आनेवाला पल जानेवाला है....

Submitted by राजेश्री on 14 June, 2018 - 13:53

आनेवाला पल जाने वाला है.....

लहानपणी गोलमाल या सिनेमाने कधी आमच्या ओठांवर निखळ हासू आणलं तर कधी गुदगुल्या केल्यासारखं खुदुखुदु हसवलंय.अमोल पालेकर उत्पल दत्त यांना अगदीच साधेपणाने आपल नाव रामप्रसाद दशरथप्रसाद हे नाव सांगतानाही हासू यायचं. आणि आपल्या वडिलांचे आपल्यावर कसे संस्कार झाले आहेत आणि आपण घरात कायम काटकसर करीत जीवन जगतोय हे मुलाखती वेळी सांगताना आणि त्यावर भवानी शंकर यांच्या प्रतिक्रिया बघताना जाम मज्जा यायची.
मग गोलमाल मध्ये पुढे गोलमाल घडामोडी घडताना उडालेली धांदल,सर्वांची त्रेधातिरपीट, भवानी शंकर यांच्या प्रश्नांना हात फिरवत आठवून आठवून दिलेली उत्तरे सगळंच लाजवाब.मग कहाणी आहे म्हंटल्यावर ती प्रेमाशिवाय अधुरीच राहील ना.मग पुढे भवानी शंकर यांच्या मुलीसोबत म्हणजे उर्मिलासोबत लक्ष्मणप्रसाद दशरथप्रसाद शर्मा याच प्रेम जुळून येत.ते त्याच्या छानछोकित दिसण्याने आणि stylish वागण्याने.उर्मिलाला गाणं शिकवताना सिनेमात हे गाणं लागतं
हम्म आ हा हा हे हे हे हम्म..
असा आलाप सुरू असताना अमोल पालेकरचा सालस चेहरा आजही आठवतो.किती मिश्किल आणि खेळकर वाटतो तो.आनेवाला पल हे गाणं जेवढं श्रवणीय आहे तेवढंच ते पडद्यावर बघताना एक वेगळाच आनंद देऊन जात.किती अर्थपूर्ण आणि या सिनेमाला साजेसं अस आहे गाणं...
आनेवाला पल जानेवाला है
आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है
हो हो
आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है
हा समोर ऊभा ठाकलेला क्षण आहे तो सरून आताचा न राहता गतकाळातील क्षण होऊन जाणार आहे.तो पाहुण्यासारखा रहायला थोडीच आला आहे.तो हा मी आलो आणि हा मी निघालो म्हणत सरून जाणार आहे.उद्या उजाडेल पण त्यात हा आत्ताचा हाती आलेला क्षण मात्र नसणार आहे.तेंव्हा या हाताशी गवसलेल्या क्षणाबरोबर आनंद साजरा करता आलं पाहिजे,येणारा नवा क्षण नव्याने जगता आला पाहिजे.नाहीतर तो तर निघून जाणारच आहे मग मात्र त्या त्या क्षणात तसंतस जगायचं राहील म्हणून हळहळण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही.

एक बार यूँ मिली, मासूम सी कली
हो खिलते हुए कहा, खुशबाश मैं चली
देखा तो यहीं है, ढूंढा तो नहीं है
पल जो ये जानेवाला है

या क्षणभंगुर पळाबद्दल किती मार्मिक उदाहरण दिले आहे या कडव्यात बघा.एक बार यू मिली मासुमसी कली... जी डोळ्यासमोर उमलतेय..कोणत्याही फुलाची कळी बघा ती किती लोभस दिसत असते.आणि अचानक त्या कळीच फुल होताना ...गीतकार पुढे म्हणतात खूषबास मै चली...म्हणजे ही अशी माझ्या आयुष्याची क्षणभंगुरता आहे मी कधीच मान्य केलं आहे.तू ही आनंदीच रहा... प्रत्येक क्षणाला साजर करीत जा माझ्यासारखच आणि माझ्या सारखच आपल्या क्षणभंगुर का असेना तेव्हढ्याश्या अस्तित्वाने दुसऱ्यांच्या आनंदाचे कारण बनून जा..
हो हो
आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है

कारण हा क्षण ,ही वेळ थांबणार थोडीच आहे ती तर निघून जाण्यासाठीच येतेय.तुला या क्षणात फुलायचय या क्षणाला फुलवायचय की नाही हे तूच ठरवणार आहेस.थोड्या कमी रोमँटिक भाषेत सद्गुरू वामन पै हेच तर म्हणतात..तूच तर आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...मग हे छोटे छोटे पल... क्षण बनून हे आयुष्य तयार होत असत.प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिक,याच क्षणात जगायला शिक.

एक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं
वहाँ दास्ताँ मिली, लम्हा कहीं नहीं
थोडा सा हँसा के, थोडा सा रुला के
पल ये भी जानेवाला है

आपण वेळ,काळ ज्याला म्हणतो त्यामधून आपण जगलेला किंवा जगायचं राहिलेला क्षण आपल्याला कधी आठवतो.किंवा मग अस वाटत अजून कळलंच नव्हतं त्या क्षणाबद्दल तोपर्यंत तर तो निघून गेला.तो क्षण पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला तर तो थोडीच परतून यायला गेलेला असतो.तो त्याच्या कलेने असाच विरून गेलेला असतो.त्या सरलेल्या क्षणांची काही हुरहूर लावणारी किंवा काहीशी हवीहवीशी वाटणारी आठवण देऊन तो क्षण मात्र आपल्या कलेने सरून पुढे निघून गेलेला असतो.पुन्हा आपल्या आयुष्यात येणारे पुढचे क्षण काही हसवतील, काही रडवतीलही मात्र प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यातून निघून जाण्यासाठीच तर येणार आहे.

हो हो
आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है...

म्हणून तर हा आताचा क्षण सर्वार्थाने साजरा करता आला पाहिजे.प्रत्येक क्षणाचा उत्सव करता आला पाहिजे. क्षण येणार आणि निघूनही जाणार हवाहवासा वाटणाराही आणि नको नकोसा वाटणाराही.निघून गेलेल्या क्षणांची हुरहूर ,हळहळ मात्र वाटली नाही पाहिजे.अस होण्यासाठी वेगळं काहीच करायचं नाहीये आपल्याला...हा आत्ताचा,आपल्या हातात क्षणभरासाठी विसावलेला क्षण आनंदाने जगायचा आहे...किती सोपं आहे ना...
गीतकार : गुलजार, गायक : किशोर कुमार, संगीतकार : राहुलदेव बर्मन, चित्रपट : गोलमाल

©राजश्री

Group content visibility: 
Public - accessible to all site users