प्रवाहपतित

Submitted by सेन्साय on 29 May, 2018 - 10:38

प्रवाहपतित (भाग -१)
________________

.
'मन समुद्रासारखं ठेवा
नद्या स्वत:हून तुम्हाला भेटायला येतील.....!'
■ Good Morning ■

आमच्या ग्रुपमधल्या ईमरान हाश्मीचा अर्थात रोहनचा सकाळी सकाळी व्हाट्सअप आला, आणि मन एकदम पार भुतकाळात शिरून कॉलेज कट्टयावर जावून विसावले.

एफवायजेसी मधील पावसाळी सुरुवात ! त्यादिवशीसुद्धा हे महाशय नेहमीसारखेच पाय फैलावून किंग साईज विल्स शिलगावून बाप मिळकतीच्या कावासाकिवर पहुडले होते. 'श्रावण मासी हर्ष मानसी' अश्या वातावरणात, येणाऱ्या प्रत्येक नवीन हिरवळीवर बारीक लक्ष ठेवून शेरेबाजी सुरु होती. बरोबरच आहे म्हणां, हीच ती सोईची वेळ तिच्या येण्याची अन् ह्यांच्या शायनिंगवाल्या नवनवीन फंड्याची ! नेहमी सारखं आजसुद्धा फिजिक्स प्रॅक्टिकलला बंक मारून त्याची आर्ट्सच्या फूलपाखरांसोबत गुफ्तगू सुरु होती. खुप वेळ वाट पाहुनसुद्धा 'ती' आलीच नाही म्हणून आजची सगळी सेटिंग वाया गेल्याने हां वैतागलेला. म्हणजे आमची मिसळपावची पार्टीसुद्धा कॅन्सल झाल्यातच जमा होती तर !

शालिनी म्हणजे सर्वांसाठी एक मिडल क्लास, नाकासमोर चालणारी मुलगी असली तरी रोहन आणि निखिलसाठी मात्र होती एक जिंकायला कठीण अशी ह्या सेमिस्टरसाठी लावलेली पैज ! खरं तर ती एक परफेक्ट ' एम.एम.' होती पण तितकीच आपल्या तत्वांशी जरा जास्तच प्रामाणिक वाटायची. कधी कोणा मुलासोबत बोलणं तर नाहीच पण साधं वर्गातील मुलांच्या बेंचच्या रांगेकडे बघणेसुद्धा कटाक्षाने टाळायची. कदाचित म्हणूनच हे असे कठिण टास्क ह्या दोघा रोमिओनी पैजेसाठी निवडलेले होते.

काळभोर कमरेपर्यंत रुळणारे लांब केस घट्ट बांधून पुस्तकं दोन्ही हाताच्या घडीत कवेत घेतल्यागत भरगच्च दुपट्टयाच्या आड़ अतिशय संयमी चालणे अन् प्रत्येक पावलागणिक झंकारणारा तो पैजणांचा अक्खा कॉरिडोर भरून पसरलेला मधुर नाद हीच तिची येण्याची खुण असायची. तिच्या आगमनाने प्रत्येक मुलगा जणू वेगळ्या विश्वात हरवल्यागत अगदी स्तब्ध होवून जायचा. अन् तरीही त्या भारावलेल्या अवस्थेत तिच्या त्या जवळून जाणाऱ्या अस्तित्वाच्या आठवणी हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवायला कसोशीने धड़पडायचा. पौराणिक कथेतील कोणा राजकुमारीच्या गंधित तनुची सत्यता आज तिच्या सहवासातील प्रत्येकजण चंदनाचा श्वास घेवून प्रत्यक्ष अनुभवत होता. अप्सरेलाही लाजवेल अश्या तिच्या मोहक हास्याने तर अनेकांच्या किमान चार पाच हार्ट अटॅकच्या फेऱ्या दिवसातून ठरलेल्याच असायच्या. तिची वर्गात येण्याची चाहूल म्हणजे अनेकांसाठी मुंगेरीलाल के हसीन सपने स्टाईलमध्ये मनात एकच कड़वे रोज आळवलं जात असे ―

समुद्र किनाऱ्यावर दिसते
ती गोड लाट पाण्याची,
संदेश वाहिनी असावी का ?
ती भेट, माझ्या प्रेमाची ..

कॉलेजमधील प्रत्येक मुलगा जिची एक झलक पहायला मिळावी म्हणून उगिचच काहीही कारण काढून आमच्या वर्गासमोरून एकतरी चक्कर लगावायचा तिथे आमच्याच बॅचमधला शुभम् मात्र ह्या सगळ्याला अपवाद असल्यागत अन् आपल्याच दुनियेत मश्गुल राहत चक्क अभ्यास करायचा. हिच्या बाजूच्याच बाकावर बसूनही फक्त समोरचा फळा आणि आपली वही ह्याव्यतिरिक्त ह्या पट्ठयाचे कुठे इतरत्र लक्ष नसायचे हे विशेष !

त्यादिवशी मात्र आयुष्यात पहिल्यांदा शुभम् स्वत:हुन शालिनीकडे काहीतरी बोलला आणि त्या वेलकम पार्टीच्या नोटिशीचे निमित्त पुढे घडणाऱ्या महाभारताची नांदी ठरली ....
.

.
― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो च्रप्स क्रमशः आहे
हां पहिला भाग (सुरुवात) आहे
________________________

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार Happy

हा जो टिपिकल 'परफेक्ट एम.एम.' प्रकार आहे तो सध्या ४०+ वय असलेल्यांचा आहे कि आजकालची तरुण मुलं पण याच प्रतिमेत अडकली आहेत?

सिरियसली?? पैंजण!!!

मन में गिटार बज सकती है तो पैजण क्यों नही Wink एक्च्युली ते पिन ड्रॉप सायलन्स संबधी लिहिलं होतं म्हणून तो शब्द आलाय !

प्रतिसादाबद्दल धन्यवाद अॅमी Happy

समस्त फेमिनिस्ट मंडळींना आग्रहाचे निमंत्रण.

सदर कथेमध्ये एका चालत्या बोलत्या, सुंदर अश्या व्यक्तीला टास्क किंवा जिंकण्यासाठीची एक वस्तू असे संबोधित करण्यात आले आहे. अर्थात, लेखक महोदयांची यात काहीएक चूक नाहीये असे मला प्रामाणिकपणे वाटते. लगी शर्त, इसको पटा के दिखा... असं यामाहा rx 100 वर बसून 90 च्या दशकात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आदी मंडळी म्हणत असत आणि तेच इथे मांडले गेले आहे..

बाकी संदेश वाहिनी वर थोडासा हसलो.

पुढच्या भागाची वाट बघतोय, कथा वाचायला आवडेल पुढे!

Happy धन्यवाद राव पाटील

बहुतेक हल्ली सुद्धा असे अक्षय कुमार दिसू शकण्याची शक्यता आहे. कदाचित शाळेपासूनच (जे आमच्यावेळी कॉलेजला दिसायचे)