छंद पाककलेचा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 July, 2018 - 03:24

भातूकली खेळता खेळता अलगद कधी मला पाककलेची आवड निर्माण झाली ते कळलेच नाही. भातूकलीत अंगणातल्या झाडपाल्यांची भाजी करता करता हळू हळू आजी आणि आईकडे खर्‍या भाज्या मागून छोटीशी चुल लावून भातुकलीतले खरे जेवण बनवू लागले. दोघींनीही कधी भाज्या फुकट जातात किंवा इतर गोष्टींमुळे मनाई केली नाही व घरातील सगळेच माझ्या भातुकलीतल्या जेवणाची (माझ्या समोर) नाके न मुरडता, खोटी का होईना वाहवा करत आले त्यामुळे माझी आवड कले कलेने वाढत गेली. शालेय जीवनातील आठवी-नववी पासून विविध पुस्तकांमध्ये लिहीलेल्या रेसिपी वाचून नविन नविन पदार्थ बनविणे हा माझा रोजच्या दिनक्रमातील रिकाम्या वेळातील आवडता छंद झाला. पदार्थ बनवताना वाचून ते मन लावून, प्रमाणशीर घटक घेऊन केल्याने पदार्थ तंतोतंत जमू लागले व त्यामुळे पाकशास्त्राची आवड द्विगुणित होऊ लागली. सुरूवातीला जाणवणारे चटके, दाह, उडणारे तेल, भाजणे ह्या गोष्टींतून पाककला जोपासताना कशी सावधगिरी बाळगायला पाहिजे ह्याचे धडे मिळत गेले.

लग्न झाल्यावर तर स्वयंपाकाला जबाबदारीची जोड लागली आणि सासरीही होणार्या माझ्या पककलेच्या कौतुकामुळे आमविश्वास बळावू लागला. होणार्या प्रत्येक सणांचे पारंपारीक पक्वान्न, नैवेद्य यांच्या पाकक्रिया करताना पारंपारीक पदार्थांबद्दल आदर आणि अभिमान वाटू लागला. शिवाय प्रत्येकाची आवड, पथ्य जोपासताना, अधिकाधिक पदार्थ, त्यातील पोषणमुल्यां बद्दलच्या ज्ञानात भर पडू लागली. श्रावणी आणि राधा ह्या दोघी मुली झाल्यनंतर त्यांच्यासाठी पोषक पदार्थांच्या शोधात असताना अजुन चविष्ट व पौष्टीक खाऊ तसेच चटपटीत पदार्थांच्या रेसिपीत भर पडत गेली.ह्या रेसिपीज लक्षात रहाव्यात व वारंवार करता याव्यात म्हणून लिहून ठेऊ लागले.

हळू हळू माझ्या पाककलेला इंटरनेटचा मोठा आधार मिळू लागला. त्यामध्ये मायबोली डॉट कॉम, मिसळपाव डॉट कॉम ह्यावर मराठीत सुलभ रितीने लिहीलेल्या रेसिपीज मिळू लागल्या व त्या पाककृती करुन माझ्या कलेत नाविन्याची भर पडत गेली. तिथे फोटो सकट मिळणार्या वैविध्यपुर्ण रेसिपीज पाहून प्रतिसाद लिहीता लिहीता "हम भी किसिसे कम नहीं" बडेजाव मारत आपणही आपल्या जवळच्या रेसिपीज सगळ्यांबरोबर शेयर करू शकतो ह्या विचारांबरोबरच माझ्या पाककलेला जोडकला लाभली ती रेसिपीज लिहीण्याची.

पावसाळ्यात ऑफिस सुटले की मार्केट गाठायचे ठाकरीणींना शोधून त्यांच्याकडे कुठल्या नविन नविन रानभाज्या आल्यात त्या बघायच्या. त्यांनाच त्यांची रेसिपी विचारली की त्या काय खुष व्हायच्या. मग भाजीचा फोटो, इतर घटकांचा फोटो, स्टेप बाय स्टेप फोटो व शेवटी तयार रेसिपीचा फोटो काढताना खुपच कसरत व्हायची. आता मी फोटोची क्वालीटी अजुन चांगली यावी म्हणून चांगला कॅमेराही घेतला.

