प्रार्थना नाकारली जेव्हा घनांनी ..

Submitted by कविता क्षीरसागर on 11 July, 2018 - 22:29

प्रार्थना नाकारली जेव्हा घनांनी
भिजवले मग शेत त्यांनी .. आसवांनी

का असे झाकोळले आहे अचानक
छेडला मल्हार बहुधा आठवांनी

कोरडे नक्षत्र गेले .. चिंब डोळे
गर्जना नुसतीच केली ह्या ढगांनी

पावसाळी रात्र होती एक छत्री
जवळ आलो.. अर्धओलेत्या क्षणांनी

ही तुझ्या त्या पावसाची छेडखानी
पकडली चोरी पुन्हा ओल्या खुणांनी

वीज पडल्यासारखे झाले मनावर
तोडला जेव्हा भरोसा प्रियजनांनी

श्रावणाचा भासही देई तजेला
सोसले चटके उन्हाचे त्या घरांनी

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येथे कवितांना दाद का मिळत नाही? मी छान म्हटलं, तुम्ही धन्यवाद म्हटलं. एवढच? खरच छान आहे गझल. आता गझलेच्या नियमात ती बसते की नाही, मला माहीत नाही पण प्रत्येक शेर सुंदरच आहे.

वाव्वा,सुंदर गझल!
>>>का असे झाकोळले आहे अचानक
छेडला मल्हार बहुधा आठवांनी>>>मस्त!

क्षणांनी,खुणांनी,घरांनी... सुरेख शेर!

खुप सुंदर गझल.
.का असे झाकोळले आहे अचानक
छेडला मल्हार बहुधा आठवांनी >>… व्वा!!! मस्तच!!!