असमान

Submitted by सेन्साय on 31 May, 2018 - 06:46

.

.

काहीतरी एक समान धागा जुळल्या शिवाय मैत्री होत नाही असे म्हणतात.
मग भलेही दोन वेगळ्या दिशेने जाणारे काटकोनातील प्रवाह ज्या एका बिंदुला एकमेकास छेदतात तो सामायिक असल्याने निव्वळ त्याच एका गोष्टीमुळे त्यांची नाळ एकमेकांना बांधून ठेवली जाते. मृदुला आणि मुकेशची मैत्री अश्याच एका बिंदुपासून सुरु झाली.

दोघेही कमालीचे चिडखोर, हेकेखोर पण तितकेच स्वतःची चूक कोणी मुद्देसुदरित्या (खरं तर मुत्सद्दीरित्या) पटवून दिल्यास प्रांजलपणे मान्य करून सुधारण्यासाठी आवश्यक ते प्रयास करण्याची धडपड, हांच काय तो दोघांमध्ये कॉमन फॅक्टर होता. पण हां एक गुण सोडला तर बाकी इतर बाबतीत कुत्रा मांजराप्रमाणे त्यांचा ३६चा आकड़ा असायचा आणि ह्याचमुळे कित्येकदा त्यांच्या LOCवर मात्र शाब्दिक गोळीबारानी जम्मू काश्मिरपेक्षाही थोड़ाफार जास्तच तणाव असायच्या.

मृदुला ही श्रीमंताघरची लाडावलेली एकुलती एक लेक ! अपवादानेच नियम सिद्ध होतो ह्याचेच प्रत्यक्ष उदाहरण म्हणून तिच्या व्यक्तिमत्वात विधात्याने बुद्धि अन् सौंदर्याची अमर्याद उधळण केलेली. राहण्यात वागण्यात टापटिपपणा एवढा की स्वतः तो शब्द सुद्धा हिला बघितल्यावर अस्तित्वात आल्यासारखा वाटावा. ड्रेस सेंस बाबत भयंकर जागरूक आणि मॉडर्न ट्रेंडला सहज अंगिकारत आपले व्यक्तित्व अधिक खुलवणारी ही यौवना असली तरी सभ्यतेच्या सर्व मर्यादा कायम पाळणारी आणि अंगप्रदर्शन टाळूनसुद्धा प्रचण्ड आकर्षक दिसणारी अफलातून कॉम्बो होती.

ह्याच्या नेमकी उलट परिस्थिती मुकेशची होती. कमालीचा अजागळपणा आणि मॅचिंग कशासोबत खातात ह्याचा दूर दूर पर्यंत अजिबात संबध नसलेला अवतार म्हणजे हां मुकेश ! उपजत पुरुषी सौंदर्य आणि पहिल्याच नजरेत ठासुन दिसणारे ते कमावलेल्या शरिरयष्टीचे भारदस्त व्यक्तिमत्व, ही त्याची बलस्थाने होती. फार गरीब नाही पण मध्यम वर्गीय बॅकराउंड असल्याने पैसे मोजूनमापुन वापरायची आधीपासून असलेली सवय आज पाच आकड़ी पगार कमावतानाही तशीच शाबूत होती.

ऑफिसच्या एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी ह्या दोघांची वरिष्ठांकडून थेट नेमणूक झाली अन् प्रोफेशनल दृष्टिकोन ठेवत दोघांनीही आपापल्या LOCवर तात्पुरती संघर्षबंदी परस्पर वागण्यातूनच न बोलता जाहिर केली. दोन महिन्याचे हे काम म्हणजे एकमेकांना ६० दिवस शांततेत झेलण्याचे खुप मोठे आव्हान होते. मात्र हे आव्हान थोड्याच दिवसात एक अनाहूत हुरहुर लावणाऱ्या ओढ़ीमध्ये कसे बदलले हे त्यांचे त्यांनासुद्धा कळलेच नाही.

