भांडण! (लघुकथा)

Submitted by जेम्स वांड on 20 June, 2018 - 06:41

तांबरल्याल्या डोळ्याचा नाना, गांजाच्या तारंत पडलावता. गावात कुत्रं बी भूकत नवतं, मेल्यागत दुपार हुती ती. कानात नुसतं कुईंssssssss आवाज सुरू हुता.

"हाय का नाना" करत नाग्या नानाच्या घरात आलं , तवा नानानं त्येला फकस्त "हूंssss" करत गोठ्यातल्या आपल्या खाटेकडे बलीवलं.

"कुटं गटाळ्या घालतुस रं भोसडीच्या इकत्या उकाड्याच्या?"

"सहज आलतो आपला नाना गाट घ्याया, म्हणलं बघावं नानासाहेब काय घराकडं लक्ष देत्याती की न्हाई त्ये"

"नीट बोलतो का शिंदळीच्या?" नाना आधीच डोक्यात राख त्यात गांजा वरताण.

"तसं नव्हं, पर आज ४ पिढ्या झाल्या तुम्ही दावा मांडलाय आप्पाबर लवणाच्या रानाचा"

"त्येचं तुला काय रं कावळ्या?"

"नाय नानासाहेब तसं नव्हं, पर आपल्याच प्वारी मागं त्या आप्पाच्या सच्याची बिलामत, सुबतीला त्येची चार दोसदार प्वारं दाताड काडताना दिसत्याती तवा...."

"अस्सं? तिच्या बायली ह्या आप्पाच्या एकदा ह्येचा चेप जिरवायच हवाय...आमच्या लक्ष्मीकडं पाहतोय भाडखाऊ ल्योक त्येचा! दाखिवतोच इंगा"

"भले पैलवान भले"

रागा रागात नाना गांजाच्या नशेतच आप्पाच्या घरा म्होरं पोचलं, अन सणसणीत आवाज घातला.

"आप्पाय, भायर यी भडव्या लै गांडीला दात फुटल्यात व्हय रं तुला न तुझ्या अवलादीला".

"नीट बोलय सुक्काळीच्या, नायतर उशी करून बुकलीन".

पुढं थेट प्रकरण एकमेकांच्या उश्या करून खोका पाडायला सुरुवात होईस्तोवर गाव गुळा झालता, एरवी काय पन करमणूक नसल्याल्या गावात कोणाचीतर जंक्शन मारामारीची भांडणं झाली, का थोडी करमणुकीची सोय असे.

नाना अन आप्पा धुळीत लोळत एकमेकांना घोळसू लागली तशी सगळी माणसे तिथं गोळा झाली, जवळपास गाव रिकामा झाला. नाग्या मातूर तिथून निसटला, कदाचित लैच वाढलेल्या ह्या प्रकरणानंतर आप्पा अन नाना दोघं त्याला वेगवेगळी किंवा एकत्रच धरून बुकलायची शक्यता हुती. इकडं जसं तुजी आय तुजा बा करत दोघं मातीत लोळाय लागली तशी नाग्या पळालंच.

गावाबाहेर येऊन वढ्याला वलांडून हागणदारीच्याबी पलीकडं नाग्या पाक बाभळीच्या बनातच पोचला. धा मिंट अजून चालत त्यो थेट नानाच्याच रानात पोचला, तुऱ्याव आल्याला ऊस तिथं डोलत हुता, फडाला वळसा घालून त्यो मागल्या बाजूला ग्येला अन पाटापाशीच बसकण मारून बसला.

त्याच्या डोळ्याम्होरं कालचा प्रसंग उभारला, यष्टी स्टँडवर आप्पाचा सच्या माजलेल्या वळूगत आपल्या चेल्यांबर उबा हुता. नाग्याला पाहून त्यो उटून बसला, अन त्यानं साद घातली

"अय नाग्याय, पैसं घिताना तर लै कमरांत वाकत हुतास अन परताव्याचा इशय आला का डोस्क वळीवतो व्हय माकडेच्या"

"तसं नव्हं मालक, पैकं परत करायची मुदत हाय के अजून, कच्याला उगा बोल लावताय"

इतकं झाल्यावरच सच्यानं अन त्याच्या दोन मैतरांनी नाग्याला लै हानला हुता.

आज मात्र नाग्याला रागापरीस हसू येत हुतं, परस्पर नानाला बत्ती लावून त्यानं सच्या अन त्येच्या बापाला पानी पाजलं हुतं, उट्टे काडल्याच्या आनंदात हलकं झाल्यालं अंग फडा शेजारच्याच गवताव झोकून नाग्या निवांत पडला.

तेव्हड्यात, शेजारून कायतरी खसफसलं , नाग्यानं सवयी परमान फकस्त कूस बदलली अन हळूच आवाज दिला

"या, या की म्होरं"

"काय आज लै उशीर ?"

"हां जरा गावगाड्याच्या राजकारनात बी लक्ष द्याया लागतंय न काय" लक्ष्मीच्या खांद्यावर हात ठेवत फडात शिरता शिरता नाग्या सहज बोललं......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

आमच्या शालीभाऊंना इतरत्र दिलेला प्रतिसाद इथं चिकटवतोय

मुळात गाव म्हंजी लैच कायतरी वाहता पाट, साधीभोळी मानसं, कुंद मुकुंद वातावरण, सच्चेपणाच वगैरे इमेजच आपल्याला मंजूर नाय. म्हंजी अस्त्यात गावाकडं बी असली सोज्वळ खुळी पर भौतेक सगळी लैच अतरंगी असत्याती, खुनशी बी असत्याती, पाजी नमुने तर पैश्याला मणभर सापडत्याल. अरभाटपना अंगी मुरलेली ही दीडशान्या बोड्याची मानसं, प्रसंगी त्येंचं अज्ञान, प्रसंगी अतरंगीपना मांडणं ह्येच आमचं लेखनाचं टेम्प्लेट होय.

१ न.:ड

मस्त.
जेम्स वांड म्हणजे जव्हेरगंज तर नाहीत ना?

नाही नाही, मी लेखन करताना ।।श्री जव्हेरगंज प्रसन्न।। असं मनात म्हणून लिखाण सुरू करतो. जव्हेरगंज हे लै सिनियर होत. आम्ही आत्ताकुठं वाचनमात्र मधून बाहेर पडून लेखणी उचलली आहे.

लै भारी...

मुळात गाव म्हंजी लैच कायतरी वाहता पाट, साधीभोळी मानसं, कुंद मुकुंद वातावरण, सच्चेपणाच वगैरे इमेजच आपल्याला मंजूर नाय. म्हंजी अस्त्यात गावाकडं बी असली सोज्वळ खुळी पर भौतेक सगळी लैच अतरंगी असत्याती, खुनशी बी असत्याती, पाजी नमुने तर पैश्याला मणभर सापडत्याल.

>>>>>> बंदा रूपाया