संक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)

Submitted by रसप on 21 July, 2018 - 03:37

क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' असलेल्या 'सैराट'चं सुधारित मिश्रण 'धडक' नावाने सिनेमागृहांत धडकलं आहे. मात्र आचरट प्रादेशिक अस्मिता आणि भयाण जातवास्तवाच्या सत्यकथनाबाबत असलेला एक अनाठायी आग्रह, 'धडक'ला मारक ठरणार, ही रिमेकची घोषणा झाली तेव्हापासून वाटत असलेली भीती अगदी सेंट-पर्सेंट खरी ठरत आहे. प्रत्यक्षात जातीभेदाने पोखरलेल्या ग्रामीण भागातलं अत्यंत वास्तववादी चित्रण वगळता बाकी काहीही विशेष नसलेल्या 'सैराट'च्या तब्बल तीन तासांच्या पसरट आणि रटाळ मांडणीसमोर 'धडक'चं अडीच तासांचं कथन खूप नेमकं आणि संक्षिप्त वाटतं. जातविस्तवाचे चटके 'धडक' देत नाही, हे मात्र खरं. तरी, 'धर्मा'चा चित्रपट आहे म्हटल्यावर त्याला जरासा 'टोन डाऊन' केलं जाणार, हे अपेक्षित ठेवायलाच हवं होतं म्हणून नंतरच्या नाकं मुरडण्यालाही अर्थ उरत नाही. 'धडक'चा खरा लेट डाऊन आहे, तो म्हणजे 'त्या'च्या मित्रांचा एकंदर भाग. सल्या-लंगड्या हे 'सैराट'च्या पूर्वार्धाची जान होते. सहाय्यक भूमिकांत सहाय्यक भूमिकेत असूनही 'तानाजी गालगुंडे'ने साकारलेला लंगड्या प्रदीप आजही सगळ्यांच्याच लक्षात आहे. 'श्रीधर वत्सर' आणि 'अंकित बिश्त' ह्यांची कामं उत्तम झाली असली, तरी त्या मानाने लक्षात राहण्यासारखी नाहीत. कारण एकूणच त्यांच्या 'ट्रॅक'मध्ये 'सैराट'वाली मजाही नाही आणि वावही नाही.

मराठीतून हिंदीत आणताना हे कथानक महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये गेलेलं आहे. उदयपूरमधील एक मोठ्या खानदानातली मुलगी 'पार्थवी सिंग' (जान्हवी कपूर) आणि उदयपूरमधल्याच एक हॉटेलव्यावसायिकाचा मुलगा मधुकर बागला (इशान खट्टर) ह्यांचं हे प्रकरण आहे. चित्रपटात २-३ वेळा 'वो लोग ऊँची जात के हैं' असा उल्लेख येत असला, तरी संघर्षाचं मुख्य कारण निवडणूक, राजकीय स्थानाला लागलेला धक्का असं सगळं आहे. 'सैराट'चं कथानक महाराष्ट्रातून हैद्राबादपर्यंत पोहोचतं, तर 'धडक'चं कथानक उदयपूरहून मुंबई व नागपूर व्हाया कोलकात्यात स्थिरावतं. ह्या संपूर्ण कथानकात 'धडक'ची कथा कुठेही अनावश्यक रेंगाळत, घुटमळत नाही. हा वाढवलेला वेग 'धडक'चं मुख्य आणि पहिलं बलस्थान आहे.