मैत्रीचे अंकुर फुलवत रुजलेली प्रितीची वेल ह्या दोन महिन्यात हळूहळू दोघांच्या भावविश्वाला एकत्र बांधत दोन विरोधी मने एकत्र गुरुफटवत राहिली. परस्पर पूरक बौद्धिक प्रगल्भता आणि चूक उलगडून दाखवायची सुंदर हातोटी अन् अर्थात समोरच्याला दिलेली सुधारण्याची संधी; ह्या गुणाचा दोघांकडून उचित आदर केला गेला आणि प्रेम नावाच्या वैश्विक चुंबकाकडे ही दोन लोखंडी मने एकाच वेळी आकर्षिली गेली.
मात्र चुंबकाच्या सतत सान्निध्यात राहून लोखंडी खिळासुद्धा चुंबक बनतो आणि वैश्विक नियमांनुसार चुंबकाचे विजातीय ध्रुव जरी आकर्षणामुळे एकत्र येत असले तरी सजातीय ध्रुव एकमेकास प्रखर विरोध दर्शवत एकमेकांपासून दूर लोटले जातात.

ईथेही मैत्री - प्रेम - लग्न अश्या टप्प्यावरुन बदललेले नाते सुरुवातीस विजातीय ध्रुवाप्रमाणे घट्टपणे आकर्षीली गेलेली मने लग्नानंतर मात्र माझा लाईफ पार्टनर ह्या एका समान नावाने अन् अपेक्षेने सजातीय ध्रुवात अलगद बदलून गेली.

तिला ह्याचा बाहेर फिरायला जातानाचा अजागळपणा अचानकपणे बोचु लागला तर त्याला किचनपेक्षा तिचा मेकअपसाठी जाणारा वेळ टोचू लागला. एकमेकांचे व्यक्तिगत वागण्यातील विरोधाभास हां दोघांमधील असमान धाग्यांचा गुंता अधिक गडद करत गेला. हां गुंता सुटण्याची शक्यता अजिबात नव्हती कारण मन आणि मते असे दोन्हीही चुंबकाच्या फक्त अपकर्षणाची क्रियाच दर्शवत राहिली.

ह्या नात्यात नक्की काय पाहिले गेले ? खरंच ह्या दोघांना आयुष्यभरासाठी असे एकत्र येण्याची गरज होती का ? जीवनसाथी बनत असताना वैचारिक स्तरासह एकमेकांचे आर्थिक स्तर सुद्धा जवळपास सारखेच असावेत का ? की ह्या सर्व असमान धाग्यांना छेद देणारा समान धागा अतूट असला तर तेवढे पुरेसे असते !

मैत्री होणे, त्यातून पुढे प्रेम होणे ही प्रक्रीया खूप सहजगत्या घडते पण तिला हरेक परिस्थितीत टिकवणे खूप कठीण काम असते. जेव्हा दोघांचा विचार प्रवाह एका असमान विचारांवर येवून ठेपतो आणि जर कोणा एकाचीही समजून घेण्याची पात्रता नसेल तर भडका, वणवा पेटलाच म्हणून समजा. मग गैरसमज, मने कलुषीत होणे, अबोला आणि संपर्क तोडून राहणे हे ही घडते. ह्याचा शेवट काय, विभक्त होणे ― शरीर आणि मनाने. जगासाठी आता हे नाते दूरावते.

मग ह्या सगऴ्यात दोष कुणाचा ? परिस्थिती, समंजसपणाची कमतरता की समान पेक्षा असमान धागे जास्त आहेत ह्याची आलेली प्रचिती ??

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अंकु Happy
बहुतांश प्रचिती ही अनुभव घेतल्यानंतरच येते. मग अश्या वेळी अजुन काय वेगळा पर्याय सुचवू शकेल का कोणी !

धन्यवाद अधांतरी Happy
दोन्ही बाजू समंजस असतील तर सोन्याहुन पिवळे ! मात्र अनेकदा हां लग्नाआधी असलेला / दाखवलेला नात्यातील समंजसपणा एकत्र आल्यावर कमी पडू लागतो अन् आपापसात खटके उडण्याचे प्रमाण वाढीस लागते असे अनेक प्रकरणात दिसून येते. वेळीच एकाने जरी पुनः समंजसपणा दाखवला तर ताणलेला रबर पूर्वस्थितीला येवू शकणारा असतो पण .... !

