रायगडावर जेंव्हा पहाट उजाडते...

Submitted by राजेश्री on 15 June, 2018 - 22:09

रायगडावर जेंव्हा पहाट उजाडते ....

जुलै महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड अशी ५८ की.मी. ची पायी मोहीम यशस्वी पणे पार पाडली आणि शिवाजीमहाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्रीच्या कडेकपारीतील गड किल्ले आम्हाला म्हणजे मला व निर्मला ला साद घालू लागले. दर महिण्यात एक किंवा दोन किल्ल्यांवर जायचा योग जुळवून आणायचाच अशी खलबते झाली.प्रत्येकीने एक आड एक शिवाजी म्हणतो कोणता गड म्हणत गडाचं नाव सुचवायचं , तो गड का करायचा याच कारण एका ओळीत द्यायचं असं आमचं ठरलं होतं. शिवाजी म्हणतो ची वेळ माझ्याकडे होती,मी म्हटलं रायगड....दुर्गदुर्गेश्वर म्हणजेच रायगड,..प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलवंत, सिंहासनाधीश्वर,श्रीशिवछत्रपती महाराज कि जय....या घोषनेणें अवघा भारत वर्ष थराराला या आवाजाची गाज ऐकायला जाऊ रायगडावर.क्षणाचाही विलंब न लावता निर्मलाने या निर्णयावर पसंतीची मोहोर लावली आणि आम्ही शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पंढरीला म्हणजे रायगडावर जायला सज्ज झालो. आम्ही कायमच म्हणत असतो शिवाजी महाराजांच्या काळात गूगल असत तर मुघल नावाला राहिला नसता .आम्ही याच गूगल वरून रायगडावर जाण्याचा मार्ग आणि मुक्कामाच ठिकाण निश्चित केलं.मुक्काम ठरवायच्या मोहिमेत महाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या शिवदे मॅडम नी केलेल्या सहकार्यामुळे तर जगात सगळीकडेच चांगलीच माणसे आहेत याचा आम्हाला प्रत्यय आला. एका फोन वर आमची राहायची सोय झाली, अर्ज email नी पाठवायला सांगितला आणि कितीही वेळ झाला तरी मी गडावर आधीच फोन करते तुमी निश्चिन्त रहा अशी खात्री दिली.मी लगेच निर्मालाला फोन करून सांगितलं आपली गडावर राहायची तजवीज झाली आहे,शिवदे मॅडम आपल्या राहण्याचा खलिता गडावर घोडेस्वाराकडून आधीचं पोहोच करतील पण तू मात्र गडाच्या पायथ्याशी जास्तीत जास्त चार पर्यंत ये.नाहीतर मी गडावर एकटीच जाऊन गडाचे सारे दरवाजे बंद करून घेईन मग तू हिरकणी बुरुज चढून आत ये, मी माझ्यासाठी त्या बुरजाच नामकरण निर्मला बुरुज करते.निर्मला ने हि गम्मत खूप गांभीर्याने घेतली आणि ती ठाण्याहुन मी इस्लामपुरहून वेग वेगळया वेळी निघूनही महाड हुन पाचाड गावी म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी जाणाऱ्या छत्री निजामपूर बस मध्यें आमची गाठ भेट झाली.ती गाडी आम्हाला मराठी साम्राज्याच्या संस्थापकाच्या राजधानी कडे घेऊन चालली होती.महाड वरून पाचाड ला बस नि जाताना मनात विचार येत होते कि सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराज या मार्गावरून कित्येक वेळा आले गेले असतील त्या मार्गावरून जातांना दिवसभराच्या प्रवासाचा शिनवटा कुटल्या कुठे पळाला होता.तिथलं सगळं वातावरण शिवमय वाटत होत.रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो ,गडाच्या पायथ्याशी रायगड अशी नावाची पाटी वाचली आणि हर्षोल्लित क्षणभराची विश्रांती न घेता रायगडाच्या १४०० पायऱ्यांवरून गडावर मार्गक्रमण सुरु केले. अगदी सोपी अशी पायऱ्यांच्या वाटेवरून चढताना होणाऱ्या अतीव आनंदाने शरीर पिसासारखं हलकं हलकं वाटत होत. वाटेत कुठे मोठया दगडी पायऱ्या,कुठे नागमोडी वाटा आणि आजूबाजूला दिसणाऱ्या दऱ्या, कुठे रायगडाच्या रख वालदारा प्रमाण भासणारेे अजस्त्र असे काळे कुळकुळीत पाषाण आहेत, गडावर पोहोचता पोहोचता सूर्यास्त होत होता, सूर्य त्याच्या घरी आणि आम्ही मुक्कामाला गडावर एकाच वेळी चाललो होतो त्यामुळे अधे मध्ये सूर्याचं गडावरून पश्चिमेकडे झुकत चाललेलं प्रतिबिंब हि डोळ्यात साठवत होतो. उद्या गडावरच भेटू म्हणत सूर्य अस्ताला गेला तेंव्हा आम्ही जवळपास ८०० ते ९०० पायऱ्या चढून गडाच्या महादरवाजा पर्यंत आलो होतो.काळ्या कातळात घडवलेला तो बुलंद दरवाजा बघितला आणि हे सगळं जित्या जागत्या माणसांकडून घडवलं गेलं आहे यावर विश्वासच बसेना.मी आणि निर्मला सूर्यास्ताचे एखाद दुसरे फोटो काढून एकमेकींना मूक सोबत करत त्या रायगडाच्या सोबतीने चालत होतो. कुठल्या तरी जल्माच पूर्व संचित आम्हाला येथे घेऊन आलं होत . अगदी रमत गमत येऊनही दीड ते दोन तासातच गडामध्ये आत प्रवेश करण्यासाठी असलेल्या मुख्य कमानी जवळ पोहचलो.त्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन पादस्पर्शे क्षमस्वः म्हणत आत प्रवेशकर्त्या झालो.जिल्हा परिषदेच्या विश्राम गृहाजवळ पोहोचलो तेंव्हा ७ वाजून गेले होते.महाड आणि आजू बाजू च्या तालुक्यातील स्त्री पुरुष वारकऱ्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम तिथल्या पटांगणात सुरु होता. टाळ, मृदूंगांच्या तालातील अभंग कानावर पड ले आणि मन प्रसन्न झाले. गेल्या गेल्या मिळालेला गरम गरम वाफाळता चहा आणि तिथल्या व्यवस्थेसाठी असलेल्या काकांची आपुलकीची चौकाशींने परकपणा नाहीसा झाला. त्याच दिवशी शिवप्रतिष्ठान संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून रायगडावरील मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या परिसरात फुलांची आणि पणत्यांची आरास केली जात होती मशालीच्या उजेडात तो सोहळा डोळ्यात साठवला.रात्री वारकऱ्यांबरोबर तांदळाची गरम गरम भाकरी,वांग आणि बटाट्याची भाजी,वरण, भात, पापड,लोणचं अस साग्रसंगीत जेवण गडावरील चांदण्यांचा प्रकाशात केलं. पोट आणि मन तृप्त करणारं जेवण करून आम्ही झोपायला खोलीत आलो,पण मनाच्या प्रसन्नता आणि उफुलत्तेवर निद्रादेवी मात करू शकली नाही आपण रायगडावर पाहऱ्यासाठी नेमलेले मावळे आहोत अश्या जाणिवेत डोळयात तेल घालून पहारा देत असल्यासारखे ती रात्र अक्षरशः जागून काढली.रायगडावर जेंव्हा पहाट झाली तेंव्हा आकाशात अजूनही मिणमिणत्या चांदण्यांचा प्रकाश होता.चोहोबाजूनी डोंगररांगांनी वेढलेला हा किल्ला सह्याद्रीच्या किल्ल्यातील रांगांचा एक दुवा आहे.