत को अपने बेटे की तरह पालें) तो पार पाडतो तसेच त्याने सांगितल्याप्रमाणे तो राजा आणि राजकुमारला मारायला तयार होतो. चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच की नाव रणजीत असल्यावर मोठा होऊन तो रणजीत खेरीज इतर कोणी होऊच शकत नाही.

"मिळाल्या मालकासी व्हावे प्रोटेक्टर" मंत्र असलेला प्राण एवढे सगळे होऊनही मध्ये पडतो. चाहो तो मेरी जान लेलो पर महाराज को छोड दो चा धोशा तो लावतो. तेवढ्यात प्राणच्या मुलाला राजकुमार समजून अमरीश पुरीच्या गँगमधला एक चिल्लर डाकू घेऊन येतो. महाराज ऐवजी राजकुमारचा बळी जाणार असे ठरते. प्राणही हे बलिदान द्यायला तयार होतो. अजूनही कमल कपूरला गप्प बसण्याचे सुचत नाही. तो म्हणतो की हा राजकुमार नसून प्राणचा मुलगा आहे. सुदैवाने अमरीश पुरीला त्या मुलाला "बाळा तुझे बाबा कोण ते सांगतोस का?" विचारायचे सुचत नाही. तो त्या मुलाला तलवारींवर नाचवून फेकण्याचा आदेश देतो. वफादार नोकराचा मुलगा असल्या कारणाने त्याचे जिस्म फौलादी असावे. कारण एकही तलवार त्याच्या पाठीत घुसत नाही. त्याला कॅच कॅच खेळल्यासारखे करून खिडकीतून खाली फेकतात. "आज जरा आडरस्त्याने जाऊयात" असा विचार करून चाललेल्या एका भटक्या दांपत्याच्या घोडागाडीत जाऊन नेमका तो पडतो. इथून तिथून, न जाणे कुठून आलेल्या घोडागाडीत पडलेला तो मुलगा पुढे जाऊन मिथुन होणार हे नक्की होते.

एवढे होऊनही कमल कपूरचे समाधान होत नाही. तो एक सुरा फेकून अमरीश पुरीला मारतो. त्याने खांद्याला किरकोळ जखम होण्यापलीकडे काही होत नाही. मग मात्र बिचार्‍याचा निरुपाय होतो आणि तो एकदाचा कमल कपूरला गोळी घालतो. कमल कपूर हार्ट अ‍ॅटॅक आल्याचा अभिनय करून मरतो. इकडे भर उन्हात बिन चार्‍याचे पळवल्याबद्दल चेतक राजकुमारला नदीत पाडतो. शेवटी वफादारी की उम्मीद फक्त कुत्तोंसे की जा सकती हैं घोडोंसे नही. सर्वकाही लक्षात आल्यानंतर अमरीश पुरी प्राणला बांधून फटके देत असतो. प्राणची जुबान काटण्याची धमकी दिल्यानंतर प्राण म्हणतो की मेरी जुबान के दो टुकडे करोंगे तो आवाज दुगुनी होगी, चार टुकडे चौगुनी. प्राणच्या हे लक्षात येत नाही की तुकडे जीभेचे होणार आहेत, स्वरयंत्राचे नाहीत. फार फार तर तो दुप्पट बोबडा किंवा चौपट बोबडा होऊ शकतो. अमरीश पुरीला मात्र एव्हाना या लोकांचा मूर्खपणा असह्य झालेला असतो. त्यात राजकुमार आणि लॉकेट निसटल्यामुळे तो आधीच त्रासलेला असतो. इतके होऊन सुद्धा तो फक्त प्राणचा उजवा हात कापून त्याला सोडून देतो. मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू परवडला याचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण ते काय?

२.३) घोड्याने पाडले, ससाण्याने तारले

इफ्तेकार प्राणची चौकशी करायला राजवाड्यावर येतो. कधीतरी कमल कपूरने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आपल्या मुलीचे, सीमाचे लग्न मोठे झाल्यावर राजकुमारशी लावून द्यायचे मान्य करतो. तेव्हा कळते की राजकुमार इफ्तेकारकडे पोचलाच नाही. मग तो गेला कुठे? बाकी सर्वांनी हलगर्जीपणा केला असला तरी शमशेरने केलेला नसतो. इतका वेळ ठिपकेदार गरुड असलेला शमशेर अचानक बहिरी ससाणा बनतो आणि आजूबाजूला कुठेही मंदिर नसताना पूजेची थाळी घेऊन फिरत असलेल्या आशालताचे लक्ष वेधून घेतो. नदीत वाहत आलेला राजकुमार आशालताला सापडतो आणि ती त्याचा सांभाळ करण्याचे मान्य करते. सहसा कंटिन्यूटी मिस्टेक्स कपड्यांमध्ये होतात. इथे पक्ष्यांमध्ये झाली आहे.

३) वेस्टर्न सिनेमा बनवण्यासाठी दिलवाले नायक हवेत

३.१) धनाच्या पेटीपाशी चावरे विषारी नाग असलेच पाहिजेत.

असा हा राजकुमार मोठा होऊन धर्मेंद्र बनतो. गळ्यात असलेल्या लॉकेटमुळे लगेच त्याची ओळख पटते. तिथल्याच कुठल्यातरी जंगलात तो खड्डा खणत बसलेला असतो. कुठून तरी त्याला कळलेले असते की इथे खजिन्याची पेटी गाडलेली आहे. इथे आपल्याला कळून चुकते का हा सिनेमा वेस्टर्नच्या अंगाने जातो. वेस्टर्नमध्ये सर्वजण एक्स्प्लोरर्स असतात. त्यांना घोडेस्वारी करणे, गाडलेले खजिने शोधणे आणि गाणी म्हणणे याशिवाय काही उद्योग नसतात. तसेच प्रत्येकजण बंदूक चालवण्यात वाकबगार असावाच लागतो. इथे रॉय रॉजर्स, जीन ऑट्री वगैरेंच्या जागी धर्मेंद्र असणार हे निश्चित होते. वेस्टर्नला साजेशी हॅट आणि गळ्याला रुमालही असतो. पेटी घेऊन धर्मेंद्र निघणार इतक्यात तिथून चाललेला मिथुन ती पेटी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. चेक्सचा शर्ट, मळकट रंगाची हॅट बघून वेस्टर्न्स मधली दुय्यम हिरोची भूमिका याच्या वाटेला आली आहे हे निश्चित होते. थोडी मारामारी झाल्यावर लाक्षणिक रित्या मिथुनला धर्मेंद्र खड्ड्यात जा म्हणतो. म्हणजे लाथ मारून वेगळ्याच एका मोठाल्या खड्ड्यात पाडतो. हमरस्त्याने जायचे सोडून त्याला दोन दगडांमधल्या चिंचोळ्या वाटेतून जाण्याची हुक्की येते. आपल्या निवासस्थानापाशी झालेल्या आवाजामुळे एक नाग (खराखुरा) वैतागून बिळातून बाहेर येतो. त्रासलेला तो बिचारा जीव धर्मेंद्राला डसण्याचा प्रयत्न करतो तर मिथुन मध्ये येऊन त्याचा (धर्मेंद्राचा, नागाचा नव्हे) जीव वाचवतो.