दुसरं बलस्थान पात्रांची निवड आणि त्यांची कामं.
इशान खट्टर आणि जान्हवी कपूर, हे वशिल्याचे घोडे जरी असले तरी ठोकळे अजिबातच नाहीत. इशान खट्टर तर खूपच सहजाभिनय करणारा वाटला. मोठ्या भावाने सुरुवातीच्या सिनेमात जी चमक दाखवली होती, त्याची तुलना केली तर 'छोटे मियां भी सुभानअल्लाह' निघू शकतात, असा विश्वास वाटतो. चित्रपटातील बरेचसे प्रसंग मूळ चित्रपटातूनच घेतले असल्यामुळे त्या त्या जागी दोन कलाकारांची थेट तुलना नकळतच केली जाते. तिथे इशान आणि जान्हवी, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूपेक्षा खूप सरस ठरतात. (रिंकू राजगुरूला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आश्चर्यकारकच वाटला होता.) तरी, जान्हवी कपूरचा नवखेपणा जाणवत राहतो. खासकरून शेवटच्या प्रसंगात तिच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून येतात. एरव्ही, दोघांची जोडी खूप टवटवीत आणि प्रभावीही वाटते.
आशुतोष राणाला ट्रेलर्समध्ये पाहताना खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. दुर्दैवाने, त्याच्या वाट्याला फारशी भूमिकाच नाही. मात्र वाट्याला आलेल्या काही मोजक्या प्रसंगांतही आतल्या गाठीचा, बेरक्या राजकारणी त्याने जबरदस्त वठवला आहेच.
कहानी - १, कहानी - २, स्पेशल छब्बीस सारख्या चित्रपटांत सहाय्यक भूमिकांत दिसलेला 'खराज मुखर्जी' इथेही सहाय्यक भूमिकेत जान ओततो. 'सैराट'मध्ये छाया कदमनी साकारलेल्या कर्कश्य आक्काच्या जागी बंगाली बाबू 'सचिनदा' म्हणून खराज मुखर्जी आणणं, दोन चित्रपटांच्या उत्तरार्धांच्या तुलनेत 'धडक'चं पारडं जड करतं.
मधुकरचे मित्र म्हणून 'अंकित बिश्त' आणि 'श्रीधर वत्सर' विशेष लक्षात राहणार नाहीत, अशी काळजी बहुतेक लेखकाने घेतली आहे. कारण 'धडक' हा ठळकपणे दोन स्टारपुत्र व कन्येच्या लाँचिंगसाठीचाच चित्रपट आहे. (इशानचा ह्यापूर्वी येऊन गेलेला माजीद माजिदी दिग्दर्शित 'बिहाईंड द क्लाऊड्स' म्हणजे त्याचं व्यावसायिक हिंदी चित्रपटातलं 'लाँचिंग' नाहीच म्हणता येणार.)

Dhadak_2018_film.jpg

गाण्यांच्या पुनर्निर्मितीवरून खूप उलटसुलट मतप्रवाह आहेत. 'झिंगाट' आणि 'याड लागलं' ची नवीन वर्जन्स कानाला मराठी शब्दांची सवयच झालेली असल्यामुळे खटकत राहतात. मात्र विचार केल्यास, ही दोन्ही गाणी त्यांच्या गरजेनुसार अमिताभ भट्टाचार्यनी उत्तम लिहिलेली आहेत. 'ढूँढ गूगल पे जा के मेरे जैसा कोई मिलेगा कहाँ..' सारख्या ओळी कथानकाच्या ग्रामीण ते निमशहरी भागाकडे येण्याला साजेश्या आहेत. शीर्षक गीत 'धडक'ही उत्तम जमून आलं आहे. अजय-अतुलकडे असलेल्या येणाऱ्या चित्रपटांची यादी वजनदार आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान, झीरो, सुपर 30, पानिपत आणि शमशेरा हे सगळे आगामी चित्रपट मोठ्या बॅनर्सचे आहेत. आत्तापर्यंतचं त्यांचं हिंदीतलं कामही दखलपात्र आहेच. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही जास्त आहेत.

'धडक'मध्ये ओरिजिनल जर काही असेल तर तो फक्त शेवट. 'सैराट'चाही तोच उच्चबिंदू होता. तो बिंदू बदलण्याची, तरी उंची कायम ठेवण्याची करामत शशांक खेताननी केली आहे. त्यांचे ह्या आधीचे चित्रपट काही विशेष दखलपात्र वाटले नव्हते आणि हाही चित्रपट जवळजवळ जसाच्या तसाच बनवलेला असल्याने फार काही प्रभाव मान्य करता येणार नाही.

