पुरावा (गझल)

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 12 July, 2018 - 03:32

माझे सासरे श्री वसंत देशपांडे, ह्यांनी १९८२ ते १९९० या कालावधीत गझल लेखन केले, त्यावेळी त्यांच्या गझल मेनका व गझल-गुंजन या मासिकात येत असत, मा. श्री सुरेशजी भट साहेबांनी कौतुकाची थाप देत त्यांना पत्र देऊन तुमचा २५ वा नंबर असल्याचे कळविले होते. वयोमानामुळे त्यांनी गझल संग्रह प्रकाशीत करण्यास नकार दिला होता, परंतू आम्ही तो मागील महिण्यात प्रकाशित केला. ते स्वत: आंतरजालावर येत नसल्याने काही गझल येथे क्रमाने देईल.

आता नको आम्हाला आभास रौरवाचा
दुष्काळ होत आहे गुणधर्म जीवनाचा

आली कशी कळा ही इतक्यात सभ्यतेला
माणूस घेत नाही कैवार माणसाचा

वारांगनेप्रमाणे श्रध्दा छचोर झाली
व्यापार होत आहे साक्षात विठ्ठलाचा

दुर्योधनास येथे धरबंद होत नाही
छ्ळवाद मात्र होतो प्रत्येक पांडवाचा

आयुष्य आज अमुचे आहे दुभंगलेले
नाठाळ ध्येय अमुचे ! अमुची ठिसूळ वाचा

नपुंसक मेघ बघता पाणवतात डोळे
येईल थेंब केव्हा बहुमोल श्रावणाचा

कुठल्याच हुंदक्याचा नसतो ठरीव साचा
मागू नये पुरावा कुठल्याच आसवाचा

तसेच कुणाला गझलसंग्रह हवा असल्यास, पत्ता जरूर द्यावा ही विनंती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults