जागीर

Submitted by पायस on 20 July, 2018 - 02:28

१९८१ साली इंडियाना जोन्स अ‍ॅन्ड रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क आला आणि अचानक खजिना-शोध या जॉनरला नवचैतन्य प्राप्त जाहले. त्याला फॉलो अप म्हणून स्पीलबर्गने १९८४ साली टेंपल ऑफ डूम रिलीज केला. एवढे होत असताना बॉलिवूडने मागे राहणे हे बॉलिवूडच्या शान के खिलाफ असल्याने कोणीतरी हे फेकलेले गाँटलेट उचलणे गरजेचे होते. त्यात प्रश्न आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकाला रुचेल असा सिनेमा बनवण्याचा अनुभव असणेही गरजेचे होते. म्हणून "लव्ह इन टोकियो" मधून जपानी लोकांना आशा पारेख जपानी आहे हे पटवून देण्याचे महान कार्य करणार्‍या प्रमोद चक्रवर्तीने त्याच वर्षी जागीर नामे चित्रकलाकृती निर्मिली. या महान कार्याचा आढावा घेण्याकरता हा चिरफाड, आपलं रिव्ह्यू प्रपंच!

१) रम्य ही स्वर्गाहून जागीर

मांगा इन थिअरी अ‍ॅन्ड प्रॅक्टिस या अप्रतिम पुस्तकामध्ये प्रसिद्ध लेखक हिरोहिको अराकी सांगतो की तुमच्या कथेचा मुख्य मुद्दा कथा सुरू झाल्या झाल्या स्पष्ट झाला पाहिजे. जेव्हा अराकी त्याची उमेदवारी करत होता तेव्हाच्या काळात सुद्धा आमच्या चक्रवर्तीकाकांच्या डोक्यात हा मुद्दा पक्का होता. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता ते आपल्याला खजिना दाखवून मोकळे होतात. कारण खजिना किती आहे हे महत्त्वाचे नाही. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास महत्त्वाचा आहे. मग खजिन्याबद्दल रहस्य निर्माण करून काय फायदा?

तर कमल कपूर (अमिताभच्या डॉनमधला नारंग) शूरवीर सिंह म्हणून अंजानगढचा राजा दाखवला आहे. ज्याला इंग्रजीत प्लूम्ड टर्बन म्हणतात आणि ज्याला आपण पीस खोवलेला फेटा म्हणतो असा फेटा, जोधपुरी सूट आणि गळ्यात मोत्यांच्या माळा असल्याने त्याच्या राजेपदावर शिक्कामोर्तब होते. राजा असूनही बिचार्‍याकडे एक जागीरच काय ती असते. त्याचे राज्य नक्की कुठे असते असे भौगोलिक प्रश्न व्यर्थ आहेत. कारण तो कोणत्या तरी मोठ्या शहराच्या जवळ राहत असतो ज्याच्यापासून थोड्याच अंतरावर नदी, जंगल, माळरान, डोंगर, दर्‍या सर्व काही असते यापेक्षा जास्त माहिती चक्रवर्तीकाका आपल्याला देत नाहीत. याच डोंगर दर्‍यांमध्ये कुठेतरी त्याचा राजवाडा असतो. तिथेच कुठेतरी एक पहाडी असते. त्या पहाडीच्या खाली शाही खजिना असतो.

सिनेमा सुरु होतो तो कमल कपूर खजिन्याच्या खोलीत उभा राहून शंकराच्या मूर्तीशी गप्पा मारत असतो. टेंपल ऑफ डूम ला उत्तर द्यायचे असल्याने खजिन्याच्या खोलीला मंदिराचे स्वरुप दिलेले आहे. त्याच्या दरवाज्यावर सात घंटा टांगलेल्या आहेत. खजिना म्हणून जेवढं मध्यम वर्गीय बंगाल्याला सुचू शकतं तेवढं दाखवलेलं आहे. इथे वाचकांनी नोंद घ्यावी की याच व्यक्तीने धर्मेंद्राचा अलिबाबा और चालीस चोर बनवला होता. असो, तर कमल कपूर सांगत असतो की त्याला हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेलेला असल्यामुळे तो आता खजिन्याची जबाबदारी राजकुमारावर सोपवण्याच्या विचारात आहे (इथे मूर्तीच्या चेहर्‍यावर बरी ब्याद टळली असे भाव). तर त्याला आशीर्वाद दे इ. इ. मूर्तीच्या मनातही बहुधा प्रेक्षकाच्या मनात चमकून जातो तोच प्रश्न येतो - ते आशीर्वाद देतो मी पण ज्याला द्यायचा तो राजकुमार कुठे आहे? याला उत्तर म्हणून कमल कपूर घंटा वाजवतो आणि कुठून तरी एक गरुड पैदा करून बाहेर पडतो.

हिंदी सिनेमात प्राणी-पक्षी अमर्यादित प्रमाणात चतुर असल्याने कमल कपूर सारासार विचार करून राजकुमार खजिन्याची जबाबदारी घेईपर्यंत त्याच्या रक्षणाची जबाबदारी बाजबहादूर शमशेर असे भरभक्कम नाव असलेल्या त्या गरुडावर टाकतो. त्याला हे माहित नसते की आपल्या गरुडावर कोणीतरी नजर ठेवून आहे. तो असतो डाकू लाखन सिंह अर्थात अमरीश पुरी. अमरीश पुरीला या खजिन्यात रस असतो पण अंजानगढचा भूगोल समजायला फारच क्लिष्ट असल्याने त्याला दुर्बिणीतून ती पहाडी दिसत असूनही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नकाशाची गरज असते. शूरवीर सिंगचा भाऊ दिगंबर सिंग (सुब्रतो महापात्रा, सत्यम शिवम सुंदरम मधला शास्त्री) हा अमरीश पुरीला जाऊन मिळालेला असतो. तो खजिन्याच्या अर्ध्या हिश्श्याच्या बदल्यात नकाशा कुठे आहे हे सांगायला तयार होतो. नकाशा एका लॉकेटमध्ये असतो जे कमल कपूर घालून फिरत असतो. अमरीश पुरी लगेच ते लॉकेट ताब्यात घेण्यासाठी अंजानगडाच्या हवेलीकडे कूच करतो.

2) प्राणिमात्रांचे ऋण

2.1) शाही उपसर्गाची संकल्पना

दिगंबरच्या दगाबाजीची कल्पना नसलेला कमल कपूर निवांतपणे प्राणशी गप्पा मारत असतो. प्रत्येक शाही खानदानाचा नोकर असलाच पाहिजे या नियमानुसार प्राण मंगलसिंग नावाने शाही नोकर दाखवला आहे. राजकुमार मोठा होईपर्यंत शाही खजिन्याचे रहस्य आणि नकाशावाल्या ‘लाकट’ ची जबाबदारी कमल कपूर प्राणवर सोपवतो.
याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे की अशा सिनेमात जर शाही हा उपसर्ग नावामागे लावला असला तर तो/ती बाय डिफॉल्ट भारी आणि मरणार नाही हे फिक्स असते. म्हणून राजकुमार कधी मरत नसतात कारण उनके रगों में शाही खून दौडत असते. दुसरं म्हणजे जोवर उघड उघड शाही हा उपसर्ग प्रयुक्त होत नाही तोवर शाही उपसर्गाची सुरक्षा प्राप्त होत नाही. तिसरं म्हणजे या उपसर्गाची प्रयुक्तता तुम्ही स्वतःकरिता करून उपयोग नाही. अन्यथा आत्मप्रौढीचा नियम या उपसर्गाच्या सुरक्षाचक्राचा भेद करतो. चौथे म्हणजे जर तुमच्याकडे एखाद्या शाही वस्तूची जबाबदारी असली तर तुम्ही शाही राजदार बनून तुम्हाला हा नियम लागू होतो. कमल कपूर शाही राजा नसल्याने तो मरणार, दिगंबरमध्ये शाही खून असले तरी त्याचा प्रत्यक्ष उल्लेख न झाल्याने तो मरणार आणि प्राणकडे शाही खजिन्याचा नकाशाचे शाही रहस्य सोपवले असल्याने तो जगणार हे नक्की झाले.

