सुरु झालिया पेरन..!

Submitted by अँड. हरिदास on 24 June, 2018 - 04:23

4PNE13E92081.JPG
सुरु झालिया पेरन..!
मान्सून सरींसाठी ' अधीर ' झालेल्या मनांना काल कोसळलेल्या पावसाने ‘झिंग झिंग झिंगाट..’चा अनुभव दिला आहे. मागील चार पाच महिन्यात उन्हाच्या झळांनी जनता ' बधिर ' झाली होती, त्यातच दुष्काळ, पाणी टंचाई आदी समश्यानी शेतकरीराजासह नागरी वस्तीतील जनतेलाही हैराण केलं होतं. यंदा मान्सून चांगला आहे, प्रमाणापेक्षा जास्त बरसणार आहे अशी भाकीत हवामान खात्याने वर्तविल्याने लोक ' उतावीळ ' होऊन मान्सूनची वाट पाहत होते. मात्र रोहिण्या गेल्या मृग सरला तरी मोसमी वाऱयांना महाराष्ट्राचा रस्ता सापडत नव्हता. शेतकऱयांनी शेती मशागतीचे काम पूर्ण करून मिळेल त्या मार्गाने पेरणीसाठी पैसा उभा केला, पण मान्सून वारंवार हुलकावणी देत होता. पावसाची एखादी सर यायची आणि लगेच ऊन पडायचे.. त्यामुळे बळीराजाच्या काळजाचा ठोका वाढला.. यावर्षी दुष्काळाचा राक्षस पुन्हा मानगुटीवर बसणार की काय, या भयाने तो ग्रासला होता. अखेर चिंताक्रांत झालेल्या बळीराजाची पर्जन्यदेवतेला दया आली, आणि मान्सून रंगात आला.. मेघाच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली.. अन ' सैराट ' होऊन तो धो धो बरसला. अर्थात जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे परंतु बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे.

या पावसामुळे गेल्या अनेक दिवसापासून पाण्यासाठी आसुसलेली जमीन ओलीचिंब झाली आहे. एका फटक्यात हवेतील कोरडेपणा, शुष्कपणा आणि उष्मा नाहीसा झाला. मातीच्या त्या सुगंधाने आसमंत व्यापून गेले. वातावरण धुंद झाले. सगळी लहान-थोर माणसं त्या पावसाच्या सरींचा उत्सव पाहात होती. टपोऱ्या थेंबाचा लयबद्ध नाच पाहण्यात दंग झाली, तर चिमुकल्यांनी पावसात भिजून दंगा केला, मनमुराद आनंद लुटला. उन्हाच्या तडाख्यात तावून-सुलाखून निघालेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावरही या मान्सून सरींनी हास्य फुलविले आहे. त्याच्या डोळ्यांना पुन्हा ' हिरवं सपान ' पडू लागलं आहे. त्यामुळे हर्षोउल्हासित होऊन तो पेरणीच्या तयारीला लागला आहे. मागील तीन वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या माऱ्यामुळे शेतकर्याच्या गाठीला पैसा उरला नाही, पीक कर्जाचं घोंगडं दरवर्षीप्रमाणे यंदाही भिजत आहे. त्यातच बियान्याच्या आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती मुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. बोनडाळीचा मोबदला अद्याप मिळलेला नाही. सरकार यातून मार्ग काढण्याच्या घोषणा करत असलं तरी पेरणी झाल्यानंतर त्याचा फारसा उपयोग होणार नाही.

गतवर्षी मे च्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरवात होवून जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पेरणीही पूर्ण झाली होती. मात्र, यावर्षी वेगळेच चित्र आहे. मान्सूनपूर्व पावसाने विलंब केल्याने शेती मशागतीची कामे अपुरी आहेत. त्यामुळे कालच्या पावसाने शेतकर्‍यांमध्ये विश्‍वास निर्माण झाला असून आता घाईने मशागतीची पूर्ण करत पेरणी हंगाम साधण्यात शेतकरी गुंतला आहे. यापूर्वीच बि-बियाणांची तयारी केलेल्या शेतकऱयांनी शिवार गाठले. तर अनेक शेतकऱयांनी कृषीसेवा केंद्रांवर गर्दी केली. या पावसामुळे जसे शिवार फुलले, तसेच गेल्या काही महिन्यापासून मरगळलेली बाजारपेठही जागी झाली. गेल्या वर्षभरापासून मजूरांना रोजगार शोधावा लागत होता. पण एकाच पावसाने शेतकऱयांना मजूर मिळनासे झाले आहेत. हवामान खात्याने यावर्षी सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे, याचा अर्थ पुढील सर्व नक्षत्रे व्यवस्थित बरसणार असून रब्बी हंगामाचीदेखील पूर्तता होईल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. अर्थात हवामान खात्याचे अंदाज किती खरे ठरतील याबाबत शंका असल्याने शेतकऱयांनी हवामान बदलामुळे होणारे परिणाम लक्षात घेऊन मनाची तशी तयारी करण्याचीही आवश्यकता आहे. बदलत्या निसर्गचक्रानुसार शेतीतही आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. परंतु शेतकरी आजकाल कमालीचा हळवा झाला आहे. जागतिक हवामान बदलाचे कृषिव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत, याकडे त्याचे लक्ष नाही. एखाद्या सट्ट्यासारखी शेतकरी आपली शेती राबतो आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असणारी शेती बेभरवश्याची झाल्याने शेतीत आता आधुनीकीकरण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. परंपरागत पद्धतीने शेती न करता शेती पद्धतीत बदल करुन बदलत्या हवामानानुंसार शेतीला मान्सूनप्रुफ बनवावे लागणार आहे. त्यासाठी पेरणी करताना बियान्यायाची उगवण क्षमता तपासणे. जमिनीची पत तपासून पिकाची निवड करणे, सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळ्याचे वाहते पाणी भविष्यासाठी साठवून ठेवण्याची तजवीज करणे, आदी गोष्टीकडे सर्वानाच लक्ष द्यावे लागेल.
यावर्षी राज्यावर वरूनराजा कृपा चांगली झाली आहे, फक्त तोंड दाखवून पावसाने हुलकावणी देवू नये, अशी अपेक्षा राहणार आहे. गेल्या एक दोन वर्षापासून पुरेशा पावसाची प्रतिक्षा करुन शेतकऱयाच्या डोळय़ातील ‘अश्रू’ ही आटत चालले होते. त्यामुळे यंदा नद्या, नाले, तलाव, धरणे तुडुंब भरावीत. उद्ध्वस्त झालेली शेतशिवारे हिरवाईने नटून डोलावीत.. एव्हडीच वरुणराजाला प्रार्थना..‼

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users