अशीही एक श्रीदेवी !

Submitted by विद्या भुतकर on 11 June, 2018 - 21:46

आयुष्यात वेगवेगळ्या घडीला असे लोक भेटतात की त्यांना आपण भेटलो, त्यांच्याशी ओळख झाली, मैत्री झाली, याचा अतिशय आनंद होतो. त्यातलीच तीही एक. इतक्या वेळा तिच्याबद्दल लिहावंसं वाटलं होतं पण कदाचित खूप वैयक्तिक वाटेल म्हणून कधी लिहिलं नाही. पण परवा तिला फोन केला आणि लिहिण्याची तीव्र इच्छा झाली. शेवटी म्हटलं लिहावंच.

सानू तीनेक महिन्यांची असतांना तिला घेऊन आम्ही चालत फेऱ्या मारत होतो आणि समोरून एक तेलगू बाई चालत येत होती. तिने सानूला पाहून तिच्याशी तेलगूमध्ये काहीतरी बोलायला सुरुवात केली. फक्त इतकंच कळलं की हिला लहान मुलं खूप आवडतात. परत आमची भेट नाहीच काही महिने. दुसऱ्यांदा दिसली ती आमच्या समोरच्या अपार्टमेंट मधल्या एका मैत्रिणीच्या घरी. मी तिथे सानुला घेऊन गेले होते, साधारण सहा महिन्यांची असेल तेव्हा ती. पुन्हा एकदा सानुला पाहून तिने तिला मांडीवर घेतलं. मी चहा घेत होते तर म्हणाली तुम्ही तिला माझ्याकडे द्या, चुकून चहा तिच्यावर सांडेल वगैरे. नंतर कळलं की हिचं नाव श्रीदेवी.

शिकागो मध्ये आमच्याच आजूबाजूच्या अपार्टमेंट मध्ये राहायची. घरी नवरा, दोन मुली. आणि वेळ जावा म्हणून घरी ती लहान मुलांना सांभाळते. तिच्या प्रेमळ स्वभावाकडे पाहून वाटलं खरंच ही मुलांना किती प्रेमाने सांभाळत असेल. तिथून मी भारतात गेले आणि आठ महिन्यांनी परत येणार होते तेंव्हा नवऱ्याला म्हटलं, तू श्रीदेवी च्या घरी जाऊन विचार, ते सान्वीला सांभाळणार असतील तरच मी परत येईन. भारतात सानुला डे-केअर मध्ये ठेवल्याचा अनुभव असल्याने बहुतेक मला तिला घरी ठेवायचं होतं. मग एक दिवस संदीप तिच्याकडे जाऊन विचारून आला. ती हो म्हणाली आणि आम्ही दोघी शिकागोला परतलो.

सानूचं श्रीदेवीकडे राहणं इतकं सहजपणे झालं की आम्हाला कळलंच नाही. त्यांचा मोकळा भात सानुला खाता यायचा नाही म्हणून मी रोज सकाळी तिच्यासाठी ३-४ डबे भरून काही ना काही बनवून द्यायचे. पण मग अनेकदा ती उलटी करायची, ते सर्व साफ करून, तिला अंघोळ घालून पुन्हा जेवायला भरवून तिला झोपवायची. नुसतं श्रीदेवीच नाही, त्यांच्या पूर्ण घराने तिला आपली मुलगी मानलं होतं. एखाद्या पोराला कुणी इतका लळा लावू शकतं? तिच्या दुसऱ्या वाढदिवसाला भारतात तिचं माप देऊन ड्रेस शिवून घेऊन तो कुणासोबत तरी भारतात माझ्याकडे पोहोचवला होता तिने. आणि तोच ड्रेस सान्वीला दुसऱ्या वाढदिवसाला घातला त्याचंही किती कौतुक वाटलं होतं त्यांना. आणि मी विचार करत होते, अरे तुम्ही इतके कष्ट घेऊ शकता तिच्यासाठी, मी तर फक्त तिला तो ड्रेस घालत आहे. त्यात विशेष ते काय? पण हे सगळं झालं आमची ओळख आणि संबंध कसे जुळून आले त्याबद्दल.