2.2) मूर्ख राजाकडे नोकरी करू नये

कमल कपूर अशक्यप्राय मूर्ख दाखवला आहे. अमरीश पुरी राजवाड्यात येतो. त्याला ते लाकट हवे असते. कमल कपूर विचारतो की तुला कोणी सांगितलं, लगेच मागून दिगंबर सिंग म्हणतो की मी. त्या दिवशी तू मला ५००० रुपये द्यायला नकार दिलेला आता मला अमरीश पुरी 5 कोटी देणार आहे. थोडं गणित करूयात. सिनेमा १९८४ चा. यानंतर तरी पंचवीस तीस वर्षे निघून जातात (ही कमीच आहेत. प्रत्यक्षात धर्मेंद्र पन्नाशीचा दिसतो). दिगंबरला खजिन्याचा अर्धा हिस्सा मिळणार म्हणजे खजिन्याची तेव्हाची किंमत १० कोटी रुपये. सध्याच्या भावाने तरी ५०० कोटी रुपये. हा आकडा नंतर कामी येईल.

५००० हजार देऊन जे टाळता आले असते ते न टाळल्याचा मूर्खपणा लपवण्याकरिता कमल कपूर विषय दगाबाजीकडे वळवतो. त्यावर अमरीश पुरी म्हणतो "आज के जमाने में वफादारी की उम्मीद तो आजकल सिर्फ कुत्ते से की जा सकती हैं. फिर ये तो इन्सान हैं."

इथे मौका देख के संकलक चौका मारतो. कट टू वफादार प्राण. प्राण तिकडे राजकुमारच्या गळ्यात ते लाकट टाकून त्याला चेतक नावाच्या घोड्यावर बसवून जायला सांगतो. इथे राजकुमारचे नाव प्रताप ठेवून पोएटिक जस्टिस साधण्याची संधी दिग्दर्शक दवडतो. चेतकला एस पी साबचे घर ठाऊक असल्याने प्राण सर्वकाही समजावणारी चिठ्ठी देण्याचे काम घोड्याला सांगतो. घोडासुद्धा समजूतदारपणे मान हलवतो. मग राजकुमार आणि घोडा एस पी इफ्तेकारच्या घराच्या दिशेने पळतात. इथे प्राणच्या मुलाकडे घोड्याइतका समजूतदारपणा नसल्याने तो फक्त चड्डी घालून हिंडत असतो. मग प्राण त्याला राजकुमारचे भरजरी कपडे घालायला देतो.

इकडे लॉकेट देत नसल्याने लाखन आणि दिगंबर राजावर बंदूक ताणून उभे असतात. तेवढ्यात प्राण मध्ये पडतो. प्रजा का सबसे बडा खजाना कमल कपूर असल्याचे सांगून तो तसेच गरुडाच्या आकाराचे नकली लॉकेट देतो. कधीतरी महाराज आपल्याला त्यांच्या गळ्यातले लॉकेट देतील आणि ते शत्रूला हवे असू शकते म्हणून नकली लॉकेट बनवून ठेवावे एवढा अंतर्यामी प्राण असतो. म्हणून दिगंबर आपण राजा शूरवीर सिंगचेच बंधुराज असल्याचा पुरावा देत केवळ ते गरुडाच्या आकाराचे आहे म्हणून खरे लॉकेट असल्याचे छातीठोकपणे सांगतो. लाखन मात्र अधिक हुशार असल्यामुळे तो आधी नकाशा चेक करायचे ठरवतो. तेव्हा प्राण थातुर मातुर कारण देऊन ते टाळतो.

इथे कमल कपूर मूर्खपणा नंबर दोन करतो. अमरीश पुरीचे समाधान झालेले असल्याने तो घरी जायला निघालेला असतो तर विनाकारण कमल कपूर त्याच्या सोबत असलेल्या सुब्रतो महापात्रावर गोळी चालवतो. दिगंबर जरी शाही खानदानाचा असला तरी उपरोक्त नियमानुसार त्याच्यासाठी शाही उपसर्ग थेट प्रयुक्त झाला नसल्याने त्याला संरक्षण मिळत नाही आणि तो मरतो. इंटरेस्टिंगली कमल कपूरच्या दुनळी बंदूकीत दोन गोळ्यांची जागा असताना त्याने एकच गोळी भरलेली असते कारण तो एकच चाप ओढतो आणि एकाच गोळीचा आवाज होतो. जर दोन गोळ्या असत्या तर त्याला अमरीश पुरीला मारायचा चान्स होता. या सिनेमात अमरीश पुरी जरा उसुलों वाला व्हिलन असल्याने तो दिगंबरची शेवटची इच्छा (मेरे बेटे रणजीत को अपने बेटे की तरह पालें) तो पार पाडतो तसेच त्याने सांगितल्याप्रमाणे तो राजा आणि राजकुमारला मारायला तयार होतो. चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच की नाव रणजीत असल्यावर मोठा होऊन तो रणजीत खेरीज इतर कोणी होऊच शकत नाही.

"मिळाल्या मालकासी व्हावे प्रोटेक्टर" मंत्र असलेला प्राण एवढे सगळे होऊनही मध्ये पडतो. चाहो तो मेरी जान लेलो पर महाराज को छोड दो चा धोशा तो लावतो. तेवढ्यात प्राणच्या मुलाला राजकुमार समजून अमरीश पुरीच्या गँगमधला एक चिल्लर डाकू घेऊन येतो. महाराज ऐवजी राजकुमारचा बळी जाणार असे ठरते. प्राणही हे बलिदान द्यायला तयार होतो. अजूनही कमल कपूरला गप्प बसण्याचे सुचत नाही. तो म्हणतो की हा राजकुमार नसून प्राणचा मुलगा आहे. सुदैवाने अमरीश पुरीला त्या मुलाला "बाळा तुझे बाबा कोण ते सांगतोस का?" विचारायचे सुचत नाही. तो त्या मुलाला तलवारींवर नाचवून फेकण्याचा आदेश देतो. वफादार नोकराचा मुलगा असल्या कारणाने त्याचे जिस्म फौलादी असावे. कारण एकही तलवार त्याच्या पाठीत घुसत नाही. त्याला कॅच कॅच खेळल्यासारखे करून खिडकीतून खाली फेकतात. "आज जरा आडरस्त्याने जाऊयात" असा विचार करून चाललेल्या एका भटक्या दांपत्याच्या घोडागाडीत जाऊन नेमका तो पडतो. इथून तिथून, न जाणे कुठून आलेल्या घोडागाडीत पडलेला तो मुलगा पुढे जाऊन मिथुन होणार हे नक्की होते.

