क्षणभर विश्रांती

Submitted by सेन्साय on 22 May, 2018 - 07:33


.

क्षणभर विश्रांती
~~~~~~~~~~
.

अनेक वेळा हमरस्त्यावर कुठेनाकुठे वाचायला मिळणारे हे हमखास दोन शब्द ! पण ह्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात खरंच करतो का ?
काही सेकंदाचा पॉझ म्हणजेच ही क्षणभर विश्रांती असली तरी नक्की त्या पॉझसाठी कायकाय निमित्त असावे किंबहुना असायला हवे हे महत्वाचे ठरते.

आजच्या मॉडर्न जमान्यात स्त्री पुरुष समानतेचे कितीही मोठ्याने नारे लावले अन् ८ मार्चला भले भले बॅनर उभारले तरी निसर्ग नियमानुसार काही मुलभुत शारीरिक फरकांमुळे स्त्रियांना कायम थोडं बचावात्मक पावित्र्यातच रहावे लागते. समानतेच्या कितीही गप्पा रंगल्या तरी अमुक अमुक वाजल्यानंतर किंवा कमी रहदारीच्या रस्त्यावर तिला सावध असावेच लागते. असं का ?

का नाही हे पुरुष आपल्या डोळ्यांना अन् भावनांना देवू शकत क्षणभराची विश्रांती ! एक छोटासा पॉझ ― त्या तिथून सुखरूप सुरक्षित ठिकाणी जाइपर्यन्त ! निर्जन स्थळी एकटी असणारी स्त्री जर ह्या विश्रांतीमुळे त्या विविक्षित नजरेला दिसलीच नाही तर का बरं कोण म्हणेल तिला अबला ! अन् तिने प्रत्येक क्षेत्रात सड़ेतोड कर्तुत्व सिद्ध केले असताना का बरं म्हणवून घ्यावे असे अबला !

ह्या जगात वावरताना स्त्रियांना अनेक प्रकारच्या पुरुषाना (पुरुषी अहंकाराला) तोंड द्यावं लागतं आणि त्या मोठ्या चतुराईने पुरुषांच्या ह्या नजरेला /स्वभावाला स्वतःच्या नैतिकतेत राहून , कधी सश्याप्रमाणे तर कधी वाघिणीप्रमाणे सामोरे जात आपापली दिनचर्या निभावत असतात. अनेक पुरुष आपल्या पुरुषी (!) स्वभावाचे दर्शन ह्या ना त्या कारणाने करत राहतात ,आपली छाप पडावी म्हणून हर तऱ्हेने प्रयत्न करत असतात.

घराजवळ ,रस्त्यात ,नाक्यावर ,बसमध्ये, ऑफिसमध्ये, दुकानात, सिनेमागृहात, हॉटेलात, जॉगर्स पार्कमध्ये, प्रवासात तसेच अडचणीच्या प्रसंगी, आनंदाच्या प्रसंगी, लहानपणी, तरुणपणी, म्हतारपणी, जागे असताना, झोपेत असताना अश्या अनेक ठिकाणी पुरुष आपले अस्तित्व दाखवत असतात ,कळत नकळतपणे त्यांच्या ह्या अस्तित्वाची दाखल घ्यावीच लागते जी अतिशय क्लेशकारक अन् मनस्ताप वाढवणारी ठरते. स्त्रियांची उपजत दैवी देणगी असलेली ज्ञानेंद्रिय प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे अश्या प्रयत्नांची दखल घेत असते आणि त्यानुसार त्याला प्रतिक्रिया / प्रतिसाद (खरं तर प्रसाद) देत असते.

जन्मापासून मरेपर्यंत स्त्रीला ह्या नजरेचा सामना करावा का लागतो ? कदाचित मेल्यावर सुद्धा अश्या नजरा पुरुषी अस्तित्व दाखवत असतील !
हे पुरुषी नजरेचं अस्तित्व नाहीसं व्हावं, निदान अश्या नजरा क्षणभर तरी कमी व्हाव्यात अन् जरा उसंत मिळावी अश्या नजरेंपासून ही प्रत्येकीची इच्छा असावी इतपत वाईट परिस्थिती झालीय का सध्या ?

म्हणून आता कल्पना करू की असे सर्व पुरुष क्षणभर विराम करतायेत आणि त्यांची ही अशी नजर लोप पावलीये काही काळाकरता, निदान क्षणाकरता ...
तो क्षण कसा असेल ?
तो क्षण ह्या विश्वातला सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा असा क्षण असेल का ?
वैश्विक पातळीवर स्त्रिया सुटकेचा श्वास घेतील का त्या क्षणी ?
स्त्रियांचं जग बदलेल का ?
स्त्रिया भयमुक्त होतील का ह्या पुरुषी अस्तित्वापासून ?
खरंच मिळेल का अशी क्षणभर विश्रांती !!

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद शाली Happy
क्षणभरांची सुरुवात होणे आवश्यक आहे अन् ही आवश्यकता मनात रूजेल, पटेल तो क्षण महत्वाचा !