श्रीदेवी मूळची आंध्रप्रदेशातल्या कुठल्यातरी गावातील. लग्न झालं तेव्हा ती १८ आणि नवरा २० वर्षाचा. पुढची १६ वर्ष फक्त मूल का होत नाही आणि त्यावर उपाय करण्यात गेलं. मुलांवर इतका जीव असणाऱ्या व्यक्तीला १६ वर्ष झगडावं लागणं म्हणजे किती त्रासदायक? एकापाठोपाठ दोन मुली झाल्या मग. लड्डू आणि पंडू त्यांची घरातली नावं. नवरा अमेरिकेत आला म्हणून मग मागोमाग मुलींना घेऊन तीही आली. अमेरिकेत आली तेंव्हा सगळं अनोळखी होतं. घरात तर पोरींना द्यायला अजून दूधही आणलं नव्हतं, तिथून सुरुवात झाली. मग सिएटल मध्ये हळूहळू ओळखी होत गेल्या आणि एकवेळी ४ मुलांना घरी सांभाळू लागली. तिथून मग शिकागो. आमची ओळख झाली तेव्हा तिला इंग्रजीचे कलासेस घ्यायचे होते. कारण बाहेर बोलण्याइतकं इंग्रजीही येत नव्हतं. पण नवऱ्याची चार दिवस परगावातली नोकरी. मग आम्हालाच विचारून अनेकदा संदीपने, कधी अजून कुणासोबत जाऊन इंग्रजीने क्लास पूर्ण केले. तिथून पुढचा टप्पा होता तो ड्रायव्हिंगचा. छोट्या गोष्टींसाठी नवरा चार दिवसांनी घरी येण्याची वाट बघावी लागायची तर कधी कुणाला विचारून घ्यावं लागायचं. लवकरच तिने पर्मनंट लायसन्सही घेतलं. तोवर त्यांचं शिकागोतून डॅलसला जायचं ठरलं होतं.

आम्ही साधारण वर्षभराने डॅलसला गेलो तर इतकं वेगळंच चित्र आम्हाला बघायला मिळालं. बऱ्यापैकी दबकत गाडी चालवणारी श्रीदेवी आता सुसाट गाडी चालवत होती. नवऱ्याला एअरपोर्ट वर ने आण करत होती. अगदी, तो 'टॅक्सिसाठी जे पैसे देतो तेच मला दे ना' असं म्हणून तिने तेही साठवायला सुरुवात केली होती. डॅलसचे सर्व हायवे तिला तोंडपाठ झाले होते. पोरींना शाळा, क्लासेसना ने आण तीच करू लागली होती.

मुख्य म्हणजे हे सर्व बदल दिसले तरी, आम्ही गेल्यावर आमच्या पोरांचा पूर्ण ताबा तिने घेतला होता. स्वनिक लहान होता एकदम, ६ महिन्यांचा वगैरे. त्याला तर सोडतच नव्हती. 'बंगारम बंगारम' म्हणत होती त्याला. Happy लहान मुलांना सांभाळण्याची तिची कला निराळीच आहे. अगदी अनोळखी मूल दिसलं तरी पटकन पर्समधून काहीतरी खायचं काढून त्याला देईल ती. मला आठवतं एकदा अजून दोन फॅमिली आणि श्रीदेवी आणि तिच्या मुली असे आम्ही लेक जिनिव्हाला गेलो होतो. दार थोड्या वेळाने ती काहीतरी खायला काढून देत होती मुलांना. जितकं मुलांबद्दल प्रेम तितकाच चांगला पाहुणचारही. तिच्या हातच्या डोशांचा स्पीड आणि शेंगदाण्याच्या चटणीची चव आजही तीच. एखाद्याला पोटभर जेऊ घालायची हौसही तशीच. सानू तिच्याकडे होती तेव्हा दर शुक्रवारी आमचं इडली चटणी, डोसा तिच्याकडेच व्हायचं. आजही कुणी घरी आलं की पटकन काहीतरी करतेच. मागच्या वर्षी त्यांच्याकडे राहायला गेलो तर भरभरून जेऊ घातलं आम्हाला आठवडाभर. कधी कधी वाटतं, आजच्या जगात सख्खे भाऊ-बहीणही करत नाही इतकं कुणासाठी.