एवढे होऊनही कमल कपूरचे समाधान होत नाही. तो एक सुरा फेकून अमरीश पुरीला मारतो. त्याने खांद्याला किरकोळ जखम होण्यापलीकडे काही होत नाही. मग मात्र बिचार्‍याचा निरुपाय होतो आणि तो एकदाचा कमल कपूरला गोळी घालतो. कमल कपूर हार्ट अ‍ॅटॅक आल्याचा अभिनय करून मरतो. इकडे भर उन्हात बिन चार्‍याचे पळवल्याबद्दल चेतक राजकुमारला नदीत पाडतो. शेवटी वफादारी की उम्मीद फक्त कुत्तोंसे की जा सकती हैं घोडोंसे नही. सर्वकाही लक्षात आल्यानंतर अमरीश पुरी प्राणला बांधून फटके देत असतो. प्राणची जुबान काटण्याची धमकी दिल्यानंतर प्राण म्हणतो की मेरी जुबान के दो टुकडे करोंगे तो आवाज दुगुनी होगी, चार टुकडे चौगुनी. प्राणच्या हे लक्षात येत नाही की तुकडे जीभेचे होणार आहेत, स्वरयंत्राचे नाहीत. फार फार तर तो दुप्पट बोबडा किंवा चौपट बोबडा होऊ शकतो. अमरीश पुरीला मात्र एव्हाना या लोकांचा मूर्खपणा असह्य झालेला असतो. त्यात राजकुमार आणि लॉकेट निसटल्यामुळे तो आधीच त्रासलेला असतो. इतके होऊन सुद्धा तो फक्त प्राणचा उजवा हात कापून त्याला सोडून देतो. मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू परवडला याचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण ते काय?

२.३) घोड्याने पाडले, ससाण्याने तारले

इफ्तेकार प्राणची चौकशी करायला राजवाड्यावर येतो. कधीतरी कमल कपूरने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आपल्या मुलीचे, सीमाचे लग्न मोठे झाल्यावर राजकुमारशी लावून द्यायचे मान्य करतो. तेव्हा कळते की राजकुमार इफ्तेकारकडे पोचलाच नाही. मग तो गेला कुठे? बाकी सर्वांनी हलगर्जीपणा केला असला तरी शमशेरने केलेला नसतो. इतका वेळ ठिपकेदार गरुड असलेला शमशेर अचानक बहिरी ससाणा बनतो आणि आजूबाजूला कुठेही मंदिर नसताना पूजेची थाळी घेऊन फिरत असलेल्या आशालताचे लक्ष वेधून घेतो. नदीत वाहत आलेला राजकुमार आशालताला सापडतो आणि ती त्याचा सांभाळ करण्याचे मान्य करते. सहसा कंटिन्यूटी मिस्टेक्स कपड्यांमध्ये होतात. इथे पक्ष्यांमध्ये झाली आहे.

३) वेस्टर्न सिनेमा बनवण्यासाठी दिलवाले नायक हवेत

३.१) धनाच्या पेटीपाशी चावरे विषारी नाग असलेच पाहिजेत.

असा हा राजकुमार मोठा होऊन धर्मेंद्र बनतो. गळ्यात असलेल्या लॉकेटमुळे लगेच त्याची ओळख पटते. तिथल्याच कुठल्यातरी जंगलात तो खड्डा खणत बसलेला असतो. कुठून तरी त्याला कळलेले असते की इथे खजिन्याची पेटी गाडलेली आहे. इथे आपल्याला कळून चुकते का हा सिनेमा वेस्टर्नच्या अंगाने जातो. वेस्टर्नमध्ये सर्वजण एक्स्प्लोरर्स असतात. त्यांना घोडेस्वारी करणे, गाडलेले खजिने शोधणे आणि गाणी म्हणणे याशिवाय काही उद्योग नसतात. तसेच प्रत्येकजण बंदूक चालवण्यात वाकबगार असावाच लागतो. इथे रॉय रॉजर्स, जीन ऑट्री वगैरेंच्या जागी धर्मेंद्र असणार हे निश्चित होते. वेस्टर्नला साजेशी हॅट आणि गळ्याला रुमालही असतो. पेटी घेऊन धर्मेंद्र निघणार इतक्यात तिथून चाललेला मिथुन ती पेटी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. चेक्सचा शर्ट, मळकट रंगाची हॅट बघून वेस्टर्न्स मधली दुय्यम हिरोची भूमिका याच्या वाटेला आली आहे हे निश्चित होते. थोडी मारामारी झाल्यावर लाक्षणिक रित्या मिथुनला धर्मेंद्र खड्ड्यात जा म्हणतो. म्हणजे लाथ मारून वेगळ्याच एका मोठाल्या खड्ड्यात पाडतो. हमरस्त्याने जायचे सोडून त्याला दोन दगडांमधल्या चिंचोळ्या वाटेतून जाण्याची हुक्की येते. आपल्या निवासस्थानापाशी झालेल्या आवाजामुळे एक नाग (खराखुरा) वैतागून बिळातून बाहेर येतो. त्रासलेला तो बिचारा जीव धर्मेंद्राला डसण्याचा प्रयत्न करतो तर मिथुन मध्ये येऊन त्याचा (धर्मेंद्राचा, नागाचा नव्हे) जीव वाचवतो.

मिथुन गारुड्यांमध्ये वाढलेला असल्याने निवांतपणे स्वतःच्याच जखमेतून विष चोखून थुंकून टाकतो. तो हे इतक्या निवांतपणे करतो की त्या नागालाही "काय ते दिवस होते, एका फूत्कारात माणसे मरायची. नाहीतर आता च्युईंग गम प्रमाणे चघळून विष थुंकणारी माणसे यायला लागली आहेत" वाटल्याखेरीज राहिले नसावे. इथे धर्मेंद्राचे नाव शंकर आणि मिथुनचे नाव सांगा असल्याचे स्पष्ट होते. मिथुन मोठ्या अभिमानाने त्याला आपल्या पाठीवरच्या तलवारीच्या खुणा दाखवतो आणि आपण प्राणचा मुलगा असल्याचे प्रेक्षकांना कळवतो. प्रत्यक्षात गंज लागलेल्या तलवारींमुळे रॅश आल्यासारख्या त्या जखमा दिसतात. याने धर्मेंद्राला भलतेच वाईट वाटते आणि तो सापडलेल्या धनाचा अर्धा हिस्सा मिथुनला देऊ करतो.

