पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना

Submitted by मार्गी on 23 July, 2018 - 08:04

पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना

उत्तराखण्ड! हिमालय! पिथौरागढ़! सुमारे अडीच वर्षांनंतर पुन: एकदा हिमालयाने बोलावलं! नोव्हेंबर- डिसेंबर २०१७ मध्ये पिथौरागढ़मध्ये फिरलो. त्यासंदर्भात आपल्याशी बोलेन. हा एक छोटा पण खूप सुंदर प्रवास झाला. त्यात दोन छोटे ट्रेक केले आणि पिथौरागढ़मधील काही‌ गावांमध्ये फिरलो. माझी बायको मूलत: पिथौरागढ़ची आहे, त्यामुळे तिथल्या एका लग्न समारंभाच्या निमित्ताने जाणं झालं. कौटुंबिक प्रवास, लोकांच्या भेटी व कमी सुट्ट्या ह्यामुळे ही भ्रमंती एक आठवड्याचीच झाली. पण परत एकदा हिमालय आणि विशेषत: हिवाळ्यातली हिमालयातली थंडी व रोमांच अनुभवता आलं. पुण्यातून २६ नोव्हेंबर २०१७ ला निघालो. मुंबईत बांद्रा टर्मिनसला जाऊन दिल्लीची ट्रेन घेतली. २७ नोव्हेंबरला दुपारी निजामुद्दीनला उतरलो व दिल्लीतल्या सिटी बसने आनंद विहार टर्मिनसला गेलो. इथून पिथौरागढ़ची बस मिळते. ह्या बस डेपोतून अनेक लांबच्या शहरांच्या बस जातात- वाराणसी, गोरखपूर, महेंद्रनगर (नेपाळ) इ.! काही‌ वेळ थांबल्यावर पिथौरागढ़ची बस मिळाली. दिवाळीच्या सुट्ट्यांचा काळ असल्याने खूप गर्दी आहे. बसमध्ये बसल्यावर एक गंमत झाली! बसमध्ये एक तृतीयपंथी आला आणि त्याने मला व इतर काही‌ जणांना आशीर्वाद दिला व पैसे मागितले! तेवढ्यात त्याने (तिने) माझ्या बायकोला बघितलं व तिला नमस्कार केला! तिनेही त्याला (तिला) ओळखलं, कारण तिने मुंबईत ह्या विषयावर काम करणा-या संस्थेसोबत काम केलं आहे. दोघांनीही एकमेकांना ओळखलं! तो/ ती तृतीयपंथी नेपाळचा (नेपाळची) आहे व तिथेच जात आहे! कुठे कशी अचानक ओळख निघते!

दिल्लीतून निघून गढमुक्तेश्वर- रामपूर ह्या मार्गाने बस टनकपूरला जाईल. थोड्या वेळाने राजधानी भागातली गर्दी कमी होऊन पश्चिमी युपी सुरू झाला. मस्त हायवे आहे. आता थोडी थंडी सुरू झाली. मध्ये मध्ये बस थांबत गेली. पण खाण्याची इच्छा झाली नाही. कारण मला उद्या पिथौरागढ़ला पोहचल्यावर लगेचच सायकल घ्यायची आहे व मुक्कामाच्या जागी जाण्याआधी मी दोन- तीन तास सायकल चालवेन. त्यामुळे पोट रिकामंच ठेवलं. दिल्लीतून टनकपूरला जायला बसने सात- आठ तास लागतात. रात्रीबरोबरच थंडीही वाढत गेली. मध्ये मध्ये थोडी झोप घेत राहिलो. रुद्रपूर सिटीजवळ उत्तर प्रदेश सोडून उत्तराखंड सुरू झाला. नानकमत्ता- खटीमा येईपर्यंत रात्रीचा एक वाजला. टनकपूरच्या काही किलोमीटर अलीकडे मोठं धुकं लागलं. इतकं मोठं धुकं की, रस्त्यावरची व्हिजिबिलिटी एकदम शंभर मीटर इतकीच राहिली! झोप बाजूला ठेवून तो नजारा बघत राहिलो. रस्त्यावर वाहतुक जवळजवळ नाही आहे. पण ड्रायव्हर खूप काळजीपूर्वक चालवतो आहे. दूरवर एखादी गाडी असेल तर तिचे टेल लाईट अगदी अंधुक दिसत आहेत. काही मिनिटांपर्यंत हा रोमांच सुरू राहिला आणि दोन वाजता बस टनकपूर डेपोत पोहचली! टनकपूर!! इथून नेपाळ सीमा अगदी जवळ. इथून आता हिमालय सुरू होईल- इथून पुढे आता फक्त घाटच घाट- पर्वतच पर्वत!