मिथुन गारुड्यांमध्ये वाढलेला असल्याने निवांतपणे स्वतःच्याच जखमेतून विष चोखून थुंकून टाकतो. तो हे इतक्या निवांतपणे करतो की त्या नागालाही "काय ते दिवस होते, एका फूत्कारात माणसे मरायची. नाहीतर आता च्युईंग गम प्रमाणे चघळून विष थुंकणारी माणसे यायला लागली आहेत" वाटल्याखेरीज राहिले नसावे. इथे धर्मेंद्राचे नाव शंकर आणि मिथुनचे नाव सांगा असल्याचे स्पष्ट होते. मिथुन मोठ्या अभिमानाने त्याला आपल्या पाठीवरच्या तलवारीच्या खुणा दाखवतो आणि आपण प्राणचा मुलगा असल्याचे प्रेक्षकांना कळवतो. प्रत्यक्षात गंज लागलेल्या तलवारींमुळे रॅश आल्यासारख्या त्या जखमा दिसतात. याने धर्मेंद्राला भलतेच वाईट वाटते आणि तो सापडलेल्या धनाचा अर्धा हिस्सा मिथुनला देऊ करतो.

अशा सिनेमांत एक तिसरे पात्र सुद्धा लागते. सहसा हे नेटिव्ह अमेरिकन किंवा मेक्सिकन, म्हणजे हिरोपेक्षा ड्रॅस्टिकली वेगळे दिसणारे लागते. इथे डॅनीची वर्णी लागली आहे. डॅनीचे नाव डॅनीच असते. त्या पात्रांच्या नियमांनुसार डॅनी सुरेफेक करण्यात आणि कुलुपे तोडण्यात निष्णात असतो. डॅनी येऊन तीन हिश्श्यात वाटणी करण्याचा सल्ला देतो. तो सल्ला धुडकावून ते दोघे आधी दगड मारून, नंतर बाँबच्या मदती ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतात. अखेर हार मानून ते डॅनीची ऑफर स्वीकारतात. डॅनी अत्यंत सहजतेने ती पेटी उघडतो. त्यात शंभरच्या नोटा, सोन्याची बिस्किटे आणि दागिने पाहून हा खजिना नसून स्मगलिंगचा माल असल्याचे आपल्याला कळते. हा माल ज्यांचा असतो ते लोक हा माल घ्यायला येतात. मग धर्मेंद्राला युक्ती सुचते आणि तो डॅनीला ती पेटी बंद करायला सांगतो.

३.२) मुलांची फाजील कौतुके केल्यास त्यांच्याच्याने एक काम धड होत नाही

पुढच्या सीनमध्ये कळते की तो माल अमरीश पुरीचा होता. इतक्या वर्षांमध्ये त्याचे डाकू मधून स्मगलरमध्ये प्रमोशन झाले आहे. रणजीतही मोठा होऊन रणजीत झाला आहे. रणजीत ती उपरोक्त पेटी घेऊन परत आलेला असतो. मिळालेली वस्तु योग्य आहे का नाही हे चेक न करण्याची सवय वडलांकडून रणजीतला मिळालेली असते. त्यामुळे तो पेटी न उघडताच घेऊन आलेला असतो. सोबत सुजितकुमार आणि मॅकमोहन पण असतात. या तिघांना हॅट दिलेल्या आहेत. आणखी पण एक कोणी फरकॅपवाला असतो ज्याच्या हातात काही कारणाने बिगुल दिलेले आहे. याला फक्त "बाप का बेटा, सिपाही का घोडा, बहुत नही तो थोडा थोडा" हा डायलॉग मारण्यासाठी ठेवलेलं आहे. अमरीश पुरी उगाचच रणजीतचे कौतुक करतो. रणजीतही अंजानगढ चा खजिना शोधून काढण्याच्या वल्गना करतो. ती पेटी डॅनीने बंद केलेली असल्यामुळे ती काही उघडत नाही. मग रणजीत ब्लोटॉर्चने तिचे झाकण तोडतो. झाकण उघडण्यापूर्वी शँपेन उघडली जाते आणि झाकणावर ग्लास भरले जातात. शँपेन आवडत असल्याने आत बंद केलेला नाग "घोटभर शँपेन मलाही द्या की" करून बाहेर येतो आणि फालतू कामाचा दर्जा अमरीश पुरीला कळून चुकतो.

३.३) घोड्यावरून प्रवास करताना गाणे व्हायलाच पाहिजे

१९४०-१९५० च्या वेस्टर्नचे बलस्थान होते त्यांच्या रेंजर हिरोंनी म्हटलेली गाणी. एका जीन ऑट्री एपिसोडमध्ये तर अर्ध्या तासाच्या एपिसोडमध्ये १० मिनिटाचे गाणेच होते. इथे तर बॉलिवूड वेस्टर्न आहे. हिरोंना यशश्री प्राप्त झालेली आहे. मग गाणे झाले नसते तरच नवल! तिघेही आपले घोडेस्वारीचे कसब दाखवत गाणे म्हणू लागतात "हम दिलवाले, सारी दुनिया से निराले, हम जैसा कौन हैं?" गाणे संपल्यावर धर्मेंद्राच्या घोड्याने "ओझे वाहायला मी गाढव वाटलो का रे?" हा प्रश्न प्रमोद चक्रवर्तीला नक्की विचारला असावा. डॅनीवर क्लोजअप मारून त्याचे त्रिकालदेवलाही खुश करू शकणारे हास्य बघण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. गाण्याच्या कडव्याच्या ओळी मोठ्या मनोरंजक आहेत "हम दोस्त नही हम भाई हैं, इस दौर के हातिमताई हैं" (मागून जितेंद्र कुजबुजतो, हातिमताई मी तू धरम) सतत "हम जैसा कौन हैं" विचारल्यामुळे सूर्याला सुद्धा कंटाळा येतो आणि तो अस्ताला जातो. रात्रीची विश्रांती घ्यावी म्हणून माळरानात घोडे पळवत असणारे ते तिघे थांबतात आणि गाणे संपते.