टिपिकल मध्यवर्गीय भारतीय स्त्रीचा लुक. नीट सांगता येणार अशा रंगाचे चुडीदार किंवा गाऊन. डोळ्यांखाली आलेली वर्तुळं. जाडसर बांधा, उंची ५ फूट ४ इंच. रंग खरंतर नीट पाहिल्यावर गोरा असावा. पण चेहरयावर पटकन तेज दिसून येत नाही. बोलायला लागल्यावरही धाप लागते की काय असं बोलणं. "अय्यो विद्या, ऐसा? बस चल रही है जिंदगी. " हे तिच्या साऊथ इंडियन हेल काढून ऐकताना जिंदगी खरंच थांबलीय की काय असं वाटतं. नेहमी आपल्या शरीराबद्दल, भाषेबद्दल न्यूनगंड. हजार वेळा मला विचारून डाएट सुरु करून पुन्हा सांबर-भातावर थांबलेलं. नवऱ्याकडून इतक्या वर्षांनंतरही 'तुला काही कळत नाही' असा होणारा उपहास. त्यात उलटी उत्तरं देणाऱ्या पोरींचीही भर पडली. पण पोरींच्याबाबत मात्र तिचे कडक नियम ठरलेले. 'तुला काय बोलायचं ते बोल, माझ्या शब्दाबाहेर जायचं नाही' हे त्यांना ठोकून बजावलेलं. आणि तरीही नवऱ्याच्या रागापासून त्यांना वाचवून त्यांचे लाडही केलेले. पोरींना कितीही चांगले कपडे, वस्तू घेतल्या तरी, तिचं राहणीमान इतकं साधं. आपल्याकडे असलेल्या मोठ्या घराचा, गाड्यांचा किंवा पैशांचा कसलाही माज नाही. जे आहे ते 'सब बाबा की कृपा' आहे. त्यामुळे दर गुरुवारी अजूनही एकवेळ जेवून केलेला उपवास आणि साईबाबाचं दर्शन हा नियम ठरलेला.

आजही तिच्या मोठ्या मुलीच्या ग्रॅजुएशनचे फोटो पाहून फोन केला तर गुरुवार आहे, मंदिरातच होती. तिथून येऊन मला फोन लावला. तोच टोन, तीच बोलण्याची पद्धत. मध्ये एक वर्ष तिने एका मुलीला सांभाळलं, का तर तिचं वजन खूप कमी होतं आणि बिचारी डे-केअरला नसती टिकू शकली. मग इथल्या पोस्ट ऑफिसमध्येही परीक्षा दिल्या तिथे नोकरीसाठी. मग मध्ये Macys मध्ये नोकरी मिळाली म्हणाली. आज फोन केला तर सांगितलं, आता फक्त सोमवार ते शुक्रवार जाते. सकाळी ६.३०- दुपारी ३.३०. खरं सांगायचं तर तिला ना पैशाची गरज ना काम करण्याची. पोरीही आता मोठ्या झाल्या. पण मूळ स्वभावच कष्टाळू, प्रेमळ आणि साधा. अमेरिकेत येऊन भल्याभल्याना बदललेलं पाहिलंय मी. त्या सगळ्यांत आपलं साधेपण सांभाळून राहणाऱ्या श्रीदेवीला पाहिलं की या जगात काहीतरी शाश्वत आहे असं वाटतं. आजही फोन केला तेव्हा ते परत एकदा जाणवलं. खरं सांगू का इथे राहणाऱ्या अनेक भारतीय स्त्रियांचे अनेक संघर्ष मी पाहिलेत, पण तितक्याच सर्व सोडून आळसात आयुष्य घालवणाऱ्याही पाहिल्यात. पण या सगळ्यांहून श्रीदेवी वेगळी वाटते, का कुणास ठाऊक.

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विद्याजी. बर्याच दिवसांनी आलात माबोवर. मीस करत होतो तुमचे लेख.+१११११
फार छान लिहिलंय... अगदी डोळ्यासमोर उभी राहिली ती आणि तिचे डोसे, चटणी पण... +१११११११११११११

कमेन्ट्बद्दल सर्वांचे मनापासून आभार.
तब्येत खूपच सुधारली आहे आता. तुम्ही सर्वानी विचारपूस केली त्याने खूप छान वाटलं. Happy
बरेच दिवस झाले काही लिहिण्यासारखं घडलं नाहीये त्यामुळे इथे नव्ह्ते. बाकी काही नाही.

विद्या.