एकंदरीत, मूळ चित्रपटातील पसरटपणा वगळणारा, तसेच त्याला बऱ्यापैकी मवाळ करणारा 'धडक', एक स्वतंत्र चित्रपट म्हणून ठरवलं तरी पाहता येत नाही. 'सैराट'च्या प्रेमात पडलेल्या लोकांना प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा जरी दाखवली, तरी ते आवडणार नाहीच, त्यामुळे उत्कटतेत नव्हे तर तीव्रतेत कमी असणारी ही प्रतिमा पसंतीस उतरणं कठीण आहे. मात्र, जर तुम्ही (माझ्याप्रमाणे) 'सैराट'ला 'एक बरा चित्रपट'हून जास्त काही मानत नसाल, तर 'धडक' नक्कीच पसंतीस उतरू शकतो. कारण जवळजवळ २० टक्क्यांनी कमी केलेली लांबी, हे 'धडक'चं बलस्थान खूप महत्वाचं आहे. 'धर्मा'चा असल्यामुळे निर्मितीमूल्यही वाढीव आहे. ते छायाचित्रणातून स्पष्ट जाणवतं.

'सैराट' एकदा पाहून विसरून गेलेल्यांनी 'धडक'ही एकदा पाहून विसरून जाण्यास हरकत नसावी.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2018/07/movie-review-dhadak.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इशान आणि जान्हवी, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूपेक्षा खूप सरस ठरतात. (रिंकू राजगुरूला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आश्चर्यकारकच वाटला होता.)
《《
Omg are you kidding ? Lol
Totally disagree !
Tried watching Dhadak with clean slate but Sairat is epic and Dhadak disappointed me, couldn't stop comparing !
Ishan Janhavi have done decent job and definitely commercial value faces but no where close to Akash and Rinku !

अरेरे...
धडक पाहायचा नाहीच हे नक्की केलच होतं..
मी सैराटप्रेमी आहे सैराटभक्त नाहीए तरी जान्हवी कपूरने साकारलेली पार्थवी अन रिंकू राजगुरुने साकारलेली आर्ची या दोघींमधली तुलनाच विचित्र वाटते.. खरतर ट्रेलर मधेच तिच्या भुवया उडवणं अजिब्बात आवडल नव्हत पण असो..
रिमेक मला सहसा आवडतच नाही.. आणि इतके दिखावेबाज चित्रपट्सुद्धा मी थेटरात पाहत नाही म्हणुन माझा पास..

इशान आणि जान्हवी, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूपेक्षा खूप सरस ठरतात. (रिंकू राजगुरूला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आश्चर्यकारकच वाटला होता.) >>>
Lol Lol

एकंदरीत, मूळ चित्रपटातील पसरटपणा वगळणारा, तसेच त्याला बऱ्यापैकी मवाळ करणारा 'धडक', एक स्वतंत्र चित्रपट म्हणून ठरवलं तरी पाहता येत नाही. 'सैराट'च्या प्रेमात पडलेल्या लोकांना प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा जरी दाखवली, तरी ते आवडणार नाहीच, त्यामुळे उत्कटतेत नव्हे तर तीव्रतेत कमी असणारी ही प्रतिमा पसंतीस उतरणं कठीण आहे. मात्र, जर तुम्ही (माझ्याप्रमाणे) 'सैराट'ला 'एक बरा चित्रपट'हून जास्त काही मानत नसाल, तर 'धडक' नक्कीच पसंतीस उतरू शकतो. कारण जवळजवळ २० टक्क्यांनी कमी केलेली लांबी, हे 'धडक'चं बलस्थान खूप महत्वाचं आहे. 'धर्मा'चा असल्यामुळे निर्मितीमूल्यही वाढीव आहे. ते छायाचित्रणातून स्पष्ट जाणवतं.

