चाळीतल्या गमती-जमती (१६)

Submitted by राजेश्री on 17 May, 2018 - 21:41

चाळीतल्या गमती-जमती

इंदू आज्जी बरोबरचे चौथे महायुद्ध...

आमची तायडी मम्मीला माझं नाव सांगेल या भीतीने मी इंदू आज्जींच्या घरावर दगड भिरकवायचे बंद केले असले तरी इंदू आज्जी मी तिला तिच्या घरावर दगड भिरकवणार्या आरोपीला पकडायला केलेली मदत (ती आरोपी मीच होते हे तिला कुठं माहीत होतं. तिने स्वतःच सुन्याचा गुन्हा मान्य केला होता.माझ्या लेखी गुन्हा करो अथवा न करो तो तिने मान्य केला होता यालाच जास्त महत्व होते.)ती लगेच काही दिवसात विसरली आणि पुन्हा माझ्या नावाने तिचा शिमगा सुरू.राजीच हे अस,राजी अशीच द्वाड आहे,राजी पोरांसारखी शर्ट पॅन्ट काय घालती,खी खी दात काय काढत असती.एक ना दोन सारख जळी स्थळीं काष्टी आपलं मला दोष दिल्याशिवाय तिला अन्न गोड लागायचं नाहीच.
तायडी शांत आणि सहनशील आहे आणि तुमची दुसरी पोरगी लय कडू बेन आहे असा माझा तिने मम्मीकडे उल्लेख केला होता.तिच्या या उल्लेखाला खाली मान घालायला लावेल असे कृत्य एकदिवस तायडीकडून घडले.आणि तायडी पुढं आली की म्हातारीची बोलतीच बंद होऊ लागली.तायडीचे त्या दिवशीचे वागणे म्हणजे सौ सोनार की और एक लोहार की असेच होते.काय झालं त्या दिवशी दमा सांगतेय नवंका
आम्हाला उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष फार जाणवायचे. इतरवेळी खर्चाला बोअर चे पाणी लांबून हाफसून आणायचो.पण प्यायला एक दोन कळश्या तरी पाणी हवंच ना . पण इंदू आज्जीच्या कठोर जलनीती मुळे. आणि तिच्या सोवळं की ओवळ पाळायच्या अट्टहासामुळे आम्हाला पिण्याच्या पाण्याचेही वांदे होऊ लागले.घरात प्यायला पाणी नाही आणि इकडे म्हातारीची वाहून जाणारी घागर काढायची नाही या जाचक अटीमुळे तायडीने एकदिवस सविनय कायदे भंगाचा मार्ग पत्करला म्हणजे म्हातारीची ओसंडून वाहणारी कळशी तिने नळाखालुन काढली आणि बाजूला ठेऊन आमची कळशी नळाला लावली.घागरीच्या आवाजाने म्हातारी तडक बाहेर दाखल.आणि आपली कळशी हलवलेली बघून जे ती तारस्वरात ओरडायला लागली म्हणतासा की काय नव्हच.अग ये जये..... आमच्या तायडीचे नाव जयश्री.माझ्या घागरीला हातच का लावलास सांग म्हनून ती मोठ्या आवाजात ओरडू लागली.आर.. आर ..देवा....माझ सोवळं मोडलं की सुटलं म्हणत तिने अक्षरशः आकांत मांडला. तिच्या अश्या वागण्याने मी अक्षरशः थिजून ऊभा होते.आणि तायडीने एक घागर भरून नळाला दुसरी घागर शांतपणे लावली.मी विस्मयकारक रित्या पुढच्या घडामोडी काय घडतील यावर तोंड वासून आणि डोळे विस्फारून लक्ष ठेऊन होते.तायडीने नळाला दुसरी घागर लावलेली बघून म्हातारीने आपली भरलेली घागर भडाभडा ओतून रिकामी केली आणि आमची घागर नळाखालून काढायला पुढं सरसावली.तायडी पुढं झाली तिने म्हातारीचा हात घागरीपासून वेगळा करायला तिच्या हाताला हिसडा मारला.म्हातारीला पापजन्मात मी कधी हात लावयाच धाडस केल नव्हतं ते धाडस आमच्या तायडीने केलं.माझे डोळे मी विस्फारून विस्फारू तरी किती.माझ्या तोंडाचाही आ इतका मोठा झाला की त्यामध्ये एक टेनिस बॉल सहज जाईल.