अशा सिनेमांत एक तिसरे पात्र सुद्धा लागते. सहसा हे नेटिव्ह अमेरिकन किंवा मेक्सिकन, म्हणजे हिरोपेक्षा ड्रॅस्टिकली वेगळे दिसणारे लागते. इथे डॅनीची वर्णी लागली आहे. डॅनीचे नाव डॅनीच असते. त्या पात्रांच्या नियमांनुसार डॅनी सुरेफेक करण्यात आणि कुलुपे तोडण्यात निष्णात असतो. डॅनी येऊन तीन हिश्श्यात वाटणी करण्याचा सल्ला देतो. तो सल्ला धुडकावून ते दोघे आधी दगड मारून, नंतर बाँबच्या मदती ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतात. अखेर हार मानून ते डॅनीची ऑफर स्वीकारतात. डॅनी अत्यंत सहजतेने ती पेटी उघडतो. त्यात शंभरच्या नोटा, सोन्याची बिस्किटे आणि दागिने पाहून हा खजिना नसून स्मगलिंगचा माल असल्याचे आपल्याला कळते. हा माल ज्यांचा असतो ते लोक हा माल घ्यायला येतात. मग धर्मेंद्राला युक्ती सुचते आणि तो डॅनीला ती पेटी बंद करायला सांगतो.

३.२) मुलांची फाजील कौतुके केल्यास त्यांच्याच्याने एक काम धड होत नाही

पुढच्या सीनमध्ये कळते की तो माल अमरीश पुरीचा होता. इतक्या वर्षांमध्ये त्याचे डाकू मधून स्मगलरमध्ये प्रमोशन झाले आहे. रणजीतही मोठा होऊन रणजीत झाला आहे. रणजीत ती उपरोक्त पेटी घेऊन परत आलेला असतो. मिळालेली वस्तु योग्य आहे का नाही हे चेक न करण्याची सवय वडलांकडून रणजीतला मिळालेली असते. त्यामुळे तो पेटी न उघडताच घेऊन आलेला असतो. सोबत सुजितकुमार आणि मॅकमोहन पण असतात. या तिघांना हॅट दिलेल्या आहेत. आणखी पण एक कोणी फरकॅपवाला असतो ज्याच्या हातात काही कारणाने बिगुल दिलेले आहे. याला फक्त "बाप का बेटा, सिपाही का घोडा, बहुत नही तो थोडा थोडा" हा डायलॉग मारण्यासाठी ठेवलेलं आहे. अमरीश पुरी उगाचच रणजीतचे कौतुक करतो. रणजीतही अंजानगढ चा खजिना शोधून काढण्याच्या वल्गना करतो. ती पेटी डॅनीने बंद केलेली असल्यामुळे ती काही उघडत नाही. मग रणजीत ब्लोटॉर्चने तिचे झाकण तोडतो. झाकण उघडण्यापूर्वी शँपेन उघडली जाते आणि झाकणावर ग्लास भरले जातात. शँपेन आवडत असल्याने आत बंद केलेला नाग "घोटभर शँपेन मलाही द्या की" करून बाहेर येतो आणि फालतू कामाचा दर्जा अमरीश पुरीला कळून चुकतो.

३.३) घोड्यावरून प्रवास करताना गाणे व्हायलाच पाहिजे

१९४०-१९५० च्या वेस्टर्नचे बलस्थान होते त्यांच्या रेंजर हिरोंनी म्हटलेली गाणी. एका जीन ऑट्री एपिसोडमध्ये तर अर्ध्या तासाच्या एपिसोडमध्ये १० मिनिटाचे गाणेच होते. इथे तर बॉलिवूड वेस्टर्न आहे. हिरोंना यशश्री प्राप्त झालेली आहे. मग गाणे झाले नसते तरच नवल! तिघेही आपले घोडेस्वारीचे कसब दाखवत गाणे म्हणू लागतात "हम दिलवाले, सारी दुनिया से निराले, हम जैसा कौन हैं?" गाणे संपल्यावर धर्मेंद्राच्या घोड्याने "ओझे वाहायला मी गाढव वाटलो का रे?" हा प्रश्न प्रमोद चक्रवर्तीला नक्की विचारला असावा. डॅनीवर क्लोजअप मारून त्याचे त्रिकालदेवलाही खुश करू शकणारे हास्य बघण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. गाण्याच्या कडव्याच्या ओळी मोठ्या मनोरंजक आहेत "हम दोस्त नही हम भाई हैं, इस दौर के हातिमताई हैं" (मागून जितेंद्र कुजबुजतो, हातिमताई मी तू धरम) सतत "हम जैसा कौन हैं" विचारल्यामुळे सूर्याला सुद्धा कंटाळा येतो आणि तो अस्ताला जातो. रात्रीची विश्रांती घ्यावी म्हणून माळरानात घोडे पळवत असणारे ते तिघे थांबतात आणि गाणे संपते.

इथे माझा अल्पविराम. उरलेली चिरफाड प्रतिसादांत.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

५) सिनेमात तिय्यम हिरो असेल तर दुय्यम हिरोला सुद्धा हिरवीण मिळालीच पाहिजे

५.१) घरात हंटर आहे म्हणून हंटरवाली बनून फिरू नये

इकडे अमरीश पुरीच्या घरी काय हालचाल आहे ते बघूयात. दिगंबरच्या मुलाला, रणजीतला त्याने आपल्या मुलासारखे वाढवले आहेच, तेही तो आपला खरा मुलगा नाही हे रहस्य उघड होऊ न देता. पण त्याशिवाय अमरीश पुरीला आशा नामे कन्यारत्न सुद्धा असल्याचे दाखवले आहे. आशाची भूमिका साकारत असलेल्या शोमा आनंदचे एंट्रीच पीस खोवलेली लाल हॅट, पांढरा फ्रिलचा शर्ट, त्यावर लाल जॅकेट, खाली पांढरी पँट आणि हंटिंग बूट्स अशा वेशात होते. कहर म्हणजे ती ही एंट्री रणजीत आणि अमरीश पुरी समोर हंटर नाचवत घेते. तिचा पहिलाच डायलॉग फॉल्स अलार्म वाजवणारा आहे - " डॅडी मैं जानती हूं आपके दिल में क्या है, भय्या मुझे मालूम हैं आप क्या सोच रहे हैं ". तिच्या सुदैवाने रणजीत तिचा भाऊ आणि अमरीश पुरी तिचे वडील असल्यामुळे ते फक्त गडबडतात. इतर कोणत्या सिनेमात मात्र तिची धडगत नव्हती.

लगेचच कळते की तिच्या मते रणजीत आणि अमरीश पुरी तिने हा ड्रेस का घातला आहे याचा विचार करत आहेत. असतात काही हिरवणी भोळ्या भाबड्या! तर ही हंटरवाली बनून घोडेस्वारी शिकायला चाललेली असते. पुढच्या संवांदातून आपल्याला कळते की पुरी साहेबांनी आपल्या काळ्या धंद्यांपासून हिला दूर ठेवले असून तिला या सर्वांची काहीच कल्पना नाही. त्यात ही हॅट घालते, घोडा चालवायला शिकते आहे. म्हणजे वेस्टर्न सिनेमातल्या दुय्यम हिरोची हिरोईन बनायला ही सज्ज आहे.

