तू....तूच ती!! S२ भाग २

Submitted by किल्ली on 22 July, 2018 - 09:33

भाग १ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : https://www.maayboli.com/node/66728

ह्या अघोषित आणि अनियंत्रित स्पर्धेत पुढच्या एका वळणावर बाईकस्वार आणि आदित्य एकमेकांवर आदळणार असं वाटत असतानाच .............
कर्णकर्कश आवाज झाला ............

जोरदार कट मारून भरधाव वेग कायम राखत बाईकवाला पुढे निघून गेला. एक भयानक अपघात होता होता टळला, पण त्या गोंधळात त्याची बाईक कारला थोडी घासून गेली. आदित्य आपल्या आवडत्या आणि प्राणाहून प्रिय गाडीला ओरखडा उमटलेला बघून प्रचंड चिडला. बाईकचा क्रमांक त्याच्या चाणाक्ष बुद्धीने टिपून ठेवला होता , हाच काय तो दिलासा! पण मग तो आवाज कसला होता? आदित्यने मागे वळून पाहिलं तर एक बस करकचून ब्रेक मारत त्याच्या गाडीच्या मागे थांबली होती. तो पळत पळत गेला. गाडी आणि बस दोन्ही सुरक्षित होत्या. लोकांनी कल्ला करायच्या आत इथून निघायला हवं असा मनाशी विचार करत तो गाडीमध्ये शिरला. "आजचा दिवसच विचित्र आहे राव! काय होतंय मला? मी गाडी सेफ चालवतो, नेहमीच. मग आज एका बाईकमुळे का लक्ष विचलित झालं? चला लवकर घरी पोचायला हवं. आराम करायला हवा. म्हणजे डोकं ताळ्यावर येईल." असा विचार करत आणि जरा सावधपणे गाडी चालवत आदित्य एकदाचा घरी पोचला.
घरी आल्यावर फ्रेश होऊन त्याने गरमागरम कॉफी बनवली. "Success is journey, not a destination" असं लिहिलेल्या डार्क ब्राउन आणि बारीकशी fluorescent पोपटी किनार असलेल्या मागात त्याने ती ओतली. एक सिप पिताच त्याला खूप बरं वाटलं. तसाच मग हातात घेऊन तो त्याच्या घरातल्या आवडत्या ठिकाणी जाऊन बसला. त्याच्या रूम मधली sitting area असलेली मोठी खिडकी! तिथून सोसायटीमधल्या बागेचं दृश्य दिसत असे. आज फार ऊन नसल्यामुळे वातावरण आल्हाददायक होतं. तिथे छान गार वाऱ्याची झुळूक अनुभवत कॉफीचे घुटके घेत गाणी ऐकणे आदित्यला फार आवडत असे. आज गाणी लावलीच नव्हती त्याने! डोक्यात विचारांचा कल्लोळ माजला होता. काही केल्या त्याला शांत वाटत नव्हते. कॉफी संपवून तो कामाकडे वळला. लॅपटॉप सुरु करून आजचे उर्वरित काम त्याने कसेबसे संपवले. काम करताना त्याला आठवले की सौम्या त्याला तिचा ठावठिकाणा सांगण्यास मदत करू शकते. साधारण ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती. लगेच असं फोन करणं त्याला योग्य वाटलं नाही. त्याने उद्या विचारूया तिला असं ठरवून तात्पुरता स्वतःसाठी विषय संपवला. पण मन मात्र सैरभैरच होतं. तशाच अवस्थेत कधी दिवस सरला, रात्र झाली आणि झोप कधी लागली हे आदित्यला समजलेच नाही. थोड्या वेळेपुरता का होईना तो शांत झोपला होता. उद्याची सकाळ कोणती मनस्थिती घेऊन येणार होती हे त्याचे त्याला सुद्धा माहित नव्हते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अमेरिकेला एका नावाजलेल्या आणि मुळात भारतीय अशा कंपनीत तिच्या बाबांची एका मोठ्या प्रोजेक्टसाठी मार्गदर्शक ह्या पदासाठी निवड झाली म्हणून त्यांचं कुटुंब तिकडेच शिफ्ट झालं होतं. दादा आणि वहिनी आधीच तिकडे राहत असल्यामुळे सगळं अगदी सहज आणि वेगात घडलं. श्रुतीलाही अमेरिकेत मास्टर्स करण्याची इच्छा होतीच. सगळं असं व्यवस्थित जुळून आलं आणि कोणालाही काहीही न सांगता श्रुती अमेरिकेला गेली. अभ्यास करायचा, रिसर्च करायचा हे डोक्यात असल्यामुळे तिने सगळे सोशल कॉन्टॅक्टस बंद केले होते. तिला तिच्या ध्येयाचा पाठलाग करण्याचा मार्ग सापडला होता. आयटी क्षेत्रात भारतीय लोक सर्व्हिस देण्यात माहीर आहेत, पण फार थोडे लोक संशोधनाकडे वळतात. तिला नवीन काहीतरी करून दाखवायचं होतं. scientist व्हायचं होतं. इंजिनीरिंग पूर्ण केल्यानंतर इंडस्ट्री मधील काम शिकावं म्हणून ती तुलनेने स्मॉल स्केल असलेल्या कंपनीत रुजू झाली होती. तिथे उत्कृष्ट काम करून एक बेंचमार्क प्रस्थापित केला होता तिने! तिकडे ती छान रुळली होती. पण तीच्या भावनिक विश्वात उलथापालथ करणारा "तो" प्रसंग घडला आणि तिला ती कंपनी सोडावीशी वाटली. सगळं इथेच भारतात जड मनाने मागे ठेवून एक नवीन आयुष्य जगण्यासाठी आणि आपल्या मूळ ध्येयाच्या पूर्तीसाठी तिने अमेरिकेला प्रस्थान केले.

मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या रिसर्चचं काम पुढे न्यायचं होतं. बऱ्याचशा गोष्टी पूर्ण करायच्या होत्या. पण अमेरिकेला आणि रोजच्या रुटीनला श्रुती कंटाळून गेली होती. लगेच नोकरी करावी असही नव्हतं. जरा निवांतपणा, बदल आणि रिसर्च करण्यासाठी एकांत हवा म्हणून श्रुती प्रथमच एकटी पुण्यात परत आली होती. आई बाबानी त्यांचं राहतं घर आता अमेरिकेलाच सेटल व्हायचं म्हणून विकलं होतं. तसे तिचे नातेवाईक खूप होते पण तिकडे राहायला जाणं तिला फारसं आवडत नसे. म्हणून ती तिच्या मैत्रिणीच्या घरी राहायला आली होती. श्रुतीला पुण्यात येऊन २-३ दिवस झाले होते. पण पुण्यात येताच इथल्या सगळ्या आठवणी तिच्या मनात फेर धरून नाचू लागल्या. तिचं आवडतं शहर म्हणजे पुणे! पुणेकर म्हणून अभिमानाने मिरवणे तिला खूप आवडत असे. इथल्या प्रत्येक गल्लीत तिच्या काही ना काही आठवणी होत्या. शाळेतले मोरपंखी दिवस, कॉलेजचे मंतरलेले दिवस, मैत्रिणीबरोबर केलेली भटकंती, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग येथील घासाघीस करून केलेली खरेदी, रोड ट्रिप्स, अभ्यासासाठी शांत कोपरे धुंडाळत आणि खाऊगल्ली पालथी घालत केलेली मजामस्ती, पुण्यातला गणेशोत्सव सगळं सगळं तिला नॉस्टॅल्जिक करून जात होतं. एखाद्या चित्रपटाप्रमाणे सगळ्या घटना तिच्या मनःपटलावर अवतरित होत होत्या आणि तीही त्यांचा आस्वाद घेत मनमुराद सगळे क्षण पुन्हा वेचू पाहत होती.
आजच्या घडीला आदित्यची कंपनी सोडून श्रुतीला ३-३.५ वर्ष झाली होती.
कसे सरले दिवस कळलेच नाही जणू! त्याची आठवण तर नेहमीच येत असे तिला. पण ते तिचं सिक्रेट तिने मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून टाकलं होतं. पण आज आठवणींनी तिला भेट द्यायचीच असे ठरवले होते की काय असे वाटावे तसे जुने सगळे प्रसंग झरझर तिला आठवत होते. आज मनाची कवाडे सताड उघडली होती तिच्या!. "तो" प्रसंगअगदी कालच घडल्याप्रमाणे दिसत होता तिला!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ऑफिसची पार्टी होती. सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं. खूप दिवसांनी मनावरचा ताण हलका झाला होता. सगळे पार्टीची मजा घेत होते. आज श्रुतीही खुश होती. तिच्या कष्टाचे चीज झाले होते. त्याचबरोबर तिला कोणालाच माहित नसलेले आदित्य कंपनीचा मालक आहे हे गुपित समजले होते. त्याला ह्यापुढेही कंपनीच्या उत्कर्षासाठी मदत करायची हे तिने ठरवले होते. आज मनमोकळ्या मनाने ती सगळ्यांशी गप्पा मारत होती, दिलखुलास हसत होती. पण तिला काय माहित पुढच्या काही वेळात तिचं आयुष्य बदलून टाकणारी घटना घडणार आहे ते? आपल्या आयुष्याचे सुकाणू आपल्या हातात नसतात हेच खरं! मानून फक्त एक कळसूत्री बाहुला असतो ह्या जीवनाच्या पटावरचा! कळ फिरवणारी आणि आपल्याला हवे तसे नाचवणारी व्यक्ती तिसरीच असते. ती controller असते आपली नियती! कोणाला कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. तिच्यापुढे भलेभले हार मानतात. इथे तर श्रुती बिचारी एक निरागस, कष्टाळू, प्रामाणिक, स्वतंत्र विचारांची, स्वाभिमानी आणि ध्येयवादी मुलगी होती. तिचे काय चालणार ह्या नियतीपुढे! तिचेही आणि आदित्यचेही!!!

(क्रमशः )
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद शाली,Vchi Preeti , पवनपरी11,मेघा., द्वादशांगुला ,अक्षय दुधाळ Happy
thoda motha Hawa >> नक्की प्रयत्न करेन Happy