चाळीतल्या गमती-जमती (१९)

Submitted by राजेश्री on 19 May, 2018 - 21:19

चाळीतल्या गमती-जमती (१९)

इंदू आजी आमच्या तायडीला प्रेमाने जयू म्हणायला लागल्यापासून या जगात कधीही काहीही होऊ शकत या गोष्टीवर माझा ठाम विश्वास बसू लागला.प्रकरण एवढ्यावरच थांबलं असत तर चालल असतं याही पुढे जाऊन चक्क इंदू आज्जी सोवळं ओवळ वैगेरे मोडून आमच्या घरी ये जा करू लागली.नाय बसत मी उभी ठीक हाय हे वाक्य दहा वेळा म्हंटल्यावर मम्मीने बसा हो बसा हो म्हणणं कितपत संयुक्तिक आहे वाटून मला इंदू आज्जी बरोबर मम्मीचाही राग येऊ लागला.मी मधेच रागाने मम्मे अस अचानकच ओरडू लागले.मम्मी मला डोळे वटारून शांत बसवू लागली.पण आज कुणाचाही राग आला तरी रागाने मम्मे म्हणायची सवय आजतागायत गेली नाही याला इंदू आज्जीच्या वरचा माझा राग कारणीभूत आहे.
जगात अपने पराये कोण आहे समजत नसलं की होत अस. पण अमक्याला दिली ओसरी अमका हातपाय पसरी म्हणीसारख इंदू आज्जी आमच्या घरात येऊन चक्क खाली मांडी घालून बसू लागली मग मी विचार केला आता मम्मी हिला 'आता कलंडा वाईच' म्हणेना म्हणजे बर नायतर मला ,नाय कलंडत मी ,मी बसलेली ठीक आहे.हे वाक्य दहा दहा वेळा ऐकायला लागलं असत.राणीच्या आई सारख आता आमच्याच घरात येऊन मलाच नावे ठेवणारी ही दुसरी व्यक्ती होती.राणीच्या आई निदान मला मायडी तरी म्हणायच्या पण ही म्हातारी सारख राजी राजी म्हणत राहायची.स्वतःच्या नावाचा असा अपभ्रंश ऐकायला माझे मन काही केल्या राजी होत नव्हते.म्हातारी आली की ती ज्या जागेवर रोज बसते त्याच जागेवर मी जाऊन बसू लागले.तर ही महाराणी येऊन राजे,हू दूर तिकडं म्हणत मला हुस्काऊ लागली.लहान मुलाला म्हणतात ना भुर्रर्र उडून जा तस मला वाटत होतं.मी तिला आमच्या घरातून हुसकवायला मोठ्या आवाजात तळ्याकाठी गाती लाटा... लाटेवर ऊभे झाड...झाडावर धिवराची...हाले चोच लाल जाड ही कविता तार स्वरात म्हणू लागले.त्याला तिने दाद लागू दिली नाही की मी घरातच बॅट बॉल ने खेळून बॉल तिच्या डोक्यावर उडवू लागले.तरीही एकदा का बॉल तावडीत आला की ती पाटाखाली लपवून ठेऊ लागली.ती येऊन बसली की मी साळूता घेऊन तिच्या रोखाने उलट्या दिशेने घर लोटू लागले.ती तिथेच तोंडावर पदर घेऊन बसून राहायचो.म्हातारी खूप निगरगट्ट होती आमच्या घरातून हालायची नाहीच.मीच काय तर आमचे शेजारी पाजारी देखील सारी गल्ली देखील म्हातारी आणि आमचे भांडण कसे होत नाही म्हणून आश्चर्य व्यक्त करू लागले.मला अवघे जीवन निरस वाटू लागले...

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
२१/०४/२०१८

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@व्यत्यय नाही तो आकडा टाकायला चुकलाय आता पुढचा १९ असेल .हे भाग लिहून पूर्ण आहेत फेसबुक वरचे ते इथे टाकतेय एका आकड्याचा घोळ झालाय ते तो खाऊन टाकला