माशांनी मला भरपूर साथ दिली. खर सांगायच तर मलाच माहीत नव्ह्त इतके मासे असतात ते. मलाही ५-६ प्रकार असतील असच वाटलेल. पण रोज मार्केट मध्ये जायचे आणि आता कुठला नविन मासा घ्यायचा असा विचार करत असले की लगेच समोर टोपलीतला नविन मासा मला खुणवायचा. रेसिपी बनवून झाली की ती दुसर्‍यादिवशी आंतरजालावर प्रकाशीत केली आणि कौतुकवृष्टी झाली की सगळे कष्ट फळाला यायचे. मी लिहीलेल्या रेसिपीज इतक्या सगळ्यांना आवडतील आणि मी रानभाजीचे तीस प्रकार आणि माशाचा पन्नासावा प्रकार गाठेन हे मला स्वप्नातही वाटल नव्हत.

मी एकत्र कुटुंब पद्धतीत रहाते. माझ्या रेसिपीजच्या उंचीच्या आकड्याला आणि कला विस्तारीत व्हायला खरी साथ दिली ती माझे पती अ‍ॅड. पराग व घरातील सर्व सदस्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाने. त्यांनीही नविन मासे, भाज्या कोणतीही हरकत न घेता स्विकारल्या. काही भाज्या व मासे बेचव असायचे व ते मलाच नाही आवडायचे तरीही तो बेचवीचा दोष मला न देता भाजी/माशालाच जायचा ही माझ्या कलेची मोठी जीत होती. नेहमीच जेवणात परफेक्शन होत अस नाही. कधीतरी इकडे तिकडे होत पण ते मला सांगून समजावून घेतात घरची मंडळी.

मी प्रत्येक भाजी किंवा मासा पूर्ण चौकशी करुनच घेते. खात्री पटली तरच घेते. मी सगळ्यांना हेच सांगते की कोणतीही रानभाजी घेताना ती ओळखीच्या विक्रेत्याकडून विचारपूरस करून खात्रीपूर्वक घ्या.अजुनही मला वॉट्सअ‍ॅप किंवा आंतरजालावर रानभाजी किंवा माश्यांबद्दल विचारणा करणारे मेसेज आले की मला खुप छान वाटत. आपल्याजवळ असलेली माहीती एखाद्यला शेयर करण्यातला आनंदच काही वेगळा असतो.

(वरील लेख महाराष्ट्र टाईम्स च्या पुरवणीतील छंद ह्या कॉलममध्ये प्रकाशीत झाला होता)

मी माझ्या रेसिपीजचा ब्लॉग सुरु केला आहे. तुमच्या सहकार्यामुळे आणि शुभेच्छांमुळे हे शक्य झाले. तुमच्या शुभेच्छा अशाच कायम राहुद्यात व माझ्या ब्लॉगवरही इथल्यासारखेच प्रतिसाद येउद्या ही मनोकामना. http://gavranmejvani.blogspot.com/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या रेसिपीज खरंच खूप छान असतात. कोकणी स्टाईलच्या जास्त असल्याने मी खूप वेळा करून बघितल्यात. मुळात फोटोज मुळे तोंडाला पाणी सुटतं. आणि सोप्या स्टेप्समुळे उत्साह येतो करून बघण्याचा.
तुमच्या ब्लाॅगसाठी खूपखूप शुभेच्छा.

जागु जियो!! तुला तुझ्या छंदासाठी आणी ब्लॉगसाठी मनःपूर्वक अनेक शुभेच्छा !! तुझी आवड आम्हाला मदत करुन गेलीय. अनेक भाज्यांची ओळख तुझ्यामुळे झाली. नवशिक्यांकरता आणी हौशी अनूभवींकरता सुद्धा तुझ्या पाककृती अनेक वेळा सहाय्य करतात.