त्याच्या पुढच्याच शॉटमध्ये तिचा घोडेस्वारीचा प्रशिक्षक मिथुन असल्याचे कळते. मिथुन तिच्या जॅकेटला मॅचिंग रंगाची गाडी घेऊन येतो. अर्थात ही गाडी खजिन्याच्या हिश्श्यातून आली असावी. दोन प्रेमी जीव भेटतात आणि गाणे सुरू होते. "चोर तेरा नाम हैं, चितचोर तेरा नाम हैं" म्हणत शोमा गाऊ लागते आणि मिथुनच्या कमीत कमी दसपट वेगाने आणि वारंवारितेने शरीराचा कणन् कण हलवत नाचते. मिथुन तेवढा जोशात नाचत नाही. त्याच्या डोक्यात बहुधा "हे बघ चितचोर अमोल पालेकरचा. माझं नाव सांगा आहे" असे विचार चालले असावेत. पण तिचीही बिचारीची चूक नाही. कल्पना करा, त्यांचा पहिला संवाद कसा झाला असेल
मिथुनः हाय, माझं नाव सांगा.
शोमा: तसं तर आम्हास तुझे नाव माहित नाही. पण आमच्या चित्तवृत्ती हरणार्‍या तुझे नाव आम्ही "चितचोर" असे सांगत आहोत.

५.२) प्राण जर प्राण वाचवणार असेल तर प्राणचे प्राण कोण वाचवेल सांगा (योग्य ती विरामचिन्हे भरा)

मनसोक्त नाचून झाल्यावर दोघे घरी जायला निघतात. इतक्या वेळ बिन चार्‍याचे उन्हातान्हात उभे केल्यामुळे शोमाचा घोडा त्रासलेला असतोच. ती स्वार होताच तो उधळतो आणि तिला घेऊन न जाणे कोठे धावत सुटतो. बिचारा मिथुन "कर्म माझं" करून तिला वाचवण्यासाठी गाडीतून तिचा पाठलाग करतो. या भौगोलिक परिसरात काय वाट्टेल ते सापडत असल्याने ते लवकरच एका खाणीजवळ पोहोचतात. उत्खनन करण्यापूर्वी तिथे स्फोट घडवून आणण्याचे काम चाललेले असते. घोडा मात्र बहिरा असल्याने त्याला हे स्फोटाचे आवाज ऐकू येत नाहीत. त्यामुळे तो स्फोट होत असलेल्या ठिकाणाच्या दिशेनेच धावत राहतो. "हे स्फोट जवळून दिसतात तरी कसे" हे बघण्याची इच्छा असलेला प्राण तिकडे आलेला असतो. क्षणार्धात त्याला सर्व परिस्थिती कळून चुकते. उडी मारून धावत्या घोड्यावर स्वार होण्याचे अफाट कसब असल्यामुळे प्राण शोमाला वाचवण्यात सफल होतो. पण या नादात तो स्वतःचे प्राण संकटात टाकतो. मालकाकडून थोडा मूर्खपणा त्याच्याकडेही आलेला असतो. आता आपल्याला एकच हात आहे. त्या हाताने शोमाला आधार दिल्यामुळे त्याला तोंडात लगाम पकडावा लागतो. इथपर्यंत ठीक होते. पण जेव्हा शोमा त्याने सांगितल्याप्रमाणे घोड्यावरून उडी मारते तेव्हा तिची टोपी काढून घ्यायचे काय कारण होते? तो हात त्याला तोल सावरायला वापरता आला असता. पण चक्रवर्ती काकांना त्याचा जीव मिथुनने वाचवणे अपेक्षित असावे. त्यानुसार घोडा प्राणला कड्यावरून खाली पाडतो आणि गडगडत जाऊन प्राण थेट मिथुनच्या हातांमध्ये येऊन पडतो.

५.३) ओळख पटणे वाटते तितके सरळसाधे नसते

मिथुन प्राणला घेऊन नेमका भारतभूषणच्या हॉस्पिटलात घेऊन येतो. रसना ऑरेंजच्या रंगाचे दिसणारे रक्त प्राणला चढवले जाते. ती नर्स सांगते की त्या दोघांचा ब्लड ग्रुप एबी नेगेटिव्ह आहे जो खूप रेअर आहे (रच्याकने हे खरे आहे). त्यामुळे प्राण खूप सुदैवी आहे. हेही कळते की प्राणचे डोळे जखमांमुळे जाता जाता वाचले. पण त्यावर पट्टी बांधल्यामुळे तो भाभूचा चेहरा बघू शकत नाही आणि तो वाचतो. मग तो मिथुनला एक दोन इमोशनल डायलॉग मारतो. मिथुनही खूप भावुक होतो. म्हणतो की आजतक किसीने मुझे बेटा नही कहा. मग ते खानाबदोश आणि सपेरे ज्यांच्यात तो वाढला ते त्याला काय म्हणत असत? मिथुनच जाणे. मग नेमका मिथुनच्या पाठीवरच्या वणांचा विषय शोमा काढते. म्हणजे आता बिछडे बाप-बेटे का मिलन होणार म्हणून प्रेक्षक क्षणभर सुखावतो आणि तेवढ्यात दुर्मुखलेला भाभू येऊन "इन्हे आराम की जरुरत हैं" म्हणून खोडा घालतो.

प्राणला त्यांच्या लव्हस्टोरीमध्ये इंटरेस्ट असल्याने ते जाण्यापूर्वी तो त्या अंगाने चौकशी करतो. मिथुन सांगतो की त्याचे आई-वडील नसल्यामुळे त्याला अमरीश पुरीकडे जाऊन लग्नाच्या बोलाचाली करता येत नाही आहेत. प्राण त्याच्या वतीने बोलणी करण्याचे वचन देतो आणि हे दोघे असे खुश होतात की जणू लग्न ठरलंच! पुढच्याच शॉटमध्ये त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटतो. कारण अमरीश पुरी आपल्या मुलीला वाचवणार्‍या माणसाला भेटायला येतो आणि मिथुनकडे असा काही तुच्छतेने बघतो की यंव रे यंव! प्राणच्या खोलीत येताच प्राणला कधीच न पाहिलेला रणजीत त्याला "मंगल" म्हणून लगेच ओळखतो पण अमरीश पुरीला फक्त संशयच आलेला असतो. अमरीश पुरी मग भाभूला याची नीट काळजी घ्या वगैरे सांगतो आणि प्राण त्याला आवाजावरून लगेच ओळखतो.

प्राण अमरीश पुरीवर झडप घालण्याचा प्रयत्न करतो पण कुठून तरी इफ्तेकार तिथे उगवतो. इफ्तेकार प्राणला शांत करतो आणि सांगतो की हा लाखन नसून ठाकूर सूर्यप्रताप सिंह आहे. आता हा चमत्कार कसा झाला याचे काहीच स्पष्टीकरण सिनेमात नाही. पण इफ्तेकार अमरीश पुरीला का ओळखू शकत नाही हे मात्र आपण सांगू शकतो. कसं आहे की डाकू लाखनला इफ्तेकारने एस पी म्हणून निश्चित पाहिले असेल पण लाखनला तर होती दाढी! ठाकूर सूर्यप्रतापला काही दाढी नाही. त्यामुळे त्याच्यामते लाखन आणि सूर्यप्रताप एक व्यक्ती असूच शकत नाहीत. दुसर्‍या शब्दांत इथे "दाढी लावल्याने बेमालूम वेषांतर होते" या नियमाचा भाऊ "दाढी काढल्याने सुद्धा बेमालूम वेषांतर होते" सिद्ध केला आहे. प्राणसुद्धा "एवढा मोठा एस पी, त्याचं बरोबरच असेल" म्हणून गप्प बसतो. मग इफ्तेकार शोमाला थोडक्यात प्राणची कहाणी सांगतो. इथे ती लगेच प्राणला त्रास देणार्‍या व्हिलनचे वाट्टोळे होईल अशी प्रार्थना करते. अमरीश पुरी तिच्याकडे "कारटी नक्की माझीच आहे ना?" नजरेने बघतो.