इथे माझा अल्पविराम. उरलेली चिरफाड प्रतिसादांत.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

प्राणची जुबान काटण्याची धमकी दिल्यानंतर प्राण म्हणतो की मेरी जुबान के दो टुकडे करोंगे तो आवाज दुगुनी होगी, चार टुकडे चौगुनी. प्राणच्या हे लक्षात येत नाही की तुकडे जीभेचे होणार आहेत, स्वरयंत्राचे नाहीत. फार फार तर तो दुप्पट बोबडा किंवा चौपट बोबडा होऊ शकतो. > Lol खूप हसले या वाक्यावर!
मस्त लेख..मजा आली वाचून..

दोन जुने मित्र पुन्हा भेटलेला बघता बघता प्रेक्षकांना दिसते की अजूनही पाऊण तासांचा सिनेमा बाकी आहे आणि प्रेक्षकही ढसाढसा अश्रू गाळतात >>
हाहाहाहाहाहाहा

इतका मोठाच्या मोठा सिनेमा बनवायला किती काळ लागला असेल ह्या लोकांना !!
स्टोरीची सुरुवात आणि मधे हे जे काय काय झालं ह्याचा काय संबंध तरी आहे का.. मला तर नुसतं वाचूनच भंजाळायला झालं.

परिक्षण आणि प्रतिक्रीया कमाल !!

१२) तुम्ही वाट्टेल तितके हरवा, तुमचे जन्मरहस्य तुम्हाला कळतेच कळते

१२.१) आईनस्टाईनने जर जागीर बघितला असता तर त्याला सापेक्षता सिद्धांताची प्रायोगिक सिद्धता देता आली असती.

या घडामोडींपासून अनभिज्ञ असलेला अमरीश पुरी जाऊन रणजीतला सांगतो की आज हमारे रास्ते के सारे काटे साफ हो गये. इथे एकतर आपला कलात्मक मोटिफ असावा म्हणून किंवा ३४ वर्षांनंतर पायसला त्याच्या परीक्षणात अजून एक पंच काढता यावा म्हणून रणजीत हातात काटे साफ केलेला गुलाब घेऊन बसलेला असतो. अमरीश पुरी मोठ्या आनंदात असतो - आता अंजानगढचा खजिना त्याला मिळेल आणि रणजीतला तो या जागीरचा राजा बनवून रिटायरमेंट घेऊ शकेल. बिगुलवाल्या फरकॅपवाल्याला दारूचे ग्लासेस भरणे या कामाला ठेवले असल्याने तो तत्परतेने एक दारुचा ग्लास रणजीतला देतो. रणजीतला न पिताच चढते आणि चढ्या सुरात तो एक बाँब टाकतो. रणजीतला हे कळलेले असते की अमरीश पुरी त्याचा खरा बाप नाही तसेच तो ठाकूरही नाही. तो पूर्वाश्रमीचा डाकू लाखन आहे.

रणजीतला बहुधा खरंच चढली असावी कारण तो म्हणतो की त्याचा गद्दार बाप निर्दोष होता आणि केवळ अमरीश पुरीमुळे तो मारला गेला. उसुलोंवाला व्हिलन असल्याने अमरीश पुरी तरीही म्हणतो की मी त्या बदल्यात दिगंबरच्या मुलाला, रणजीतला आपल्या मुलासारखं वाढवलं. ते खरंही आहे कारण अमरीश पुरी रणजीतला जागीरच्या गद्दीवर बसवायला तयार असतो. पण गद्दारचा मुलगा गद्दारच! लोभीचा मुलगा लोभीच! रणजीत अमरीशला म्हणतो की घरी जा, तुला एक पैसा मिळत नाही खजिन्यातला! इथे तो स्वतःला शाही खून संबोधतो आणि त्याचे सर्व "शाही" बेनिफिट्स नाहीसे होतात. थोडक्यात आता रणजीत मरू शकतो. रणजीत अमरीश पुरीचे रहस्य इफ्तेकारला सांगण्याची धमकी देतो. यावर अमरीश पुरी फारच वैतागतो. उसुलच्या नादात त्याने अस्तनीत निखारा बाळगल्याचे त्याला लक्षात येते. त्यामुळे तो उसुल तोडून रणजीतला गोळी घालण्याचा प्रयत्न करतो. अ ने ब वर पिस्तुल रोखले तर ब च्या हातात अ च्या पिस्तुलातल्या गोळ्या असतात या नियमानुसार गोळ्या रणजीतकडे असतात. मग रणजीत लोडेड रिव्हॉल्व्हर अमरीशवर रोखतो. पण अमरीश पुरीने त्याला वीस वर्षे सांभाळले असल्याची आठवण ठेवून तो अमरीशला जीवनदान देतो. या फॅक्टमुळे खूपच प्रश्न निर्माण होतात. रणजीत तरी मेकअप वगैरे लावून तीसच्या आसपास दिसतो म्हणजे तेव्हा तो जेमतेम दहा वर्षांचा असणार. अशावेळी बाप कोण हे डिटेल विसरणे जरा अवघड असले तरी थोडा सस्पेन्शन ऑफ बिलीफ करून हे सोडून देता येते. पण धर्मेंद्र वीस वर्षांत पाच वर्षांचा पन्नास वर्षांचा कसा काय झाला? बहुधा हे लोक प्रकाशाच्या वेगाच्या वेगवेगळ्या प्रमाणात धावत असल्याने टाईम डायलेशन होत असावे.

१२.२) व्हिलनच्या गँगमध्ये बॉब क्रिस्टो नसेल तर कसलं आलंय इंटरनॅशनल अपील?