निसर्गतः डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे शत्रूच्या हल्यापासून बचाव व्हावा यासाठी पुणे सोडून पश्चिम डोंगरातील रायगड हा किल्ला राजधानी म्हणून निवडला. पहाटेच्या निश्चल शांततेत मी आणि निर्मला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची अनुभुती अनुभवत होतो.गड बघताना पहिली आगेकूच टकमक टोकाच्या दिशेने केली.कोणत्याही गोष्टीच्या टोका ला जाण आणि टोक गाठणे या दोन भिन्न संकल्पना आहेत ,निर्मला यातील दुसऱ्या संकल्पनेत मोडते , टकमक टोक अश्या पाटीच्या पुढे एक पाटी आहे त्यावर पुढे जाण्यात धोका आहे असा मजकूर लिहिला आहे,पण निर्मला साठी धोका हा शब्द नेपोलियन बोनापार्टच्या अश्यक्य या शब्दासमान आहे.मी तिला तिची Dictionary उलट पावली बदलून आण जा अश्या पुणेरी थाटात काही सांगत बसत नाही.आणि मग ती बघता बघता टकमक टोकाच्या शेवटच्या टोकावर पोहचली .मला शिवाजी महाराज इथे फेरफटका मारण्यासाठी आल्यावर त्यांच्या डोक्यावर छत्री धरलेला सेवक येथील वाऱ्याच्या प्रचंड झोताने उडत गेला आणि एका गावात सुखरूप पणे उतरला म्हणून त्या गावच नाव छत्री निजामपूर ठेवल्याची कथा आठवली .माझ्या मनात विचार आला इथे वाऱ्याचा प्रचंड झोत आला तर छत्री कुणाकडेच नाहीये उडायला. पावलांनी मात्र टकमक टोक सर केलं होत रायगडाच टकमक टोकावरून दिसणारं रौद्रभीषण सौंदर्य बघताना डोळ्यात साठवावे कि फोटोत पकडावे अशी आमची अवस्था झाली होती.कानात वारं शिरलेल्या वासरसारखं अक्षरशः आम्ही रायगडावर हुंदडत होतो.रायगडावर पाहण्याच्या ठिकाणावर नावाच्या पाट्या आहेत. तिथे गाईड पण उपलब्ध होत असतात, आम्ही गूगल वरून मराठी माती या वेब साईट वरून रायगड किल्ल्याची सर्व माहित सोबत घेतली होती. त्यामध्ये रायगडाच्या इतिहासापासून जायचं कस,तिथल्या ठिकाणांची माहिती दिली आहे,टकमक टोकावरून पाचाडची खिंड,वर येणारा रस्ता, काळ नदीचे पात्र, तेथील छोट्या छोटया वस्त्या,डोंगराचे लाटांसारखे पडलेले कप्पे फार आकर्षक दिसतात.टकमक टोकावरून मागे होळीचा माळ आहे,त्याच्या पुढे शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा आहे.होळीच्या माळावर शिर्काई देवीची छोटी मूर्ती आहे,जगदीश्वरच मंदिर मोठ आणि काळ्या दगडांनी सुबक घडवलं आहे,मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर अष्टकोनी चौथरा आहे तीच त्या युगकर्त्याची समाधी आहे. मी आणि निर्मला त्या समाधीजवळ खूप वेळ हात जोडून स्तब्ध बसून होतो,खरच महाराज देहरुपाने नाहीत पण त्यांच्या विचारांच्या ठिणग्या किती जाज्वल आहेत, नंतर गडावरील सर्वात मोठे इमारत बांधकाम संकुल असणाऱ्या भागात आलो,तिथे दरबारदालन ,शिवराय परिवाराचे वास्तव्यस्थान, इत्यादी बांधकाम आहे.मेणा दरवाजा,पालखी दरवाजा इत्यादी ठिकाणे पाहीली.स्वर्ग कुठे आहे?असं जर त्या वेळी कुणी मला विचारले असते तर मी म्हणाले असते पृथ्वीवरील रायगड किल्ल्याच्या मेघडंबरीत सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला आहे त्याच्या पायाशी आहे स्वर्ग,सिंहासनाच्या चौथऱ्यावर एकेकाळी बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर श्रीशिवछत्रपती सिंहासनारूढ झाले होते तो क्षण आठवत कित्येक वेळ आम्ही तिथे भारावून बसलो होतो.