'सैराट' एकदा पाहून विसरून गेलेल्यांनी 'धडक'ही एकदा पाहून विसरून जाण्यास हरकत नसावी. >>>>

या परिच्छेदाची गरज नव्हती. एक तर रिव्ह्यू लिहा किंवा ललितलेख लिहा किंवा तुलना !

क्लिन स्लेट ने पाहिला तरी धडक ट्रेलर फार आवडला नाही.प्रत्येक दिग्दर्शकाची वेगळी स्टाईल वगैरे ओके, तरीही.
जान्हवी नवी आहे बरोबर.पण ज्या सीन मध्ये चेहर्‍यावर किमान आश्चर्य, थोडा राग वगैरे पाहिजे (तो उडी मारतो पाण्यात त्या सीन मध्ये) तिथेही तिच्या चेहर्‍यावर जनरल पार्टीत माफक स्माईल देऊन पोझ देत असल्याचे सौम्य भाव आहेत.दिसायला छान आहे.पण थोडे भाव हवेत चेहर्‍यावर.
बाकी पिक्चर पाहील्यावर ठरवेन.गाण्यांमुळे हिट जाईलच.

रसप, तुम्हाला सिनेमा ह्यावेळी चक्क आवडलाय असं वाटतंय Happy
मला ट्रेलरच पुरलंय धडकचं.
'पप्पी? मतलब कुत्तेका छोटा बच्चा(आह)' असा डायलॉग जो ती दोन्ही भुवया नाचवत बोलते ते मी बरेचदा मुलांना करुन दाखवते.
मुलं खुप हसतात. Happy

>> जातीभेदाने पोखरलेल्या ग्रामीण भागातलं अत्यंत वास्तववादी चित्रण वगळता बाकी काहीही विशेष नसलेल्या 'सैराट'च्या तब्बल तीन तासांच्या पसरट आणि रटाळ मांडणी

+१११

I agree with your review. I consider Sairat an average film. So may be Dhadak is also same type. No need to waste money on this.

अगदीच आवरा परीक्षण
तुमचे बऱ्यापैकी संतुलित असते परीक्षण म्हणून मुद्दाम वाचतो पण सॉरी टू से
अजिबात पटलं नाही
एक लाडात वाढलेल्या सरपंचाच्या पोरीच्या व्यक्तिमत्वात होत गेलेला बदल मंजुळेनी ज्या प्रकारे दाखवलाय आणि रिंकू ने तो पेललाय त्याला तोड नाही
तिच्या पुढे जान्हवी उजवी वाटली हे वाचून हसावं का रडावं असं झालं

आशुचँप +११
मला तर काय लिहु काय नको झालय , सैराट न बघता गेलात तर शक्यता आहे जरा बरा वाटायची पण सैराट पाहिला असेल आणि सैराट फॅन असाल तर मात्र #RIPsairat

{भयाण जातवास्तवाच्या सत्यकथनाबाबत असलेला एक अनाठायी आग्रह}

हे वाचल्यावर करण जोहरछाप चित्रपटांसाठी तुम्ही फिट प्रेक्षक आहात असं वाटलं.

इंग्रजी पेपरात लिहिणाऱ्यांना जे सैराट आणि म़ंजुळेंचं वेगळेपण वाटलं, ज्या कारणासाठी त्यांना वाखाणलं, तेच तुम्हाला नकोय.

यानिमित्ताने मला प्रश्न पडला. हिंदी सिनेमात क्लास स्ट्रगल दाखवतात. पण जातिभेद ?
अछूत कन्या, सुजाता, आरक्षण .तीन चित्रपट आठवले.