रणजीत घराबाहेर पडतो तो त्याला गुलाबी पंजाबी ड्रेस घातलेली शोमा आनंद भेटते. शोमाचा विग या सीनच्या दिवशी हरवला असावा कारण ती इथे झीनतसारखे झिपरे केस घेऊन फिरते आहे. त्यांच्या डोक्याचा आकार सारखा नसल्याने शोमाच्या डोक्यावर टोपली ठेवल्यासारखे ते केस दिसतात. रणजीत तिला सांगतो की तू माझी बहीण नाहीस. माझ्यात शाही खून आहे तुझ्यात डाकूका खून आहे. पटत नसेल तर अमरीशला जाऊन विचार. शोमा भलतीच कूल असते. ती जाऊन अमरीशला "ओ बाबा बघा ना कसा हा दादा" टोन मध्ये सांगते की रणजीत तिला डाकूका खून म्हणाला. यावर अमरीश हातातली ब्लॅक लेबलची बाटली फेकून देतो. ऐलान-ए-जंगच्या रेटने यात एक अजित वच्छानी आला असता. अनिल शर्माच्या वतीने प्रेक्षक हळहळ व्यक्त करतो.

अमरीश फारच उखडतो आणि थेट शिवीगाळ करतो. इतका वेळ त्याचे उसूल त्याला संरक्षण देत होते पण आता उसूल सोडल्यामुळे त्याला मारणेही शक्य होणार आहे. तो शोमाला वरच्या मजल्यावर जायला सांगतो पण ती आडोश्याने त्याचे सारे म्हणणे ऐकते. इथे त्या फरकॅपचे नाव तरुण असल्याचे कळते. अमरीश त्याला बॉबला बोलावायला सांगतो. इथे बॉब म्हणजे बॉब क्रिस्टोखेरीज इतर कोणी असू शकत नाही हे शेंबडे पोरही सांगेल. अमरीशने तसाही खजिन्याचा नकाशा नकलून ठेवलेला असतो त्यामुळे तो सेट असतो. शोमाला इथे कळते की आपले वडील वाटतात तितके साधे नाहीत. त्यामुळे जेव्हा पुढच्या सीनमध्ये मिथुन तिला अमरीश पुरीच पाद्री आहे असे सांगतो तेव्हा तिला तेवढा धक्का बसत नाही. पण ती भलतीच इमोशनल होते आणि राखीच्या आवाजात सगळे रहस्य उघड करते. धर्मेंद्राला आता कळते की अमरीश पुरीच मेन व्हिलन आहे. पण झीनत पॉईंट आऊट करते की तू असशील राजकुमार पण झीलपर्यंतचा रस्ता ठाऊक असलेल्या प्राणला मात्र रणजीत राजकुमार वाटतो. व्हॉट टू डू?

१२.३) जर सत्यनारायण घालायला केळीचे खुंट आणि सुपार्‍या दोन्ही लागतात तर सुपारीच्या झाडांच्या पायाशी केळीचे खुंट वाढणारच!

सुदैवाने नशेत रणजीत प्राणला सर्व रहस्य सांगून टाकतो. झीलपर्यंत पोहोचल्यामुळे त्याचे काम तसेही झालेले असते. प्राण संतापून रणजीतशी फाईटिंग करायला जातो पण रणजीत त्याला बंदिवान करतो. इकडे हिरो लोक अंजानगडला पोचतात. शेवटची वीस मिनिटे तरी खजिना आणि वेस्टर्न दाखवू असा निर्धार असल्याने सगळ्यांना गनस्लिंगरचे कपडे दिले आहेत. डॅनी आणि मिथुनला त्यांचे कपडे शोभून दिसतात. शोमा गरीबांची मेरी विंडसर दिसते पण विग आणि डोके मॅच नसल्याने किमान तिला तिची हॅट नीट बसते तरी. झीनतच्या डोक्यावर राजा राममोहन रॉयची हॅट देण्याची अचाट कल्पना कोणाला तरी स्फुरली आहे. त्याची भरपाई तिला क्वार्टर हॉर्स देऊन केली आहे - बाकीच्यांचे घोडे अरेबियन आहेत. सर्वात जास्त अन्याय धर्मेंद्रावर झाला आहे. त्याला सगळ्यात स्लो व्हाईट हॉर्स दिला आहे. बहुधा त्याच्या वजनाने घोडा तसाही हळू धावणार आहे तर कोणाला कळणार आहे असा विचार असावा. धर्मूच्या चेहर्‍यावर "लहानपणी मी या डोंगरावर करवंदे हादडायचो का त्या डोंगरावर?" असा गहन प्रश्न स्पष्ट दिसतो. अशा अवस्थेत त्याला मिथुन आणि डॅनी विचारतात की इथे तर सगळे डोंगर सारखेच दिसतात आणि आपल्याला तर रस्ता माहित नाही. आता? पाजी असल्या चिल्लर अडचणींनी डगमगणारे नसतात. ते मोठ्या रुबाबात म्हणतात "हम अपना रास्ता खुद बनायेंगे."
.........
.........
.........
वरून कमल कपूरची आत्मा ओरडते "कारट्या, रस्ता स्वतःचा स्वतःच शोधणार होतास तर इतके पैसे घालून ते लॉकेट आणि तो नकाशा कशाला बनवला? पैसे काय झाडाला लागतात?"

या लोकांना घोडेस्वारी शिकवण्याकरिता केलेला खर्च वसूल करण्यासाठी त्यांचे घोडेस्वारीचे शॉट्स आहेत. डॅनी, मोंटू आणि शोमा एका दिशेने जातात. पाजी, मिथुन आणि झीनत स्टार असल्याने वेगवेगळे जातात. एक डाव मिथुनचा सांभाळ केलेले लोक दाखवणे गरजेचे असल्याने इथुन तिथुन मिथुन त्या लोकांच्या बस्तीत पोहोचतो. ते लोक सुद्धा "सांगा आया, सांगा आया" करत नाचायचेच बाकी ठेवतात. बट मिथुन गॉट नो चिल! तो सरळ विचारतो, "इकडे शहरी लोक कुठे आलेत का?" एकजण म्हणतो "हो, त्या तिथे. पलीकडे. तिकडे. झील के पास (तुम्हाला काय वाटलं? इतक्या सहजा सहजी तो प्रियेचा अ‍ॅड्रेस थोडीच देणार आहे?)" मिथुन म्हणतो ओके बाय. तडक तिकडे जातो तर बघतो सगळा तळ ज्वालांनी वेढला आहे आणि मध्यभागी एका खांबाला प्राणला बांधले आहे.