दुसरी जोडी जुळली.

"काय ते दिवस होते, एका फूत्कारात माणसे मरायची. नाहीतर आता च्युईंग गम प्रमाणे चघळून विष थुंकणारी माणसे यायला लागली आहेत" >>> Lol

धर्मेंद्र मात्र भोळा (आठवा त्याचे सिनेमातले नाव शंकर आहे) >>> Proud

त्याच्या डोक्यात बहुधा "हे बघ चितचोर अमोल पालेकरचा. माझं नाव सांगा आहे" असे विचार चालले असावेत. >>>> :हहपुवा:

महान लिहिले आहे हे सगळे.

धरमपाजीचा अजून एक महान वेस्टर्न आहे झलझला. मेकानाज गोल्डचे हे हिंदी व्हर्जन. ते पण लगे हाथ रिव्ह्यू करून टाका

सॉलीड लिहिलयं. :हहपुवा:

कॅपजेमिनी कंपनीने या चित्रपटातील मिथुनवरून आपल्या कंपनीचे नाव ठेवले. ->>>>
हे कनेक्शन नाही कळाले.

कॅपजेमिनी कंपनीने या चित्रपटातील मिथुनवरून आपल्या कंपनीचे नाव ठेवले. ->>>> हे कनेक्शन नाही कळाले.>> अहो जेमिनी म्हणजे मराठीत कोणती रास?

धरमपाजीचा अजून एक महान वेस्टर्न आहे झलझला >> +१
धरमपाजींच्या वेस्टर्न चित्रपटांमधल्या योगदानावर एक वेगळा लेख पाडला पाहिजे. पण माझ्याकडे सोना सिंग सारखा "झपाट्टा" नसल्यामुळे जलजला बॅकबर्नरवर आहे Proud

मधे एका सीन मधे धर्मेन्द्रचा उल्लेख "नौजवान" म्हणून येतो. भा. भू. च्या तोंडी. ही एक केवळ नोंद या चित्रपटाबद्दल Happy

मधे एका सीन मधे धर्मेन्द्रचा उल्लेख "नौजवान" म्हणून येतो. भा. भू. च्या तोंडी.
<<<<
भा भू च्या दृष्टीने पाहू जाता धर्मेंद्र नौजवानच म्हणावा लागेल.

लेखात, "भा.भू दुर्मुखलेल्या चेहऱ्याने" असा अवमानकारक उल्लेख आहे ते मात्र खटकले, ते "भा.भू चेहऱ्याने" एवढेच हवे,

या भौगोलिक परिसरात काय वाट्टेल ते सापडत असल्याने ते लवकरच एका खाणीजवळ पोहोचतात. >>>
"हे स्फोट जवळून दिसतात तरी कसे" हे बघण्याची इच्छा असलेला प्राण तिकडे आलेला असतो >>> Lol हे महान आहे.

शोमा आनंद ही गरिबांची कोण आहे? हेमा नसावी. रीना रॉय का? मला आधी ती बिंदिया गोस्वामीच वाटली. मी "बिंगो" म्हणून ओरडणार तेवढ्यात ही तर शोमा आनंद असा साक्षात्कार झाला.

पायस, त्या शोमा आनंदच्या एण्ट्री पासून ते "माणूस (x) +/- दाढी != माणूस(x)" प्रमेयापर्यंत च्या पीस वर थीसीस होउ शकेल

बाह्य जगातील लॉजिकः तुम्ही जर "अ" ही गोष्ट शिकायला जात असाल, आणि ती शिकायला जाताना तुम्ही "अ" सराईतपणे वापरत असाल, तर तुम्हाला "अ" शिकायची गरज नाही.
जागीर लॉजिक: शोमा आनंद घोडेस्वारी शिकायला जाताना सराईतपणे घोडेस्वारी करत जाते.

दुसरे, ही घोडा शिकायला आली, मिथून गाडी घेउन आला तर ट्रेनिंग लोकेशन वर घोडा कोठून आला? की ही घरातून जनरली एक घोडा घेउनच निघाली. घोडा शिकायला?

तिसरे - घरातून निघताना लाल असलेली टोपी खाणीत पडेपर्यंत पाढरी झाली. हे कसे झाले म्हणून रिवाइण्ड केले. तर मधे ते चोर/चितचोर गाणे आहे. मग ठीक आहे. कारण गाणी म्हणताना लोकांचे कपडे बदलतात हे अनेकदा प्रूव्ह झालेले लॉजिक आहे.

आणि चौथे, सर्वात महत्त्वाचे: खाणीतील बचावकार्य उंचीच्या तीन प्रतलांवर घडत असावे. त्या सगळ्या सीन चा दिशा, उंची आणि वेग यांच्या दृष्टीने एका फुलस्केप पेपर वर अ‍ॅनेलिसीस करायला हवा. तरच संगती लागेल.
एच-१ - इथे प्राण ला इथून मिथून व तिथून शोआ येताना दिसते
एच-२: इथे प्राण उभा असतो. तो तेथून घसरत खाली येतो, शोआ च्या घोड्यावर बसतो, घोडा खाणीजवळ असलेल्या कड्याकडे जातो व तेथे खिकाळून प्राण ला खाली (म्हणजे जमिनीवर. कड्यावरून खाली नव्हे) टाकतो.
एच-०: प्राण तेथून घसरून इथे येतो. तेव्हा एच-१ वरून मिथून एच-० वर आपोआप आलेला असतो.

नुसती उंची बघितली तर हॉलीवूडवाल्यांना घरी बसवेल असे दिग्दर्शन आहे. त्यात वेग व दिशा धरून विश्लेषण करणे अपने बस की बात नही.

"भा.भू दुर्मुखलेल्या चेहऱ्याने" असा अवमानकारक उल्लेख आहे ते मात्र खटकले, ते "भा.भू चेहऱ्याने" एवढेच हवे >> गुस्ताखी झाली खरी पण भाभूचे चित्रपट न सोसलेल्या पब्लिकला याने थोडा काँटेक्स्ट मिळावा.

शोमा आनंद ही गरिबांची कोण आहे? >> ती गरिबांची देवी आहे. जय पाताल भैरवी Proud

पायस, त्या शोमा आनंदच्या एण्ट्री पासून ते "माणूस (x) +/- दाढी != माणूस(x)" प्रमेयापर्यंत च्या पीस वर थीसीस होउ शकेल >> +१
नुसती उंची बघितली तर हॉलीवूडवाल्यांना घरी बसवेल असे दिग्दर्शन आहे. त्यात वेग व दिशा धरून विश्लेषण करणे अपने बस की बात नही. >> Lol
भारी लिहिले आहेस फा. हा संपूर्ण सिनेमा तीनपेक्षा जास्त प्रतलांमध्ये घडत असावा. त्याखेरीज या सिनेमाचा भूगोल असंभव आहे.