'धर्मा'चा चित्रपट आहे म्हटल्यावर त्याला जरासा 'टोन डाऊन' केलं जाणार, हे अपेक्षित ठेवायलाच हवं होतं म्हणून नंतरच्या नाकं मुरडण्यालाही अर्थ उरत नाही. >> Uhoh
धर्माने सिनेमा बनवून प्रेक्षकांना ऊपकृत केले आहे आणि प्रेक्षकांनी सिनेमा बघून कृतकृत्य वाटून घ्यावे असे थेटच म्हणा Rofl

धडक सिनेमा बघितलेला नाही (आणि बघणारही नाही) त्यामुळे सिनेमाबद्दल नो कमेंट्स.
पण सैराट बद्दलच्या प्रत्येक वाक्यागणिक लेखक महाशय रिव्यु लिहिण्यास किती अपात्र आहेत ह्याचा बोध होत राहिला.

आधीच प्रॉडक्शन हाऊस प्रती आपल्याला बायस आहे हे लेखक महाशयांनी ठळकपणे लिहिले आहे आणि त्यात सैराट बद्दल मनात आकस आहे हे सुद्धा धडधडीत कबूल केले आहे आणि तरी 'मी सिनेमा परिक्षण' लिहिले आहे असे म्हणत आहेत. कोणाला ह्यात काही विपर्यास दिसत नाही का? एक जबाबदार चित्रपट परिक्षकाने आपले बायसेस सिनेमा बघण्याआधी बाजूला ठेवणे अपेक्षित नाही का?

सिनेमाच्या लांबीविषयी ओसीडी आहे क.. परिक्षेचा पेपर असल्यागत तो एवढ्याच वेळात संपला पाहिजे प्रत्येक रिव्युमध्ये लांबीविषयी कमेंट्स असतात म्हणून विचारतोय..
गॉडफादर, LOTR वगैरे मास्टरपीसेसची लांबी बघा. पाल्हाळ लावले, धागे दोरे नसलेले, स्टोरीमध्ये वॅल्यू अ‍ॅड न करणारे सीन्स आहेत म्हणणे वेगळे आणि आपला खुर्चीत बसण्याचा थ्रेशोल्ड आणि सिनेमा अमूकच वेळेत संपवावा ह्याचे गुणोत्तर का घालावे दरवेळी?
सैराटचे चित्रित केलेले काही सीन्स जे फायनल प्रॉडक्ट मध्ये नव्हते... ते असते तर आम्ही अजून १५ मिनिटे आनंदाने आपल्या पुढार्‍यांसारखे खुर्चीत अवघडलेले बूड टिकवून धरले असते. Lol

धडक पाहिलेला नाही, पण सैराटशी केलेली तुलना अजिबात पटली नाही. परीक्षणाला सैराटबद्दलच्या आकसाचाच जास्त वास येतोय.

'सैराट'चं सुधारित मिश्रण 'धडक' <<< म्हटल्या नंतर आणि धडक च ट्रेलर बघितल असल्यामुळे काही वाचायची ईच्छाच राहीली नाही.

'पप्पी? मतलब कुत्तेका छोटा बच्चा(आह)' असा डायलॉग जो ती दोन्ही भुवया नाचवत बोलते ते मी बरेचदा मुलांना करुन दाखवते.
मुलं खुप हसतात. Happy
>>>>

Proud
हे आमच्याकडेही फेमस आहे.. याच प्रकारे ..

धडकचा वेग वाढवला असेल तर चांगले आहे. त्याची गरज होतीच. सैराटचा ते पळून गेल्यापासूनचा सेकंड हाफ जाम बोअर आहे. त्यामुळे फर्स्ट हाफला रिपीट वॅल्यू असूनही चित्रपट पुन्हा बघावासा वाटत नाही.

जान्हवीने आर्चीला मात दिली असेल असे ट्रेलर बघून तरी वाटत नाही.
पण येस्स, तो तळ्यात उडी मारायच्या सीनमध्ये ती ओली झालेल्या अवस्थेत त्या हिरोकडे बघत राहते तेव्हा ती मला खूप छान वाटते.

