एटलस सायकलीवर योग यात्रा १: प्रस्तावना

Submitted by मार्गी on 23 May, 2018 - 13:07

१: प्रस्तावना

नमस्कार!

नुकतीच मी एक सायकल मोहीम पूर्ण केली. योग प्रसारासाठी सायकल यात्रा अशा मोहीमेत सुमारे ५९५ किलोमीटर सायकल चालवली आणि ठरवल्याप्रमाणेच ही मोहीम पूर्ण झाली (फक्त काही कारणामुळे एक टप्पा कमी झाला). मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात कार्यरत 'निरामय योग प्रसार व संशोधन संस्था' तसेच तिच्या कामाचा झालेला विस्तार ह्या संदर्भात हा प्रवास होता. परभणी, जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काम करणारे योग साधक, योग शिक्षक ह्यांच्याशी ह्या प्रवासात भेटलो. आता त्याविषयी सविस्तर लिहिणार आहे.

पहली गोष्ट म्हणजे कोणत्याही विषयाचा प्रसार करायचा असेल, तर अनेक मुद्दे येतात. प्रत्यक्ष केलेला प्रसार नेहमीच प्रभावी ठरेल, असं नाही. अनेक लोक अनेक वेळेस आग्रह केल्यानंतर एखादी गोष्ट करतात. पण हे सगळ्यांनाच लागू पडत नाही. माझं स्वत:चं उदाहरण हेच की, मला एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह केला तर मी त्या विषयापासून शक्यतो लांबच गेलो आहे. त्यामुळे योग प्रसार ही इतकी सरळ बाब नाही. प्रत्यक्ष प्रसाराच्या ऐवजी अप्रत्यक्ष प्रसारावर माझा जास्त विश्वास आहे. कोणाला योग करा, असं सांगण्याऐवजी तो स्वत: करण्यावर जास्त विश्वास आहे. आणि ह्या प्रवासात ते बघायलाही मिळालं. ही एक सायकल मोहीम होती आणि सायकल वापरा हा संदेश व सायकल प्रसार हा मुद्दासुद्धा त्यातील एक अंतर्गत भाग होताच. मी कोणालाच म्हंटलं नाही की, सायकल चालवा. पण प्रत्येक ठिकाणी काही लोक स्वत:हून सायकल चालवताना दिसले. त्याशिवाय प्रत्येक ठिकाणी योग- साधकांसोबत खूप छान भेटी झाल्या. योगाचा एक अर्थ जोडणे असा आहे आणि ह्या पूर्ण प्रवासात अनेक लोकांसोबत मी जोडला गेलो. प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांच्या टीममध्येही नवीन लोक कुठे कुठे जोडले गेले. ही सायकल यात्रा त्यांच्या जोडलं जाण्यासाठी एक माध्यम बनली. अप्रत्यक्ष व अपरोक्ष प्रकारे योगाला चालना मिळाली. एक सायकलवर आलेल्या प्रवाशाला भेटून काम करणा-या कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला. ह्याचं श्रेय सायकलला जातं, त्यामध्ये असलेल्या इनोव्हेशनला जातं.

 

ह्या सायकलीची तयारी करताना

प्रसाराबद्दल दुसरी गोष्ट म्हणजे एकाने मला असंही विचारलं की, जर योग प्रसार करायचा आहे, तर त्यासाठी सायकल कशाला चालवतो, सरळ योग प्रसारह का करत नाही? अगदी बरोबर आहे हेसुद्धा. एका अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. अनेक लोकांचा असा विचार असू शकतो व त्यांच्या ठिकाणी ते बरोबरही आहे. पण मला वाटतं की, कोणताही विषय समोर घेऊन जाण्याचे अनेक मार्ग असतात आणि असले पाहिजेत. वेगवेगळ्या पद्धतीने विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमातून व साधनातून हा विषय लोकांपर्यंत गेला पाहिजे. आणि प्रत्येकाची आवड असते. दुसरी गोष्ट अशी पण आहे की, सायकलिंग हे मी योगाला समांतर आहे, असं अनुभवलं आहे. त्याविषयी विस्ताराने बोलेनच. असो.