६) तिय्यम हिरोची जोडी जुळवणे आवश्यक नाही

६.१) नाग नेपाळी असेल तर तो अनंत असतो

त्या पेटीतून मिळालेले पैसे भाभूला देऊन टाकल्यामुळे धर्मेंद्रावर पुन्हा एकदा कामधंदा बघायची वेळ येते. यावेळेस त्याचे लक्ष्य असते एक हिरेजडीत मुकुट ज्याला सगळे विजयमुकुट म्हणत असतात. पण त्यावर फक्त धर्मेंद्रच नजर ठेवून नसतो. प्रीति सप्रू डोक्यावर गॉगल, मॉडर्न वेषभूषा आणि केशभूषा करून टेहळणी करायला आलेली असते. संपूर्ण सिनेमात एकट्या तिचेच कपडे मॉडर्न असल्यामुळे ती या सिनेमाची फेम फटाल असणार आणि नंतर ती मरणार हे निश्चित होते. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून धर्मेंद्र वेगळी हॅट घालून आलेला असतो. प्रीतिने रिपोर्टरचे सोंग वठवलेले असते आणि ती कॅमेर्‍यातून फोटो काढत असते. मुकुट एका संग्रहालयात एका फिरत्या टेबलावर ठेवलेला असतो. अचानक प्रीति काहीतरी वस्तु काढून मुकुटाच्या दिशेने फेकते अशी काही फेकते की जणू ती रिंग टाकून तो मुकुट जिंकणार आहे. लगेचच भोंगा वाजू लागतो आणि संपूर्ण मुकुटाला लाल किरणांनी घेरले जाते.

मग धावत धावत असित सेन येतो. त्याने गुरख्याचा वेष आणि त्यासोबत येणारी टोपी घातली आहे. असित सेन तिथला हेड गार्ड असतो. प्रीति हसून त्याला सांगते की चुकून तिच्याकडून ती वस्तु तिथे पडली. असित सेनच्या म्हणण्यानुसार तिथे छुपे कॅमेरे असतात पण तरी तो तिच्यावर विश्वास ठेवतो. थोडा मस्का मारताच तो मोठ-मोठ्याने सगळ्यांना ऐकू जाईल अशा बेताने प्रीतिला इथल्या सुरक्षेव्यवस्थेविषयी सांगायला लागतो. त्या मुकुटाला म्हणे ४४० व्होल्टच्या तारांचे कुंपण असते (ती लाल किरणे) आणि अलार्म वाजला की थेट लाल बाजार पोलिस स्टेशनला कळवायची सोय असते. म्हणे की जसे खजिन्याची रक्षा करायला नाग/अजगर इ. लोक असतात तसे या दोन कोटींच्या मुकुटाच्या रक्षणासाठी अनंत नाग आहे. प्रीति जरा इकडे तिकडे बघते, तिचे विष थुंकून द्यायला मिथुन थोडीच येणार आहे? आपणही "अरेच्चा श्रेयनामावलीत तर अनंत नागचे नाव नव्हते" विचार करून चमकतो. मग असित सेन म्हणतो की त्याचे नाव अनंत नाग आहे.

६.२) शरीफपणाचे मापदंड बदलत आहेत

प्रीति लगेच अमरीश पुरीला फोन करून सांगते की इथे सेक्युरिटी खूप कडक आहे. तर चार दिवसांनंतर त्याला ट्रेनने दिल्लीला पाठवणार आहेत तेव्हा आपण त्याला चोरूयात. अमरीश म्हणतो ओके, तू मला तीन वाजता भेट. इथे वाट्टेल तिथे भूछत्रांप्रमाणे उगवण्याची सोय असल्यामुळे कुठे ते सांगायची गरज त्याला भासत नाही. मग तो रणजीतला म्हणतो की जँगोला बोलावून घे. रणजीत म्हणतो की तो लोखंडी दातवाला का? अमरीश म्हणतो हा तोच. जँगो पोलिस रेकॉर्डनुसार मेलेला असल्यामुळे त्याला कब्रस्तान के रास्ते से आणायला सांगून तो पोएटिक जस्टिस साधतो. कट टू कब्रस्तान.

मोनिका डिसूझा नामक कबरीपुढे डॅनी एका मुलाला कडेवर घेऊन उभा असतो. ती कबर त्या मुलाच्या आईची, म्हणजे डॅनीच्या बायकोची असल्याचे स्पष्ट होते. डॅनी मग भूतकाळात शिरतो. मोनिका असे नाव न शोभणारी घरगुती साडी घालून बीनाची एंट्री होते. त्या मुलाच्या, मोंटूच्या गेल्या वाढदिवशी तिने खेळण्यातली ट्रेन आणलेली असते. मोंटू विचारतो तू लवकर कशी, तर एका शरीफ आदमीने लिफ्ट दिली. डॅडी कधी येणार, तर लवकरच येतील. बीनाला लिफ्ट देणारा हा शरीफ आदमी रणजीत असतो. बीनाच्या मते रणजीत शरीफ आदमी दिसतो हे बघता तिची विनोदबुद्धी भलतीच चांगली असली पाहिजे. असो, तर मोंटूला हे सर्व मोठमोठ्याने सांगितलेले रणजीत ऐकतो. आता डॅनी घरात नसल्याचा फायदा रणजीतने घेतला नाही तरच नवल!

मोंटू थोडे फार प्रयत्न करतो पण अर्थातच रणजीतला थांबवणे त्याच्या बस की बात नसते. रणजीत बीनाला घेऊन दुसर्‍या एका खोलीत जातो आणि दार लावून घेतो. दार काचेचे असल्याने मोंटूला सगळे दिसण्याची सोय असते. बीना केक कापायला आणलेली सुरी रणजीतवर रोखते आणि म्हणते की छोड दो वर्ना मैं तुम्हे मार दूंगी. रणजीतही क्षणभर बिचकतो. मग तो म्हणतो नहीं तुम मुझे नही मार सकती. यावर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.
१) रणजीतवर हल्ला करून त्याला जखमी करता येते का बघणे. तुम्ही ताकदवान नसलात तरी हातात सुरी आहे. झटापटीत रणजीत जखमी होण्याची शक्यता नक्कीच आहे.
२) रणजीत जे म्हणतो त्यावर विश्वास ठेवून धमकीचे "मैं अपने आपको मार दूंगी" मध्ये रुपांतर करणे

अर्थातच बीना दुसरा पर्याय निवडते आणि रणजीतच्या चेहर्‍यावर टोमॅटो केचप फेकून मरते. फ्लॅशबॅक मधून बाहेर येऊन डॅनी त्याच्या मुलाला विचारतो, की कोणी तुझ्या आईला मारले जे बघून तुझा आवाज गेला आहे. इथे तीन मुद्दे आहेत
१) डॅनीला वाटते की खांद्याला धरून शोमा आनंद जसे मिथुनला हलवते तसे मोंटूला हलवले तर त्याचा आवाज परत येईल
२) रणजीत समजा पकडला गेलाच तर त्याच्याकडे "हे बघ तुझ्या बायकोने आत्महत्या केली" असा बचाव आहे.
३) ते कब्रस्तान एका वेगळ्याच आयामात आहे. कारण फ्लॅशबॅक सुरु होईपर्यंत तिथे नसलेली मोंटूची केअरटेकर मेरी तिथे हवेतून प्रकट होते. मोंटूच्या क्लोजअपच्या वेळी तिथे समुद्र दिसतो, मिथुन धर्मेंद्रच्या क्लोजअपच्या वेळी डोंगर दिसतात आणि डॅनीच्या क्लोजअपच्या वेळी माळरानावर आढळतात तशी झाडी दिसतात.