आकाश ठोसरला मात्र त्या शाहीद कपूरच्या भावाने मात दिली असू शकते. ट्रेलरमध्ये तो गोड दिसतो. नाचे झिंगाट गाण्यातही मस्त दिसतो. आमच्याकडे हल्ली हिंदी झिंगाट गाणेच लागते. कोरीओग्राफी छान आहे. मराठी झिंगाट गाणे वास्तववादी वाटावे म्हणून "ड" दर्ज्याची कोरीओग्राफी केली आहे. बोअर होते. फक्त शब्दांमुळे छान वाटते.

येड लागले गाणे मात्र सैराटचे मस्त आहे. ईथे तसाच प्रयत्न केलाय पण ती जादू तितकीशी जमली नाही. पण याड लागलेशी तुलना केली नाही तर ओबरऑल चांगले आहे.

शेवट बदललाय हे एक कारण मराठी लोकांना मोठ्या संख्येने चित्रपटगृहात घेऊन जाणार..

अरे हो ते टायटल ट्रॅक माझ्या फार आवडीचे झाले आहे. ईन्टेन्स आहे. आवंढा घश्यातच रोखला जातो.

आर्चीला नक्की कसला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला? सर्वोत्कृष्ट अभिनेत्री की पदार्पण? बाकी राष्ट्रीय पुरस्कार तर बाहुबलीसारख्यालाही मिळतो. खरा पुरस्कार फिल्मफेअरच. अजय अतुल यावेळी संगीताचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवतील. याच धडकसाठी किंवा वर्षाखेरीस येणारया झिरो साठी ...

आधीही दुसरया धाग्यावर लिहिलेले.. तीनही खानांनी करीअरच्या सुरुवातीला मैने प्यार किया, क्यू से क्यू तक आणि डीडीएलजे असे अजरामर प्रेमपट केले आणि पुढे जाऊन सुपर्रस्टार बनले. पैकी हा धडक क्यू से क्यू तक च्या कॅटेगरीतला आहे.

सिनेमाचा वेग वगैरे अजिबात काही वाढवलेला नाहीये, नुसताच कापलाय मेजर सोल ऑफ द मुव्ही !
इन्टेन्स केलाच नाहीये , बरेच हवे होते ते सीन्स नाहीच्चेत म्हणून संपला लवकर, उथळ झालाय, गुंडाळलाय म्हणु शकता.
ना हिरो हिरॉइनच ना प्रेम फुललय, ना मित्रां बरोबरचा ह्युमर, ना हिरॉइनचा ऑरा- बिंधास्त डॉमिनेटींग अ‍ॅटीट्युड दिसलाय, ना इंटरव्हल नंतरचा संघर्ष इन्टेन्स झालाय, ना धड कमर्शिअल ना धड रिअल लाइफ सिनेमा .. गंडलाय पूर्ण !
नागराज वर्सेस शशांक खैतान म्हणजे अगदीच ऑस्ट्रेलिया वि केनिया केविलवाणा समना झालाय !

अगदी बरोबर DJ.
रसप आपला हा review फार biased वाटला राव.

रसप, नॉर्मली तुमचे रिव्ह्यूज आवडतात मला पण...
मी सैराट पाहिला नाही. धडक सुद्धा पहाणार नाही. पण yt वर जेवढं पाहिलंय त्यावरुन एक कलाकृती म्हणून सैराट धडक पेक्षा अनेक पटींनी उजवा वाटतोय. सेम विथ रिंकू आणि़ जान्हवी. रिंकूपुढे जान्हवी म्हणजे... तडका दाल पुढे साधं वरण.

any ways...you are entitled to your opinions.

सॉरी टू से रणजित पण सिनेमा इतका फ्रेम टू फ्रेम(प्रसंग) कॉपी केला असेल असे अजिबात वाटले नव्हते त्यामुळे केवळ १५-२० मिनीटे पाहू शकलो.

आणि सीन्सना नागराजने दिलेली ट्रीटमेंट आठवल्यावर 'ये शशांक खेतान के बस की बात नही थी' हे वारंवार जाणवले. करण जोहरने कधीतरी नागराजला शशांकला मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती आणि त्याने ती नाकारली होती असेही कुठेतरी पाहण्यात(बहुतेक यू टयूबवर) आले. खरे नसेलही कदाचित! पण असो.....