म्हातारीला आपला हात पकडणं अनपेक्षित होत.शिवाय हिसडा मारणं तर त्याहून जास्त अनपेक्षित होत.म्हातारी संतापाने अक्षरशः खदखदू लागली.आणि थरथरत्या आवाजात...ये...जये... तुझा मू*दा बशिवला म्हणत ती तायडीच्या अंगावर चाल करून आली.मला काय करावं सुचेना मी जाग्यावरच थिजले होते.तायडीने इकडे भरलेली दुसरी घागर काढली आणि तिसरी घागर लावत आपल्या अंगावर चाल करीत आलेल्या म्हातारीला उजव्या हाताने मागे ढकलले की म्हातारी मागे बदकन खालीच बसली...पुन्हा म्हातारीचा संताप...पुन्हा ती चरफड... पुन्हा बडबड...प्रचंड आरडाओरडा... सभोवती बघतोय तर सारी गल्ली आमच्या घराभोवती जमली होती.तायडी शांतच...ती मला घायल मधल्या सनी देओल सारखी वाटत होती.चेहेऱ्यावर तेवढे रुद्ध भाव..हालचाल हत्तीसारखी..एक पाऊल टाकलं तर जमीन कंप पावेल असे तिचे पाऊल.मीच लय घाबरलो तिच्या रागापुढे .मी तेवढ्यातही म्हातारीची दया येऊन तिला म्हणाले आज्जी तुम्ही शांत बसा. शिव्या देऊ नका,पुढे जाऊ नका नाहीतर ती आणखी चिडेल..म्हातारी माझं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतीच.म्हातारी पहिल्या धक्क्यातून सावरली पुन्हा ओरडत,शिव्या देत तायडीवर चाल करून आली.तायडीचे आता दोन्ही हात रिकामे होते.तिने म्हातारीला दोन्ही हाताने ढकलले.म्हातारी तिच्या घराच्या उंबर्यात दोन्ही पाय वर करून उताणी पडली.तायडी प्रचंड चिडलेली ती म्हातारीच्या अंगावर धावून जाणार तोवर मला कसं सुचलं काय माहीत मी तायडीला मागून दोन्ही हाताने तिच्या पोटावर हातानी कवळा बांधला आणि प्रचंड ताकद लावून तिला उचलल आणि मागे ठेवलं.. दारातून आत तिला ढकलत घरात नेलं..दार लावून घेऊ लागले तायडी मला विरोध करून..राजू तू मधून उठ म्हणून माझ्यावरच ओरडू लागली.आमचं दार फळ्या फळ्याच .ते व्यवस्थित आणि लवकर काय मला लावता येईना.मी कसबस ते लावल.बाहेरून कढी घातली.तायडी सनी देओल वानी दरवाज्यावर धक्के देत होती.मी म्हातारीला उठून बसवली.ती अजूनही चरफडत होती.हे सगळं केवळ दोन मिनिटात घडलेलं नाट्य.पण हे नाट्य इतिहासात नोंद होईल असंच घडलं .संध्याकाळी आमची मम्मी गावावरून आल्यावर या घडल्या घटनेचा इतिवृत्तांत तिला खूप जणांकडून आणखी जास्त नाट्य वाढवून ऐकायला मिळाला.या नाट्यमय चित्रपटात पहिल्या भागातील खलनायक म्हणून इंदू आज्जी.दुसऱ्या भागात अँग्री यंग विमेन चा किस्सा म्हणजे तायडीचा किस्सा आणखी जास्त तेल तिखट मीठ लावून सांगितला गेला.या नाट्यात माझ्या स्थानाला मात्र उच्च स्थानी नेऊन ठेवण्यात आले.मी तिथे नसते तर काय झालं असत काय माहीत म्हणत माझ्या त्या भूमिकेला वाखाणण्यात आलं होतं.मला या नाट्याचा हिरो हे पद देण्यात आले.मम्मी तायडीवर प्रचंड म्हणजे प्रचंड चिडली.तिला सक्त ताकीद देण्यात आली.मम्मीने माझ्या कामगिरीबद्दल कंठातील हार काढून देतात त्या अकॅशन मध्ये आया माया की अला बला की काय करतात तस करून माझ्या गालावरून हात फिरवून कानशीलावर कडाकडा बोटे मोडली.कधीही चांगुलपणा या गुणाबद्दल खिजगणतीत नसलेली मी चांगुलपणाचा महामेरू बनले.चाळीतल्या पश्या,स्वप्नया, डॉली,दिदू,अव्या यांच्या साठी आमचे नाट्य नवीन खेळ झाला.हा खेळ खेळताना जो तो या खेळात मी मायडी ताई होणार म्हणू लागले.म्हणजे भांडणाच्या झटापटीत तायडीला मी कवळा घालून उचललं ती भूमिका प्रत्येकाला हवी असायची.मोठं झाल्यावर कोण होणार या प्रश्नावर आमच्या चाळीतील बाळगोपाळ मंडळी मायडी ताई व्हायचंय हेच उत्तर देऊ लागली.माझा आदर सगळी कडे वाढला अगदी कळसाला पोहचला.अशारितीने एका रात्रीत माझं भाग्य अस उजाडलं होत.

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
२०/०४/२०१८

Group content visibility: 
Public - accessible to all site users