धर्मेंद्र आणि मिथुनही तिथे कुठून तरी उगवलेले असतात. मिथुन विचारतो की कातिलची ओळख पटवणारी काही खूण सापडली का. डॅनी सांगतो की फक्त एक सिगारेटचे थोटूक तेवढे मिळाले होते जे त्याने वर्षानंतरही जपून ठेवलेले असते. धर्मेंद्र त्या अज्ञात कातिलला स्वतःचा आणि मिथुनचाही दुश्मन डिक्लेअर करतो.

६.३) मेलेला माणूस जिवंत कसा असू शकतो माय सन?

शहरात एकच कब्रस्तान असल्यामुळे रणजीत जँगोला घेऊन तिथेच आलेला असतो. जँगो म्हणून प्रवीण कुमार (बी आर चोप्रांच्या महाभारतातला भीम) दाखवला आहे. चक्रवर्तीकाकांना हॉलिवूडच्या लोकांनी फेकलेली गाँटलेट्स उचलण्यात भलताच रस असल्याने त्यांनी जँगोच्या रुपाने रॉजर मूरच्या जेम्स बाँडच्या व्हिलन जॉजला उत्तर दिले आहे. जँगो आल्या आल्या सुंदर डायलॉग मारतो "बिल्ली की अगर नौ बार मौत को धोका दे सकती है तो मैं तो मौत को मुंह में लेके घूमता हूं." याची हॅट तुलनेने स्वस्तातली, मळकट फेदोरा असल्यामुळे त्याच्या हेंचमनचे स्टेटसवर शिक्कामोर्तब होते. या शॉटमध्ये आपल्याला कब्रस्तानचे नाव बघता येते - सेंट पॉल कॅथॉलिक सेमेटरी. इथे एक झोल आहे. सेमेटरी शेजारी चर्च नसते. जर शेजारी चर्च असेल तर त्याला ग्रेव्हयार्ड म्हणतात, सेमेटरी नाही. पण जेव्हा हा सगळा सीन सुरु होतो तेव्हा आपल्याला एक चर्चचा लाँग शॉट दाखवतात. या सिनेमाचा भूगोल किती डायमेन्शन बेंडिंग आहे याची गणनाच नाही.

इकडे हे तिघे घरी निघालेले असतात तर योगायोगाने डॅनी जँगोला पाहतो. डॅनीची मेमरी फोटोग्राफिक असते. त्याने कधीकाळी पेपरात "हिरों का मशहूर चोर जँगो कार अ‍ॅक्सिडेंटमें मारा गया" वाचलेले आठवत असते. मग तो जँगोचा पाठलाग करतो. त्याला जँगो तर दिसत नाही पण डेनिस पिंटोच्या कबरीखाली पडलेली जँगोची हॅट सापडते. सुदैवाने अमरीश पुरीला लिली अर्थात प्रीति सप्रू वगळता आपली माणसे काय फडतूस दर्जाची आहेत हे ठाऊक असल्यामुळे तो पाद्र्याचे बेमालूम वेषांतर करून तिथे येतो. वेषांतर बेमालूम असल्यामुळे त्याने नकली दाढी लावली हे ओघानेच आले. अमरीश पुरी इतक्या वर्षांत डाकूचा ठाकूरच नाही तर इंग्रजी पारंगत झाल्याची ग्वाही देतो. डॅनीला दर वाक्याच्याशेवटी "माय सन" संबोधले नाही तर बिंग फुटेल असा त्याचा समज असतो. तो डॅनीला सांगतो की ती टोपी माझी आहे, मी इथे विसरलो होतो. डॅनी आपला संशय बोलून दाखवतो. अमरीश पुरी लगेच जगात एकच जँगो असल्याप्रमाणे "जँगो डिकॉस्टा" करून उसासे सोडतो. सिनेमाच्या भूगोलाच्या नियमांना अनुसरून लगेच जँगोची कबरही सापडते.

जँगो असा काही मूर्खपणा करणार आणि त्याला ओळखू शकणारा डॅनी तिथे असणार हे प्रेडिक्ट करू शकण्याची अतिंद्रिय शक्ती असल्यामुळे प्रीति सप्रू विधवेचा पोशाख करूनच अमरीश पुरीला भेटायला आलेली असते. इथे डॅनीने आपली मेमरी फोटोग्राफिक आहे हे सांगून सुद्धा अमरीश पुरी त्याला प्रीतिचा चेहरा बघू देतो. मिथुन आणि धर्मेंद्रही तिथे येतात आणि त्यांचा लगेच प्रीति जँगोची विधवा आहे यावर विश्वास बसतो. अमरीश पुरीने मिथुनला "माय सन" म्हटल्यावर तर त्यांच्या दृष्टीने संशयाला जागाच उरत नाही. डॅनीचा मात्र विश्वास बसलेला नसतो पण वाद नको म्हणून त्यांच्याबरोबर तो निघून जातो. मग अमरीश लगेच पिंटोच्या कबरीचा क्रॉस फिरवून गुप्त दरवाजा उघडतो आणि प्रीतिसोबत तिथून पसार होतो. जँगो तिथे वल्गना करतो की उद्यापर्यंत तो मुकुट चोरी करेल. पण फाजील कौतुक करू नये हा धडा शिकल्यामुळे अमरीश त्याच्यावर उखडतो. जँगोला डॅनीने ओळखल्यामुळे प्लॅनमध्ये चेंज करणे आता अटळ असते. तो त्याला दिल्लीला पाठवायचे ठरवतो. तिकडे मुकुटही ट्रेनने दिल्लीच्या दिशेने निघतो. चोरी कशी होते, कोण करतं ते पुढच्या सेक्शनमध्ये बघू.

स्वस्तातली, मळकट फेदोरा असल्यामुळे त्याच्या हेंचमनचे स्टेटसवर शिक्कामोर्तब होते.हे कळले नाही।बाकी सगळी वाक्क्ये कहरह....येऊ दे अजून।

आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून धर्मेंद्र वेगळी हॅट घालून आलेला असतो. >>> Lol इथे ऑल्मोस्ट चहा सांडला कीबोर्ड वर Happy

थे वाट्टेल तिथे भूछत्रांप्रमाणे उगवण्याची सोय असल्यामुळे कुठे ते सांगायची गरज त्याला भासत नाही. >>> Lol हे ही परफेक्ट आहे. जँगो ला जेथून आणणार आहेत तेथे डॅनी येणार आहे हे त्याला अंतर्ज्ञानाने कळत असावे. म्हणून तेथे तो फादर होउन जातो. जँगो तेथे ती हॅट का ठेवून गेला याचा पुढे काही क्लू आहे का कल्पना नाही. आणि डॅनीला शंका आली तर आली. तो नक्की काय करणार होता त्याबद्दल? त्याकरता अमरीश पुरीला वेगळे कपडे घालून आवर्जून तेथे जाण्याची काय गरज आहे समजले नाही Happy

Pages