हे लिखाण करायच्या एक आठवडा आधी मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या हातातील पंचधातूंच्या तलवारीचा तुकडा कुणी चोरीस नेला अशी बातमी होती. मन खूप विषण्ण झालं. खर तर त्या पुतळ्याच्या आसपास कुणी पायाने स्पर्श हि करू नये इतकी पावन ती जागा आहे. दुसऱ्याच दिवशी पूर्वी होती तशीच तलवार विधिवत बसवल्याची बातमी पेपरात वाचली मनाला समाधान वाटलं. रायगडावर पहाटे ५ पासून ११ वाजत आले तरी पायाला चाके लाऊन आम्ही फिरत होतो,१८१८ मध्ये रायगड ताब्यात आल्यानंतर इंग्रजांनी गडाची न भुतों न भविष्यती इतकी मोठी हानी केली. कुठल्याही धर्माची अस्मिता,जाज्वल्य स्वाभिमान,तेज,गौरवशाली परंपरा,श्रेष्ठ व्यक्तीच्या विचारांचा वारसा नष्ट करायचा तर त्या व्यक्तीची प्रेरणास्थान नष्ट करायची असं शत्रूंच धोरण असत, हा वारसा पुढे चालवला जाऊ नये म्हणून त्या व्यक्तीच्या विचारांशी संबंधित प्रत्येक गोष्ट नष्ट करायची . पण तरीही पुन्हा रायगडाच्या इतिहासाला वाचा फुटली,पुन्हा राखेतून नव्या विचारांचे बीज पेरले गेले.शिवाजीची गाथा पुन्हा घराघरातून गायले गेले आणि जातात.माझे मन रायगडाच्या सम्राटाच्या भूतकाळाचा ढूंढोळा करीत फिरत होत रोहिडेश्वराच्या मंदिरात युवा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची घेतलेली शपथ,तोरणा किल्ला सर करून स्वराज्याच बांधलेलं तोरण,आपल्या भोवती मावळ्यांची फौज निर्माण करून तिन्ही पातशाहीला शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ या काव्याने नमावणारे शिवाजी महाराज,या मध्ये अफजलखानाचा वध असो,या प्रतापविजयानंतर १८ दिवसात घेतलेले २१ किल्ले,सिद्धी जौहरच्या पन्हाळगड वेढ्यातील सुखरूप सुटका असो , पन्हाळा पवनखिंड च्या मोहिमेत पांढरेपानी येथून कोसळणारा धबधबा बघितला तर अंगावर काटा येतो,कराल अंधारात मावळ्यांनी तिथून शिवाजी महाराजांची पालखी कशी नेली असेल ते विधात्याला माहित.त्या नंतर शाहीस्थेखानावर छापा, आग्र्याहून सुटका असे एकापेक्षा एक मोठे चमत्कार वाटावेत असे भीमपराक्रम करणारे शिवाजी महाराज मी एक एक प्रसंग पुन्हा निर्मालाला सांगत होते आणि ती पहिल्यांदाच ऐकत असल्याच्या उत्साहात ऐकत होती.त्यानंतर रायगडावरील राज्याभिषेकाचा अभिमान क्षण डोळ्यासमोर तरळला जिजाऊंना खरच किती धन्य वाटलं असेल नाही अस निर्मालाला विचारात मी उभारून महाराजांना अभावीतपणे ३ वेळा मुजरा घातला,निर्मालाने पण तीच कृती केली.पाय जड झाले होते. आम्ही पहाटेपासून शिवचरित्रमय झालो होतो.तिथून उठताना आता आपण रायगडावर कायम येत राहायचं हे वाक्य एकदमच बोलून गेलो,पुन्हा त्रिवार मुजरा करीत गडावरून खाली यायला पावलं वळवली.