सोशल कॅपिटल आणि गॉडफादर - १

Submitted by अतुल ठाकुर on 13 June, 2018 - 00:24

32929e718e64ef3682bb7e15288b0edb.jpg

सामाजिक भांडवलाची संकल्पना विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयाला आली. पण त्यावर विशेष संशोधन झाले नव्हते. पुढे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ पिअरी बोर्द्यु आणि अमेरिकन समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट पुटनम यांनी या संकल्पनेचा विस्तार केला. दोघांनी जरी सोशल कॅपिटलचाच विचार केला असला तरी दोघांच्या दिशा पूर्णपणे विरुद्ध होत्या. पुटनमसाठी सोशल कॅपिटल ही मानवी जीवनाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक अशी बाब होती. त्याने अमेरिकन समाजातील अनेक अनिष्ट बाबींसाठी सोशल कॅपिटलच्या कमतरतेला जबाबदार धरले. त्याच्या "बॉलिंग अलोन" या लेखात अमेरिकन लोक टिव्हीला चिकटून राहतात आणि पूर्वीप्रमाणे समाजात फारसे मिसळत नाहीत. त्यामुळे एकंदरीतच सोशल कॅपिटल कमी झाले असून त्यामुळे सामाजिक समस्या वाढत आहेत असे निदान पुटनमने केले. सोशल कॅपिटलवरील संशोधनाने पुटनम इतका लोकप्रिय झाला की त्याला जवळपास एखाद्या सेलेब्रिटीचा दर्जा मिळाला.

बोर्द्युने मात्र याउलट सोशलकॅपीटलचा वापर समाजात नकारात्मकरित्या कसा केला जातो हेच सांगण्यावर भर दिला. एखाद्या गटाशी, संस्थेशी, समाजाशी जेव्हा माणुस जोडला जातो तेव्हा त्या संस्थेचे स्वतःचे एक सामाजिक भांडवल असते. ते कुठल्याही स्वरुपात असु शकते. ते आर्थिक स्वरुपात असेल. कदाचित त्या गटाची एखादी पतपेढी असेल. ते शैक्षणीक स्वरुपात असेल. कदाचित त्या संस्थेच्या शाळा असतील, इतर शैक्षणिक संस्था असतील. आणि असे असल्यास त्या गटाशी जोडल्या गेलेल्या माणसाला या भांडवलाचा वापर करता येऊ शकतो. अशा वेळी या सोशल कॅपिटलमुळेच कशा अनिष्ट सामाजिक रुढी पडतात आणि त्यामुळे सामाजिक विषमता राखण्यास कशी जन्माला येते किंवा असलेली सामाजिक विषमता पुन्हा पुन्हा अधोरेखित केली जाते हे बॉर्द्युने वारंवार सांगितले.

हे सोशल कॅपिटल कसे असते आणि त्याचा वापर कसा केला जातो हे पाहण्याआधी त्याच्या वापराचे काही नियम असतात ते पाहणे मनोरंजक ठरेल. आमच्या एका अत्यंत विद्वान प्रोफेसरने आम्हाला गॉडफादर चित्रपटाचे उदाहरण हे समजवून सांगण्यासाठी दिले होते. चित्रपटाच्या अगदी सुरुवातील बोनासेरा नावाचा गृहस्थ गॉडफादरकडे येतो. सिसिलियन माणुस आपल्या मुलीच्या लग्नात केलेली कुठलीही मागणी नाकारु शकत नाही हे त्याला ठावूक असते. त्याच्यामुलीवर अत्याचार केलेले दोन गुंड कोर्टातून सुखरूप सुटलेले असतात. आणि आता त्याला गॉडफादरकडून न्याय हवा असतो. हे अविस्मरणीय दृश्य सर्वांना ठावूक असेलच. आपल्या विषयाच्या अनुषंगाने सांगायचं तर गॉडफादर त्याची मागणी मान्य करतो आणि त्याला सांगतो," कधीतरी मला काही गरज लागली, कदाचित ती वेळ कधीच येणार नाही. मी तुला एखादे काम करण्यास बोलावेन".

यालाच सोशल कॅपिटलचा देवाणघेवाणीचा नियम म्हणतात. मी तुझे काम करतो तु माझे काम कर. यावर सोशल कॅपिटलचा सारा डोलारा उभा राहिलेला दिसतो. बहुधा बोनासेराला सोशलकॅपिटलचा हा नियम माहित असावा कारण गॉडफादर त्याला विचारतो की तु यापूर्वी माझ्याकडे का आला नाहीस? तेव्हा तो उत्तर देतो की "I didn't want to get into trouble. " ही गोष्ट सर्वसामान्यपणे सर्वांनाच माहित असते. मात्र सोशल कॅपीटल हे एक शास्त्र म्हणून विकसित झाल्यावर हा देवाणघेवाणीचा नियम अधोरेखित झाला आहे. आमच्या एका नातेवाईकाची हकिकत आहे. मुंबईच्या कापडगिरण्या बंद झाल्यावर वडिलांच्या ओळखीमुळे कुणा नेत्याने या मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते मुलाने नम्रपणे नाकारून राहण्याच्या जागेपासून लांबवर का होईना पण स्वतःचे स्टेशनरीचे दुकान उघडले. मला कारण सांगताना तो म्हणाला की ही नेते मंडळी उपकारांची परतफेड म्हणून काय अपेक्षा करतील सांगता येत नाही.

आमच्या या नातेवाईकाने नकळत सोशलकॅपिटलच्या मूलभूत नियमाला स्पर्श केला होता. सोशल कॅपिटल या गुंतागुंतीच्या संकल्पनेचा आपल्याला मागोवा घ्यायचा आहे आणि या संकल्पनेला भारतीय जातीव्यवस्थेच्या संदर्भातदेखील तपासायचे आहे.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users