याहू मेसेंजर बंद होतोय. आजचा शेवटचा दिवस. जागवूया जरा आठवणी...

Submitted by अतुल. on 17 July, 2018 - 02:32

बरीच वर्षे झाली. ज्या काळात संगणकावर डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम अजून अस्तित्वात होती आणि विंडोज बाल्यावस्थेमधून तारुण्यात पदार्पण करत होती त्या काळात युनिवर्सिटी मध्ये कॉम्प्यूटर सायंस शिकत असताना आम्ही दोघा मित्रांनी मिळून एक तांत्रिक उपद्व्याप केला होता. अर्थातच त्या काळात मेसेंजर वगैरे कोणाला ऐकूनही माहित नव्हते. तेंव्हा फाईल सिस्टीम आणि नेटवर्किंगचे ग्यान वापरून आमच्या कॉम्पुटरच्या लॅबमध्ये आम्ही एक साधा मेसेंजर बनवला होता. नेटवर्कने जोडलेल्या फक्त दोन कॉम्पुटर मध्ये चालणारा. त्या सेमिस्टरला आम्हाला आर्टीफिश्यल इंटेलीजंस होते. व त्याचीच चर्चा विद्यार्थ्यांच्यात असे. मग काय? या मेसेंजरच्या एका कॉम्पुटरवर माझा मित्र बसायचा. आणि दुसऱ्यावर मी इतर मित्रांना बोलवून सांगायचो आर्टीफिश्यल इंटेलीजंसचा प्रोग्रॅम बनवलाय. काहीही विचारा सांगेल. मग ते त्यांचा प्रश्न टाईप करायचे. तो प्रश्न आमच्या मेसेंजर मार्फत थेट दूरवर दुसऱ्या कॉम्पुटरवर बसलेल्या माझ्या मित्राकडे जायचा. मग तो तिथून उत्तरे देत असे. भाषा अशी खुबीने वापरत असे कि वाटावे संगणकच देत आहे Happy आणि उत्तर वाचून विचारणारा महाआश्चर्यचकित होई. आपला प्रश्न मेसेंजर मधून दुसऱ्या संगणकावर जातोय आणि तिथून कोणीतरी उत्तर देतोय हे कुणाच्याच लक्षात यायचे नाही. हळू हळू तिथे गर्दी होऊ लागली. बघता बघता याची कीर्ती सर्वत्र पसरली. आमच्या सरांपर्यंत गेली. ते स्वत: बघायला आले. तेंव्हा त्यांना मात्र आम्ही सगळे सत्य आधीच सांगून टाकले. ते म्हणाले हे मेसेंजर प्रोडक्ट म्हणून डेवलप करा. खूप मोठे प्रोडक्ट होईल.

ते स्वप्न उराशी बाळगूनच आम्ही सगळे बाहेर पडलो खरे. पण पुढे त्यावर काही झाले नाही. शिक्षण झाल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुण्याला येऊन नोकरी पकडली. इंग्लंड अमेरिकेला जायचे वेध लागले. एक दिवस एक मित्र इंग्लंडला गेला. तेंव्हा त्याने इमेल करून मला सांगितले "याहू मेसेंजर म्हणून एक सोफ्टवेअर टूल निघालंय बघ. ते इंस्टाल कर. आपण बोलू" ती याहू मेसेंजरची पहिली ओळख. मला माहित नव्हते नक्की काय आहे. पण इंस्टाल करून त्याला माझा आयडी दिला. आणि आम्ही चाट करून बोलू लागलो. त्या त्या क्षणीच आमचे मेसेज एकमेकाला जात होते. तेंव्हा मोठी गम्मत वाटली आणि लक्षात आले कि हे तसेच काहीतरी आहे जे आपण काही वर्षांपूर्वी लॅबमध्ये तयार केले होते. ज्याचे प्रोडक्ट बनवायचे स्वप्न पाहिले होते. (अर्थात हे स्वप्न मी अलीकडे मागच्या काही वर्षात माझा KnowMe Messenger लॉंच करून पूर्ण केले हा भाग वेगळा). माझ्या माहितीप्रमाणे याहू मेसेंजरच्या आधी आयसीक्यू तसेच अन्य काही मेसेंजर होते. पण अमेरिकेत काही प्रमाणात ते वापरले जात. आपल्यकडे तर फारसे कुणाला ते माहित नव्हते. त्यामुळे मेसेंजरची लाट याहूमुळे आली म्हटले तर वावगे ठरू नये.