हिरो असल्यामुळे प्राणचे रक्षण करणे त्याचे कर्तव्य असतेच पण त्याखेरीज रिंगमास्टरची हॅट दिल्यामुळे सर्कसवाल्या कलाबाजी करणे पण अत्यावश्यक असते. त्याला आपले कर्तव्य पार पाडता यावे म्हणून तिथे सुपारीची उंचच उंच झाडे येतात. त्या झाडांच्या साहाय्याने तो रणजीतच्या अग्निकंकणात प्रवेश करून प्राणचे प्राण दुसर्‍यांदा वाचवतो. पण रणजीत हातचा निसटतो. तो केव्हाच तळ सोडून पसार झालेला असतो. कर्तव्य पार पडल्याने ती उंच झाडे जाऊन तिथे केळीचे खुंट येतात. बहुधा मिथुनच्या पालक वडलांना सत्यनारायण घालायचा असावा. तेही मागोमाग येतात. प्राणच्या जखमा बर्‍या करायला ते संजीवनी मलम मागवतात!! मिथुनची पालक आई त्याला धीर देत म्हणते की तू आम्हाला सापडला तेव्हा तर तुझ्या तर पाठीच्या तलवारींनी चिंधड्या झाल्या होत्या. त्यामानाने प्राणला काहीच झालेलं नाही, तू चिंता करू नकोस. आता प्राणपाशी कुलक्षणी भाभू नसल्यामुळे कोणी टॉपिक चेंज करत नाही आणि प्राणला मिथुन आपलाच मुलगा असल्याचा साक्षात्कार होतो.

कथेत आता नवीन मुद्दे उपस्थित होणे थांबले आहे. रहस्ये उलगडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच क्लायमॅक्समध्ये आपण प्रवेश केलेला आहे.

यावर अमरीश हातातली ब्लॅक लेबलची बाटली फेकून देतो. ऐलान-ए-जंगच्या रेटने यात एक अजित वच्छानी आला असता. अनिल शर्माच्या वतीने प्रेक्षक हळहळ व्यक्त करतो.<<<<<
Lol Rofl काय कहर मुद्दा आहे!

रच्याकने, आत्मा 'ओरडतो'... फक्त हिंदीतली 'रुह' स्त्रीलिंगी!

अशक्य आहे
हा धागा आनि प्रतिसाद
Proud Proud :फिदी
९७

बाप रे! किती उलट सुलट कथा आहे...नक्की कुणाचे कोण याचा काही पत्ताच लागत नाही!
यात नक्की किती नायक व किती खलनायक आहेत? मिथून, धरम पाजी, प्राण, रणजीत, भा भू, अमरीष , बॉब क्रिस्टो.......!!! भली लांबलचक लिस्ट!
आणि मधेच ते शोमाला इथे कळते की आपले वडील वाटतात तितके साधे नाहीत. त्यामुळे जेव्हा पुढच्या सीनमध्ये मिथुन तिला अमरीश पुरीच पाद्री आहे असे सांगतो तेव्हा तिला तेवढा धक्का बसत नाही.. असं काय लिहीलंय...?

कथेला किमान काही एक तरी सिक्वेंस अथवा लॉजीक असावं (भलेहि ते अतर्क्य असेना) इतकीही किमान अट ही कहाणी पूर्ण करीत नाही!

हिरो असल्यामुळे प्राणचे रक्षण करणे त्याचे कर्तव्य असतेच पण त्याखेरीज रिंगमास्टरची हॅट दिल्यामुळे सर्कसवाल्या कलाबाजी करणे पण अत्यावश्यक असते. त्याला आपले कर्तव्य पार पाडता यावे म्हणून तिथे सुपारीची उंचच उंच झाडे येतात>>>

जबरी पन्चेस आहेत सगळे
१००
Happy Happy

@पायस... मस्त लिहीले आहे.

तुमचा लेख एका मॉनिटरवर आणि दुसर्‍या मॉनिटरवर जागिर (रशियन भाषेत) असा बघतोय...भाषेची अडचण तुमच्या लेखामुळे दुर झाली आहे. आता तुम्ही या चित्रपटला तुमच्या शैलीत मराठीत डबींग करून घ्या....फार छान होईल..

बाकी राहूल देव बर्मन यांनी या चित्रपटासाठी जितके टुकार संगीत देता येईल याचा प्रयत्न मुद्दामुन केला आहे असे वाटते. त्यांनी असे संगीत दिले आहे की ज्याने करून उगाच फक्त गाण्यांसाठी लोकं नको परत यायला. एक गाणेसुद्दा आर. डीं नी गायले आहे. त्या काळात बहूधा जिंक्स असावे की आर.डींच्या आवाजात एक जरी गाणे चित्रपटात असेल तर चित्रपट हिट...!! आर.डीं.नीं ही जिंक्स तोडण्याच्या पुरेपूर प्रयत्न एक गाणे गाऊनच केला की जेणे करून प्रेक्षक परत न येवोत.

पण त्या काळात आपण प्रेक्षक फारच क्रेझी होतो. म्हातार्‍या धर्मेंद्रच्या एका घोडेस्वारीच्या सिनसाठी २-३ दा चित्रपट पहाणारी लोकं पाहीली आहेत. माझा एक मावसभाऊ अनिल शर्माचा इतका फॅन होता की त्याने हुकूमत, ऐलान-ए-जंग, फरिश्ते आणि तहलका हे चित्रपट निदान ३-४ वेळा थेटरात पाहीले आहेत. मी हुकूमत नंतर असले चित्रपट पहायचे सोडले होते. पण बाकीचे चित्रपट फारएण्ड आणि तुमच्या परीक्षणामुळे पाहीले.

त्या काळात बहूधा जिंक्स असावे की आर.डींच्या आवाजात एक जरी गाणे चित्रपटात असेल तर चित्रपट हिट...!! आर.डीं.नीं ही जिंक्स तोडण्याच्या पुरेपूर प्रयत्न एक गाणे गाऊनच केला की जेणे करून प्रेक्षक परत न येवोत.
>> पण आले ना प्रेक्षक परत परत. त्या वर्षीचा highest grossing चित्रपट आहे हा.