मुख्य पात्रांच्या अभिनयाबद्दल तुमचे मत(किंवा आकाश आणि रिंकूशी केलेली तुलना) बिल्कुल पटले नाही. किंबहुना आपल्याला तंतोतंत उलटे कसे काय वाटले बुवा? असा प्रश्न पडला.

विश्वास ठेवा, मी व्यक्त केलेल्या मतांमागे मराठीची अस्मिता, आपला सैराट वगैरे भावना नक्कीच नाहीत.

सॉरी टू से रणजित पण सिनेमा इतका फ्रेम टू फ्रेम(प्रसंग) कॉपी केला असेल असे अजिबात वाटले नव्हते त्यामुळे केवळ १५-२० मिनीटे पाहू शकलो.

आणि सीन्सना नागराजने दिलेली ट्रीटमेंट आठवल्यावर 'ये शशांक खेतान के बस की बात नही थी' हे वारंवार जाणवले. करण जोहरने कधीतरी नागराजला शशांकला मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती आणि त्याने ती नाकारली होती असेही कुठेतरी पाहण्यात(बहुतेक यू टयूबवर) आले. खरे नसेलही कदाचित! पण असो.....

मुख्य पात्रांच्या अभिनयाबद्दल तुमचे मत(किंवा आकाश आणि रिंकूशी केलेली तुलना) बिल्कुल पटले नाही. किंबहुना आपल्याला तंतोतंत उलटे कसे काय वाटले बुवा? असा प्रश्न पडला.

विश्वास ठेवा, मी व्यक्त केलेल्या मतांमागे मराठीची अस्मिता, आपला सैराट वगैरे भावना नक्कीच नाहीत.>>+१००

कदाचित अनुराग कश्यप वगैरे सारख्याने स्क्रिप्ट ला वेगळी ट्रीटमेंट दिली असती.रंग दे बसंती वाला पण चालला असता.
अर्थात मला मुळातच बद्री की दुल्हनिया आणि हमटी की दुल्हनिया दोन्ही पण झेपले नव्हते.

सैराट आवडला नव्हता तर धडक एक स्वतंत्र चित्रपट म्हणून रिव्ह्यू करायला हवा होता. नावडत्या चित्रपटाशी तुलना करून बळेच फालतू चित्रपटाला चांगला म्हणायचे असेल तरीही त्रास नाही, पण त्याला परीक्षण म्हणू नका; ललित, स्फुट नैतर अजून काय काय असतील ती नावे ठेवा. परीक्षण म्हटले की अपेक्षा वेगळ्या असतात.

बाकी तुमची बरीच परीक्षणे आवडलेली आहेत. मला आवडलेल्या पण तुम्ही फाडलेल्या किंवा मला नावडलेल्या आणि तुम्ही डोक्यावर घेतलेल्या, दोन्ही प्रकारची. पण हे परीक्षण काहीच्या काहीच.

रिंकूसमोर जान्हवी उभीही राहू शकत नाही, त्यामुळे तुलना होऊच शकत नाही.

पण आर्चीच्या तुलनेत परश्या टोन डाउन असणे हा चित्रपटाच्या कथेचा भाग आहे. मधुकर पार्थवीपेक्षा स्मार्ट वाटला तर दिग्दर्शन फसले म्हणायला हवे. सैराटचा हिरो आर्ची आहे, परश्या नाही.

अर्थात दिग्दर्शन असले तर ते फसले म्हणता येईल. कजोच्या मते सगळे चकचकीत, भव्य व परिटघडीचे असले म्हणजे झाले. चित्रपट चालतो. धडकही चालणार, कारण मल्टिप्लेक्सला जाणाऱ्यांची गरज 3 तास मनोरंजन व आठवडाभर गाणी एवढीच आहे. धडक ही गरज पुरवतो.

Pages