पुढे त्यात स्मायली हा प्रकार आणून याहूने अजून धमाल उडवून दिली. तत्पूर्वी इ-मेल मधून टेक्स्ट स्मायली वापरल्या जात. याहू मेसेंजर मध्ये त्यांना ग्राफिकल ओळख मिळाली. याहू मुळे त्या खूप पोपुलर पण झाल्या. (त्यातली एक स्मायली तर व्यक्तिश: मला अतिशय आवडत होती. डोळ्यांची उघडझाप करणारी अतिशय बोलकी.(त्यामुळे तिचाच आधारे मी माझ्या मेसेंजरचा आयकॉन बनवला. तशी स्मायली मला आत्ताच्या मेसेंजर्स मध्ये सुद्धा आढळली नाही. असो). आणि पुढील काळात बघता बघता याहू मेसेंजर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. किंबहुना १९९५ ते २००५ हे दशक तत्कालीन सोशल नेटवर्किंगवर याहूचे निर्विवाद साम्राज्य होते. त्यात याहू मेसेंजर, याहू ग्रुप्स, याहू इमेल हे आघाडीवर होते. पुढे ओर्कुटने या साम्राज्याला पहिला धक्का दिला. पण तरीही २०१०पर्यंत याहू मेसेंजर आघाडीवर होताच. नंतर फेसबुक आणि व्हाट्सपच्या झंझावातात हा मेसेंजर तग धरू शकला नाही. (पैकी व्हाट्सपची निर्मिती हि, माझ्या वाचनात आले त्यानुसार, याहू मधूनच बाहेर पडलेल्या दोघांनी केली) आणि आज तर या मेसेंजरचा शेवटचा दिवस.

मला आठवतय इंग्लडमध्ये असताना आम्ही आमच्या विद्यापीठीय मित्रांचा एक ग्रुप याहू मेसेंजरवर केला होता. त्यात काही भारतातून काही अमेरिकेतून आणि मी व इतर काही इंग्लंडमधून. अक्षरशः धमाल करायचो आम्ही. असे वाटतही नव्हते कि आमच्यात इतकी अंतरे आहेत. प्रत्यक्ष भेटूनही जितक्या गप्प्पा झाल्या नसत्या तितक्या याहू मेसेंजर वर या ग्रुप मध्ये व्हायच्या. तेंव्हा मराठी टायपिंग उपलब्ध नव्हते. त्यामुळे इंग्रजी अल्फाबेट वापरूनच आम्ही मराठी लिहित असू. रोमन-मराठी. अजून आठवते अशा रोमन-मराठीतून मी मोठ्या मोठ्या इ-मेल भारतात असलेल्या माझ्या भावाला लिहायचो आणि तो त्या घरच्यांना वाचून दाखवायचा. किंबहुना तेंव्हा हे खूप सर्रास होते (त्यामुळे अजूनही जेंव्हा काही लोक मायबोलीवर कधीकधी अल्फाबेट वापरून मराठी लिहितात तेंव्हा मला तरी ते वाचताना त्रास नाही होत. उलट एकेक शब्द न शब्द काळजीपूर्वक वाचला जातो Lol ओके. तो विषय वेगळा). तर यामुळे तेंव्हा कधीकधी गमती पण होत. हे लिहिता लिहिता एक अशीच एक छोटीशी गम्मत झालेली आठवतेय. एकदा भारतात असलेल्या माझ्या मित्राने मला याहूवर मेसेज पाठवला. (अर्थात आमचे संभाषण रोमन मराठी होते. पण इथे आता मी ते सगळे देवनागरीत लिहितो...)

तो: अरे बच्चनचा aks रिलीज झालाय. सही आहे एकदम.
मी: कोणता? aks? म्हणजे?
तो: अरे aks म्हणजे aks
मी: अरे असे कसे काय नाव? फुलफॉर्म?
तो: अरे फुलफॉर्म नाही aks हेच नाव आहे. AKS... got it?
मी: काय? a k s? हे काय नाव आहे का? नक्की शोर्टफॉर्म असणार. तू नीट बघ. मध्ये डॉट असतील.
तो: अरे नाही रे. AKS... AKS... एकच शब्द आहे हा

तो जाम वैतागला होता Biggrin याहू मेसेंजर वर अशा कैक गमतीजमती होत. पुढे पुढे तर तो माझ्यासारख्या अनेकांच्या नेहमीच्या आयुष्याचा भाग बनला (जसे आज व्हाट्सप आहे). मी काम करत असलेल्या एका एकदोन कंपन्यांमध्ये तर तो ऑफिशियल मेसेंजर होता. या शिवाय व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा तो कैकजणांच्या भावविश्वाचा भाग बनला होता. कित्येक जणांतील अंतरे कमी झाली. दोन्ही अर्थानी. (कित्येकांच्यात मेसेंजरमुळे दुसऱ्या अर्थाने अंतरे वाढली पण असतील). कित्येक प्रेमप्रकरणे जमली असतील. कित्येक लग्ने पण जुळली असतील. ब्रेकअप झाले असतील. डिवोर्स झाले असतील. अफेअर्स झाली असतील. वादविवाद झडले असतील. त्यात आणि या मेसेंजर मध्ये पूर्वी चाटरूम असायच्या. तिथे सुद्धा धमाल पब्लिक असायचे. कित्येक जण तर तिथे पडीक असायचे. कधीही लॉगीन झाले कि हे ठराविक आयडी तिथे हजरच. कधी कधी तिथे गंभीर वाद पण व्हायचे. नंतर याहूने या चाटरूम्स बंद केल्या.