१३) क्लायमॅक्स

१३.१) रणजीतचा अंत

रणजीतला केवळ आणखी एक झील पार करायची असते की मग तो खजिन्याच्या पहाडीजवळ पोहोचणार असतो. या आनंदात तो नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित करतो. हिरो लोक या संधीचा फायदा उठवण्याचे ठरवतात. भविष्यात हा सिनेमा रशियनमध्ये डब होणार याची कल्पना असल्यामुळे डॅनीला उशांका (https://en.wikipedia.org/wiki/Ushanka) घालायला दिली आहे. झीनत आणि शोमा आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून तोंडावर रेशमी रुमाल बांधतात . गाणे बजावण्यासाठी मिथुनच्या कबिल्यातले खानाबदोश आणले असावेत. मग मिथुन, झीनत आणि शोमा वंजार्‍यांचे सोंग वठवून गाणे सादर करतात - सबको सलाम करते हैं, सबसे कलाम करते हैं. अर्थः आम्ही सर्वांचा आदर करतो (त्यांना नमस्कार करतो) आणि सर्वांशी संवाद साधतो. आपले हिरो लोक सर्वसमावेशक असल्याचे हे द्योतक आहे. त्याविरोधात "शाई खून" म्हणून बोंबाबोंब करत असलेला, भेदाभेद मानणारा रणजीत आणून चक्रवर्तीकाकांनी बंगाली दिग्दर्शकांना कंपल्सरी असलेली सोशलिस्ट कमेंट्री मारली आहे.

या गाण्याविषयी काहीही लिहिण्यासारखे नाही पण या गाण्याच्या कोरिओग्राफीवर खूप काही लिहिण्यासारखे आहे. संपूर्ण गाण्यात डॅनीला घोड्यावर का बसवले आहे ते काही कळत नाही. धर्मेंद्रला या गाण्यातून वेगळे काय साधले तेही कळत नाही. त्याला डॅनीप्रमाणेच घोड्यावर बसवून ठेवता आले असते. झीनतने काळ्या रंगाचा रुमाल बांधल्यामुळे तिचा डिसगाईज जेनुईन तरी वाटतो. शोमाच्या तोंडावरच्या पारदर्शी जाळी काय डिसगाईज करते कोणास ठाऊक! त्यात ती मधूनच ती जाळी बाजूला करून प्रेक्षकांना डोळा मारते. यातून प्रेक्षकांनी काय बोध घ्यावा? बरं रणजीतला ती परवा परवापर्यंत भैय्या म्हणत असते. मग स्वतःहून त्याच्या अंगचटीला जाऊन नाचण्याचा धोका पत्करण्यामागे काय विशेष कारण असावे? जवळ मिथुन होता म्हणून नाहीतर रणजीतचे एक्सप्रेशन बघता तिचं काही खरं नव्हतं. आणि सर्वात कहर, प्राणला पायरेटचा, तोही लाँग जॉन सिल्व्हरचा वेष देऊन थीमॅटिक इंटेग्रिटी का तोडली असावी? बरं रुपकही नीट जुळत नाही. जॉन सिल्व्हर लंगडा असतो, थोटा नाही.

असो, तर गाणे संपते तेव्हा झीनत तिचे नृत्यकौशल्य रणजीतला दाखवत असते. झीनतचा डान्स आणि सेहवागची बॅटिंग यात एक विलक्षण साम्य आहे. दोघांमध्येही फूटवर्कचा अभाव आहे. तर झीनत रणजीतसमोर नाचत असते. नाचता नाचता ती रणजीतच्या गळ्यातले लॉकेट काढून घेते आणि आपला नकाब हटवते. रणजीतची नशा खाडकन उतरते. झटापटीत लॉकेट दूर फेकले जाते. डॅनी धावत जाऊन लॉकेटमधला नकाशा बघतो. रणजीत लगोलग तो नकाशा आगीत फेकतो. म्हणा याचा काही फायदा नसतो, कॉज डॅनी हॅज ए फोटोग्राफिक मेमरी! रणजीतचे सिनेमातले काम झालेले असल्यामुळे त्याची अवतार संपवायची वेळ झालेली असत्ते. त्यास अनुसरून मोंटू रणजीतला ओळखतो आणि डॅनीला सांगतो की हाच बीनाच्या मृत्युस जबाबदार आहे. यावर क्रमाने डॅनी, मिथुन, प्राण, झीनत आणि शोमा आपले सुरेफेकीचे कौशल्य दाखवतात. सर्कसच्या खेळात जसे सुरे माणसाच्या खूप जवळ पण शरीराला लागणार नाहीत अशा बेताने मारायचे असतात अगदी तशीच सुरेफेक होते. रणजीत याने घाबरून जाण्याऐवजी खुश होतो कारण त्याला हे लोक आयतेच शस्त्र देतात. मग रणजीत व डॅनी थोडावेळ झोंबाझोंबी करतात. याक्षणी कोणी एक असिस्टंट म्हणला असावा "सर कुछ मजा नही आ रहा". लगेच चक्रवर्तीकाकांना आठवले की "अरेच्चा, आपल्या अंजानगडमध्ये एक नदी पण आहे." फायटिंग लगेच नदीत शिफ्ट होते. बीनाने जसा स्वतःच्या पोटात चाकू मारलेला असतो तसाच डॅनी रणजीतचा हात मुरगाळून रणजीतच्याच हाताने रणजीतला भोसकतो. रणजीत खलास, अमरीश पुरी बाकी!

१३.२) अमरीश पुरीचा अंत

दुसर्‍या दिवशी सकाळी अमरीश पुरी, बॉब क्रिस्टो, मॅक मोहन आणि फरकॅपवाला पंचवीस तीसजणांचे घोडदळ घेऊन खजिन्याच्या पहाडीपाशी पोहोचतात. घोडदळात कदाचित आणखीही लोक असतील, घोड्यांचे शॉट सुस्पष्ट नसल्याने अंदाज बांधता येत नाही. हे घोडदळ बॉब क्रिस्टोच्या हाताखालच्या लोकांचे असल्याने त्याला एकट्यालाच मशीनगन दिली आहे. हे थोडे थोडे १९९२ च्या तिलक सारखे आहे ज्याच्यात शिल्पा शिरोडकर गिरोहची सरदार असल्याने तिला एकटीलाच मशीनगन मिळते. बाकी सगळ्यांना चंबळ डाकू स्टँडर्ड १२ गॉज डबल बॅरल शॉटगन दिल्या आहेत. त्या कदाचित अमेरिकी बनावटीच्या असल्यामुळे त्यांना कोचगन म्हणता येऊ शकते जेणेकरून वेस्टर्न मोटिफ पूर्ण व्हावा. अमरीश पुरीलाही सिंगल बॅरल रायफल मिळाल्यामुळे त्याच्यावर काहीसा अन्याय झाला आहे खरा पण बॉब क्रिस्टो सीनमध्ये असल्यावर उन्हात चमकण्याचे चान्सेस फार नसतात.