रायगडावर यावं तर एका मुक्कामाच्या बेतानेच यावे,रम्य सूर्यास्त अनुभवावा,प्रसन्न पहाट अनुभवावी, आपण झोपेतुनच नाही तर विचारांच्या गुंगीतून हि जागे होतो,शिवचरित्र मनाच्या कनाकनाला स्फूर्ती देत राहते,असा युगकर्ता राजा युगायुगातून एकदाच जल्माला येतो,तो आपल्या भूमीत जल्मास आला याचा अभिमान बाळगावा, रायगडाचा ठेवा सर्वांनी जपूया, पुढच्या पिढीच्या ताब्यात तो वारसा देताना काही चांगलं घालता येत का संकल्प करूया,इतिहासाला मात्र कुठे तडा जाऊ नये याची काळजी घेऊया,राज्यसभेच्या चार बाजूवर सिमेंटच्या भिंतींच बांधकाम झाल आहे त्यावर कोळशाने , दगडांनी नाव रेखाटली आहे ते बघितलं कि खूप वाईट वाटत राहत,ज्या राजाच नाव भारतवर्षातील प्रत्येक व्यक्तीच्या काळजावर कोरल गेलं आहे तिच्या गड किल्ल्यावर जाऊन आपलं नाव गिरगाटणे यात कसला पुरुषार्थ आहे.गडावर सरकारने २४ तास पहारेकरी नेमावेत त्यांच्या खर्चासाठी कुठला कर लावला तरी जनता हसतमुखाने देईल.जाणाऱ्या सर्वांनी गडाचे पावित्र्य जपले पाहिजे,अविघटनशील कचरा तिथे घेऊनच जाऊ नये,स्थानिकांना उदरनिर्वाहास उपयोगी पडेल म्हणून ताक, सरबत अशी पेय त्यांच्या कडून घ्यावीत,गडावर कचरा दिसला तर तो गोळा करून खाली आणावा ,शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकल्यावर गडावरून फेरफटका मारत असताना सेवक गोळा केलेला कचरा गडावरून खाली फेकत होता,महाराज त्याला सांगतात असा गोळा होणारा कचरा खाली न टाकता तो एकत्र करून तो जाळून त्याची राख भाजीपाल्यासाठी शिबंदीत टाकावी, तेंव्हा बाजीप्रभू म्हणतात एवढ्या कराल संकटात हा राजा गडावरील कचऱ्याच्या विल्हेवाटी बद्दल विचार करतो याला सुचत कस,खरच शिवाजीमहाराजांचे चरित्र समजावून घेईल इतके साधे हि आहे आणि गूढ हि आहे. नि्श्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु।श्रीमंतयोगी।। यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत ,वरदवंत ,पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा।। शिवरायांचे आठवावे रूप,शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी। शिवरायांचे कैसे बोलणे,शिवरायांचे कैसे चालणे ,शिवरायांचे सलगी देणे कैसे असे। सकळ सुखाचा केला त्याग करूनि साधिजे तो योग। राज्यसाधनाची लगबग । कैसी केली।। रामदास स्वामींच्या या वचनानुसार शिवाजीमहाराजांच्या जिवीतकार्याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि आपल्या बरोबरच दुसऱ्याचे आयुष्य स्वाभिमानाने जगत राहण्याची प्रेरणा निर्माण केली पाहिजे, शिवाजी महाराजांच्या चरणांची धूळ मस्तकी लावण्यासाठी एक वेळ जरूर रायगडाला भेट दिली पाहिजे . ।।जय जिजाऊ।। ।।जय शिवराय।।
©राजश्री जाधव-पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप भारी अन ओघवत्या शैलीतील लिखाण. शिवरायांसंदर्भातील काही वाक्यांनंतर अंगावर सरसरून काटे आले. ऊर अभिमानाने भरून आला.

छान लिहलयं!

लिखाणातून महाराज उभे केले डोळ्यासमोर! Happy

अप्रतिम अनुभव....इथे शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद राजेश्री. अजून काय बोलावं सुचत नाहिये....