तर अशा कित्येकविध आठवणी अनेकांच्या आयुष्यात याहू मेसेंजरने निर्माण केल्या असतील. त्या जागवणे हाच या धाग्याचा उद्देश. एकेक आठवेल तसे मी पण लिहित जातो.

So... Many many thanks Yahoo! Messenger. We all will miss you. Goodbye! Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रॅड्युअशन नंतर काही काळ कोलकात्याला होतो,
तो काळ याहू मेसेंजर च्या भरावश्यावरच काढला Happy

तिकडे एक junction96 म्हणून नेट कॅफे ची चेन होती,ठराविक रकमेची कुपन्स घेऊन तुम्ही शहरात कोणत्याही औटलेत मध्ये जाऊ शकायचात. (मायबोलीचा शोध मला तिकडेच लागला)

तर शनिवार रविवार मी तिकडे पडीक असायचो, पुण्यातल्या मित्रांबरोबर गृप चॅट, तेव्हाची GF (आणि सध्याच्या बायको) बरोबर चॅट, करत किती तास घालवले याची गणतीच नाही,
पण 2006 07 पासून याचा उपयोग कसा काय माहीत पूर्णच बंद केला.

<<त्यात आणि या मेसेंजर मध्ये पूर्वी चाटरूम असायच्या. तिथे सुद्धा धमाल पब्लिक असायचे. कित्येक जण तर तिथे पडीक असायचे.<<
हे सगळे अनुभवले आहे.
२००५-६ची गोष्ट असेल. घरच्या कॉम्प्युटर इन्स्टीट्युट मधे नुकतीच एम एच सी आय टी परिक्षा दिली होती. भावाने सगळ शिकवले पण इन्टरनेट काही शिकवले नव्हते. तरीही तेवढ्या बळावर विश्रांतवाडीला एका एज्युकेशनल इन्स्टीट्युट्मधे नोकरी लागली. पहिल्याच दिवशी माझ्याबरोबरच लागलेली कलिग नंतर मैत्रीण झाली. आणी बाईने काय शिकवले असेल तर इन्टरनेट. याहु वर इमेल आयडी ओपन करणे. याहु चॅट... ते ASL please.. वै मज्जा याय्ची.
कलिग इन्दोरची होती. मग 'इन्दोर ऑनलाईन' असेही काहीतरी इन्दोरच्या वेबसाईटवर चॅट बॉक्स होते वाटते. तिथे अन याहु चॅटवर पडीक असाय्चो. धम्माल करायचो. इतके एडिक्शन झाले की घरी आल्यावर पण जवळच्या सायबर कॅफेमधे जाउन तासनतास घालवले आहेत. ऑरकुट आल्यावर तिने ते ही शिकवले. नंतर नंतर या आभासी दुनियेचा कंटाळा यायला लागला. मायबोली सापडले अन सगळ सोडुन दिले. Lol

छान आठवणी. मज्जा यायची याहूवर गप्पा मारायला. ईमेल साठी रेडिफमेल जास्त वापरले जायचे परंतु गप्पांच्या फडात याहू आघाडीवर होते बरेच दिवस. अलविदा याहू

ASL Please >> Lol अगदी अगदी. चॅट रुम मधे गेलो कि पहिला प्रश्न हाच अदळायचा

>> ते ASL please

@मी_आर्या काय झकास आठवण Lol ASL please हा हा हा.. एकदा ऑफिसच्या कलीग चा मेसेज आला होता. तेंव्हा हा मेसेंजर त्या कंपनीत ऑफिशियल म्हणून वापरत होते पण मला त्याची सवय नव्हती. अनोळखी आयडीवरून आलेला मेसेज म्हणून मी आपला सरळ रिप्लाय केला ASL please Biggrin आणि तिकडून रिप्लाय आला "अरे, मी टीम मध्ये आहे तुझ्या". मी एकदम हडबडून गेलो. त्यानंतर अनेकदा त्या ASL please ची आठवण काढून आम्ही हसत असू.