दिड तास बस टनकपूरमध्ये थांबली. इथून पुढे घाट असल्यामुळे रात्री बस चालत नाहीत. इथे अनेक लांबच्या ठिकाणाहून बस येतात. टनकपूर- शिमला व्हाया हरिद्वार बस चालते. रात्री दोन वाजता भर थंडीत गरम चहाचा आनंद घेतला. उद्या सकाळी सायकल चालवायची असल्यामुळे टनकपूर बस डेपोवर पोटही हलकं केलं. पहाटे पाचला बस पुढे निघेल असं वाटत होतं, पण बस साडेतीनलाच निघाली! रोमांच अजून वाढला. पण दु:ख इतकंच आहे की, अंधार असल्याने पर्वताचे नजारे थोडा वेळ दिसणार नाहीत. टनकपूरच्या बाहेर आल्या आल्या घाट सुरू झाला आणि ड्रायव्हर फारच जोशात गाडी पळवतोय. फारच अनुभवी व महारथी असावा. इतक्या अंधाराच्या वेळेत आणि हिमालयाच्या घाटातही चाळीसच्या स्पीडने बस पळवतोय! अर्थात् वाहतुक जवळजवळ नाहीच आहे, त्यामुळेच हे शक्य आहे. हिमालय!!! आता एक प्रकारचा सत्संग सुरू होतो आहे. मन सजग करून अंधारातच पण तिथे असण्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली. आता झोप येण्याचा तर प्रश्नच नाही.

जवळजवळ दोन तास अंधारात गेल्यावर चंपावतच्या थोडं आधी उजाडायला सुरुवात झाली आणि नजारे दृग्गोचर झाले- सगळीकडे उंच पर्वत, नागमोडा रस्ता, सगळीकडे डोंगर- उतारावरची पर्वतीय शेती आणी अगदी कोप-यात आतमध्ये असलेली छोटी घरं! उलटी होईल ही भिती होती, पण तसा त्रास अजिबात झाला नाही. हळु हळु दूरवर असलेल्या बर्फाच्छादित पर्वत शिखरांचं दर्शन सुरू झालं. त्रिशुल पर्वत, ॐ पर्वत अशी शिखरे ढग व धुक्यांमधून डोकं वर काढताना दिसत आहेत! फारच अद्भुत दृश्य! ते फोटोत टिपण्याचा प्रयत्न करत राहिलो. लोहाघाटपर्यंत ड्रायव्हरने बस अक्षरश: पळवली. दिवसा उजेडी त्याचं ड्रायव्हिंग बघून भिती वाटते आहे! पण लोहाघाटनंतर थोडी ट्रॅफिक लागली, छोटे जामही झाले. त्यामुळे त्याचा वेग जरा कमी झाला. पिथौरागढ़च्या वीस किलोमीटर अलीकडे- गुरना माता मंदीराच्या थोडं अलीकडे- एका जागी रस्ता बंद केला आहे. इथे रस्त्यावर काम चालू आहे, त्यामुळे वाहतूक बंद केली आहे. इथून मस्त नजारे दिसत आहेत! सगळीकडे पर्वत आणि जवळच दरीमधून वाहणारी रमणीय रामगंगा! लवकरच रस्ता सुरू झाला. तेव्हा दिसलं की, रस्त्याच्या कामामुळे काही जागी रस्ता फारच नाजुक झाला आहे. आता टनकपूर- धारचुला नॅशनल हायवेला रुंद करून दो- लेन बनवले जात आहेत. पण त्यासाठी जवळजवळ प्रत्येक ठिकाणी पर्वत कापावा लागतोय व रस्ताही नवीनच बनवावा लागतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुक मध्ये मध्ये थांबवली जात आहे. असो, सुमारे नऊ वाजता पिथौरागढ़ बस स्टँडवर पोहचलो. टनकपूरच्या पुढे १५० किमी पहाड़ी मार्गावर सहा तासांचा प्रवास झाला. इथे आता सायकल घ्यायची आहे. एका व्यक्तीने सांगितलं आहे की, तो सायकल देईल. आता ते बघेन. बघूया इथे कशी सायकल चालवता येते.

क्रमश:

पुढचा भाग- पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults

इन्टरेस्टीन्ग!हिमालयातल्या ज्या काही स्थानान्चे एक अनामिक आकर्षण वाटत आलय त्यापैकी पिथोरगड.
पुढच्या भागाच्या उत्सुकतेने प्रतिक्षेत. Happy

इन्टरेस्टीन्ग!हिमालयातल्या ज्या काही स्थानान्चे एक अनामिक आकर्षण वाटत आलय त्यापैकी पिथोरगड.>>>>> खरय! खरतर पुर्ण हिमलयाविषयीच गुढ आकर्षण आहे!