छान लिहिलंय नेहमीप्रमाणे Happy

ह्या सगऴ्यात दोष कुणाचा ? परिस्थिती, समंजसपणाची कमतरता की समान पेक्षा असमान धागे जास्त आहेत ह्याची आलेली प्रचिती ??>>> माझ्यामते हे सर्व मुद्दे तर आहेतच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातील प्रेम कुठेतरी कमी पडले किंवा प्रेम नव्हतेच फक्त ओढ असावी.

आपण कधी कुणाच्या प्रेमात पडू हे बरेचदा आपल्याला कळतच नाही, अचानक एक दिवस जाणीव होते की आपण प्रेमात आहोत.

पूर्वीच्या काळी पदरी पडले अन पवित्र झाले या उक्तीनुसार एकदा लग्न झाले की इच्छा असो वा नसो, मनाविरुद्ध का असेना पण संसार केला जायचा, मने जुळो वा न जुळो, एकदा लग्न केले की ते आयुष्यभर टिकवायचेच , असे संस्कार. पण आता परिस्थिती बदल्लीय. स्त्री-पुरुष दोघांना स्वतंत्र मते आहेत. अन घटस्फोट सुद्धा खुप कॉमन झालेत. बळजबरीचे संसार करण्यापेक्षा वेगळे होणे चांगलेच आहे.
अन म्हणूनच फक्त प्रेम आहे म्हणून लग्न करून नंतर वेगळे होण्यापेक्षा सर्व बाबींचा डोळसपणे विचार दोघांनाही करणे आवश्यक आहे. अन जर दोघात असमान मुद्दे जास्त असतील तर ते काही लग्नानंतर अचानक उगवणार नाहीत , तर त्यामुद्द्यांवर तोडगा काय असेल हेही लग्नाआधी च ठरविलेले बरे.
प्रत्येक व्यक्ती मध्ये गुण अवगुण दोन्ही असतात. जेव्हा आपण एखाद्या ला त्याच्या अवगुणा सोबत स्वीकारतो तेव्हा अर्धी बाजी मारली समजा कारण बाकीचे सर्व तुमच्या एकमेकांवरच्या प्रेमाने सावरता येते.
अन सर्वात महत्त्वाचे, काहीही होवो, मी तुझ्या सोबत आहे, तुझ्यासाठी आहे , मी तुझ्याशी कधीच खोटे बोलणार वा वागणार नाही, नेहमी प्रामाणिक असेन ही जाणीव जर वेळोवेळी दोघांनी एकमेकांना करून दिली तर आयुष्याचा खडतर प्रवास सुकर होऊ शकतो, अन प्रेमही वाढते.

धन्यवाद VB प्रतिसाद आवडला.
__________________

@भरत, मला तो शब्द छाप पाडणारे आकर्षक पुरुषी व्यक्तिमत्व ह्या अनुषंगाने अभिप्रेत होता. अर्थ चुकीचा निघत असेल तर कृपया योग्य शब्द सुचवावा Happy

अतिशय टोकाचा विचार वाटू शकेल पण आजकाल माझं हेच मत झालंय कि

स्त्री आणि पुरुष हे एकत्र राहण्यास अनुकूल बनलेच नाहीयत. एकत्र आले कि ती युद्धभूमीच बनून जाते!
यापुढे हुशार स्त्री, पुरुष लग्न करणार नाहीत. मूल जन्माला घालणे आणि एकत्र वाढवणे एवढयापुरताच करार करतील. इतर वेळी एकमेकांसोबत फ्लॅटमेटसारखे राहतील किंवा वेगवेगळ्या घरात राहतील.

खरंय अॅमी
अश्या प्रकारे राहण्याची पद्धत रूढ़ चालीरिती अन् धर्मशास्त्रा विरुद्ध वागणूक घडणार असली तरी सध्याची अनेक विस्कळीत लग्न पाहता हां मुद्दा कदाचित पुढे जोर पकडेल ह्याचीही शक्यता आहेच.

<<< स्त्री आणि पुरुष हे एकत्र राहण्यास अनुकूल बनलेच नाहीयत. एकत्र आले कि ती युद्धभूमीच बनून जाते! >>>
इतके सरसकट विधान मी तरी करणार नाही.
बाकी चालू द्या.