आताच्या सोमी वर फेसबुक इन्स्टाग्राम व्हाट्सप इत्यादी आहे तसे तेंव्हा फक्त याहू होते. त्यातल्या त्यात हा मेसेंजर जीवनाचा भाग बनून गेला होता तेंव्हा. याहू मेसेंजरच्या इमोजी मी अजूनही मिस्स करतोय. त्यातल्या काही आहेत ज्यांची जागा आताच्या युनिकोड इमोजी (ज्या व्हाट्सप व इतर सोमीवर दिसतात) मधली कोणतीच इमोजी घेऊ शकत नाही. अगदी योग्य भावना व्यक्त व्हायची Lol


.

.

.

.

बरोब्बर!
फार एन्जॉय केले तेव्हा याहु मेसेंजर. Lol
माझ्या याच कलिगचे लव्ह मेरेज होते. ती गुजराथी, तो मराठा. दोन्ही घरचा फार विरोध होउन लग्न झालेले. अन तेव्हा ते नुकतेच लग्न होउन पुण्यात आलेले. तर ती मला याहु चॅटवर मुद्दाम अनोळखी मुलगी बनुन तिच्या नवर्याशी चॅट करुन त्याची फिरकी घ्यायला लावायची. .
ते ही, अस," हाय जानु! कहा हो? कबसे आपका इंतजार कर रही हु! चलो कही पे मिलते है, Biggrin
अन ही माझ्याजवळच बसुन मलाच सांगायची असे असे टाईप कर. Rofl

लेख छान झालाय...
अनुभव नाहीच.. पण kind of relate झाल्यासारखं वाटलं...

अरे!
आमचं लग्न करायचं घटत होतं तेव्हा आम्ही दोघे दोन देशात होतो. त्याकाळात याहू मेसेंजरचा खूप मोठा आधार होता!

1998-99 दरम्यान नवऱ्याने मित्रमैत्रिणी नावाची chat रूम/group सुरू केली होती. धमाल असायची तिथे! नंतर काही वर्षांनी ती दुसरं कोणीतरी चालवायचं.

अरे!
आमचं लग्न करायचं घटत होतं तेव्हा आम्ही दोघे दोन देशात होतो. त्याकाळात याहू मेसेंजरचा खूप मोठा आधार होता!

1998-99 दरम्यान नवऱ्याने मित्रमैत्रिणी नावाची chat रूम/group सुरू केली होती. धमाल असायची तिथे! नंतर काही वर्षांनी ती दुसरं कोणीतरी चालवायचं.

ASL > Lol

Angel Priya का?

ह्या ASL वर कॉमेडियन प्रविणच एक मस्त skit आहे

Verizon ने बंद केलं ASL. याहू त्यांनी घेतली आणि Flickr घेतली Smugmug photo sharing कंपनीने.

माझ्या घरी इंटरनेट आल्यावर काहीच महिन्यात याहू मेसेंजर बंद झाले होते. त्यामुळे फारसे वापरता आले नाही. पण त्यात एक फिचर होते ज्याद्वारे समोरच्याचे chat कडे लक्ष नसेल तर आपल्याकडून एक बटन दाबून त्याच्याकडे जोरात बेल वाजवता यायची! ते फिचर मला खूप आवडायचे!!!

माझ्या अमेरिकेत लग्न होऊन गेलेल्या मुलीशी ऑपिसला जाताना त्या जुन्या नोकिया फोनवरून चॅट करत असे याहू मेसेंजर वरून..... खूप हृद्य आठवणी आहेत् दोन् हजार चारची गोष्ट ..... माझा न्युमेरिकल की पॅड चालत नाहीये :

आमची सुरवात dos based IRC chat वरुन झाली 1996 मध्ये. आमचा बराच मोठा ग्रुप होता, बरेच गटग झाले, अनेक प्रेमप्रकरणे, ब्रेक अप्स झाली, काहींची लग्ने झाली, ती सगळ्यांनी अटेंड केली. मग IRC चाट मागे पडत बंद झालं तेव्हा याहू मेसेंजर वर सगळे शिफ्ट झाले. ते मी काही काळ वापरले, पण ती मजा नव्हती. मग ओर्कुटवर दुसरा ग्रुप जमला, त्यांच्या सोबत याहू मेसेंजरवर चाट होत असे. गाण्यांच्या MP3 ची देवाण घेवाण त्यावरून होत असे.
या दरम्यान मी वर्षभर असे सोमी वरून दोन तीन ब्रेक्स घेतले होते म्हणुन असेल, कुठल्याही मेसेंजर सर्व्हीसच्या खास अशा आठवणी नाहीत जशा IRC Chat, ऑर्कुटच्या आहेत.