छान आहे ब्लॉग!
उघडल्याबरोब्बर तालिमखानाची भाजी हे नाव वाचुनच चक्रावले Happy
नवनवीन माहितीचा खजिना असणार आहे तुझा ब्लॉग.
अभिनंदन!!

फारच सुंदर. बर्‍याच माशांची आणि भाज्यांची आठवण तुमच्या मुळे झाली. मिपा आणि इथेही लेख वाचतो तुमचे. अशाच पाकृ लिहीत रहा.

शुभेच्छा ब्लॊगसाठी
तुमच्या रेसिपी वाचुन तोंडाला पाणी सुटते खरे पण मी शाकाहारी आहे. Happy तुमच्या लेखांमुळे बरेचसे माशांचे प्रकारही माहीत झाले.
पुढील लिखाणासाठी मनापासुन शुभेच्छा Happy

जागु छान लिहिले आहेस गं.. तुझ्या रेसीपी साध्या सोप्या असतात, करून बघितल्या जातात. इतके मासे व ररानभाज्यांची माहिती केवळ तुझ्यामुळे मिळाली.

तुझ्या घरचेही खूप चांगले लोक आहेत. रविवारी घरातील स्त्रियांनी सैपाक न करता पुरुषांनी तो करून स्त्रियांना वाढायचे ही पद्धत खूप आवडली. तुझ्या दिरांच्या हातालाही मस्त चव आहे हा... मला त्यांच्या हातचे मटण परत खायचेय. Happy Happy

चिन्मयी, एस, रश्मी, शाली, सस्मित, धनी, पंडीत, आदिती, साधना धन्यवाद. सगळ्यांचे प्रतिसाद भावले.
साधना कधी येतेस?

जागू,
अभिनंदन ग.tuzaaलेख नेहमीप्रमाणे सुरेख.

इतके मासे व ररानभाज्यांची माहिती केवळ तुझ्यामुळे मिळाली.

तुझ्या घरचेही खूप चांगले लोक आहेत. रविवारी घरातील स्त्रियांनी सैपाक न करता पुरुषांनी तो करून स्त्रियांना वाढायचे ही पद्धत खूप आवडली. ..........+१

पवनपरी, मंजूताई, देवकी, भरत, वर्षुदी धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनानेच हे शक्य झाले.

खूप छान ब्लॉग. आपल्या खाद्यसंस्कृतीच्या डॉक्युमेंटेशनचं फार महत्वपूर्ण काम तुम्ही करत आहात याबद्दल आभार आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

जागू ताई, अभिनंदन. Happy
तुझ्या रेसिपी मी नेहमी ट्राय करत असते गं आणि घरच्यांना आवडतात पण. Happy

जागु तुझी रास नक्की कर्क असली पाहिजे. Happy
फार सुंदर पाककृती असतात तुझ्या आणि तु त्या ज्या पद्धतीने सादर करतेस त्यात जिव्हाळा आणि आवड जाणवते.

जागुले ब्लाॅग मस्त आहेच .. तुझे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
अनेक मासे व रानभाज्यांची माहिती केवळ तुझ्यामुळे मिळाली आणि स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. आता मी पावसाळ्यात चेंबुर , दादर , बोरिवली, दहिसर सग्ळीक्डे शोधून शोधून रानभाज्या आण्ते. माझ्या आई आणि सासूला खुप कौतूक वाटते . पण याचे क्रेडिट दर वेळी तुलाच देते. छान आवड लावलीस ग.
बाजारात जावून नविन नविन भाज्या आणायच्या आणि आवडीने करायच्या याच्या मागची प्रेरणा तू आणि दिनेशदा आहात.
ज्ञानदाता सुखी भवः