आपल्याला हवी असलेली पहाडी हीच असल्याची खातरजमा झाल्यानंतर अमरीश पुरी ती पहाडी बाँबने उडवून द्यायला सांगतो. खजिन्याचे कोरीवकाम केलेले दगडी दार बघून सगळे तिथे बाँबफेक सुरू करतात. बाँबचा आवाज धरमपाजींचे लक्ष वेधून घेतो. पाजी लगेच अमरीश पुरीच्या दिशेने घोडा पळवतात. इकडे अमरीश पहाडीच्या आत पोहोचलेला असतो. काचेचे हिरे मोती आणि पितळेच्या मूर्ती पाहून अमरीश पुरीचा आनंद गगनात मावत नाही. हा करोडों का खजाना तो थैल्यांमध्ये भरून घ्यायला सांगतो. स्वतः तो शंकराच्या मूर्तीवरचा हिरेजडीत नागमुकुट घ्यायला पुढे होतो. तेव्हा शमशेर द मिरॅक्युलस ससाणा येऊन त्याला जखमी करतो आणि मुकुट घेऊन गुहेबाहेर निघून जातो. काही घडलेच नाही अशा आविर्भावात ते लोक आपले काम चालू ठेवतात. इकडे धर्मेंद्राला ओळख पटावी म्हणून शमशेर परत गरुड होतो आणि मुकुट धर्मेंद्रला देतो. मुकुट बघून पाजींना कळते की व्हिलन लोक खजिन्यापर्यंत पोहोचले आहेत. मग तो शमशेरला खजिन्याचा रस्ता दाखवायला सांगतो. थोड्याच वेळात ते त्या पहाडीपर्यंत पोहोचतात. धर्मेंद्र बॉब क्रिस्टोची मशीनगन वगळता इतर सर्व बंदूका झाडीत फेकून देतो. उपलब्ध संसाधनांचा असा अपव्यय शमशेरला खपत नाही. मग तो सर्व बंदूका ओळीने मांडून ठेवून त्यातून एक दोरी ओवतो. त्या दोरीचे एक टोक स्वतःच्या चोचीत पकडून दबा धरून बसतो. अमरीश पुरी बाहेर येताच पाजी वीरश्रीपूर्ण संवाद मारून त्याला उचकवतात. आश्चर्य म्हणजे आता घोडदळ जेमतेम दहा लोकांचे असते. तसेच त्यांच्याकडे बंदुकाही परत आलेल्या असतात. मग फायटिंग होते. पाजी आणि शमशेर बर्‍याच लोकांना मारतात. स्वतः पाजी बॉब क्रिस्टोला जातीने तुडवतात. पण कोणी एक चिल्लर गुंड दोरीचा फास टाकून धर्मेंद्रला पकडण्यात यशस्वी होतो. मग अमरीश पुरी धर्मेंद्रला घोड्याला बांधून फरफटत कमल कपूरच्या समाधीकडे घेऊन जाऊ लागतो. नदीपाशी आल्यावर अचानक कोणीतरी गोळी झाडते आणि धर्मेंद्रला बांधणारी दोरी तोडते. तो प्राण असतो.

प्राण अमरीश पुरीला सांगतो की तुला काहीच जमत नाही. माझ्या मुलाला पण तुला मारता आलं नाही, तो आता मिथुन झाला आहे. प्राणचा मुलगा मिथुन आहे हे ऐकून धर्मेंद्र दोन सेकंदच का होईना पण अशक्य कमाल एक्सप्रेशन देतो. मोनालिसाच्या गूढ हास्यानंतर सर्वाधिक क्रिप्टिक हास्य ते हेच! हे ऐकल्यावर अमरीश म्हणतो फार बिल झालं, आता फायटिंग करू. इथे एक कंटिन्युटी राखल्याबद्दल कौतुक केले पाहिजे. क्लोजअप मध्ये पूर्णवेळ शमशेरने केलेली जखम अमरीश पुरीच्या चेहर्‍यावर आहे. तर फायटिंग! डॅनी बॉब क्रिस्टोसोबत कराटे फाईट करतो. त्या फाईटचा निकाल काही तुनळीवर दाखवलेला नाही पण शेवटची लाथ डॅनीने मारली म्हणजे तो जिंकला असावा. झीनत अमान दगडांमागे लपून रायफलने स्नायपिंग करते. शोमा आनंद एकाच अँगलने पिस्तुलातून गोळ्या झाडते पण त्याने गुंड चारही दिशांना मरतात. मोंटूसुद्धा दगड फेकून काही गुंडांना मारतो. त्यामानाने धर्मेंद्र, मिथुन आणि प्राणची नेमबाजी फारशी अचूक नाही.

आपली साईड हरत आहे बघून अमरीश पुरी मिथुनवर मागून हल्ला करायला जातो पण पाजी सावध असतात. ते एक गोळी झाडतात आणि अमरीश पुरीची बंदूक खाली पाडतात. मग स्वतःची बंदूक फेकून देतात. अमरीश आपली बंदूक उचलायला जातो तर मिथुन एक गोळी झाडतो आणि स्वतःची बंदूक फेकून देतो. नि:शस्त्र माणसांसोबत शस्त्र वापरून लढणे अमरीशला प्रशस्त वाटत नसल्याने तो परत बंदूक उचलण्याचा प्रयत्न करत नाही. या चांगुलपणाचा फायदा घेऊन धर्मेंद्र आणि मिथुन त्याला बडवायला लागतात. ही बडवाबडवी चाललेली असताना झीनत आणि शोमा उर्वरित गुंड संपवतात. राहता राहतो मॅकमोहन. मॅक हुशार असतो. तो बंदूक घेऊन एका उंचशा दगडावरून या लोकांवर नेम धरतो आणि बॉब क्रिस्टोची मशीनगन अमरीशला देतो.

अमरीश पुरी विकट हास्य करतो. शोमा आनंद मध्ये पडून म्हणते की आधी मला मारा. अमरीश पुरी सहृदय बाप असला तरी व्हिलन निर्दय असतो. तो तिला बाजूला ढकलून देतो. पाजींकडे वाढत्या वयाबरोबर तेवढी चपळाई राहिलेली नसते. ते या संधीचा फायदा घेऊन मशीनगन हिसकावण्यात अपयशी ठरतात. अमरीश पुरी पुन्हा एकदा विकट हास्य करतो. हिरोंनाही कळते की आता काही होऊ शकत नाही. पण दोन्ही बाजू एक फॅक्टर विसरलेल्या असतात. शमशेर अमरीश पुरीवर झडप घालतो. या नादात अमरीश बंदूक १८० अंशात फिरवतो, उलटी पकडतो आणि स्वतःवरच झाडून घेतो. हा चमत्कार कसा झाला याचा विचार करेपर्यंत झीनत अमान मॅकला गोळी घालते आणि सगळे व्हिलन संपतात.

थोडाच वेळ उरला असल्यामुळे आता संदेश द्यायची वेळ झालेली असते. अमरीश मरता मरता प्राणची तारीफ करतो. काय करणार व्याह्याला खुश ठेवलं पाहिजे, मुलगी त्याच्या घरात द्यायची आहे. त्यात आईविना पोर ती! प्राणचा आनंदी चेहरा बघून अमरीशला कळते की घरात शोमाला सासू नाही. सुटकेचा निश्वास टाकून तो मरतो. सगळं नीट झाल्यामुळे दिवाळी असल्यासारखी हवेली सजवली जाते. धर्मेंद्र एका गाडीतून झीनतला घेऊन हवेलीत येतो. प्राण जागीर त्याच्या हवाली करतो. धर्मेंद्रही एक संदेश द्यायचा म्हणून देतो - खरी जागीर त्याचे मित्र आहेत. धर्मेंद्र, मिथुन आणि डॅनी प्रसन्न हसतात. पुन्हा एकदा हम दिलवाले वाजू लागते आणि तिघांच्या घोडेस्वारी करतानाच्या शॉटवर सिनेमाची इति होते.

|| समाप्त ||

अश्यक्य अश्यक अश्यक लिहिला आहे.
हा महाचित्रपट आधी बघितला होता, "हे स्फोट जवळून दिसतात तरी कसे" हे बघण्याची इच्छा असलेला प्राण तिकडे आलेला असतो. हा सीन अजूनही आठवतो.
पण आता एवढा जबऱ्या रिव्यू लिहिला आहे त्यामुळे पुन्हा महाचित्रपट बघितलाच पाहिजे

पायसा, धन्य आहेस! कसले बारकावे टिपले आहेस!! शैली अफाट!!

तुला ह्या क्राफ्ट वर्क मधे सहाय्य करणार्या फारएण्डाचं सुद्ध कौतुक आहे. पण आता बरेच दिवस असिस्टंट डायरेक्टरकी केल्यावर त्यांनी स्वतंत्र पणे एक सिनेमा का(फा)डून दाखवावा अशी त्यांना आणी श्रद्धाताईंना, 'हम बटाट्याकी चाळ की ओरसे, निवेदन देने का एक स्वप्न......हमारे उर मे बाळगते है - करेंगे या मरेंगे".

Lol

पायस - यातील क्लिप्स तुझे परीक्षण वाचत बघत असल्याने मागे पडलो आहे. मागच्या तुझ्या ३-४ पोस्टी वाचल्या नाहीत अजून. कॅच अप करतो लौकरच

मागे त्या 'ऐलाने जंग' च्या धाग्यावेळी धर्मूने जयाला वळीकल्याचा सीन व या जागीरमधील 'प्राणचा मुलगा मिथुन आहे हे ऐकून धर्मेंद्र दोन सेकंदच का होईना पण अशक्य कमाल एक्सप्रेशन देतो. मोनालिसाच्या गूढ हास्यानंतर सर्वाधिक क्रिप्टिक हास्य ते हेच! ' हा सीन आवर्जून तुनळीवर पाहिले....बेक्कार हसलोय.. Rofl
भारीच जमलंय पायस!

धन्यवाद लोक्स! कैक महिने पुरेल एवढे मटेरिअल आहे, निवांतपणे वाचा आणि धरमपाजींना त्यांची जागीर परत मिळवताना नक्की बघा Proud

आता सगळा रिव्ह्यू एकत्र करून नवीन धागा काढ रे पायस >> काढू शकतो पण खूप लांबलचक होईल. माबोवर शब्दसंख्येवर काही मर्यादा आहे का? कॉलिंग अ‍ॅडमिन/वेबमास्तर. अर्थात जर या फॉर्ममध्ये वाचताना फारसे अवघड जात नसेल तर माझ्यामते नवीन धागा काढण्याची जरूर पडू नये.

त्यांनी स्वतंत्र पणे एक सिनेमा का(फा)डून दाखवावा अशी त्यांना आणी श्रद्धाताईंना, 'हम बटाट्याकी चाळ की ओरसे, निवेदन देने का एक स्वप्न......हमारे उर मे बाळगते है - करेंगे या मरेंगे". >> सही पकडे हैं Lol फारएण्ड, श्रद्धा होऊन जाऊ दे एक परीक्षण. माझाही फेरफटकाच्या निवेदनाला पाठिंबा Happy

पायस - यातील क्लिप्स तुझे परीक्षण वाचत बघत असल्याने मागे पडलो आहे. मागच्या तुझ्या ३-४ पोस्टी वाचल्या नाहीत अजून. कॅच अप करतो लौकरच >> Happy लौकर कर रे कॅच अप. आणि रेल्वेचे ब्लूपर्स काढण्याचा मी प्रयत्नही केलेला नाही, तुलाच जास्त चांगले जमेल ते. त्या एका सीनमध्येच तू खंडीभर चुका काढशील Lol

बापरे!! अशक्य लिहीलय Lol

हे असलं काहीतरी वाचून आता कुठलाही सिनेमा सरळ नजरेने पाहणेच बंद झालेय.
काल कर्मा पहातांना त्यात पण मनातल्या मनात चिरफाड होत होती Biggrin

अमरीश मरता मरता प्राणची तारीफ करतो. काय करणार व्याह्याला खुश ठेवलं पाहिजे, मुलगी त्याच्या घरात द्यायची आहे. त्यात आईविना पोर ती! प्राणचा आनंदी चेहरा बघून अमरीशला कळते की घरात शोमाला सासू नाही. सुटकेचा निश्वास टाकून तो मरतो. >>>> images.jpg

Pages