... ११ मे ला परभणीतून प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी अनेक दिवस निरामयच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा होत राहिली. हळु हळु रूट ठरला. सगळ्यांशी संपर्क झाला. एखाद्या संस्थेसोबत आणि एखादा विषय घेऊन सायकलिंग करण्याचा माझ्यासाठी हा पहिलाच प्रयोग असेल. माझी ही पहिली सायकल मोहीम असेल ज्यामध्ये मी फक्त सायकलिंगच नाही तर त्यासोबत इतरही काही‌ करण्याचा प्रयत्न करेन. सोलो सायकलिंग असलं तरी प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत अनेक लोक असतील. त्यासाठी सर्व प्रकारे तयारी केली. माझे मागच्या योग ध्यान- सायकल यात्रेच्या वेळचे टी- शर्टस व सायकल बॅनर ह्यावेळीही उपयोगी पडतील. संस्थेद्वारेही काही तयारी करण्यात आली. आणि प्रत्यक्ष सायकलिंगचा भाग म्हणून जुन्या एटलस सायकलवर काही प्रॅक्टीस राईडस केल्या. तेव्हा जाणवलं की, ह्या सायकलीवर आरामात ४ तासांमध्ये ५५- ६० किलोमीटर जाता येऊ शकेल. रोज सकाळी साडेपाचला सुरू करून जास्तीत जास्त साडेदहा- अकरा वाजेपर्यंत चार- पाच तास सायकल चालवेन. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि माझ्या प्रवासात मला बरेचसे वाईट रस्तेही लागतील. त्यामुळे सायकलची नीट सर्विसिंग करून घेतली व नवीन टायर आणि ट्युब्ज टाकले. पंक्चर होणार नाहीत, असे जाड टायर टाकले. पण जाण्यापूर्वी एक दिवस जेव्हा छोटी राईड केली, तेव्हा सायकल जड झाली आहे, असं जाणवलं. नवीन टायर्समुळे काही दिवस असं वाटेल व नंतर टायर्स एडजस्ट होतील, अशी स्वत:ची समजुत काढली.

१० मे च्या रात्री अजिबात झोप आली नाही. मी आजवर जितकं सायकलिंग केलं आहे, ते बघता माझ्यासाठी ही कठीण किंवा आव्हानात्मक मोहीम नाही आहे. पण तरीही एक प्रकारचं नावीन्य आहे. सकाळी लवकर उठून जायचं आहे. कदाचित ह्या कारणामुळे झोप लागलीच नाही. मी पूर्वी जेव्हा अर्ध मॅरेथॉन धावलो होतो, तेव्हाही असंच झालं होतं. सकाळचा प्रसंग इतका मोठा आहे, की त्यामुळे मन फार सजग होऊन जात असावं- कॉन्शस होत असावं. आणि जेव्हा इतकी सजगता असेल, तेव्हा झोप येतह् नाही. कारण झोपेसाठी सजगता कमी असली पाहिजे. सजगता किंवा जागरूकता हीसुद्धा एक प्रकारची ऊर्जा आहे. जेव्हा एखाद्या कारणामुळे- एखाद्या प्रसंगामुळे किंवा एखाद्या दु:खद घटनेमुळे आपण खूप सजग होतो, तेव्हा झोप लागतच नाही. सजगता हीसुद्धा एक ऊर्जा आहे आणि जर ही ऊर्जा फार जास्त झाली तर झोप येत नाही. तसेच ही उर्जा फार कमी झाली, तरीही झोप येत नाही जसं खूप जास्त थकल्यावरसुद्धा झोप लागत नाही. हे असं बघता येईल की, आपल्याकडे काही विशिष्ट पातळीपर्यंतच सजगता ठेवण्याची क्षमता असते. काही जणांना स्टेजवर जाऊन भाषण करता येत नाही. कारण स्टेजवर गेल्यावर खूप लोकांचे डोळे आपल्याला बघतात; सजगता एकदम वाढते. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे लहान मुलाकडे लक्ष देणं हे त्याचं एक प्रकारचं पोषण असतं. सायकल चालवतानाही अनेकदा बघितलं आहे की, खूप थकतो तेव्हा समोरून येणा-या जाणा-यांकडे नजर देणंही कठीण होतं. असं बघण्यातही ऊर्जा जाते. एकदा तोरणमाळला सायकलवर जात असताना थकल्यामुळे सजगता इतकी कमी झाली होती की, येणारं तोरणमाळ आहे की दुसरं हिल स्टेशन ही जाणीवही उरली नव्हती. असो. पण ह्या कारणामुळे झोप लागली नाही. जणू समोर खूप मोठा दिवा ठेवल्यानंतर अंधार होणारच नाही.

११ मे ची पहाट. अगदी थोडी झोप झाली आहे. तरीही लवकर तयार झालो. आधी अनेक सायकल मोहीमा केल्या असल्यामुळे सामान बांधणं, कमीत कमी सामान घेणं, आहार काय घ्यावा, ह्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत. पहाटे सव्वा पाचला निरामय संस्थेमध्ये पोहचलो. अंधारातच काही जण मला निरोप द्यायला आले आहेत. त्यांच्या शुभेच्छांमुळे उत्साह वाढला. उजाडत असताना सायकल सुरू केली. एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली! ही योग- यात्रा व सायकल यात्रा तर असेलच, पण बाह्य नाही तर एक अंतर- यात्रासुद्धा असेल. पहिल्या दिवसाची चर्चा पुढच्या लेखात करू.

 आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी‌ इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.

निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!

पुढील भाग: परभणी- जिंतूर- नेमगिरी (५५ किमी)
माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत: www.niranjan-vichar.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults

वाह खूप खूप अभिनंदन!!!
पुणे मुंबई हा प्रदेश सोडून भटकंती/योग प्रसार/सायकलिंग केल्या बद्दल अतिप्रचंड अभिनंदन !!!!!!!!

पुढील भाग लवकर येऊ देत